चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 2 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 2

" चार आण्याचं लव्ह, बारा आण्याचा लोच्या!"


|| भाग - दोन ||

राज आणि राहूल दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. एकाच वर्गात शिकायचे. एकाच हॉस्टेलमध्ये एकाच रूममध्ये राहायचे. राज जितका अवखळ तितकाच राहूल शांत आणि संयमी होता. दोघांच्या वागण्यात, स्वभावात जमीन अस्मानाचा फरक असला तरी दोघांमधली मैत्री घनिष्ठ होती. राज थोडा वात्रट होता खरा पण तो अगदीच वालंटर नव्हता. म्हणूनच तर राज सिमरनच्या मागे लागलेला असल्याचं ठाऊक असूनही राहूल काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. सिमरन राहूलची सख्खी धाकटी बहीण होती.
" काय यार... आज पुन्हा एकदा तुझ्या बहिणीने थोबाड फोडलं माझं.. " कण्हत कुंथत राज राहूलला सांगू लागला.
" त्यात नवीन काय आहे...? " राहूल निर्विकारच.
" अरे... पण... ती बहीण आहे ना तुझी... तू सांग ना तिला.. माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते... " राज विव्हळू लागला.
" ए बाबा, तुझ्यासारखं मला तोंड फोडून घ्यायचं नाहीये हं... ती माझी बहिण आहे. खरं तर तू तिच्यावर लाईन मारतोस म्हणून मीच तुला फोडून काढायला पाहिजे, पण केवळ तू माझा मित्र आहेस म्हणून मी गप्प राहतोय... " राहूल बोलला," तुला संधी देतोय हेच खूप आहे... आता तिला तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडायचं काम तुझं... यात मी काहीही मदत करू शकणार नाही... "
" काय रे मित्रा... अरे किमान शिफारस तर कर... आपल्याकडे आजच्या काळात शिफारशीशिवाय ना नोकरी मिळते ना छोकरी... "
" सॉरी ड्यूड... मला वाटतं जो स्वतःला प्रूव्ह करून दाखवतो त्याला नोकरीही मिळते आणि छोकरीही... मग काळ आणि इलाका कोणताही असो.. चल मी निघतोय... मला नोट्स आणायच्यात... "
" ओहो... तुमचं बरंय बाबा... नोट्स पे ओठ्स फ्री... मिळतात तुम्हाला... " राज राहूलला चिडवू लागला.
" व्हाट डू यू मीन? "
" यू बेटर नो व्हाट आय मीन... "
" शट्अप..! "
" थँक्यू डिअर... भाभीजी को हमारा नमस्ते बोलदो... "
" कोण भाभी? फालतूपणा करू नकोस राजा.. "
" अरे भाई जैसे हर राज की एक सिमरन होती हय... वैसे ही हर राहूल की... एक अंजली होतीही हय... "
" मुस्काड फोडीन मी तुझं आता... आणि अंजलीला तुझ्या या बडबडीबद्दल कळलं तर... ती तर फाडीनच तुला...चल बाय! "
" बाय. बाय. बाय... "
राहूल आणि अंजली एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघंही एकाच वर्गात शिकायचे. अंजली आणि राहूलची बहीण सिमा म्हणजेच आपली सिमरन रूममेट होत्या. या शहरात एकच मोठं कॉलेज होतं. तिथेही एकच हॉस्टेल. तेही फक्त मुलांसाठीचं. बाहेर गावावरून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना किरायाने खोली करून राहावं लागायचं. सिमरन अंजलीला ज्युनियर होती. दोन वर्षे मागच्या वर्गात. तरीही दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी होत्या. म्हणून तर त्या एकाच रूममध्ये राहायच्या.
अंजली तशी दिसायला 'सो - सो' कॅटेगरीतलीच. पण हेड भारी होतं तिचं. अगदीच ब्रिलियंट. खूप अभ्यास करायची. स्वभावाने खूप शांत, हळवी. आपण आणि आपला अभ्यास एवढ्यापुरताच विचार करणारी. कुणाच्या अध्यात ना मध्यात. तिचा शांत संयमी स्वभाव, साधंसं राहणीमान, प्रखर बुद्धिमत्ता या सगळ्या गुणांवर राहूल अक्षरशः फिदा होता. तोही तिच्यासारखाच शांत, संयमी, अभ्यासू. राहूलला बरेचदा वाटायचं, आपल्या दोघांतले बरेचसे गुण जुळतात. खरं तर राहूलच्या मनात अंजलीबद्दल एक हळवा कोपरा होताच. पण तो मनातलं प्रेम कधी व्यक्त करत नव्हता. कदाचित प्रेमाबद्दल बोलावं तर दोघांमध्ये असलेली निखळ मैत्री तुटायची भीती त्याला वाटत असावी. त्यामुळेच आपल्या मनातल्या सगळ्या प्रेमभावना त्याने मनातच दडवून ठेवल्या होत्या. राजला मात्र मित्राच्या मनातलं सगळं कळायचं. म्हणूनच तर तो संधी मिळेल तेव्हा अंजलीच्या नावाने राहूलला चिडवायला. पता नहीं अंजली कब समझेगी की... राहूलके दिल में 'कुछ कुछ होता है!'

©शिरीष पद्माकर देशमुख ®