आई... किती गं तुझी थोर महती
तुझ्या बद्दल लिहिताना शब्दही अपुरे पडती
आई... कोणी केली गं तुझी अशी निर्मिती
आम्हा लेकरांची माय जणू वात्सल्याची मूर्ती
आई... स्वर्गाहून ही सुंदर तुझे निरागस रूप
तुझ्याच मध्ये दिसते आम्हा देवाचे स्वरूप
आई... सोसल्या अपार कळा तू लेकरांसाठी
झटलीस फार आमचे जीवन घडवण्यासाठी
आई... तू स्नेह, तू त्याग आणि तूच समर्पण
मातृत्वाच्या उबदार कुशीत वासरू घाली आलिंगन
आई... माया अन् ममतेचा तू अपार सागर
तुझ्या पुढे फिका पडे सारा सुखाचा ही डोंगर
आई... तू मनाचा धीर, तू विश्वास आणि आधार
तू सोबत असताना दुःख ही होतील कडेकपार
आई... तुझविन आम्हांस खरच गं कोणी नाही
तुझी जागा या मनी दुसरं कोणीच घेणार नाही
आई... तू निराकार जीवनास आकार देणारी
अंधारमय जगात समईची वात बनून प्रकाश देणारी
आई... सांग कशी करू तुझ्या उपकारांची उतराई
उदरी तुझ्या जन्म घेऊनी धन्य झालो आम्ही ठायी ठायी
धन्य झालो आम्ही ठायी ठायी...
-प्रियांका कुंभार (वाघ).
"आई" अगदी साधा आणि सरळ शब्द पण या शब्दाची महती ब्रह्मांडाएवढी आहे. आईच्या प्रेमाची तुलना करणे कोणालाही शक्य नाही. अगदी स्वर्गही आईपुढे फिका आहे. आईचे स्थान प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सर्वोच्च आहे. असे म्हणतात ," मनुष्याच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी देवाने आईची निर्मिती केली आहे . " आई ही देवरूपी वास्तल्याची मूर्ती आहे जी आपले घर स्नेह आणि ममतेने बहरून टाकते . मलाही माझ्या आईमध्ये साक्षात देवाचे स्वरूप दिसते .
आज माझे जे काही अस्तित्व आहे ते फक्त माझ्या आईमुळेच आहे . मला मिळालेल्या यशाचे श्रेय माझ्या आईचे आहे. माझी आई माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेरणा स्त्रोत आहे. लहानपणापासून मी माझ्या आईचे अपार कष्ट आणि आमच्यासाठी तिच्या मनाची होत असलेली घालमेळ खूप जवळून पहिली आहे. परिस्थिती चांगली नसतानाही आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकावं यासाठी तिने खूप धडपड केली आहे. वडिलांच्या कमी पगारामध्ये घराचा खर्च भागत नसल्यामुळे दिवसरात्र राबणारी माझी माऊली साक्षात आदिशक्तीचे रूप आहे .
माझी आई माझा आदर्श आहे. ती परिश्रम आणि समर्पण यांचे उत्तम उदाहरण आहे. मी तिला रिकामं कधीच पाहिले नाही, तिला फक्त काम करायला आवडते.ती नेहमी मला सांगते की, "स्वप्नांना कधीही अंत नसतो. माणसाने सतत नवनवीन स्वप्न पाहावी आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्दीने मेहनत करावी." आईचे हे वाक्य माझ्या जीवनाचे घोषवाक्य बनले आहे.
श्रेष्ठ समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक साने गुरुजींनी केलेल्या मातृत्वाचे हे वर्णन,
" 'मदंतरंगी करुनी निवास सुवास देई मम जीवनास. '
तीच वास देणारी, रंग देणारी, मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे, त्या थोर माउलीचे. सारी माझी आई ! आई ! आई !!! " या ओळींनी अजूनही मन गहिवरून जाते . खरंच माझ्या आईने मला घडवले. माझ्या निराकार जीवनास आकार दिला आहे . माझ्या जीवनातील माझी आई ही माझा पहिला गुरु आहे.
आई इतके प्रेम, ममता आणि संस्कार दुसर कोणीही देऊ शकत नाही. आईविना या जीवनास अर्थ नाही . ज्याच्याजवळ आई नाही त्याच्यापेक्षा मोठा दुर्भागी नाही .त्याला आईच्या सुखापासून वंचित व्हावे लागले या पेक्षा मोठी शिक्षा नाही. प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी "
शब्दांत देखील मांडता न येणारे मातेचे श्रेष्ठत्व आहे. तिच्या उपकारांचे गाठोडे कधीही कमी होणार नाही आणि त्यांचे ऋण आजन्मात फेडणे शक्य नाही. कारण आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही.
(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )