Homemade love! books and stories free download online pdf in Marathi

घरपोच प्रेम!

आज तुमची ओळख करून द्याची आहे मला प्रणय शी, प्रणय खूप हुशार आणि मेहणती मुलगा आहे, सध्या बारावीची परीक्षा दिली आहे आणि निकालाची वाट बघत आहे, सुट्ट्या अश्याच वाया नको घालवायला म्हणून कुठे त्याच्या लायकीच काही काम मिळत का शोधू लागला, सायकल मोठी प्रिय त्याची, बाबांनी दहावीच्या निकालानंतर खुश होऊन जी घेतली होती त्याच्यासाठी...
बराच प्रयत्न करून थकला होता, थकुन ब्लु डार्ट च्या ऑफिस बाहेर बसला होता, तितक्यात एका गाडीवरून एक माणूस आला, मागे भलंमोठं बॅग अडकवलेले, प्रणय त्याला बघून चकितच होता, इतकं वजनदार बॅग घेऊन हे रोज कामाला जातात... तो कुतूहलाने त्याची सर्व हालचाल बघत होता... तो लगबगीने आत गेला आणि काही वेळातच बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर खूप काळजी दिसत होती. न राहून प्रणय नि त्याला विचारलं "काय झालं?"
"आई आजारी आहे माझी, उद्या तीच ऑपरेशन आहे आणि मला उद्या सुट्टी मिळत नाही आहे... " तो स्वतःशीच बडबडत म्हणाला.
"मी काही मदत करू शकतो का?"
"तू काय मदत करशील बाबा ही बघ किती मोठी बॅग आहे, तुला उचलणार तरी आहे का?" तो त्याच्या वाक्याचा विचार ही न करत म्हणाला त्यामुळे प्रणयाच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. तो आपल्या सायकल वर तिथून निघू लागला मग वळून त्याला म्हणाल, "काळजी नका करू निघेल काही मार्ग आणि तुमच्या आई पण बऱ्या होतील..."
त्याचं वाक्य एकूण वाईट वाटून तो त्याला म्हणाला, "मी जास्तीच फटकळ पणे बोललो रे तुला, मी काळजीत होतो ना.." मग आपल्या बॅग मध्ये काही बघू लागला आणि त्यानी 5 छोटी पार्सल काढून त्याला एका पिशवीत भरून दिली, "उद्या माझ्या साठी हे पोचवशील? म्हणजे माझा तेवढा वेळ वाचेल आणि मला लवकर पोचता येईल ऑपरेशन ला?"
"हो पोचवेल की..." प्रणय च्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता पुढे त्याला सर्व प्रक्रिया समजावून दिली
"सर्व नीट लक्षात ठेवशील ना? आणि सही आणायची नाही हा विसरायची" मग काही विचार करत तो पुढे म्हणाला "पण तू जाणार कसा?"
प्रणव अभिमानाने आपल्या सायकल कडे दाखवत म्हणाला माझी तुफान सवारी आहे ना, असा जातो आणि असा सर्व पार्सल पिचवतो बघा.. तसा दोघांच्या चेहऱ्यावर आनंद आला.
तू मला देवा सारखा भेटलास बघ, आता मला उद्या अर्धा दिवस करता येईल, "उद्या संध्याकाळी इथेच भेट मग मला..." तेवढे बोलून तो निघाला.
प्रणय ती लिस्ट बघत बसला, ऍड्रेस बघून पाहिले कुठे जायचे हे ठरवत होता, घरापासून जवळ कोणतं ठिकाण पडेल तिथून आधी सुरवात करू असा विचार करत त्यानी 5 ही ऍड्रेस ची नंबर लावून लिस्ट बनवली मग स्वतःशी खुश झाला. आपल्याला उद्या साठी काम मिळालं म्हणून स्वतःवर खुश होता. घरी जाऊन आज शांत चित्ता नि झोपला.


दुसऱ्या दिवशी लवकर उठला, कामाला जायचा पहिला दिवस नवा हुरूप... छान पांढरा कुर्ता आणि खाकी पॅन्ट घालून तो पार्सल वाटप करायला निघाला, संध्याकाळी प्रणय ठरल्या ठिकाणी वाट बघत थांबला, समोरून त्याला येतांना बघूनच प्रणय त्याच्या गाडी जवळ धावत गेला, "दादा दादा तुमचं नाव काय!! नक्कीच तुमचं नाव भगवान असणार..." असे म्हणत तो त्यांच्या गळ्यात पडला, मग पाय पाडू लागला. त्याला काही कळेना ह्याला काय झालय...


"अरे हो हो.. काय करतोस, मी काही देव वगैरे नाही..." त्यानी त्याला बाजूला केलं.
"कसं शक्य आहे ते, तुम्ही देव नाही? तुम्ही तर प्रेमाचे देव आहात.. "
"अरे काय झालंय सांगशील का?"
"तुम्ही किती सुंदर काम करताय, मला रोज तुम्हाला मदत करायची, हातभार लावायचा..." प्रणय जास्तीच भावुक झालेला, त्यांनी त्याला सावरलं आणि बाजूच्या कट्ट्यावर बसवत म्हणाले काय झालं ते मला नीट सांग आधी...


प्रणय त्यांना म्हणाला, "तुम्ही मला जी पार्सल दिलीत ना मी ती पोचवली.. " प्रणय आपला अनुभव सांगू लागला,


पाहिलं पार्सल होतं त्या घरी गेलो तिथे एक आज्जी होत्या, खूप थकलेल्या, डोळ्यांनी दिसत नव्हतं, मी त्यांना पार्सल दिलं तर माझ्या कडेच शंकेने बघू लागले, मग माझ्या समोरच त्यांनी ते पार्सल उघडलं, त्यांची औषधं होती त्यात, ते बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं... मला काही कळेना रडायला काय झालं आणि राहवलं नाही म्हणून मी काय झालं विचारलं, आपले डोळे पुसत त्या म्हणाल्या, "पोरा, देवा सारखा आलास रे.. कालच माझी औषधं संपली, मला काही कळत नाहीत, संत्या चे बाबा होते तो पर्यंत तेच आणायचे, बघायचे औषधं माझी, ते गेले मला इथे एकटं सोडून, कोण बघणार आता माझ्या औषध पाण्याकडे असा कालच मनात विचार आला, आणि बघ तू घेऊन आलास माझी औषध, किती पैसे द्यायचे मी ह्याचे तुला?
मी पार्सल वर बघितलं तर पैसे भरलेले होते, तसं मी त्यांना म्हणालो, "आज्जी पैसे भरलेले आहेत आधीच" त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी तोंडावर हात लावून घेतला, "पैसे भरले आहेत? कोणी?" मी परत पार्सल वर बघितलं, त्याच्यावर संतोष नाव दिसलं पार्सल पाठवणार्याच... ते वाचून माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला ते बघून आज्जी म्हणाली, "कोणी भरले सांग ना..."
मी गालात हसत म्हणलो, "संत्यानी"
त्यांनी परत तोंडाला हाथ लावून घेतला, "तो रे कसा आला इथे?तो तर लांब आहे कित्ती बंगलोर ला..."
"आज काल ऑनलाइन सर्व मिळतं आज्जी... त्यांनीच तुमच्या गोळ्या ऑनलाइन विकत घेऊन पाठवल्यात तुमच्यासाठी.."
ते ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.. "माझा संत्या मला विसरला नाही.. अजून ही काळजी घेतो माझी, लांब राहून ही.. त्याचं प्रेम मला मिळावं म्हणून खटपट करत असतो.. " तेवढे बोलून त्यांनी आपले डोळे पुसले आणि जबरदस्ती मला त्यांच्या सोबत नाष्टा करायला बसवलं... मी नको म्हंटल तर म्हणाल्या
"घे रे बस, मला माझ्या संत्या सोबत जेवल्यासारखं वाटेल, तू जसं त्याचं प्रेम पोचवलं मला... त्याला माझं प्रेम ही पोचू दे.. "
त्या क्षणाला दादा मला कळले आनंदाश्रू कशाला म्हणतात, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आज, त्यांनी ते आपल्या पदराने टिपले, आपल्या हातांनी त्यांनी मला भरवल, इतकं प्रेम होतं त्या घासत...
मी तर सर्व काही विसरलोच होतो ते बरं निघतांना त्यांची सही घेण्याचं आठवलं!
तिथून निघालो, पुढेच पार्सल पोचवायला..."
प्रणय आपल्या अनुभवाचा अनुभव घेण्यात परत गर्क झाला.
"मी खूपच खुश होतो, दुसऱ्या घरी पोचलो तर एका ताई नि दार उघडले, त्यांच्या पदराआड एक छकुली मला वाकून बघत होती, काय पार्सल आलं आहे म्हणून तिला इतकी उत्सुकता की ताईंनी सही करण्या अगोदर तिनी पार्सल फोडलं सुद्धा, त्यात तिच्या शाळेचं पुस्तक पाटी होती, दादा त्या मुलीच्या डोळ्यात असली चमक आली ते बघून, तिच्या चेहऱ्यावर काय आनंद पसरला म्हणून सांगू!! पुस्तक बघून तिनी पाहिले काय केलं तर त्या पुस्तक पाटीच एक दिर्घ चुंबन घेतलं आणि मग मला येऊन बिलगली, कोण कुठली ती छकुली पण ती मला इतक्या आत्मीयतेने भेटली जणू मी तिची अधुरी इच्छा पूर्ण केली. माझा गोंधळ बघून मग त्या ताई म्हणाल्या, २ वर्ष झाली तिची शाळा बंद झाली होती कारण त्यांच्या कडे इतके पैसे नव्हते तिला शिकवण्या करता. मागच्या एका परीक्षेत स्कॉलरशिप लागली आणि त्या संस्थेनीच तिला आता शिकवण्याचं ठरवलं आहे. त्यांनी हि पुस्तक पाठवली आहेत ह्या वर्षीची, २ वर्ष पासून वाट पाहत आहे माझी राणी परत शाळेत जाण्या साठी!!" प्रणय नि आपले डोळे पुसले आणि मग पुढे म्हणला, "दादा कोण ते, माझा त्यांचा काय संबंध, पण त्यांच्या आनंदाचा आज मी एक कारण बनू शकलो... फक्त तुमच्यामुळे!! त्या छकुलीचा आनंद तिनी माझ्या हि चेहऱ्यावर पसरवला, मी खूप खुश होतो, आजच्या दिवसाची सुरवात छान झाली होती. पुढचे पार्सल द्यायला निघालो" प्रणय च्या चेहऱ्यावर सर्व आठवून सांगतांना परत तोच आनंद पसरला होता.
"पुढच्या घरी ना दादा मी जरा घाबरतच गेलो, घराच्या बाहेर असे चित्र विचित्र चित्र रंगवले होते, कुठे खोपडीच काढली होती आणि डेंजर लिहिले होते... मग बेल च्या तिथे लिहिले होते 'ह्या घरातले सर्व पात्र काल्पनिक आहेत!!' कोणी स्वतःला काल्पनिक म्हणाले का हो? मला थोडी भीतीच वाटत होती जणू भुताटकी बांगला आहे अशी मनात भीती वाटू लागली... पण पार्सल तर द्यावे लागणार होते ना, मी देवाचे नाव घेतले आणि घाबरतच बेल वाजवली मी."
"मग?" त्यानी हि उत्सुकतेने विचारलं....
"दादा दार उघडलं ना तेव्हा अक्षरशः माझे पाय थरथर कपात होते आणि मी घाबरून डोळे बंद केले होते, भीती वाटतं होती कोण असेल ठाकूर? भूत तर नाही? दार उघडले आणि मी जेव्हा डोळे उघडडलें माझ्या समोर एक तरुण उभा होता ... मला असे घाबरलेले बघून तो हसला,त्याला हसताना बघून मला अजूनच भीती वाटली का माहित नाही पण ते बली का बकरा ची फीलिंग आली होती. त्यांनी माझी अवस्था बघून मला घरात बोलावले आणि मला पाणी दिले आणि काय झाले विचारले... जेव्हा मी असे घाबरल्याचे कारण सांगितले तो परत मोठ्यांनी हसू लागला. मग पुढे म्हणाला त्याला आर्ट खूप आवडते जसे पैंटिंग करायला खूप आवडते आणि इथे तो एकटच असतो म्हणून मनात जेव्हा काहीं नवीन विचार येतो तो पैंटिंग करतो, एकटेपणामुळे कंटाळून जातो मग स्वतःलाच खुश करायला त्याने स्वतः साठीच शॉपिंग केली होती ऑनलाईन, त्यानी पार्सल उघडलं आणि त्यातून त्यानी बोलावलेला कॅमेरा काढला आणि त्याचे पार्टस बसवले, तो कॅमेरा तयार करतांना ना दाद त्याच्या चेहऱ्यावर एक भूक होती, वेगळीच चमक होती चेहऱ्यावर, त्यांनी माझे फोटो काढले, मी नाही म्हणालो तर म्हणाला तू आज मला माझ्या पॅशन शी मिळवलं आहे तुझ्या पासूनच सुरु करू आणि माझा फोटो काढला, मला दाखवला आणि मी त्याचा पाहिल्या फोटो, त्या फोटोत मी ना अश्रू पुसतांना आलो... त्याच किती प्रेम होतं आपल्या कलेवर... एकटा राहत आहे आणि आपल्या कॅमेऱ्या ची येण्याची आतुरतेने वाट बघत होता, ती आज रात्रीच जंगल ट्रेक ला जाणार आहे तिथे वाईल्ड लाईफ चे फोटो काढणार असं काहीं बडबड करत होता... "
"हम्म... ठीक आहे राज्या एवढं भावुक होऊन नाही चालत पार्सल पोचवणं माझं काम आहे, वेडा कुठला... तुम्ही देव आहात म्हणे..." त्यांनी त्याच्या केसातून हाथ फिरवत म्हंटल आणि ते पुढे जाऊ लागले.
"तुम्ही खरंच देव आहात दादा ... " त्यानी त्यांचा हाथ धरून थांबवले... आणि पुढे म्हणाला, "मी पुढच्या घरी काय झालं सांगेल ना तेव्हा तुमचा हि विश्वास बसेल की तुम्ही देव आहात, लोकांच्या इच्छा पूर्ण करणारे... "
"काय?? असे काय झालं?"
"दादा ... मी माझं शेवटचं पार्सल घेऊन ते द्यायला निघालो होतो... जेव्हा त्या घरी पोचलो मी पार्सल दिलं त्यांनी सही केली आणि मी निघणार तेव्हा पार्सल वरच नाव बघून त्या रडू लागल्या आणि त्यांना काय झालं माहित नाही त्या अस्वस्थ वाटू लागल्या, त्यांची तब्ब्येत बिघडली, मला काहीं सुचेना, मी लगेच आत जाऊन त्यांच्यासाठी पाणी घेऊन आलो, त्यांना पाणी दिलं आणि त्यांना थोडं ठीक वाटलं तेव्हा त्यांनी सांगितलं, त्या पार्सल वर त्यांच्या मिस्टरांचे नाव होते, म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी त्यांना ते पार्सल पाठवले होते, आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता... "
"हा मग त्यात काय?"
" त्यांचे मिस्टर आर्मी मध्ये आहेत... म्हणजे होते "
"होते म्हणजे ?? आता नाहीत का आर्मी मध्ये?"
"आता आर्मी काय ह्या जगात नाहीत... त्यांना हे जग सोडून ३ महिने झाले... " प्रणय त्यांना डोळ्यात रोखून बघत होता.
"काय?? मग ते पार्सल??"
"तेच ना दादा... त्यांच्या मिस्टरांना जाऊन ३ महिने झाले होते पण आज ते तरी त्यांच्या सोबत होते आणि त्या पार्सल मध्ये त्यांनी आपल्या बायको साठी घेतलेले त्यांच्या आवडीचा परफ्युम होता!! ते बघून त्या खूप भावुक झाल्या. कसं दादा सांगा? आज च्या महत्वाच्या दिवशी ह्या जगात नसतांना सुद्धा त्यांच्या मिस्टरांचे प्रेम त्यांच्या पर्यंत पोचले कसे? त्यांची आठवण पोचली, ते नसून हि ते आहेत त्या सुगंधाच्या रूपात त्यांच्या आयुष्यात, सर्व आठवणी नेहमी ताज्या राहतील त्यांच्या मनात? कसं सांगा? त्यांचे प्रेम कसे पोचले दादा सांगा? बोला आता नाही का तुम्ही देव? तुम्ही नाही का लोकांच्या इच्छा पूर्ण करत...?अशक्य वाटणारी इच्छा सुद्धा? आज त्यांचे मिस्टर जाऊन हि परत आले त्यांच्या आयुष्यात दादा कोणा मुळे? आता सांगा नाही का तुमचे नाव भगवान नाही का तुम्ही भगवान?"
"नाही रे बेटा... नाही... मला भगवान म्हणून देवाला छोटं नको करुस!! आणि माझं नाव शंभू... "


आज शंभू ला आपल्या रोजच्या कामाची नव्याने ओळख झाली होती, त्याला आपल्या कामाचा वेगळा दृष्टिकोन सापडला होता, तो स्वतःशी बडबडला... "मी देव नाही... पण देवाचा, लोकांचा मेसेंजर आहे... मी प्रेमाचा मेसेंजर आहे, मी लोकांचे प्रेम घरो घरी पोचवतो...!! आपल्या कामाबद्दल आज शंभूच्या मनात नवीन प्रेम जागृत केले होते कोणी? प्रणय नि ... "


-निशी


इतर रसदार पर्याय