चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 1 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 1

" चार आण्याचं लव्ह .. बारा आण्याचा लोच्या..! "

|| एक ||


जगातल्या सगळ्या 'राज' लोकांचं 'सिमरन' मंडळींवर प्रेम असतं, तसं आमच्या या राजचंही सिमरनवर प्रेम होतं. होतं म्हणजे काय ती त्याला इतकी आवडायची की.... खूपच! पण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार सिमरन काही केल्या या आमच्या राजला भाव देत नव्हती. मनात प्रेमाची भावना निर्माण होणे तर कोसो दूर! तरीही धाडसी, धडपड्या, प्रचंड चिकाटी असणारा आमचा संयमी आणि धैर्यवान राज... नाराज झालेला नव्हता. त्याला त्याच्या कर्तबगारी वर ठाम विश्वास होता. एक ना एक दिवस आपण सिमरनला आपल्या प्रेमात पाडूच याची त्याला खात्री होती. सात वेळा ग्रामपंचायत निवडणूकीत पडलेला राष्ट्रीय नेता आठव्या वेळीही जसा जोमाने उभा राहतो तसाच आमचा राज हजार बार डिपॉझिट जप्त होनेके बाद भी प्रेमाच्या मैदानात शड्डू ठोकून उभा राहणाऱ्यांपैकी होता. 'हारकर जितने वाले को बाजीगर कयते हय' हा प्रेमवीरांचा मूलमंत्र त्याने बाळगुटीसोबत उगळून पिलेला होता. तर असा आमचा हा राज. आज पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, सिमरनला पटवण्याचा.! सिमरन - म्हणजे खरं तर तिचं नाव सीमा आहे , पण अख्ख्या कॉलेजात ती सिमरन म्हणूनच वर्ल्ड फेमस आहे. आणि आपण ज्याला राज म्हणतोय ना त्याचं नाव राजेश आहे. पण शॉर्टकटच्या नव्या जमान्यात राजेशचा 'राज' झालाय. त्यानं काय फरक पडतोय म्हणा, असंही 'नाम में क्या रख्खा हय?' असं शेक्सपियरने म्हणून ठेवलेलं आहेच. त्यास्तव आपणही नावाबद्दल आणखी काही वेगळं न म्हणता राज आणि सिमरनच्या अंडर कन्स्ट्रक्शन लव्हस्टोरीकडे वळूयात.
दिवस होता 14 फेब्रुवारीचा. जगभरातल्या तरुणाईच्या अत्यंत आवडीचा. व्हॅलेंटाइन डे! पोरं पोरी ज्या दिवशी पार येडे होतात असा हा व्हॅलेंटाइन डे! राजने ठरवलं काहीही झालं तरी आजचा हा परमपवित्र दिवस पावन करूनच सोडायचा. सिमरनला प्रपोज मारायचं म्हणजे मारायचंच. असं त्यानं ठरवलं अन् त्याचा आतला आवाज ओरडला, " अय रताळ्या... लै जोरात मारू नगंस परपोज नायतर मरंल ते लेकरू!" पण राजच्या बाहेरच्या आवाजानं पक्कं ठरवलं होतं की आज आतला आवाज ऐकायचाच नाही. आणि तो केसांचा कोंबडा होईल असा सुंदर भांग पाडून, एकमेव नवी जीन्स अन् जरा बऱ्या वाणाचं पण जुनंच टी शर्ट परिधान करून, त्यावर ज्या स्प्रे च्या निसत्या वासानं पोरीसोरी माणसामागे पळत्यात त्या स्प्रेचा काखाबिखात फवारा मारून, तोंडाला मर्दानगीच्या वासत्यावालं पावडर फासून सज्ज झाला. पूर्वी लढाईला जाणारे सैनिक पाठीला ढाल, कमरेला तलवार लावून जायचे. हा प्रेमसैनिक प्रेमयुद्ध जिंकायला निघाला होता. आणि शस्त्र होतं... हातातलं नाजूक गुलाबाचं फूल.!
सिमरन कॉलेजात आली. नेहमीप्रमाणे तिच्या भोवती मुलींचा घोळका होताच. घोळक्यात जोरदार हास्यविनोद चालले होते. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मुलं जितकी बावचळलेली असतात तितक्याच मुलीही एक्साईटेड असतात बरं. पोरांना जसं वाटतं की आपण कुणाला तरी प्रपोज केलं पाहिजे तसंच पोरींनाही वाटत असतंच कि आपल्यालाही कुणीतरी प्रपोज करायला हवं. अर्थात पोरांच्या जेनेटिक झांबळेपणामुळे त्यांच्या चेहर्‍यावरचे हेंदरट भाव लपून राहत नाहीत. पोरी मात्र सात्विक शांतपणाने चेहरा निर्विकार ठेवून आतली खळखळ कुणाच्याही लक्षात येऊ न देण्यात यशस्वी होतात.
" सिमरन..." राजने आवाज दिला. सिमरनने वळून बघितले. उगाच खांद्यावर दीडशे किलो वजन ठेवल्यागत संजूबाबा स्टाईलने मानेला झटके देत राज येत होता. नाव जरी राज असलं तरी पठ्ठ्याने स्टाईल मात्र 'खलनायक' ची उचलली होती. त्याला बघून सिमरन थांबली. सोबतच्या मुलींना तिने थोडं पुढे जाऊन थांबायला सांगितलं. मुली गेल्या. राज सिमरनच्या पुढे येऊन उभा राहिला.
" स... स... सिमरन.... मुझे तुमसे कुछ कहना है..." उगीच स्टाईलबाजी करत राज बोलला.
" बोल... " सिमरनचा टोटली कोरडा रिप्लाय.
" आ...आ...य..... ल..ल.. ल... व.... " राज 'यू' पर्यंत पोचण्याआधी सिमरनचा हात त्याच्या गालापर्यंत पोचला होता. बल्ब अचानक शॉट व्हावा तास फट्कन आवाज झाला. राजच्या हातातलं फूल गळून पडलं. हात गालावर जाऊन गालाची मदत करू लागला.
" पुन्हा मला प्रपोज करशील तर जीव घेईन मी तुझा... " मोठ्ठ्या आवाजात राजवर वसकून दणादणा पाय आदळीत सिमरन निघून गेली. कॉलेजच्या मैदानावर हा लाईव्ह ड्रामा बघणारी मुलं मुली खदाखदा हसू लागले.
बिचारा राज! सातव्यांदा त्याचं फूल वाया गेलं होतं. सातव्यांदा त्याचा गाल लाल झाला होता. त्याचे मित्र त्याला म्हणालेही, "दरवेळेस फुलाचा रंग बदलतोस... बावळटा कधीतरी समोरचा कँडिडेट बदल..."
अन् राजचं उत्तरही ठरलेलं असायचं... " अरे पण जीव तिच्यावर जडलाय त्याचं काय करू... तिच्याशिवाय इतर कुणी आवडतच नाही... दिल आया इस गधी पे.... तो परी क्या चीज है..!"
अशा पद्धतीने राजचा आणखी एक प्रयत्न वाया गेला. पण राजच तो. त्याचा आतला आवाज त्याला मोठ्ठ्याने म्हणाला, 'अपयश ही यशाची पहिली पायरी असते.' हा आतला आवाज मात्र तो आवर्जून ऐकतो. अशा अनेक अपयशाच्या पायऱ्या तो चढलाय. यशाच्या पायरीचा नंबर नेमका कितवा असतो? याचं उत्तर शोधण्यासाठी तो प्रयत्नरत आहे.

© शिरीष पद्माकर देशमुख ®