mayajaal - 24 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल - २४

मायाजाल-- २४
काही दिवसांतच डाॅक्टर संदीपशी खूप जुनी ओळख आहे असं नीनाताईंना वाटू लागलं होतं. त्या विचार करत होत्या;
" नशिबानं इतकं चांगलं स्थळ चालून आलंय! प्रज्ञाला अगदी शोभतील असे आहेत डाॅक्टर संदीप! त्यांचा स्वभाव किती चांगला आहे! इतक्या तरूण वयात एवढं यश मिळवलंय पण त्यांना थोडाही अहंकार नाही!--- पण अगोदर प्रज्ञाशी बोलायला हवं! तिचं मन जाणून घेणं महत्वाचं आहे!"
रात्री त्यांनी प्रज्ञाला सगळं सांगितलं. " किती सुस्वभावी आहेत नं डाॅक्टर! त्यांचा स्वभाव मला खुप आवडला! खूप शिकलेले आहेत---- दिसायलाही देखणे आहेत! ते सुद्धा त्यांना शोभून दिसेल अशी मुलगी शोधत असतील नं? तू बहुतेक मनात भरली आहेस त्यांच्या! त्यांची नजर सतत तुला शोधत होती! तू घरी नाहीस, हे पाहिलं, आणि त्यांचा चेहरा उतरला --- तुला ते कसे वाटतात? ते नक्कीच परत येतील! पण त्यांचा स्वभाव पहाता ते स्वतः तुला विचारतील असं वाटतं नाही! ते प्रथम आमच्याशी बोलतील! किंवा त्यांच्या आईला बोलायला सांगतील! हा विषय निघालाच तर तुझं मत माहीत असलेलं बरं; म्हणून तुला विचारलं!" त्यांनी शेवटी मनातला विचार बोलून दाखवला.
"अाई! तुला माहीत आहे; सध्या मला या गोष्टींमध्ये जराही इंटरेस्ट नाही. इंद्रजीतच्या धक्क्यातून आता कुठे मी जरा बाहेर पडतेय! तू ही नवी भुणभुण माझ्यामागे लावू नको! वरून दिसायला सगळेच चांगले दिसतात; पण खरं पाहता; यांना मुलींच्या मनाची जराही कदर नसते; याचा अनुभव मी एकदा घेतलाय--- परत घ्यायची माझी इच्छा नाही!" प्रज्ञा चिडून म्हणाली.
" तू कितीही मोठी डाॅक्टर झालीस तरी लग्न वेळेवर व्हायला हवं नं! आम्हालाही तुझा संसार बघायचा आहे! संदीपसारखं स्थळ मिळणं; ही सोपी गोष्ट नाही! एक इंद्रजीत तुझ्याशी चुकीचा वागला, म्हणून सगळीच मुलं वाईट आहेत असा विचार तू का करतेयस? व्यक्ती तितक्या प्रकृती असतात! प्रत्येकाचा स्वभाव-- आचार-- विचार भिन्न असतात! प्रत्येकाला एकाच तराजूने तोलणं योग्य नाही! हे संदीप बघ---इतके यशस्वी डाॅक्टर आहेत; पण किती सरळ आणि साधे आहेत!" नीनाताई तिला समजावायचा प्रयत्न करत होत्या!
"तुझं परत सुरू झालं आई? इंद्रजीतसुद्धा तुला असाच आवडला होता! तो जे म्हणेल, ते तुला पटत होतं! प्रत्येक वेळी त्याची बाजू घेत होतीस! शेवटी काय झालं? डाॅक्टर संदीपना कोणीही नाव ठेवू शकणार नाही! चांगले आहेत ते! पण लगेच त्यांना जाव‌ई बनवायची स्वप्न बघू नकोस!" प्रज्ञाने स्पष्ट शब्दात नीनाताईंना समज दिली.
