सगळेच भयचकित नजरेने एकमेकांकडे पाहात होते.
आता हळूहळू काही गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या होत्या. दोन हजार वर्षांपूर्वी चे तेच संकट त्यांच्या समोर होतं..समीर, दिग्या, स्नेहा आणि मंगेश काहीच बोलत नव्हते. काही मिनिटं त्या खोलीत एक जडशीळ शांतता पसरली.
" एक मिनिट.. ह्यात लिहल्या प्रमाणे महाराज नंदक यांनी समुद्राच्या किनारी राजवाडा बांधला होता..आणि हा वाडा पण.." - समीर गंभीर स्वरात म्हणाला.
" हो..तो राजवाडा याच ठिकाणी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.." - स्नेहा म्हणाली.
" म्हणजे ते सात दरवाजे आणि अग्निघराकडे जाणारा रस्ता ही इथेच असेल.." - दिग्या.
" हजारो वर्षांत जमिनीच्या उलथापालथीत भूभागात खूप बदल झाले आहेत.. ही वास्तू जरी नंतर बांधली गेली असली तरी ती तळघराकडे जाणारी वाट इथेच आजूबाजूला असावी.." - समीरने विचारपूर्वक त्याचे मत मांडले.
मंगेश शांतपणे बसून सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.
" ते दुसरं कागद आहे त्यावर नकाशाच आहे ना..तोच असेल तळघराकडे जाण्याचा रस्ता.." - दिग्या एकदा समीर कडे आणि मग स्नेहा कडे पाहत म्हणाला.
" नाही..हा नकाशा तळघराच्या आतला आहे आहे.. असं स्पष्ट लिहलंय यात..प्रल्हादपंत खूप बुद्धिमान होते अग्निघरात प्रवेश करायचा आधीच त्यांनी खोल अभ्यास करून सगळ्या गोष्टी यात लिहून ठेवल्या आहेत. म्हणजे वितल लोकातून हाट नदी पर्यंत जाण्याचा रस्ता, वाटेत येणाऱ्या अडचणी आणि पुढे अग्निघर म्हणजे तर एक मोठं चक्रव्यूह आहे त्यातून ही वाट काढत कसं जायचं हे सगळं या पत्राच्या दुसऱ्या कागदावर लिहून ठेवलं आहे.
काही वेळ विचारकरून त्यांनी आजूबाजूला शोधायचे ठरवले. पावसाने विश्रांती घेतली होती म्हणून त्यांचे काम वेगाने सुरू झाले. वाड्याचा सर्व परिसर त्यांनी पिंजून काढला पण असं एकही ठिकाण त्यांना सापडलं नाही किंवा अशी एकही खून मिळाली नाही जिथून त्या तळघारकडे जाण्याचा मार्ग असण्याची शक्यता असेल. संध्याकाळ झाली पण काहीच हाती लागलं नाही. निराश होऊन सगळे परत घरात आले. आजचा दिवस वाया गेला होता. वेळ वाळुसमान हातून निसटून जात होता.
खिडकीतून संध्याकाळचा गार वारा घोंघावत आत येत होता. त्यात समीरचे भुरे केस फडफडत होते. तोच वारा खोलीत घोंघावत होता. स्नेहाच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. एक उसासा सोडून तो सावकाश खाली आला. आजोबांच्या आठवणीने त्याचा जीव गलबलला होता. त्याला विश्वास होते की आजोबांनी नक्कीच काहीतरी मार्ग शोधून ठेवला असेल पण तो त्यांना सापडत नव्हता.
खाली येऊन त्याची नजर टेबलावरच्या आजोबांच्या डायरी वर पडली.त्याला चमकुन आठवले की डायरी मध्ये प्रत्येक पानावर एक बाण काढलेलं होतं..आणि काही आडव्या उभ्या रेघोट्या आखलेल्या होत्या. त्याने डायरी हातात घेतली. ती पुन्हा एकदा चाळली. काहीतरी विचार करून त्याने डायरी ची पान फडायला सुरुवात केली.. कोणाला काहीच कळेना.. समीर काय करतोय ते..!!
पानं फाडून झाल्यावर तो टेबल जवळ गेला आणि टेबलावर च्या सगळ्या वस्तू बाजूला काढून ठेवल्या.प्रत्येक पान पृष्ट क्रमांका प्रमाणे आणि बाणाचा टोख उत्तर दिशेला अशी मांडणी करू लागला...दिग्या, स्नेहा आणि मंगेशही टेबल जवळ येऊन उभे राहिले..एक पान.. दुसरं पान.. तिसरं पान.. असं काहीवेळातच डायरीच्या पानांनी टेबल व्यापून गेलं.. आणि समोर एक नकाशा तयार झालेला पाहून सगळे अवाक् झाले.. त्या आडव्या उभ्या रेषांनी एक नकाशा तयार झाला होता..जवळच समुद्र आणि इतर काही गोष्टी लक्षात घेतल्या तर तो त्याच भूखंडाचा वाटत होता..
