मायाजाल-- ३१ Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मायाजाल-- ३१

मायाजाल--३१
बुक केलेल्या टेबलकडे प्रज्ञाला आणून; बसण्याचा निर्देश देत इंद्रजीत म्हणाला,
"आताच आलीयस! आरामात बोलू आपण! तुझ्यासाठी काय मागवू? माझ्या चांगलंच लक्षात आहे; तुला इथली कोल्ड काॅफी आवडते! " त्याने वेटरला बोलावून कोल्ड काॅफीची आॅर्डर दिली.
प्रज्ञा गप्प आहे; हे पाहून इंद्रजीतने बोलायला सुरुवात केली,
"मी तुझ्यापासून दूर गेलो; पण तुला विसरू शकलो नाही. त्यावेळी हर्षदने आत्महत्त्येचा प्रयत्न केला; आणि मी हादरून गेलो आणि तो अप्रिय निर्णय मी नाइलाजाने घेतला. . एकप्रकारे मी आत्मघातकीपणा केला. पण त्यावेळी भावनेच्या भरात ते लक्षात आलं नाही. मला एकच गोष्ट कळत होती --- मी बाजूला होणं सगळ्यांच्याच हिताचं होतं!"
जीत बोलत होता. प्रज्ञाला सतत तेच - तेच मुद्दे ऐकून आता त्याच्या बोलण्यात रस वाटेनासा झाला होता. त्याला सतत तीच - तीच उत्तरे देऊन ती आता कंटाळली होती. तिथून घरी निघून जावं असं तिला मनोमन वाटू लागलं होतं.
तिला आठवत होतं; पूर्वी त्यानं सतत बोलत रहावं आणि आपण ऐकत रहावं असं तिला वाटत असे.
"आज त्याचं बोलणं कृत्रिम आणि कंटाळवाणं का वाटतंय?" तिचं तिलाच आश्चर्य वाटत होतं.
बाजूच्या टेबलवर अंदाजे चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलांना घेऊन एक जोडपं बसलं होतं. दोन्ही मुलं खुप गोंडस होती. त्यांना खेळताना बघून प्रज्ञाचं लक्ष सतत त्यांच्याकडे जात होतं. जीतच्या बोलण्यापेक्षा त्या मुलांच्या बाललीलांचं आकर्षण तिला जास्त वाटत होतं.
जीतच्याही हे लक्षात आलं होतं. मनातून त्याला राग आला; पण राग गिळून तिचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी तो पुढे बोलू लागला,
" तुझ्यापासून दूर गेलो; पण तुला मी कधीच विसरू शकलो नाही! तुला भेटावं-- तुझ्याशी बोलावं असं सारखं वाटत असे; पण मी स्वतःला सावरत असे. माझा नाइलाज होता; पण तू मात्र मला विसरलीस! मला तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकलंस!" त्याचे डोळॅ ओलावले होते!
त्याच्या डोळ्यात पाणी बघून प्रज्ञाचं मन हेलावलं. तिला आठवलं ---तो शेवटची भेट घ्यायला आला होता, तेव्हाही निघताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं!---
तिच्याही डोळ्यात पाणी तरारलं! दुराव्याच्या भिंती विरघळू लागल्या,
"तू निघून गेल्यावर माझी काय अवस्था झाली होती; याची कल्पना आहे तुला? अनेक दिवस मी मृतवत् जगत होते! तू अचानक् का बदललास; हा प्रश्न स्वतःला सतत विचारत होते! जगण्याची इच्छा राहिली नव्हती! असं वाटत होतं; की मीच काहीतरी मोठा गुन्हा केलाय! जगासमोर जायचीही लाज वाटत होती. महत्प्रयासाने माझ्या आई-वडील बाबांनी मला या अवस्थेतून बाहेर काढलं. नंतर अभ्यासात स्वतःला झोकून दिलं; मन अभ्यासात गूंतवलं नसतं तर मला वेड लागलं असतं. तुला मात्र तेव्हा माझी जराही काळजी वाटली नव्हती. निघून जाताना माझं काय होईल; हा विचार. एकदाही तुझ्या मनात आला नव्हता!" अनेक दिवस मुकेपणानं भोगलेलं दुःख आज शब्दांबरोबर अश्रूंच्या रूपाने प्रकट होत होतं.
नकळत ती मनानं जीतच्या जवळ जात होती- त्याच्याशी संवाद साधत होती.
