तिच्यावर होणारे अत्याचार कधी थांबणार..? Priyanka Kumbhar-Wagh द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तिच्यावर होणारे अत्याचार कधी थांबणार..?

आज दिनांक २९ सप्टेंबर २०२०, रात्रीचे सुमारे १२.३० वाजले होते. माझी आई आणि बहीण दोघीही बेडरूममध्ये झोपल्या होत्या. मी आणि माझा भाऊ हॉलमध्ये अजूनही जागेच होतो. भाऊ मोबाईलमध्ये मूवी बघत होता तर मी नेहमीप्रमाणे लॅपटॉपमध्ये माझं काम करत बसली होती. तितक्यात बहिणीच्या मोबाईलची रिंग वाजली. एवढ्या रात्री कोणाचा कॉल आला असेल या भीतीने माझी आईसुद्धा घाबरून उठली. नंबर अनोळखी असल्यामुळे कॉल उचलायचा कि नाही हा प्रश्न पडला होता. परंतु कोणीतरी महत्वाचं काम असेल म्हणून कॉल केला असेल असा विचार करून माझ्या आईने बहिणीला कॉल उचलायला लावला.

कॉल उचलताच समोरून आवाज आला, "वर्षा मॅम, मैं विहान कीं माँ बात कर राही हूं..." रडक्या आवाजात ती स्त्री बोलली . माझी बहीण तिचा रडवेला आवाज ऐकून पहिल्यांदा खूप घाबरली पण तिला धीर देत म्हणाली,"विहान कीं माँ, आप ठीक तो हो ? क्या हुआ है ? आप पेहले रोना बंद किजीये प्लीझ. " बहिणीचे हे शब्द ऐकताच तिला अजून रडू आले. ती रडत रडत पुढे बोलू लागली ,"मुझे मेरे पती ने आज बहोत मारा है. इतनी रात हो गयी है फिर भी उसने मुझे घरसे निकाल दिया है. उसने मुझे निकाल दिया तब मैने छुपकेसे अपना मोबाईल ले लिया था. वो अब भी मेरा पिछा कर रहा है . मैं भागते भागते आपके स्कूल के यहा पोहच गयी हू. यहा मुझे एक दिवार पे आपके स्कूल का बॅनर दिखा जिसपे आपका नंबर लिखा है . प्लीझ मेरी मदद किजीये. " एकाच दमात ती असं बोलून गेली आणि अचानक कॉल कट झाला. वर्षा तिला पुन्हा कॉल करायचा प्रयत्न करत होती पण ती कॉल उचलत नव्हती.

थोड्यावेळाने (१० - १५ मिनीटांनी) तिचा पुन्हा कॉल आला. आता तर ती खूप जोरजोरात रडत होती. वर्षाने तिला धीर दिला आणि तुम्ही आता कुठे आहात असं विचारले. ती रडत हुंदके देत बोलायला लागली, "मैं आपसे कॉल पे बात कर रही थी तभी मेरा पती पिछेसे आया और मेरे बाल पकडकर मुझे मारणे लगा. उसने उसकी चप्पल उठाके मेरे सर पे जोर से मारी. वो मेरी बहोत पिटाई कर राहा था इसलिये मैंने बहोत शोर किया. तो सब आजूबाजूके लोग इकट्ठा होणे लगे. सब उसको समझा रहे थे तो मैं वहा से भाग निकली. आप प्लीझ मेरी मदद किजीये. " असं म्हणून ती खूप जोराने रडायला लागली. वर्षाने तिला शांत व्हायला सांगितलं आणि आता कोणत्या एरियामध्ये आहेत असं विचारलं. ती घाबरत बोलली, "मैं दत्तवाडी में एक बिल्डिंग में छुपके बैठी हूं. " वर्षा तिला म्हणाली घाबरू नका . तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने पुढे या मी लगेच येते खाली तुम्हाला भेटायला. असं म्हणताच तिने फोन ठेवला.