" मानलं भावा तुला.. कसं काय शोधलं पण..? " - दिग्या ने समीरला विचारले.
" अरे ह्यात काही रॉकेट सायन्स नाही रे.. डायरीच्या पानांवर बाणाची विशिष्ट खून आहे.. कुठला ही नकाशा पहिला तर त्यावर उत्तर दिशा दर्शवणारा बाण असतोच..मी फक्त तर्क लावून बघितलं.." - समीर.
समीरने एका कोऱ्या कागदावर सध्याच्या वाड्याचा एक आराखडा तयार केला आणि आजोबांनी तयार केलेला नकाशा असे दोन्ही जुळवून बघितले..त्यात बरेच साम्य आढळत होते.. आता फक्त त्या तळघरात जाण्याची गुप्त वाट शोधायची होती.. सगळ्यांच्या अंगात एक नवीन ऊर्जेचा संचार झाला आणि दिवसभर दमलेले असून ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले..
शोधत शोधत ते देवघराजवळ आले..जुना नकाशा पाहिला तर त्यात ही इथे मंदिर असल्याचे दर्शवले होते..आणि त्या समोर एक विहीर असं चित्र दिसत होतं..पण आता विहिरीच्या जागेवर तिथे धान्य साठवणयासाठी कोठारे होती..ही गोष्ट विचार करण्या सारखी होती.. सगळे त्या खोलीत गेले..या खोलीत इतर खोलींच्या तुलनेत कमालीचा गारवा होता. ती खोली समीरने निरखून तपासायला सुरुवात केली.
वाडा जुन्या बांधणीचा असल्यामूळे धान्याची कोठारे ही विटांच्या बांधकामाची होती. त्यावर झाकण्यासाठी लाकडी फळ्यांचा वापर होत असत. कोठराची भिंत कमीत कमी पाच ते सहा फूट उंचीची असेल. त्यावर लाकडी फळ्या ठेवण्यात आलेल्या होत्या. यात वेगळं वाटण्यासारखं काही नव्हतं. पण कुतूहलापोटी समीरला त्यात डोकावून बघावस वाटलं. बाजूला असलेल्या शिडीच्या साह्याने तो वर चढला आणि एका हाताने लाकडी फळी बाजूला केली. दोन वेगळी कोठारे होती. त्यातून एक रिकामं असल्याचं दिसत होतं..दुसऱ्या कोठरावरची फळी समीरने बाजूला केली. त्यात काहीच दिसलं नाही उलट ती खोल वाटत होती. स्पॉट लाईटने आत बघण्याचा प्रयत्न केला पण काहीच दिसलं नाही.. बाजूच्या कोठराचा तळ दिसत होता..पण ह्या कोठाराचा तळ नजरेस पडत नव्हता. उलट आतल्या बाजूला खोलवर रीतसर रचलेल्या दगडी दिसत होत्या. अचानक कोठाराचा आतून एक जोरदार वाऱ्याचा झोत बाहेर आला आणि समीरला आधळला..त्याचा तोल गेला आणि शिडी सकट तो जोरात जमिनीवर येऊन आपटला. सगळे समीरच्या जवळ धावून गेले. त्याचा डोकायला थोडा मार लागला होता आणि त्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. हा वाऱ्याचा झोत मोठा अनैसर्गिक वाटत होता..त्यात काहीसा जिवंतपणा जाणवत होता. दिग्या, स्नेहा आणि मंगेशला ही तो त्यांच्या आजूबाजूला घोंगावत असल्याचं जाणवलं. ह्या भयानक वातावरणात सगळे एकदम घाबरून गेले होते. खोलीतील तापमान सातत्याने कमी होत होते. हाडं गोठवणारी थंडी खोलीत पसरली. मंगेश आणि दिग्याने समीरला उचलून घेतलं आणि सगळे खोलीच्या बाहेर पडले एवढ्या थंडीत ही तिघं घामने डबडबले होते. त्यांनी समीरला त्याचा खोलीत नेऊन झोपवले. सुदैवाने त्याला जास्त दुखापत झाली न्हवती. सगळे भयचकित अवस्थेत दिवाणखान्यात येऊन बसले.
