नभांतर : भाग - ३ Dr. Prathamesh Kotagi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नभांतर : भाग - ३

भाग – ३

दुसऱ्या दिवशी चहा पिताना सर्वांची गप्पांची मैफिल रंगली. कुणालाही कसलीही गडबड नव्हती त्यामुळे सगळे अगदी निवांत बसले होते. थोडेच पाहुणे उरले होते मात्र तरीसुद्धा गप्पांना ऊत येत होता. सर्वांच्या चर्चेचे एकच केंद्र होते ते म्हणजे हे लग्नकार्य !

“अगदी आदर्श म्हणाव इतक छान झाल ! ना वारेमाप पैसा खर्च केला, ना अन्नाची नासाडी केली. पण भाऊजी तुम्हाला सुचल तरी कसं हो एवढ परफेक्ट ?” तसे आकाशचे बाबा म्हणाले, “ह्या मागच सगळ डोक याचच आहे !” आकाश कडे हात दाखवत ते म्हणाले. “व्वा ! पोरग भारी हुशार निघाल तुमचं !” असे कौतुकाचे बोल कानी आले. “मग कालची रात्र कशी गेली नवरोबा ? अजून धुंदी उतरलेली दिसत नाही.” कुणीतरी समवयस्क भावाने गर्दीतून प्रश्न टाकला तसे गर्दीतून “अह्म्म...” चे आवाज गुंजायला लागले. “कुठच काय, मुव्ही मध्ये दाखवतात तसं हि दुधाचा ग्लास घेऊन आली आणि मी हलकेच तिचा घुंगट वर केला वगैरे असलं काहीही झाल नाहीय. आपण आहे सामान्य जनता. टिपिकल मध्यमवर्गीय मराठी कुटुंब ! आपल्यासारखी लोक हे असले फिल्मी चाळे करत नाहीत तर पहिलं काम करतात ते म्हणजे अहेर उघडून त्याची विल्हेवाट लावणे !” आकाशने तसे म्हणल्याबरोबर मंडळींमध्ये हशा पिकला. असाच खेळीमेळीत तो दिवस संपला. ठरवल्याप्रमाणे अहेराचे भाग हे त्या त्या जागी पोहोचवण्यात आले. हळू हळू सर्व पाहुणे मंडळी मार्गस्थ झाली. आकाश सुद्धा त्याच्या क्लिनिक मध्ये व्यस्त झाला. सानिका हळू हळू त्या नवख्या घरात रुळत होती, रीतीरिवाज समजून घेत होती. आकाशच्या आई ला ती भयंकर आवडली होती. तिला खूप वाटायचे कि आपल्याला एक मुलगी असावी, तिची हौस पुरवावी..

पण इतक्या वर्षानंतर सानिकाच्या रूपाने ते स्वप्न आज सत्य झाले होते. त्यामुळे सानिकाला तर सासू न मिळता एक आईच मिळाली होती. शांत स्वभावाचे बाबा तर तिच्या मते आदर्श बाबा होते आणि मनापासून प्रेम करणारा नवरा तिला मिळाला होता. एकंदरीत सगळीकडे आनंदाच वातावरण होत. लग्नासाठी जवळपास महिनाभर क्लिनिक बंद ठेवल्याने आकाशला वर्कलोड खूप होता. तीन – चार महिन्यात सगळी घडी त्याने परत बसवली. असच एकदा क्लिनिक वरून घरी आल्यावर बाबांनी विषय काढला, “मी काय म्हणतो, तुझा बॅक लॉग पण भरून निघाला आहे आता, इथ घरी सुद्धा सगळी आवरा आवरी झाली आहे. तर तू आणि सूनबाई जाऊन जरा देवदर्शन, भ्रमंती करून या ! तेवढाच बदल जरा तुम्हाला !” बाबा अस काही बोलतील याची त्याला कल्पनाच नव्हती, म्हणजे त्याला सुद्धा ब्रेक हवाच होता इतक्या कामानंतर. सानिकासुद्धा आईंच्या मागे जाऊन लाजू लागली. तशी आई तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाली, “चल, लाजतेयस कसलं ! जेवायची तयारी कर आणि मग तुम्ही बोला दोघ यावर. रात्री बेडरुमच्या बाल्कनीमध्ये आकाश आणि सानिका बोलत बसले. “काय रे जायचं ना ?” सानिकाने त्याला विचारले. “तर तुला खूप घाई लागलेली दिसतेय. एवढा उतावीळपणा बरा नाही हो !” आकाश तिची खेचत म्हणाला. तशी ती रुसून बसली. मग मात्र तिचा रुसवा दूर करण त्याला जरा महागात पडल कारण त्याबदल्यात दुसऱ्या दिवशीचा पूर्ण दिवस मागितला होता आणि क्लिनिक एक दिवस जरी बंद ठेवलं तरी किती नुकसान होत हे त्याने अनुभवले होते. तरीही तिची ईच्छा म्हणून दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस तिला देण्याचे मान्य केले.