हॉलमध्ये येऊन वर्षाने घडलेला सर्व प्रकार मला आणि माझ्या भावाला सांगितला. मी नेहमी अशा घटना कधी वर्तमानपत्रात वाचल्या तर कधी बातम्यांमध्ये ऐकल्या होत्या. आज हे प्रत्यक्ष ऐकून मी थोड्यावेळासाठी सुन्न झाले होते. तितक्यात, आपण त्यांना मदत केली पाहिजे असं माझा भाऊ बोलला आणि अचानक लाईट गेली. त्याच्या बोलण्याने मी भानावर आली. आणि आम्ही सगळ्यांनी तिला मदत करायची असं ठरवलं. तिचा पुन्हा कॉल आला. ती खूप घाबरली होती. लाईट गेली असल्यामुळे रस्त्यावर खूप काळोख होता. तिला पुढचे काहीच दिसत नव्हते म्हणून तिने आपल्या मोबाईलची टॉर्च सुरु केली. त्या भयावह अंधारात ती धीर एकवटून चालत होती. रात्रीचे एकटीच रस्त्यावरून चालत असल्याने सगळे कुत्रेही तिला पाहून भुंकत होते. त्या निशांत रात्रीमुळे ती आणखीनच घाबरली होती. भीतीमुळे ती कदाचित रस्ता चुकली होती. माझ्या बहिणीने तिला पुन्हा धीर दिला आणि आम्ही सगळे तिच्या शोधात घराबाहेर पडलो.

आम्ही सगळे तिला शोधत होतो. वर्षा कॉलवर तिच्याशी बोलून नक्की ती कोणत्या ठिकाणी आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. अचानक माझ्या आईने मला मागून आवाज दिला,"प्रियांका, ती बघ. तीच आहे का ती बाई ?" आई समोर हात दाखवून म्हणाली. आमच्या सगळ्यांची नजर तिच्याकडे खिळली. ती स्त्री आमच्याच दिशेने येत होती. जसजशी ती जवळ येत होती तसतशी ती आम्हाला नीट दिसू लागली. घाबरलेल्या अवस्थेत ,अश्रूंना सावरत, अनवाणी आणि रक्तबंबाळ झालेली ती स्त्री बघून आम्ही सगळे स्तब्ध झालो होतो. भीतीने तिचे अंग थरथर कापत होते. कपाळावरून रक्ताची धार वाहत होती.ओठांतूनही रक्त येत होते. तिला बघून आमच्या छातीत धडधड सुरु झाली. ती जवळ येताच तिने वर्षाला घट्ट मिठी मारली आणि जोरजोराने जिवाच्या आकांताने ती रडू लागली. तिची ती अवस्था बघून आम्ही सगळेच घाबरलो होतो. नकळतपणे आम्ही चौघेही रडायला लागलो. माझ्या आईने तिला जवळ घेतले. तिला शांत व्हायला सांगितले. आज आमच्या घरी रहा असं माझी आई बोलली. "नही माँ जी, मेरे छोटे छोटे दो बच्चे घरपे है. मैं उन्हे अकेला नही छोड सकती ." असं ती माऊली म्हणाली आणि पुन्हा तिच्या डोळ्यांतून धारा वाहू लागल्या.

आम्हाला काहीच कळत नव्हते कि, आता काय करावं?. "आप पोलीस थाने में चलिये हमारे साथ. अब यह एकही रास्ता है. " असं माझा भाऊ अमित म्हणाला. क्षणभर ती स्त्री विचार करत राहिली. त्यानंतर अमितकडे बघून म्हणाली,"हा. मैं पोलीस थाने में जाऊंगी.अबतक मैं अपने बच्चो के लिए चूप रही. बस अब और नही सहुंगी." आमचाही निर्धार झाला होता. आता काहीही झालं तरी तिला एकटं सोडायचं नाही. माझ्या आईला आम्ही घरी जाण्यास सांगितले. आईने घरी जाताना तिच्या पायातील चप्पल त्या स्त्रीला दिली. नंतर आम्ही तिघेही तिच्यासोबत पोलिसस्टेशनच्या दिशेने रवाना झालो.