*************************************
कोकणात एका अज्ञात ठिकाणी ,
हे तेच ठिकाण असावं जिथे समीरच्या आजोबांना कैद करून ठेवलेलं होतं. त्या घराला एकच खिडकी होती...काचेची. आत चाललेल्या सगळ्या गोष्टी बाहेरच्याला स्पष्ट दिसतील इतकी मोठी. आत एक तरुण इसम खोलीच्या मधोमध बसला होता. त्याचा चेहरा कुरूप दिसत होता. दाढी वाढलेली होती. केस विसकडलेले होते. कपाळावर कश्याचा तरी मोठा टिळा लावलेला. समोर घरीच तयार केलेला एक यज्ञकुंड दिसत होतं.. त्यात आग पेटवलेली होती. काळया कपड्याने तयार केलेला एक बाहुला तिथे ठेवला होता. बाजूलाच ठेवलेल्या ताटातून त्याने काहीतरी उचललं आणि आगी समोर हात पुढे करून मोठ्याने मंत्रा सारखे शब्द उच्चारू लागला.
क्रीं क्रीं सदात्मने भुताय मम मित्रः
सिद्धिम कुरु कुरु क्रीं क्रीं फट्ट्
ताटातून जे उचललेले होते ते त्याने जोराने फेकल्यागत अग्नीत टाकले. मोठा भडका उडाला. तो अजून आवेगाने मंत्र बोलू लागला. पुन्हा तेच काहीतरी ताटातून उचलून अग्निच्या स्वाधीन केलं. एका हातात काळा बाहुला घेऊन तो जागेवरून उठला आणि यज्ञकुंडाला एक प्रदक्षिणा घातली आणि तो काळा बाहुला भडकलेल्या यज्ञकुंडातल्या ज्वलांना अर्पण केला.
" उठा..! आज मी तुम्हाला मुक्त करत आहे..!
उठा.. ! जागे व्हा..! " तो माणूस जोराने ओरडला.
सगळीकडे अद्भुत शांतता पसरली होती.. अचानक यज्ञकुंडातून काळया धुराचे वलय बाहेर पडू लागले. बघता बघता त्यांनी पूर्ण खोली व्यापून गेली आणि खोलीला असणाऱ्या खिडकीच्या काचेचे क्षणांत तुकडे झाले..आणि काळया धुराचे वलय वेगात एका दिशेने निघून गेले.
हे बघून तो माणूस जोर जोरात हसायला लागला..
आणि खिडकी जवळ येऊन उभा राहिला. तेवढ्यात विजेचा कडकडाट झाला आणि काही क्षणांसाठी सगळं उजलून निघालं.. या प्रकाशत त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसला..तो होता समीरचा अनिकेत दादा..!! पुण्याला राहणाऱ्या त्याच्या आत्याचा मुलगा.. पण त्याने असं का केलं असेल..?
*************************************
इकडे समीरच्या घरी सगळे अस्वस्थ होते..पावसाळ्यात अनेकदा गावात लाईट जात असे. आज ही तेच झालं होतं..सगळे समीरच्या खोलीत बसून राहिले होते..स्नेहा समीरच्या जवळच बसली होती..दिग्या बाजूच्या एका खुर्चीवर बसला होता आणि मंगेश ही बेड वर बसला होता. खोलीत फक्त एक मेणबत्ती पेटली होती..तेवढाच काय तो प्रकाश होता..!! अचानक खोलीत एक शुभ्र प्रकाश दिसू लागला जणू त्या प्रकाशाच्या दुसऱ्या बाजूला एक वेगळी दुनिया असेल असं वाटत होतं..तो जसजसा मोठा होत गेला तसतसा त्यांना एका मंत्रोच्चराचा ध्वनी ऐकू आला. सगळे घाबरून एकत्र येऊन उभे राहिले.
" घाबरण्याच काही कारण नाही..आम्ही तुम्हाला इजा पोहोचवायला नाही आलोत." आतून एक आवाज आला.
तो प्रकाश आता इतका वाढला की त्यासमोर डोळे उगडून स्पष्टपणे बघणं अशक्य होतं.सगळे डोळ्यांवर हात ठेवून डोळे बंद करतात. आता तो प्रकाश हळूहळू मंद होतो. सर्वजण डोळे उघडतात आणि समोर पाहतात तर सफेद पेहरावातील एक प्रचंड मोठी उंची असलेले एक वृद्ध व्यक्तिमत्त्व त्यांच्या समोर उभे होते. ते सगळ्यांकडे बघून स्मितहास्य करत होते.