खूप दिवसांनी ते असे एकत्र बसले होते. साहजिकच दोघेही गप्पांमध्ये रमले होते. दोन दिवसांनी फिरायला बाहेर पडायचे असे त्यांचे ठरले. पुढच्या दोन दिवसांमध्ये आकाशने क्लिनिक ची सर्व व्यवस्था लावून घेतली आणि सानिकाने घरचे सगळे आवरून घेतले, दोघांच्या बॅगा भरून घेतल्या. ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी ते निघाले, ते सुद्धा आकाशच्या स्टाईलने ! आकाश ला भटकायला खूप आवडतं आणि त्याची फिरण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे जरा. सामान्यतः कुठे जायचं म्हणाल कि लोकं काय करतात ? काही प्लॅन्स बनवतात, आधी सगळी तयारी करून घेतात, राहायची सोय वगैरे तरतुदी करतात. हा गडी असलं काहीही करत नाही. अचानक ठरवेल कि फिरायला जायचं आहे, कुठे – काय – कसं काहीही बघणार नाही. हातात गाडी असेल तर मनाला येईल तिकडे वळवणार आणि जिथे पोहोचेल तिथे फिरणार. गाडी नसेल तर बस – ट्रेन कोणतीही असो मग ती त्यात बसून लास्ट स्टॉप पर्यंत जाणार किंवा मनात येईल तिकडे उतरणार. अस करत करत जवळपास संपूर्ण भारत त्यान पालथा घातला होता. एकदा त्याला कुणी विचारले कि तुला कधीच गैरसोय नाही होत ? आम्ही काडीचाही त्रास होऊ नये याची किती काळजी घेतो आणि तू असा बिनधास्त कसा जातोस रे कुठेही ? त्यावर तो म्हणालेला, “अस ठरवून आपण जेंव्हा कुठे जातो ना तेंव्हा त्यातली मजा घेता येत नाही. आपण सगळ ठरवलं तसच होईल कि नाही ? रेल्वेत रिझर्वेशन केलेल्या जागेवर कुणी बसलेल असेल का ? आम्ही जिथे जाणार तिथे जेवण वगैरे व्यवस्थित मिळेल का नाही ? आता नेमक काय होईल ? असे विचार करत राहतो, विनाकारण त्याचा ताण घेतो. पण मी कुठे जायचं, काय करायचं काहीही ठरवत नाही, नशिबात असेल तिकडे फिरून येतो. काहीही ठरवलं नसल्यामुळे दरवेळेस मनात एक थ्रिल असत कि आता काय नवीन अनुभवायला मिळेल ? अनपेक्षित गोष्टींचे गोड, सुखद धक्के देणारे ते क्षण अविस्मरणीय ठरतात. मेंदू नेहमीच नव्या आव्हानांसाठी तयार राहतो.

ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी ते निघाले. निघताना बाबांनी आग्रह केल्यामुळे गाडी घेऊन निघाले होते आणि अर्थातच पुढचा कसलाच प्लॅन ठरलेला नव्हता. पहाटे निघाले असल्याने रहदारी कमी होती, ते दोघे एकमेकांच्या सहवासाचा, प्रवासाचा निखळ आनंद घेत पुढे जात होते. ५ -६ तास गाडी चालवल्यानंतर आकाश ला कंटाळा आला. पाय मोकळे करण्यासाठी म्हणून एका हॉटेल मध्ये ते थांबले. चहा नाष्टा केल्यानंतर ते दोघंही जरा फ्रेश झाले. बिल देताना त्याने हॉटेल च्या मालकांना विचारले, “हा रस्ता पुढे कुठे जातो ?” त्यावर त्या मालकाने विचारले, “तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे ?” आकाश हसत हसत म्हणाला, “ते काय अजून ठरले नाहीय, पण तुम्ही सांगा कि हा रस्ता कुठे जातो पुढे ?” त्याचे उत्तर ऐकून तो मालक जरा चक्रावूनच गेला आणि त्याला म्हणाला, “इथून पुढे १० – १२ किमी वर तीन रस्ते लागतात, त्यातला डाव्या हाताचा रस्ता हा आंबेवाडी म्हणून गाव आहे तिकडे जातो मी तिथेच राहतो. सरळ रस्त्याने गेलात तर थोड्या अंतरानंतर घाट लागेल तो उतरून गेलात तर खाली निसर्गरम्य गावात पोहोचाल. तिकडे खूप जागा आहेत फिरण्यासारख्या आणि उजव्या रस्त्याला गेलात कि अजून एक गाव लागेल तिसवाडी नावाचे. आमच्या गावात आलात तर घरी या, मस्त गाव – शेत सगळ फिरवून दाखवतो ! रामदास पाटील नाव आहे माझ, कुणाला पण विचार माझ्या घरी सोडतील, आणि हे माझ कार्ड ठेवा नंबर आहे त्यावर उपयोगाला येईल.” अस म्हणून त्याने आकाश कडे कार्ड दिले. “धन्यवाद पाटील साहेब, जमल तर नक्कीच येऊन जातो तुमच्या गावाला !” अस म्हणत आकाश ने त्याचा निरोप घेतला. गाडीत बसून त्यांनी पुढचा प्रवास सुरु केला. तीन रस्ते येताच आकाश ने पटकन सानिकाला विचारले, “कुठे वळवू ग ? डावीकडे, उजवीकडे का सरळ ?” “सरळ !” ती पटकन उत्तरली. स्मित करत आकाश ने गाडी सरळ घेतली आणि त्या हॉटेल मालक रामदास ने म्हटल्याप्रमाणे थोड्याच अंतरावर एक घाट सुरु झाला, श्रावण महिना सुरु असल्याने ऊन सावल्यांचा तो खेळ निसर्गाच्या रम्य, विस्तीर्ण हिरव्या पटावर सुरु होता. धुक्याने वेढलेल्या घाटरस्त्यातून गाडी नेताना त्याला जाम मजा येत होती. थोडा घाट उतरून होताच एक गाव लागले.