पोलिसस्टेशनमध्ये जाताच एका लेडीज काँस्टेबलने तिला बसवून पिण्यास पाणी दिले. माझ्या भावाला बाहेर उभे राहायला सांगून आम्ही तिघी म्हणजे मी, माझी बहीण वर्षा आणि ती स्त्री आत गेलो. पोलिसांनी चौकशी सुरु केली. इतक्या वेळ शांत राहिलेली ती अखेर बोलू लागली,"साहब, मैं यहा अपने ससुराल में रेहती हूं. मेरे दो छोटे छोटे बच्चे है. लडकी ४ साल की है और मेरा मुन्ना २ साल का है. " पोलिसांनी तिला विचारले आपकी ये हालत किसने की ? ती घडलेला सर्व प्रकार सांगू लागली…

अवघ्या विसाव्या वयात पाचवर्षांपूर्वी माझं लग्न झालं. माझं माहेर उत्तर प्रदेश. बापाची परिस्थिती नसतानाही आपली मुलगी दिल्या घरी सुखी राहावी म्हणून त्यांनी लग्नात आठ लाख रुपये हुंडा दिला होता. लग्नाचा सर्व खर्चही माझ्या माहेरच्यांनीच केला होता. नव्याचे नऊ दिवस गेले आणि माझा सासुरवास सुरु झाला. अगदी छोट्या छोटया गोष्टींवरूनही घरात कलह सुरु झाले. पतीच्या पगारात घर चालत नसल्यामुळे मी लग्नाआधी केलेला ब्युटी पार्लरचा कोर्से कामी आला. घर खर्च भागावा म्हणून मी छोट्या मोठ्या पार्लरच्या ऑर्डर्स घेऊ लागली. बघता बघता वर्ष सरले आणि माझ्या पदरात मुलीचं सुख मिळाले.

दिवसामागून दिवस जात होते. नवरा रोज दारू पिऊन घरी यायला लागला. माझ्याकडे सतत पैसे मागायला लागला. पैसे दिले नाही तर मारझोड करायला लागला. सासू - सासरे देखील छळ करायला लागले. माझ्या आई वडिलांना नको नको ते अपशब्द बोलायला लागले. माझ्याकडे साधा एक फोनसुद्धा नव्हता. आईवडिलांना तक्रार करण्याची हिम्मत नव्हती म्हणून मी कसेबसे दिवस काढू लागली. दोन वर्षे झाली आणि मला मुलगा झाला. खर्च अधिकच वाढल्यामुळे माझ्याकडून घर खर्च भागत नव्हता. मी नवऱ्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. पण तो कमावलेल्या सगळ्या पैशांची बाहेर उधळपट्टी करून घरी दारू पिऊन येऊ लागला आणि मला मारझोड करू लागला.

अलीकडे वडिलांची तब्येत ठीक नसते. त्यांना कॅन्सर झाला आहे. माझ्या माहेरच्यांनी त्यांची विचारपूस करता यावी म्हणून मला एक मोबाईल घेऊन दिला होता. मनात सगळं दुःख साठवून मी खूप आनंदात असल्याचा दिखावा करत होती, जेणेकरून त्यांना माझ्यामुळे कोणताही त्रास व्हायला नको. पण नशिबाला कदाचित तेही मान्य नव्हतं. हळूहळू परिस्थिती माझ्या हाताबाहेर जाऊ लागली. नवऱ्यासोबत सासू सासरे देखील मला मारझोड करू लागले.मी अनेक वेळा विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण त्या तिघांसमोर मी हतबल होती. माझ्या सोन्यासारख्या दोन मुलांकडे बघून मी आलेला दिवस ढकलत होती.

