" चार आण्याचं लव्ह.. बारा आण्याचा लोच्या "
|| भाग - तीन ||
" लल्लू नहीं, लल्लन हैं... बडेही बदचल्लन हैं! "
अचकट विचकट हसत तो अंजलीच्या समोर येऊन उभा राहिला. लल्लन. युपी की बिहारच्या कुठल्यातरी गावगुंड लीडरचा हा वंशज. आजोबा पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आले. नाही नाही ते धंदे गेले. बापाच्या काळात जम बसला. आणि हे दिवटे तर 'दादा'च होऊन बसलेत. अंजलीच्या कॉलेज मध्ये तिच्याच वर्गात शिकत होता हा लल्लन. शिकणं म्हणजे काय... नुसतं नावालाच. दादागिरी करणे, पोरींची छेड काढणे, सिगारेटी फुंकत, बाईक डूरकावत उंडारणे हेच त्याचे मुख्य धंदे. खिशात बापजाद्यांचा पैसा अन् अंगात तारुण्याची मस्ती. परिणाम व्हायचा तोच झाला. मागेपुढे चार पाच बिडीकाडीवरचे उडाणटप्पू मित्र घेऊन कॉलेजच्या परिसरात गिधाडासारख्या घिरट्या घालत राहणे एवढे एकच काम करायचा तो. वर्गात बसणे, लेक्चर अटेंड करणे हे प्रकार ठाऊकच नव्हते पठ्ठ्याला.
लल्लन मागच्या अनेक दिवसांपासून अंजलीच्या मागे होता. ती दिसताच शिट्ट्या वाजवायचा. ती येता जाता कमेंट पास करायचा. तिच्या समोरून बाईक फिरवायचा. मेंदूला कीड लागलेली मोक्कार पोरं जे जे काही करतात ते सगळे कुटाणे हा लल्लन करायचा. पण अंजली त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. त्याच्या माकडचाळ्यांकडे ढुंकूनही बघायची नाही. तिच्या अशा वागण्याने तो अधिकच चिडायचा. नवनवे चाळे शोधायचा. तिला छळायचा. आजही तसेच झाले. लल्लनने अंजलीची वाट अडवली.
" कहां जा रही हो छमिया....? " अंजली काहीही न बोलता पुढे जाऊ लागली. लल्लन तिच्या समोर येऊन उभा राहिला," अरे.. हम दिवानोंकी तरह पिछे पडे है तुम्हारे... और तुम हो की हमसे बात तक नहीं करती... "
" रस्ता सोड माझा... " अंजली रागावून गरजली.
" नहीं छोडेंगे... " आणि लल्लनने तिचा हात धरला.
त्याच्या हाताचा स्पर्श होताच अंजलीच्या अंगातून जणू वीज चमकली. तिचे डोळे रागाने लालबुंद झाले. ओठ थरथरू लागले. आणि पुढच्या क्षणी खाडकन आवाज झाला. अंजलीने लल्लनच्या कानाखाली सणसणीत आवाज काढला होता. ती थप्पड पडताच लल्लनच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. तो इकडे तिकडे बघू लागला. कॉलेजच्या आवारातले हजारो विद्यार्थी त्याच्याकडे बघून हसत होते. या अपमानाने त्याला मेल्याहून मेले झाले.
" देख लुंगा... मै तुझे देख लुंगा... " असं म्हणत, गाल चोळत तो तिथून फणफणत निघून गेला.
लल्लनच्या त्रासाला कॉलेजातल्या सगळ्याच मुली कंटाळलेल्या होत्या. पण त्याला धडा शिकवण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती. अंजलीने आज ते धाडस केलं होतं. सगळ्या मुली तिच्या जवळ आल्या. अंजलीला थँक्यू म्हणू लागल्या. तिला सपोर्ट करू लागल्या. अंजलीच्या धाडसाचं कौतुक म्हणून टाळ्याही वाजवू लागल्या. काहीजणींनी तर तिला उचलून खांद्यावर घेतलं. सगळ्या मुली एका सुरात तिचा जयजयकार करू लागल्या.
पण इकडे सिमरनला मात्र काळजी वाटत होती. रागाच्या भरात आपल्या प्रिय मैत्रिणीने लल्लनच्या श्रीमुखात ठेवून दिली होती खरी. पण तो विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे. तो शांत बसणार नाही. तो या अपमानाचा बदला घेईलच. आणि तो काय करील याची खात्री नाही. तो काहीही करू शकतो. कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. अंजली सारख्या सोज्वळ, सुसंस्कारी, हुशार मुलीवर लल्लनच्या विकृतपणाची शिकार होण्याची वेळ येऊ नये. सिमरनच्या मनात भीती निर्माण करणारे असे अनेक विचार येत होते. तिला आपल्या मैत्रिणीची खूप काळजी वाटत होती. शिक्षणासाठी आपलं घरदार सोडून येणाऱ्या सरळमार्गी मुलींच्या वाट्याला अशा नालायक मुलांचे क्रूर वागणे येते आणि हीच राक्षसं पुढे या मुलींचा बळी घेतात. स्त्री पुरूष समानतेच्या वल्गना करणाऱ्या समाजात मुळात मुलगी- स्त्री सुरक्षित नाहीये हेच खरे तर दाहक वास्तव आहे. दिवसागणिक हजारो मुली - स्त्रिया पुरूषांच्या मनोविकृतीला बळी पडतात. अन् तरीही स्वतःला सुसंस्कृत - सभ्य समजणारा समाज शांत बसून असतो. अन्याय अत्याचार घडून गेल्यानंतर दीड दीड रूपयांच्या मेणबत्त्या घेऊन मिरवण्याऱ्या जत्थ्यांनी अशा घटना घडूच नयेत यासाठी काय केलेले असते याचाही कधीतरी विचार व्हायला हवा!
© शिरीष ®
[ 'बारीक सारीक गोष्टी' हा मुलांसाठीचा सर्वांगसुंदर बालकुमार कथासंग्रह मिळवण्यासाठी संपर्क साधा. काॅल किंवा वाट्सप करा. मो. 7057292092 ]