त्या थंडगार पावसाळी वातावरणात चहाशिवाय मजा नव्हती, म्हणून ते चहा घेण्यासाठी उतरले. गरमागरम चहाचा आस्वाद घेत असताना सानिका त्याला म्हणाली, “ऐक ना आपण इथेच राहू या का ? इथल वातावरण खूप छान आहे.” “जरूर, का नाही. आता सरकारांचा आदेश आल्यावर नाकारणार कसा !” आकाश तिला म्हणाला तशी ती लाजली. तिला लाजल्याचे पाहताच त्याला हसू आले. आपल्याला अस हसल्याचे पाहून ती त्याला खोटेच मारू लागली. “अग हळू, चहा सांडेल ना..” म्हणत तो तिला आवरू लागला. चहा पिऊन झाल्यावर त्याने गावात चौकशी करून राहण्यासाठी सोय आहे का बघितले. त्याप्रमाणे त्याला कळाले कि, इथून पुढे ५ किमी वर एक एक रिसॉर्ट आहे. तो विचारेपर्यंत इकडे सानिकाने थोडी शॉपिंग सुरु केली, ताजी फळे, भाजलेले मक्याचे कणीस अस बरच काय काय तिने घेतलं होत. निघण्यासाठी आकाश ने तिला बोलावले, “चला निघायचं ना, का इथेच राहणार आहेस ?” सानिका गाडीत येऊन बसली, तिने विचारले “राहण्यासाठी काही सोय झाली का ?” “हो, इथून ५ किमी वर एक छानसे रिसॉर्ट आहे. तिकडेच जातोय आपण.” अस तिला उत्तर देत त्याने गाडी सुरु केली. ते निघाले तसे हलका पाऊस सुरु झाला. थोड्याच वेळात ते तिथे पोहोचले. मुख्य रस्त्यापासून डावीकडे आत जाण्यासाठी रस्ता होता तिकडे बाण दाखवणारा फलक त्यांना दिसला त्यावर “REST IN NATURE’S WOMB RESORT” असे लिहिले होते.

आकाश ने गाडी डावीकडे वळवली. एका चिंचोळ्या रस्त्यावरून ते आत जात होते, भल्या मोठ्या गेट मधून गाडी आत घेत एका इमारतीसमोर त्याने उभी केली. आत जाऊन रिसेप्शन वर चौकशी करून एक रो बंगला त्याने बुक केला. बंगला आतून खूपच अलिशान होता. एक हॉल, किचेन, २ बेडरूम्स आणि हॉल च्या एका बाजूला समोर छोटस गार्डन. त्या गार्डन मध्ये छान गवताचा हिरवागार गालीचा पसरला होता. बाजूने फुलझाडे लावली होती. निरनिराळ्या रंगाची ती फुले मन आकर्षून घेत होती. मध्यभागी एक लाकडी गोल टेबल आणि २ खुर्च्या होत्या. त्यासमोरच एक स्टील चे रेलिंग होते तिथे उभे राहून समोर दिसणाऱ्या रम्य देखाव्याचा आनंद लुटायची सोय केली होती. तिथून लांबच्या लांब दोन्ही बाजूला पसरलेली डोंगररांगा दिसत होत्या. समोरचा भाग मोकळा होता. समोर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आकाशच दिसत होते. खाली धुक्यात हरवलेली खोल दरी दिसत होती. एकंदरीत डोळ्यांना प्रसन्नता देणारा देखावा तिथून दिसत होता.

किचेन मध्ये सर्व वस्तू होत्या, घरात सर्व आवश्यक ते सामान होते. शिवाय त्या घराच्या समोर एक दोन खोल्यांचे छोटे घर होते जिथे रखमा आणि तिची मुलगी रमा राहत होती. त्या घराची देखभाल त्याच करायच्या. तिथे कोणी रहायला आले कि त्यांचे स्वयंपाक वगैरे त्याच बघायच्या. आकाश ने सगळ सामान बेडरुममध्ये ठेऊन दिले. फ्रेश होऊन तो त्या रेलिंग जवळ येऊन तिथले दृश्य बघण्यात हरवला. वाऱ्याबरोबर पळणारे ते ढग बघताना त्याचे मन त्याला भूतकाळात नेऊ लागले...

सहा सात वर्षापूर्वी.......

क्रमशः

सदर कथानक हे पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


- ©डॉ. प्रथमेश कोटगी

(सदर कथेचे पूर्ण हक्क हे लेखकास्वाधीन असून यातील अंशतः किंवा पूर्ण भागाचे पुनः प्रकाशन करायचे असल्यास वा चित्रीकरण करायचे असल्यास लेखकाची तशी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)