" मला आता शंका येऊ लागली आहे---, इंद्रजीत परत येईल असं अजूनही तुला वाटत तर नाही? भलत्याच आशेवर राहू नकोस! भेटायला येणं दूरच राहिलं; इतक्या दिवसांत त्याने कधी एका शब्दानेही तुझी विचारपूस केली नाही! कदाचित् तिकडे त्याने कोणाबरोबर संसारही थाटला असेल! नाहीतर तो एवढा अलिप्त कसा राहू शकला असता? त्याची वाट पाहणं वेडेपणाचं ठरेल!" नीनाताईंना संदीपसारखं स्थळ गमावायचं नव्हतं.
"खरं सांगू? मी इंद्रजीतची वाट पहात नाही! माझ्या आयुष्यातून त्याला मी दूर केलाय! पण त्याच्या आठवणी दूर करणं मला अजूनही शक्य झालं नाही! इंद्रजीतबरोबर मी फार कमी वेळ घालवला---- पण तेवढ्या वेळात त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं जे दर्शन मला झालं; त्यापुढे मला सगळे निष्प्रभ वाटतात. हे संदीपचंच उदाहरण घे--- इंद्रजीत किती मनमोकळा आहे; समोरच्या माणसाला लगेच आपलंसं करून घेतो; याउलट संदीप किती रुक्ष स्वभावाचे वाटतात--- तू विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तरे देऊन मोकळे झाले-- मी तेव्हाच विचार करत होते; "जर इंद्रजीत असता तर उत्तर देताना घरच्या माणसांचे स्वभाव सागून जोक्स केले असते-- मला हसवण्यासाठी काहीतरी काॅलेजच्या गमती-जमती सांगितल्या असत्या-----पण संदीप किती गंभीरपणे बोलत होते--- " जरा थांबून ती पुढे बोलू लागली,
" काॅलेजमधले विद्यार्थी --- हाॅस्पिटलमधले डाॅक्टर्स----- अनेक चांगल्या तरूणांनी माझ्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला; पण कोणाबरोबर मैत्री करावी; असं मला कधी वाटलं नाही! नकळत माझं मन प्रत्येकाची इंद्रजीतशी तुलना करतं; आणि त्याच्यापुढे सगळेच निष्प्रभ वाटतात! त्याच्याइतका वागण्या- बोलण्यातला स्मार्ट-- आणि तितकाच विशाल हृदयाचा दुसरा कोणी तरूण मला अजुनपर्यंत भेटला नाही!" प्रज्ञा नीनाताईंकडे आपल्या मनाची द्विधा अवस्था सांगण्याचा प्रयत्न करत होती.
"अगं प्रज्ञा! अशी तुलना करत राहिलीस तर कसं चालेल? प्रत्येक व्यक्तीचे गुण-दोष वेगळे असतात! वागण्याची पद्धत वेगळी असते! माणसाच्या सच्चेपणाला महत्व द्यायचं असतं! मला संदीपविषयी विचारशील, तर हा साधेपणाच त्याच्या स्वभावातली जमेची बाजू आहे! आजकाल अशी साधी- सरळ माणसं खूप कमी पहायला मिळतात!" नीनाताई म्हणाल्या.
प्रज्ञाचं बोलणं ऐकून त्या घाबरून गेल्या होत्या! प्रज्ञाचं म्हणणं खरं होतं. इंद्रजीतशी तुलना होऊ शकेल असा स्मार्ट तरूण मिळणं कठिण होतं. एकासारखा दुसरा माणूस कसा असेल?
नीनाताई विचार करत होत्या; हा मोठा गुंता झालाय!--- इतका मनस्ताप सहन करूनही इंद्रजीतचं गारूड हिच्या मनावर अजूनही आहे; ते उतरणार कधी? प्रज्ञाला कसं समजवायचं?