प्रज्ञा भावनांच्या जाळ्यात अडकली आहे; हे इंद्रजीतने ओळखलं. त्याने तिचा हात हातात घेतला,
" मी तुला खूप दुःख दिलं. पण यापुढे मात्र तुझ्या डोळ्यांत अश्रू येऊ देणार नाही. जे काही झालं; ते विसरून आपण नवीन आयुष्याची सुरुवात करू." तो मृदू स्वरात म्हणाला.
त्याच्या स्पर्शाने, नजरेतल्या प्रेमाने प्रज्ञाची विचारशक्ती कमजोर पडू लागली. तिने ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, अाणि अजूनही तिच्या हृदयात विराजमान होता--- तो तिचा जीत तिला साद घालत होता, तिचं मन तिला सांगू लागलं,
"प्रज्ञा! आई म्हणते; ते खरं आहे! तुला सुखाकडे नेणारी ही सुवर्णसंधी दवडू नकोस! माणसाकडूनच चूक होते! जीतकडूनही झाली----; त्या चुकीची शिक्षा त्याच्याबरोबर स्वतःलाही करून घेऊ नको! इतके दिवस तुझ्यापासून लांब राहूनही त्याचं तुझ्यावरील प्रेम कमी झालं नाही; आणि तुझ्या मनातही त्याची जागा अजून कोणी घेऊ शकत नाही; ही साधी गोष्ट नाही! त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर!" प्रज्ञाच्या मनातली अपमानाची आग जीतच्या अनुनयामुळे शांत होऊ लागली होती..
तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून आपण तिचं मन जिंकण्यात यशस्वी झालो आहोत; हे इंद्रजीतने ओळखलं. टेबलावरच्या फ्लाॅवरपाॅटमधलं एक सुंदर लाल गुलाबाचं फूल तोडून तिच्या समोर धरत तो म्हणाला,
" मी खूप प्रेम करतो तुझ्यावर! माझ्या सगळ्या चुका विसरून तू माझी होशील?"
प्रज्ञाने फूल घेतलं. तिच्या चेह-यावर स्मित होतं.
" ती नक्कीच मला हो म्हणणार! माझा आत्मविश्वास खरा ठरला!" मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटत जीत तिच्या होकाराची वाट पहात होता. प्रज्ञाच्या नजरेतील रागाची जागा आता अनुरागाने घेतली होती---- अजूनपर्यंत डोळ्यात दिसणारी लाली आता तिच्या गालांवर दिसू लागली होती.
प्रज्ञा काही बोलायला सुरुवात करणार ; ---- आणि तेव्हाच इंद्रजीतच्या मोबाइलची रिंग वाजू लागली.
इंद्रजीतने वैतागून फोन कट केला. पण तो प्रज्ञाशी काही बोलणार ; तोच परत त्याच्या मोबाइलची रिंग वाजली.
" महत्वाचं काम असणार. तू फोन घे!" प्रज्ञा म्हणाली.
फोन घेताना त्याचा चेहरा गंभीर झाला होता. तो इंग्लिशमध्ये बोलत होता.
"हॅलो! हलो! ----- कोण? --- मी आता कामात आहे. नंतर फोन करतो----"
समोरची व्यक्ती काहीतरी बोलली; त्यावर तो प्रज्ञाला म्हणाला,
"इथे रेंज मिळत नाहीये. लंडनवरून सुजीतचा फोन आहे. महत्वाचं बोलायचं म्हणतोय. मी जरा बाजूला जातो." तो प्रज्ञाला म्हणाला; आणि तिथून उठला. पण प्रज्ञाने पाहिलं; की तो दबक्या आवाजात, पण रागावून बोलत होता.
" सुजीत तर त्याचा काॅलेजपासूनचा जवळचा मित्र आहे--- लंडनला गेल्यावर अधिक जवळचे संबंध आले असणार --- त्याला हा टाळायचा प्रयत्न का करत होता? आणि आता वैतागून का बोलतोय?" प्रज्ञाच्या मनात हे प्रश्न येणं साहजिक होतं. पण कदाचित् या वेळी त्याला फोन आलेला आवडला नसावा, अशी तिने मनाची समजूत करून घेतली.