एक दिवस रात्री घरी सगळे झोपले होते. अचानक कुजबुण्याचा आवाज येताच मी जागी झाली. आवाजाच्या दिशेने मी चालत गेली. बाथरूममध्ये माझा नवरा कोणाशी तरी विडिओ कॉल वर बोलत असल्याचा मला जाणवलं. तो एका परक्या स्त्री बरोबर घाणेरडे बोलत असल्याचं मला समजलं. मी त्याच्या नकळत पुन्हा माझ्या जागेवर येऊन झोपली. दुसऱ्यादिवशी माझ्या मोठ्या जाऊबाईंकडे जाऊन मी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. आम्ही दोघीही घरच्यांच्या नकळत या गोष्टीचा शोध घेऊ लागलो.

अखेर चोराची चोरी पकडली. एक दिवस माझ्या मोठ्या जाऊबाईंनी माझ्या नवऱ्याला एका परस्त्री सोबत हॉटेलच्या (लॉज) दिशेने जाताना बघितलं. तिने घडलेला सर्व प्रकार मला विश्वासात घेऊन सांगितला. ते ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. पण हा नरादम असही वागेल यात मला तिळमात्र शंका नव्हती. मी ठरवलं ! आज एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच. सुमारे अर्धातास चालत चालत मी त्या हॉटेल मध्ये पोहचली. त्या हॉटेल मध्ये जाऊन मी चौकशी करू लागली. हॉटेलच्या मालकाने माहिती सांगण्यास नकार दिला. मी त्यांना खूप विनवण्या केल्या. त्यांच्या हातापाया पडली. तरीही ते सांगायला तयार नव्हते. मग मी नाईलाजाने त्यांना पोलिसांची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी मला माझ्या नवऱ्याचा आधारकार्ड बघून महिन्याभराची सर्व माहिती सांगितली. जाऊबाईंना घेऊन मी तातडीने घरी गेली. सत्य सगळ्यांसमोर सांगितलं. एवढं होऊनही तो त्याची चूक कबूल करत नव्हताच. शेवटी मी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला घरच्यांनी थांबवलं. त्याच्याशी बोलून आपण सगळं नीट करू असं आश्वासन मला दिल.

आज पुन्हा तो दारू पिऊन घरी आला. मी जे जेवण बनवलं होतं ते जेवायला वाढलं. त्याला ते नको असल्यामुळे त्याने मला मारझोड करायला सुरुवात केली. सासूसासरे हा प्रकार बघत होते तरीही त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने खूप वेळा मला चपलेने मारहाण केली. माझ्या लहान मुलांसमोर त्याने माझं डोकं भिंतीला आपटलं. माझी दोन्ही मुले खूप रडत होती. तरीही तो माझ्यावर लाथेचा मारा करतच होता. मी पोलिसांची धमकी देताच आम्ही पैसा दाखवला की सगळे पोलीस आमच्या बाजूने बोलतील अशी भाषा ते करून लागले. मी त्यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देते पाहून त्याने मला एवढ्या रात्री घराबाहेर काढलं .

एवढं सगळं बोलून ती पुन्हा रडू लागली. लेडीज काँस्टेबलने तिच्या पाठीवर हात फिरवला आणि तिला शांत केले. घडलेलं सगळं ऐकून पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली. ताबडतोब तिच्या नवऱ्याला कोणत्याही परिस्थतीत पोलिसस्टेशन मध्ये हजार करण्याची सूचना हवालदारांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला पुन्हा काही प्रश्न विचारले.
"आपने यह सब आपके मायके में क्यूँ नही बताया ?"
"साहब, मेरे पिताजी पेहलेसे ही बिमार है. मेरी हालत उन्हे पता चलेगी तो शायद वो सेह नही पायेंगे. इसलिये मैं उन्हे तकलीफ नही देना चाहती थी. " ती उत्तरली.
"तो आप इतना सेहती क्यूँ रही? आपको पोलीस थाने में पेहले आना चाहिये था. " पोलिसांनी विचारले .
"साहब, मैं जबसे यहा आई हू तबसे लेके आजतक मेरे पतीने मुझे आजतक कही घुमाया नही और ना ही कही लेकर गया है. मुझे यहा का हॉस्पिटल तक पता नही है. मेरे बच्चो के स्कूल कि वजह से मैं सिर्फ वर्षा मॅम को जाणती हू. " असं बोलून ती शांत झाली.