*********
त्या दिवशी हर्षद आॅफिसमध्ये गेला; तरीही मृदुला आलेली नव्हती. ती अशी न सांगता रजा कधीच घेत नसे. सकाळी हर्षदच्या अगोदरच ती आलेली असे. सकाळी आॅफिसला आल्याबरोबर तिच्या प्रसन्न हास्याबरोबर ' गुड माॅर्निंग " ऐकायची त्याला आता सवय झाली होती. तो आल्याबरोबर त्याच्या आजच्या अॅपाॅ‌इंटमेंट-- मीटिंग्ज काय आहेत--- अर्जंट कामं कोणती आहेत. स्टाफला कामांचं डिस्ट्रिब्यूशन ---- सगळे तपशील तिच्याकडे तयार असत. आज त्याला गोंधळल्यासारखं झालं.
"का आली नसेल? ती आजारी तर पडली नसेल? " हर्षदला काळजी वाटू लागली होती. त्याने तिला फोन करायचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. तिच्या फक्त कामाचीच नाही--- तर अस्तित्वाचीही आपल्याला किती सवय झालीय, हे हर्षदला आज जाणवत होतं. दिवसभर त्याला तिचं बोलणं हसणं आठवत होतं. ती आपल्यावरील कामाचा किती भार उचलते, हे तिच्या गैरहजेरीत त्याला कळत होतं.
मृदुला दुस-या दिवशीही आॅफिसला आली नाही, तेव्हा त्याला खरंच काळजी वाटू लागली. तिला पहाण्यासाठी- तिचं बोलणं ऎकण्यासाठी-- त्याचा जीव कासावीस होऊ लागला. संध्याकाळी आॅफिसच्या रजिस्टरमधून तिचा पत्ता घेऊन तो तिच्या घरी गेला. एका ८-१० वर्षांच्या मुलाने दरवाजा उघडला.
मृदुलाला फ्लू झाला होता. हर्षदला बघून तिचा चेहरा उजळला. ताप असूनही उठून बसू लागली.
" उठू नको! तुझ्याकडून फोन आला नाही, काळजी वाटायला लागली, म्हणून आलो." तो तिला थांबवत म्हणाला.
"घरी मी आणि हा कुणाल- माझा लहान भाऊ- दोघंच आहोत. आई आणि बाबा दोन दिवसांसाठी पुण्याला काकांकडे गेले आहेत. आईने कुणालसाठी स्वयंपाकाच्या रमाकाकूंना दिवसभर बोलावलं होतं; त्यांची मदत होती म्हणून निभावलं! कालपासून मी तापाच्या ग्लानीत होते, उठू शकत नव्हते ; त्यामुळे आॅफिसमध्ये फोन करता आला नाही. मृदुला म्हणाली.
"तू आराम कर! चांगलं बरं वाटल्याशिवाय आॅफिसला येऊ नकोस! कामाची काळजी करु नकोस---मी मॅनेज करेन!"हर्षद तिला थांबवत म्हणाला.
" ताप होता; तरीही आॅफिसला यावं असं वाटत होतं..तुमचं काम अडून राहील; याची काळजी वाटत होती ! पण काय करू? अंगात शक्ती नव्हती. तुम्हाला दोन दिवस खूप त्रास झाला असेल! मी लवकर आॅफिसला यायला सुरूवात करेन! फार दिवस रजा घेणार नाही." मृदुलाला त्याची किती काळजी वाटत होती; हे तिच्या ओलावलेल्या डोळ्यांमध्ये हर्षदला दिसत होतं. कदाचित् आपल्याइतकीच त्यालाही आपली ओढ आहे हे कळल्यामुळे झालेला आनंद अश्रुंच्या रुपाने व्यक्त होत होता. अाजपर्यंत जिथे शब्द कमी पडले होते ; तिथे आज डोळे शब्दांचं काम करत होते..
एखदी व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करते ही जाणीव किती सुखद आहे ; हे त्या क्षणी हर्षदला कळत होतं. मृदुला त्याच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग झाली होती; हे सत्य तो आता नाकारू शकत नव्हता.. कालपासून तिला भेटण्यासाठी त्याचं मन इतकं आतुर झालं होतं, हे प्रेम नव्हतं; तर काय होतं?
********* contd.... part 25

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED