पाच रुपये - 1 Na Sa Yeotikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाच रुपये - 1

आभाळ गच्च भरून आलं म्हणून रेल्वे स्टेशनला जाण्याच्या घाईत तो ऑटो पाहू लागला. पावसाच्या धास्तीने प्रत्येकजण मिळेल त्या ऑटोमध्ये बसून जात होते थोड्याच वेळांत त्याला देखील ऑटो मिळालं. तसं तो रेल्वे स्टेशनला चला म्हणून ऑटोमध्ये बसून घेतलं. ऑटोत बसल्याबरोबर जोराचा पाऊस सुरू झाला. ऑटोमध्ये बसून देखील त्याच्या अंगावर पावसाचे पाणी पडतच होतं. पाऊस तसं खूप जोरदार पडत होता. काही वेळात तो रेल्वे स्टेशनवर पोहोचला. जोरात पाऊस चालूच होता पण ऑटो मधून उतरणे गरजेचे होते. सोबत छत्री नव्हतं आणि पावसात भिजत स्टेशनमध्ये जाण्याशिवाय पर्याय देखील नव्हता. ऑटोमधून उतरून धावत-पळत पावसात भिजत कसेबसे स्टेशनमध्ये पोहोचला. पाऊस मोठा असल्याने एका मिनिटात पावसाने त्याला ओलेचिंब करून टाकले होते. टिकीट काढून प्लॅटफॉर्मवर रेल्वे येण्याची वाट पाहू लागला. पूर्ण अंग भिजल्याने त्याला थंडी वाजू लागली होती. एक गरम चहा प्यावे म्हणून तो कँटीन शोधू लागला. त्याला जास्त वेळ शोधावं लागलं नाही. थोड्याच अंतरावर त्याला कँटीन दृष्टीस पडली. तसा तो कँटीन जवळ गेला आणि चहा पिण्याच्या अगोदर काही खाऊन घ्यावं म्हणून त्या कँटीन मधले समोसे जे की थंड होते पण तो कँटीनवाला गरम आहे म्हणत होता. त्याच्याशी वाद घालत बसायला त्याचं डोकं चालत नव्हतं, पोटात भुकेचं आगडोंब उसळला होता. त्याने समोसे घेतले आणि कधी एकदा पोटात टाकावं म्हणत तो खाण्यास सुरू केला. तिथेच बाजूला एक दहा वर्षाची मुलगी त्याला समोसे खाताना पाहत होती. नकळत त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिला खूप भूक लागली असेल असं त्याला वाटून गेलं. तो इशारा करून खायचे का ? असं विचारलं. तिने लगेच मानेने होकार दिलं. त्याने कँटीनवाल्याला अजून समोसे देण्यास सांगितलं. ते घेऊन त्याने त्या मुलीला दिलं. मुलीने ते समोसे घेऊन पटापट खाण्यास सुरुवात केली. ती खूपच भुकेली होती असे त्याला वाटले म्हणून अजून पाहिजे का ? असं तो विचारलं तेंव्हा ती मानेने नको असं म्हणाली. जवळच नळ चालू होतं. ती नळाजवळ गेली आणि पोटभर पाणी पिऊन तिथेच एका खुर्चीवर आडवी झाली. त्याने ही हातातला समोसा संपविला आणि कँटीनवाल्याकडून एक पाण्याची बॉटल आणि चहा घेतलं. कँटीनवाल्याला त्याने शंभरची नोट काढून दिली. त्याने पैसे घेतले आणि तीस रुपये परत दिले. पण त्यात पाच रुपये कमी असल्याचे त्याला आढळले. त्याने कँटीनवाल्याकडे पाच रुपयांची मागणी केली. तेंव्हा कँटीनवाला म्हणाला, साब बराबर है। दो समोसे के चालीस रुपये, बॉटल के बिस रुपये और चाय के दस रुपये. हे उत्तर ऐकून त्याला कँटीनवाल्याचा राग आला तो म्हणाला, पण बॉटल तर पंधरा रुपयाला आहे. तुझ्या बोर्डवर लिहिलेलं आहे. बोर्डाकडे बोट दाखवून तो म्हणाला, पाच रुपये परत करावं लागेल. म्हणत तो कँटीनवाल्यासोबत वाद करू लागला. या वेळांत गाडीचा अजून काही पत्ता नव्हता. सुरुवातीला गरम समोसे आहेत म्हणून थंडच समोसे दिले होते, त्याचा राग मनात होताच. त्यावेळी त्याच्या पोटात भूक होती आणि डोकं चालत नव्हतं पण समोसे खाल्यावर भूक ही भागली आणि डोकं ही चालायला लागलं. पाच रुपये परत करावेच लागेल म्हणून तो वाद करू लागला. दोघांचे वाद होऊ लागले तसे ती मुलगी त्याच्याकडे पाहू लागली. कँटीनवाला म्हणाला, क्या साब उस बच्ची को बिस रुपये के समोसे खिलाए फोकट मे और पाच रुपये के लिए मुझसे झगडा कर रहे हो. यावर तो म्हणाला त्या मुलीला भूक लागली म्हणून वीस रुपये तिच्यासाठी खर्च केलोय. पण तुला काय झालंय माझे पाच रुपये जास्त घेत आहेस. तुला पाच रुपये जास्तही दिला असता पण तू खोटा बोलून व्यवहार करतोस म्हणून मला पाच रुपये पाहिजेच. पाच रुपये घेतल्याशिवाय तो कँटीनवाल्याला सोडलाच नाही. कँटीनवाल्याकडून पाच रुपयांची नोट घेऊन जाता जाता त्या मुलीजवळ गेला आणि तिच्या हातात ते पाच रुपयांचे नोट दिला. तेवढ्यात त्याची रेल्वे आली आनंदात रेल्वेत बसून आपल्या मार्गावर निघाला.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769