गहाण Lata Thombre द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गहाण


गहाण
लता भुसारे ठोंबरे


शंकर तणतणतच घरी आला.मोरीवर हातपाय धुतांनाही बडबडतच धुतले आणि धुमसतचं चुलीपूढ येऊन बसला. द्रुपदा चुलीवर भाक-या टाकतांना आल्यापासून चाललेली शंकरची धुसफुस पाहत होती.आज शेतात काहीतरी घडलयं हे तीनं ओळखलं होतं."काय रं शंकर,काय झालयं एवढं वैतागायला.चहा टाकू का?
"हे बघ माय ,त्या दादाला काही सांग.मी काही बोलत नाही म्हणून लईच करतोय बघ."
"काय केलं रं बाबा त्यानं."
"घरच्या शेताचा सगळा धुरा काढलाय बघ की."शंकर तणतणतंच म्हणाला.
"आरं पर तो का करील तसं?"
"जाऊन बग की एकदा शेतात.दादाला काय तेवढा धुराचं दिसतो होय काढायला.मी आपलं काही बोलतं नाही त्याचा फायदा घेतोय तो."
"आरं बाबा असं भांडू नका धु-यावरून. सख्खे भाऊ ना तुम्ही?"
"त्याला बी सांग की समजून."
शंकर आज माईच काहीचं ऐकायला तयार नव्हता. रामान काढलेल्या धु-याचा त्याला फार राग आला होता.दोघांची वाटणी होऊन तीन वर्ष झाली होती.तेव्हापासून दोघं भाऊ एकमेकांचे वैरी बनले होते.आता माय तेवढीच त्यांचातील दूआ होती. त्यांनी सहा सहा महीने माईला सांभाळायचं ठरवलं होतं.त्यामूळे आता द्रुपदा शंकरकडे राहायला आली होती. शंकरची बायको बाळांतपणासाठी माहेरी जाऊन आता दोन तीन महीने झाले होते.
शंकर जेवतांनाही तावातावाने बोलत होता.माईला रामाला समजवायला सांगत होता.बिचारी म्हातारी पोरांचं वागणं पाहूण टीप गाळत पाण्यासोबतं घास गिळत होती. म्हातारं असतं तर पोरं अशी वागलीचं नसती असं तीला वाटतं होतं.
आजारपणात म्हातार गेलं आणि पोरांनी वाटणी केली. शेत, घर सगळं वाटून घेतलं आता माय राहिली. तीचं काय ?तेव्हा सहा सहा महीने असं ठरलं.बिचा-या माईचीही वाटणी झाली.तीला दोघही सारखीचं पण वाटणीमूळे एकाकडं असतांना दुस-याचं तोंडही पाहायचं नाही असं पोरांना वाटायचं. ती बिचारी माय यात घुसमटून जायची. काही गोड धोड केलं की तीला सगळ्या नातवांची आठवण यायची पण पोरांसमोर काही चालायचं नाही.म्हातारी मुळूमुळू रडत बसायची.त्यातचं आता हे धु-याचं प्रकरण निघालं होतं.
शंकर धकटा.धाकटा म्हणून त्यानं तरी लवतं घ्यावं अस द्रुपदाला वाटायचं पण तो म्हणायचा"धाकटा झालो म्हणून मीचं का नेहमी लवत घ्यायचं, तो मोठा आहे त्यालाही समजल पाहीजे सगळं."
धू-यावरून सुरू झालेली भांडणं आता शिगेला पोहचली होती.आज परत शेतात धु-यावरून दोघात काहीतरी झालं असावं म्हणून शंकर तणतणतचं घरी आला होता.जेवतानाही बडबडतचं होता त्याला भाकरीही गोड लागत नव्हती.म्हणून शंकर अर्ध्या ताटातूनचं ऊठला होता.माईच्या बोलन्याकडे लक्ष न देताच तो घोगड खांद्यावर टाकून शेतावर निघाला होता.रस्त्यात शाळेवर महादू सावकार, केशव वाणी,दामू शेलट्या गप्पा ठोकत बसले होते.हे त्रिकूट म्हणजे गावचं नारदमूनी गावात कुठं काय चाललय याची ह्यांना खडान् खडा माहिती असायची. गावातल्या बितबातम्यांचं पेपरचं होत ते.
"काय रं शंकर, शेतात निघालास होय?"
त्रिकूटाला भावाभावात बिनसलय याची चांगलीचं खबर बात होती. आता त्यांच्यात राँकेल ओतल्याशिवाय ह्यांना खालेल पचनार नव्हतं.आणि म्हणूनचं त्यांनी शंकरला आवाज दिला.शंकरही त्यांना चांगलाच ओळखून होता.
"बैलं हाईत शेतात.जायला नग?"
"असं होय, जाशील की मग, बैलं कूठ जात्यात पळून. बस की जरा तंबाखू खाऊन जा." महादू तिरकस पहात बोलला.
"तसं नव्ह पर कोणी नाई बघा आखाड्यावर उगाचं
बैलांना काई व्हायला नग."
आरं बस,काई नायी व्हायचं बघ.तंबाखू तर घे हतावरचा.केशव वाणी तंबाखू हतावर मळत बोलला.
तिघांनीही बसन्याचं टुमन लावल्यामूळं शंकरला नाईलाज झाला.तो दामू शेलाट्याजवळ टेकला.
"काय रं शकंर काय चाललय शेतात?"महादू सावकारान सुरवात केली.
"काई नाही रोजचंचं."
" पेरणी आटोपली मन की सगळी?" महादू अंदाज काढण्यासाठी बोलला.
"आटोपलीचं बघा."
शंकर काही ताकास थूर लागू देत नाही हे त्रिकुटाला समजले होते पण त्याना शंकरला बोलते करायचे होते.
"काय रं शंकर मी ऐकलय ते खरं हाय म्हणायचं का?"
आता सावकारान डायरेक विषयालाचं हात घातला.
"काय ऐकलय तूम्ही सावकार"
"नाही मनजी,तूझं अन् तूझ्या भावाचं..........
" ते काय चालायचचं सावकार.भाऊ भाऊ मनजे लागायचचकी भांड एकमेकांना"
"नाही मनजे रामा जरा हाईच बघ सार्थी.माग वाटणीच्या एळस बी असचं केलं त्यानं.अन् आता काय मनून त्रास देतोय तूला?"केशव वाण्याने री ओढली.
तसा शंकर जरा मोकळा झाला. आपल म्हणणं ऐकायला कोणीतरी भेटलं होत.असतील चौकडी तरी आपल्याला काय ग-हाण तेवढं सांगायचं म्हणजे आपसूकचं पोहचल भावाकड अस त्याला वाटलं.
"होय रं वाण्या.जरा तरास द्यायला लागलाय बघ. किती समजावलं तरी समजतंच नाई बघ.लई डोस्क खालय त्यान."शंकर तावातावान बोलला.तस त्रिकूटाला गप्पा कुटायला व लावालावी करायला चान्स मिळाला.
"मी पण तेच मनतोय शंकर.तू पडला गरीब त्याचा फायदा घेतोय बघ रामा."हातावर तंबाखू चोळत शेलट्या बोलला.त्यानं हतावर तंबाखू चोळला आणि बाकीच्या सगळ्यानां वाटला.
हतावरचा तंबाखू ओठात दाबत सावकार शंकरला म्हणाला"मला काय वाटतयं शंकर तू का मणून साखरं लवत घ्यायचं? रामाला दाखवं की तू बी कायी कमी नाई मनून."
"काय तो सोक्षमोक्ष लावून टाक बाबा एकदाचा"केशव वाणी सावकाराची री ओढत बोलला.
"काय कराव काहीचं कळत नाही बघा?"
"मी एक खासा उपाय सांगतो बघ,ऐकत असलास तर बोल."सावकार बारीक डोळ करीत बोलला.
"सांगा की मग,नाई कुठं मनलो"
तालुक्याला जा वकीलाकड आन केस टाक बघ त्याच्यावर." सावकारान शंकरचे कान फुंकले.तशी बाकी दोघा मंडळिनीही हो हो म्हणून मान डोलावून घेतली.
"आवं पर यात कोनाच भलं झालय?"शंकर त्यांचं ऐकायला तयार व्हईना.
"असं कसं मनतो शंकर तूला न्याय मिळेल. किती दिवस अस पडत घेनार"त्याला समजावन्याच्या सुरात सावकार बोलले.
"आओ पर सावकार भाऊचं नव तो माझा आनि माईसबी
पटनार नाई बघा हे. शंकर नाराजीनेचं म्हणाला.
"तूझा भाऊ करतो का हा इचार.तो तर काढतोय ना धूरा, आरं कोन कोनाचं नाई बाबा या जगात."सावकार चिकाटीलाच पेटला होता. त्याला दोघा भावाच भांडण लावून मजा पहायची होती.
"बघू" असे म्हणून शंकर ऊठला आणि शेताकडे निघाला. तसे हे तीघं बेरकी हसले.
सकाळी शंकर शेतातून घरी आला.बघतो तर रामा आधीचं घरी येऊन म्हातारीसोबत हुज्जत घालतं बसला होता
म्हातारी चुलीशेजारी बसून टीप गाळत त्याला समजावत होती..रामाने शंकरला पाहीले तसा रामा ताडकन जाग्यावरून ऊठला आणि शंकरला रागातचं म्हणाला"केस टाकनार हाईस व्हय रं माझ्यावर.जा कुठ जायचंय तिथं जा मी बी घाबरत नाही.अरं लहान भाऊ मनून काई बोलत नाई तर डोक्यावरचं मूताया लागलास कीरं.मी नाई काढला तूझा धूरा तूचं घुसवला होतास माझ्या शेतात.तो जरा काय उकरला तर एकदम केस करायच्या गप्पा करतोस होय."
"तूला कोन मनलं?"
"कोनी का मनीना.तूला काय त्याच्याशी.पर मी बी बगतो मह्यावर कोन केस करतोय तो.मी काय हातात बागड्या नाई भरल्यात.मी बी चाललोय आजच वकीलाकड बघ कसा वठणीवल आणतो तूला."
काहीचं दोष नसतांना भावाच्या अशा बोलन्यामूळे
शंकरही भडकला"जा काय कराचं ते कर तूला?मी नाई घाबरत. आला मोठा केस करनारा." मी घातला व्हयं रं तूझ्या शेतात धूरा? तूचं अर्ध्या शेतात आलास माझ्या अन् वरतून मह्यावरचं दादागिरी दाखवतोय.
शब्दान शब्द वाढत गेला आणि भांडण भलतचं वाढलं .द्रुपदा दोघा भावांतील भांडणामूळे पुरती खंगली होती.आजही दोघांना समजावून थकली पण तीच्या तळमळीचा काहीचं फायदा होत नव्हता.एकहीजन माघार घ्यायला तयार होईना.बिचा-या द्रुपदाचा नाईलाज झाला आणि ती हतासपणे रडत बसली.वाड्यातील व गावातील बरीचं लोक भांडण पहायला जमली होती. त्यात त्रीकूटही होतं.एकमेंकांकडं च्छदमीपणे हसायला. गावक-यानी कसबस समजावून दोघांनाही घरी पाठवले.सख्खे भाऊ साताजन्माचे वैरी झाले.
काही दिवसांनी शंकरला एक टपाल मिळालं आणि रामालाही दोघांनीही परस्परांवर दावे ठोकले होते.आता सुरु झाल्या तारखांवर तारखा आणि संपलं घरातील धनधान्य आणि पैसा. ज्या शेताच्या धु-यासाठी दावे ठोकले होते ते शेतही पडलं गहाण सावकाराकडं कायमचं.