" माफ करा..पण कृपया आमचे मार्गदर्शन करावे. आम्हा सगळ्यांना खरंच माहीत नाही आपण कोण आहात.." - दिग्या म्हणाला.
" तुम्हा सर्वांपैकी कोणीही आम्हास ओळखले नसेल आणि ते उचितच आहे. आम्ही रुद्रस्वमी आहोत. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी या भूतलावर आमचे वास्तव्य होते. सध्या तुम्ही ज्या संकटाला सामोरं जात आहात त्याची सुरुवात आमच्या काळात झाली होती. त्या पत्रमधून बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील." ते वृद्ध गृहस्थ म्हणाले. वृद्ध असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज ओसंडून वाहत होते. ते गृहस्थ साक्षात रुद्रास्वामी होते.
" स्वामीजी आम्ही सगळे मोठ्या संकटात सापडलो आहोत..आम्हाला यातून बाहेर काढा.." - दिग्या हात जोडत म्हणाला.
" नाही बाळा नाही.. असं खचून जाणं योग्य नाही..आता तर वास्तविक युद्ध सुरू झाले आहे.." रूद्रस्वामी म्हणाले.
रूद्रस्वमी समीर जवळ येऊन उभे राहिले आणि त्याच्या कपाळावरून हात फिरवला. असं करताच समीर शुद्धीवर आला. डोळे उघडताच त्याला समोर रुद्रस्वामी दिसले आणि त्याने त्यांना नमस्कार केला.
" समीर बाळा..तू खूप धाडसी आहेस..आणि हे तुझे मित्र सगळेच तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत हे पाहून आनंद झाला.. आता वेळ फार कमी आहे आणि म्हणूनच काही गोष्टी तुम्हाला कळायला हव्यात म्हणून आज आम्ही तुमच्या समक्ष आहोत.. अग्निघर बद्दल तुम्हाला माहिती आहेच. पण त्या प्राणज्योती पर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण आहे. नक्षत्राच्या मुहूर्तानंतर त्या असूरांची शक्ती अधिकच वाढली आहे. याचा तुम्ही मगाशीच अनुभव घेतला. आजूबाजूला घडत असलेल्या अनेक गोष्टी यास कारणीभूत आहेत.
" पृथ्वीतलावर अशी कोणतीही जागा नाही ज्या ठिकाणी त्यांचा नाश होऊ शकेल, असं कोणतही हत्यार नाही जे त्याच्यावर वार करू शकेल, असा कोणतही प्राणी नाही जो त्यांचा अंत करू शकेल. त्या दुष्ट शक्तींना फक्त तीच व्यक्ती रोखू शकते ज्या व्यक्तीचा जन्म सूर्यवंशी कुळात झाला असेल." - रुद्रस्वामी म्हणाले.
"पण त्या सर्वांना जाऊन तर दोन हजार वर्षे झाली आहेत, मग आता त्यांना कोण थांबवणार?" मंगेश विचारतो.
" त्यांना फक्त समीर थांबवू शकतो आणि म्हणूनच त्या दुष्ट शक्तींचे पहिलं काम समीरला संपवायचं आहे. ." रुद्रस्वामी म्हणाले.
समीर आता तुझी खरी परीक्षा चालू होणार..
वाड्याच्या मागच्या बाजूला पाच कोसांवर समुद्राच्या तळाशी एक गुहा आहे. तिथे एक संदुक दिसेल जी फक्त समीरच्या हातून उघडू शकते. त्या संदुकमध्ये एक दैवी परशु आहे. भगवान परशुराम यांच्या विद्युदाभी या परशु प्रमाणेच तेही शक्तिमान आहे. ते परशु तुझे रक्षण करेल." रुद्रस्वामी म्हणतात.
" स्वामीजी एक शंका आहे.. तुम्हाला हे सगळं आधीच माहीत होतं.. तुम्ही एवढे शक्तिशाली आहात..सगळ्या गोष्टींचे जाणकार आहात मग आपण स्वतः मला प्रत्यक्ष मदत का करत नाहीत." - समीर प्रश्नार्थक नजरेने रुद्रस्वामींकडे पाहात म्हणाला.
यावर रुद्रस्वामी काहीच बोलले नाही..त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
"सांगाना स्वामीजी असं का करत आहात आपण..आपण मदत केली असती तर कदाचित काही गोष्टी सोप्या झाल्या असत्या.." - समीर म्हणाला.
सांगतो..आज सगळं सांगतो. - रुद्रस्वामी.
रुद्रस्वामींनी दोन हजार वर्षांपूर्वीचा अजून एक गूढ सांगायला सुरुवात केली..
.....................................................................................................................................