अजून काॅफी आली नव्हती. प्रज्ञा वेळ घालवण्यासाठी आजूबाजूला बघत होती. बाजूच्या टेबलावरील कुटुंबाने आईस्क्रीम मागवलं होतं. मुलं आॅरेंज कँडी चोखत एकमेकांशी बोलत होती.... हसत होती. मोठ्या मुलाने छोट्याची काय मस्करी केली; हे प्रज्ञाला कळलं नाही; पण तो रागाने खुर्चीवरून उठला, आणि भावाला मारण्यासाठी त्याच्याकडे येऊ लागला. त्याला चुकवण्यासाठी मोठा भाऊ उठून धावू लागला, तो प्रज्ञाच्या खुर्चीला अडखळला; पडताना स्वतःला सावरण्यासाठी त्याने प्रज्ञाला पकडलं. त्याच्या हातातल्या आॅरेंज कँडीने प्रज्ञाचा ड्रेस माखून गेला. प्रज्ञाने त्या मुलाला उठवून उभा केला.
" तुला लागलं नाही नं?" तिनं विचारलं.
तिचा ड्रेस खराब झालेला बघून तो मुलगा घाबरला होता. ढोपरं खरचटलेली असूनही मानेने नाही म्हणत तो तिथून पळाला आणि आई-वडिलांच्या जवळ जाऊन बसला. दुसरा भाऊसुद्धा आता खाली मान घालून शांत बसला होता. त्या दोघांची तारांबळ उडालेली बघून प्रज्ञाला हसू आलं. आपला ड्रेस खराब झाला आहे; हे तिच्या अजून लक्षात आलं नव्हतं!
त्या मुलांची आई प्रज्ञाकडे येऊन तिची क्षमायाचना करू लागली.
" साॅरी मॅडम! तुम्हाला त्रास दिला माझ्या मुलांनी! किती समजावलं तरी एका जागी बसतच नाहीत!" ती म्हणाली.
"मुलं आहेत! दंगा करणारच! तुम्ही मनाला लावून घेऊ नका!" प्रज्ञाने तिला समजावलं.
"अहो! पण तुमचा इतका सुंदर ड्रेस त्यांनी खराब केला!"
आता प्रज्ञाचं ड्रेसकडे लक्ष गेलं; आणि तिचा चेहरा थोडा उतरला!
वेटर कोल्ड काॅफी घेऊन आला. प्रज्ञाचा ड्रेस नारिंगी रंगाने रंगलेला बघून तो म्हणाला,
"मॅडम! तुमच्या ड्रेसवर डाग पडलेयत! चांगला ड्रेस खराब झाला. समोर-- त्या कोप-यातून उजव्या बाजूला जा!--- तिथे बेसिन आहे. डाग लगेच पाण्याने साफ करा, पांढ-या सिल्कवरचे डाग नंतर जाणार नाहीत. मी काॅफी थोड्या वेळाने घेऊन येतो. नाहीतरी साहेबसुद्धा अजून फोनवर बोलतायत."
"थँक्स! बघते डाग थोडे कमी होतायत का ते! " प्रज्ञा तिथून उठत म्हणाली.
ती बेसिनकडे गेली; आणि तिला इंद्रजीतचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. तिने पाहिलं; जवळच्याच एका खांबामागे उभा राहून तो बोलत होता. प्रज्ञा तिथे येईल; अशी पुसटती शंका त्याला नव्हती. त्याच्यापासून चार-पाच फुटांच्या अंतरावर बेसिनजवळ ती उभी होती; पण तिच्याकडे पाठ असल्यामुळे; आणि मध्ये मोठा खांब असल्यामुळे तिची चाहूल त्याला लागली नव्हती. तो अगदी मोकळेपणाने बोलत होता.
"हा मित्राशी एवढा रागात काय बोलतोय? एवढा कोणावर चिडलेला कधी पाहिला नाही. " प्रज्ञाला मनोमन आश्चर्य वाटत होतं.
" अरे ---- त्या सूझीला जरा समजावशील का?--- सतत फोन करून त्रास देत असते! किती वेळा सांगितलं--- इकडे फोन करत जाऊ नको; मला वेळ असेल तेव्हा मीच फोन करत जाईन, पण ऐकत नाही. आता मी प्रज्ञाला घेऊन हाॅटेलमध्ये आलोय! आणि नेमका तिचा फोन आला! ---- भारतात येऊन माझ्या घरी सगळं सांगणार म्हणाली--- लवकर लग्न करण्यासाठी मागे लागली आहे--"
इंद्रजीतचं नव्यानं उलगडणारं वर्तमान पाहून प्रज्ञाला आश्चर्याचा धक्का बसला होता.. ती सुन्नपणे जागच्याजागी उभी राहिली होती. इंद्रजीतचा आवाज तापलेल्या शिशासारखा तिच्या कानावर पडत होता.

********* contd --- part 32