तिचा एक एक शब्द माझ्या मनात घर करून जात होता. हे सगळं ऐकून आम्ही सगळे निःशब्द झालो होतो. बराच उशीर झाल्यामुळे माझ्या आईचे सतत कॉल येत होते. तिला आमची खूप काळजी वाटत होती. पोलिसांनी आम्हाला घरी जाण्यास सांगितले. तिचा निरोप घेऊन आम्ही तिघे पोलिसस्टेशनबाहेर पडलो. या घटनेमुळे आज आम्ही पूर्ण हादरून गेलो होतो. घर येईपर्यंत विचारांनी मनात तांडव सुरु केला होता. सुमारे २ वाजता आम्ही घरी परतलो.घडलेली हकीकत आईला सांगितली. सगळे जाऊन झोपी गेले पण माझं मन मात्र स्वस्थ नव्हतं. मनात अनेक प्रश्न येऊ लागले. पण त्याच उत्तर काही मिळतच नव्हतं.

काय हा डाव मांडलास देवा
स्त्री-पुरुषांच्या संसाराचा
कसला हा जीवघेणा
खेळ आहे भातुकलीचा...

प्रेम, समर्पण देऊनही
जाणीव मिळते परकेपणाची
प्रत्येक वेळी स्त्रीच का बनते जिवंत मूर्ती
आत्मसन्मानाच्या त्यागाची..?

सध्या एकविसाव्या शतकात आपण वावरत आहोत. आज आपल्या समजातील अनेक स्त्रियांच्या कर्तृत्वामुळे आपल्या देशाचा कायापालट झाला आहे. गीता गोपीनाथ, हिमा दास, मॅरी कॉम, अवनी चतुर्वेदी, किरण मुझुमदार यांसारख्या यशस्वी स्त्रियांमुळे भारताला प्रत्येक क्षेत्रांत गगन भरारी घेता येणे शक्य झाले आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या देशात, त्याच समाजात प्रत्येक दीड तासांनी एक हुंडाबळी जातो, दर एक तासाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार होताना दिसतो , अर्ध्या अर्ध्या तासाला एक स्त्री बलात्काराची शिकार होते, दर बारा मिनिटांनी एका महिलेचे शारीरिक शोषण केले जाते. तर दिवसाला अनेक मुलींचे गर्भपात केल्याचे दिसून येते. तो देश या अत्याचारांतून खरंच मुक्त होऊ शकतो का ? स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचा अंत शक्य आहे का ?

स्त्रियांचा पोशाख, त्यांचे राहणीमान, त्यांची विचारसरणी, वाढती आधुनिकता त्यांच्यावरील होणाऱ्या अत्याचारांस कारणीभूत आहे असे वरकरणी जरी वाटले तरी त्यात तिळमात्र तथ्य नाही . आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत. कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्या नोकरीसाठी घराबाहेर पडत आहेत. आपल्या संसारासाठी त्या हातभार लावत आहेत. खरंतर पुरुषांची बदलती मानसिकता या गोष्टीचे मूळ कारण आहे. स्त्री श्रेष्ठ आहे की पुरुष, असा तर प्रश्नच उपस्थित होत नाही. तरीही अत्याचार फक्त स्त्रियांवरच का केले जातात? स्त्रीची शारीरिक शक्ती पुरुषाच्या तुलनेत कमी पडते म्हणून की पुरुषांची मानसिकता सडकी आहे म्हणून?

स्त्रीला सृजनशीलतेचा मुख्य स्रोत मानले जाते. तिच्यामुळे जीवनाचे चक्र सुरळीत चालू आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीची देवी म्हणून पूजा केली जाते. नवरात्रोत्सव साजरा केला जातो तर त्याच संकृतीत तिच्यावर रोज अत्याचार होत आहेत. स्त्री ही प्रकृती आहे. आदिशक्तीचे स्वरूप आहे. हे केवळ बोलण्यापुरतेच ना ? स्त्रियांना आपण शक्तिस्थान मानतो. परंतु शक्तिमान पुरुषाला म्हटले जाते. सरस्वती बुद्धीची देवता आहे, परंतु आपल्याकडे सगळी बुद्धी मात्र पुरुषांकडेच आहे. धनप्राप्ती साठी लक्ष्मीची पूजा करतो पण आपल्या घरच्या लक्ष्मीला मात्र त्रास देतो. या पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान का दिले जाते? खरंतर स्त्री शिवाय पुरुष हा अपूर्णच !!!

समाजात स्त्रियांना विविध प्रकारच्या विरोधाभासी भूमिका निभवाव्या लागतात. ती आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मुलगी आहे आणि मुख्यतः ती एक स्त्री आहे म्हणूनच सगळ्यांच्या अपेक्षा तिच्याकडूनच जास्त असतात. आपल्या परीने सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती कायम झटत असते. येणारा प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करण्याची तिची तयारी असते. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिनेच घरातली सगळी कामं करायची असतात, असा अन्यायकारक एक रूढ समज आपल्या समाजात आहे ! ती प्रेम, ममता, समर्पणाची मूर्ती असूनही आपण पदोपदी तिचा अपमान करत असतो. आपल्यापैकी प्रत्येकाला आई, बहीण, पत्नी , मुलगी आहे याचे भान ठेवून तरी स्त्रियांचा सन्मान करायला शिकले पाहिजे.

अनेकदा स्त्रियाही पुरुषांचा मानसिक छळ करतात. काही प्रकरणात स्त्रियांचाही दोष असतोच. त्यामुळे अनेक निष्पाप पुरुषांना बळी पडावे लागते ही वास्तविकता आहेच. ती नाकारता येणे शक्यच नाही. खरंतर स्त्री आणि पुरुष हे आयुष्याच्या रथाचे दोन चाक आहेत. ते एकमेकांसाठी पूरक आहेत. वास्तविक दृष्ट्या, समाजातील काही पुरुषांमुळे किंवा काही स्त्रियांमुळे संपूर्ण पुरुष वर्गाला किंवा स्त्री वर्गाला दोषी ठरवणे अत्यंत चुकीचे आहेच . परंतु अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना दुजोरा देणे हे समाजाला काळिमा फासण्यासारखे आहे.

अत्याचारांबाबत न बोलता ते सहन करीत राहिल्यास त्याचे प्रमाण जास्त क्रूरतेने वाढण्याची शक्यता असते परंतु त्याविरोधात बोलल्यास, मदत घेतल्यास अत्याचार थांबण्याच्या शक्यता मात्र नक्कीच असतात. कोणतेही अत्याचार असो, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अथवा सहन करीत राहिल्याने ते कधीच थांबत नाहीत. उलट ती व्यक्ती असेच गुन्हे दुसऱ्या स्त्रियांवर किंवा पुरुषांवर करण्याची शक्यता अधिक वाढते. सर्व प्रकारचा हिंसाचार पूर्णपणे थांबवणे हे खूप मोठे आव्हान जरी असले तरी आपले सरकार ते कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्त्री- पुरुष दोघांचीही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

महिलांवरील अत्याचार कधी थांबणार , हा प्रश्न जरी निःशब्द करणारा असला तरी कधीही न सुटणारा नक्कीच नाहीये. होकारार्थी दृष्टिकोनातून आपण सर्वानी पाहिले तर त्यासाठी स्त्रीने न घाबरता पुढे येणे गरजेचे आहे. तिने स्वत:च सक्षम असणे अति आवश्यक आहे. पोलीस स्टेशन, कायद्याचा आधार घेऊन ती जर पुढे आली तर समाजात घडणा-या अत्याचारांच्या घटनांना आपोआपच पूर्णविराम मिळायला फारसा वेळ लागणार नाही हे निश्चित.

(टिप : या लेखाची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या लेखाचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय हा लेख ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )