नभांतर : भाग - 8 Dr. Prathamesh Kotagi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नभांतर : भाग - 8

भाग – 8

आज सानिकाचा हात हातात घट्ट धरून आकाश आणि सानिका एकमेकांच्या जवळ बसले होते. सानिकाने बघितले तर आकाशच्या डोळ्यात पाणी आले होते. “रडतोयस का ?” सानिकाने त्याला विचारले. “काही नाही ग असच...” त्याने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. “मला माहितीय तू का रडतोयस ते, तू त्या जुन्या आठवणींमध्येच रमला आहेस ना ? किती वेळा सांगितलंय तुला कि ते वाईट प्रसंग परत परत नको आठवूस म्हणून.. आता आहे ना आपण एकत्र.” आकाश ला आश्चर्य वाटले कि तिला कसं काय कळाल असेल मनातल. “मला एक प्रॉमिस कर कि, इथून पुढे कोणताही प्रसंग घडला तर मनात कसलेही विचार येण्यापूर्वी तू माझ्याशी बोलशील.” आकाश तिला म्हणाला.. “प्रॉमिस !” ती सुद्धा त्याच्या हातात हात देत म्हणाली.

“तू सुद्धा मला एक प्रॉमिस कर, आपल्या लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला तू मला इकडेच घेऊन येशील अगदी काहीही झाल तरी !” त्याने सुद्धा कसलेही आढेवेढे न घेता तिला प्रॉमिस केले.

----------------********----------------

आज तिला तो दिवस आठवत होता, महिन्याभरात त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येत होता आणि आज आकाशची अवस्था अशी झाली होती. आकाश हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये बेड वर झोपला होता. त्याच्या नशिबाचे भोग सुद्धा त्याच्या वाट्याला अशा पद्धतीने आले होते की एके काळी जो पेशंट्स ना स्वतः ट्रीटमेंट करायचा तो डॉक्टर आज स्वतः गंभीर रुग्ण म्हणून दाखल होता. त्याच्या भूतकाळाचे चलचित्र त्याच्या मन पटलावर चालू होते. पण तो शुद्धीत नव्हता. सानिका त्याचा हात पकडून त्याच्या बेड जवळच बसून होती आणि तिला त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसायला लागली, त्याच्या डोळ्याची बुब्बुळे किंचित हलल्याप्रमाणे वाटत होती. सानिका एक मिनिट स्तब्ध झाली व अचानक तीतिथून उठून बाहेर धावत आली व डॉक्टर म्हणून मोठ्याने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून डॉक्टर - नर्स, आकाशचे आई - बाबा व अनु धावत आले; परंतु आता सुद्धा सानिकाचे अनुकडे लक्ष नव्हते. ती स्वतः सुद्धा डॉक्टर असल्याने तिने आकाश मध्ये पाहिलेले बदल, लक्षणे व्यवस्थित समजावून सांगितली, त्यानुसार डॉक्तरांनी आत जाऊन तपासणी केली. बाहेर येताच ते म्हणाले, "थोड्याच वेळात शुद्धीवर येईल तो." डॉक्टर व नर्स निघून गेले. इतक्यात सानिकाचे लक्ष अनुकडे गेले - ती आकाशच्या आई ला धीर देत होती. तिला अचानक काही सुचेना, अचानक ही इथे कशी आली ? तिच्या तोंडातून शब्द फुटेनात. क्षणभरात तिच्या डोळ्यासमोरून त्यांचा भूतकाळ तरळून गेला - कसे ते एकमेकांचे छान मित्र होते आणि घडलेल्या काही प्रसंगामुळे जशी तिची आणि आकाशाची ताटातूट झाली होती त्याचप्रमाणे अनुची या दोघांशी ताटातूट झाली होती. आणि इतक्या दिवसांनी ती आज समोर उभी होती ! त्यामुळेच तिला अचानक काय बोलावे हेच समजेना. "अनु !!!" कशी बशी तिच्या तोंडून तिला उद्देशून हाक बाहेर पडली; त्याच सरशी अनुचे लक्ष तिच्याकडे गेले व ती सुद्धा पाणावलेल्या डोळ्याने तिच्याकडे धावत आली व तिला घट्ट मिठी मारली. इतक्या दिवसांनी दोन जिवलग मैत्रिणी एकमेकींना कडकडून भेटत होत्या - दोघांचे अश्रूच एकमेकांशी संवाद साधत होते. परंतु स्थळ - काळाचे आणि प्रसंगाचे भान होताच ते वेगळे झाले. "कशी आहेस ?" अनु ने सानिकाला विचारले. त्याबरोबर पुन्हा सानिकाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. अर्थातच कुणाचा नवरा - जीवनसाथी जर मृत्यूशी झुंज देत त्यातून बाहेर येत असेल तर त्याला कसे वाटत असेल, आनंद व्यक्त करावा तर धड पूर्ण बरा नाही; दुःख व्यक्त करावे तर ते बरोबर दिसत नाही. अशा व्यक्तीची मानसिकता कशी झाली असेल हे अनुने जाणले व तिने सानिकाला धीर दिला. अर्थात सानिका व अनु दोघीही डॉक्टर असल्याने त्या दोघी या पेक्षाही भयानक प्रसंगातून गेल्या होत्या - आणि त्यांना अशाच गोष्टींसाठी तयार करण्यात आले होते. आकाशच्या आई - बाबानी सकाळ पासून काही खाल्ले नसल्याने सानिकाने अनुला हॉस्पिटल कँटीन मध्ये जाऊया असे सांगितले; त्यानिमित्ताने त्या दोघीना मनमोकळे पणाने बोलता आले असते. अनु व सानिका दोघी हॉस्पिटल कँटीन मध्ये पोहोचल्या. तिथे सानिकाने आई - बाबांसाठी खाऊ व दोघींसाठी कॉफी घेतली.

हातात कॉफी घेऊन दोघी कोपऱ्यातील एका टेबल वर जाऊन बसल्या. अनुला खूप काही सांगायचे होते तर सानिकाला खूप काही जाणून घ्यायचे होते दोघीनाही कुठून सुरुवात करावी हे सुचत नव्हते. शेवटी अनुनेच सुरुवात केली, "मला माहितीय तुला खूप काही जाणून घ्यायचे आहे. मला सुद्धा कुठून सांगू हेच कळेनासे झालय.. तू कॉलेज मध्ये असताना शेवटी शेवटी बोलत नव्हतीस, जास्त संपर्कात राहत नव्हतीस त्यामुळे आकाश ला व मला दोघांनाही खूप वाईट वाटायचे. इंटर्नशिप च्या वेळेस तर तू निघून गेलीस त्यानंतर आकाश फारसा कुणाशी बोलेनासा झाला अगदी माझ्याशी सुद्धा. मला हेच कळत नव्हते की अचानक असे काय झाले की सगळे माझ्याशी असं वागत आहेत. माझं काही चुकत होते का काहीच कळेना. त्यानंतर मला असे ऐकायला मिळाले की आकाश आणि तुझ्यामध्ये मी फूट पाडली; तुला मी मुद्दाम आकाश पासून दूर केले कारण म्हणे आकाश मला सुरुवातीपासून खूप आवडत होता पण आकाश ने मला कधीच भाव दिला नाही. त्या एकतर्फी प्रेमाखातर मी मार्गात असणारी एकमेव अडचण म्हणजे तू दूर करण्यासाठी मुद्दाम काही गोष्टी पसरवल्या म्हणे. मला सुद्धा हे ऐकून धक्का बसला. मी त्याच वेळी आकाश ला फोन केला पण त्याने उचलला नाही. त्याला भेटण्याचा प्रयत्न केला पण त्याने ते टाळले; त्यामुळे मला शंका आली की त्यानेच तर निराशेतून गैरसमज करून घेऊन अशा गोष्टी पसरवल्या नसतील ना ? खात्री करण्यासाठी मी वेगवेगळ्या जणांना विचारले तर अजून धक्का बसला की त्यानेच हे सर्व केले होते. मला सुरुवातीला हे पटेना पण आकाशचे वागणे बघून हळू हळू त्यावर विश्वास बसू लागला. म्हणून मी सुद्धा त्याच्यापासून दूर जायचे ठरवले.

इंटर्नशिप संपल्यावर त्याची आणि माझी पुन्हा कधीच भेट झाली नाही किंवा बोलणे सुद्धा झाले नाही. मध्ये मला पल्लवी भेटली होती तिच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला आली होती तेंव्हा मला ती म्हणाली की ते सर्व आकाश ने केले नव्हते, त्याचा त्यामध्ये काही दोष नव्हता तसेच तुझ्या आणि आकाश मध्ये सुद्धा अशा पद्धतीने गैरसमज झाला होता. जर तुम्हा दोघांपैकी कोणी भेटले तर तुम्हाला दोघांना एकत्र आणायची जबाबदारी घे असे ती म्हणाली. इतक्या वर्षांनी हे ऐकून मला सुद्धा वाईट वाटले की काही कारण नसताना आपली अशी निखळ मैत्री आणि तुझे आणि आकाश चे निर्मल नाते असे का तुटावे ? त्या दिवसापासून मी आकाश ला आणि तुला शोधात होते. तुझ्या घराचा पत्ता मला माहित नव्हता तसेच तुझा फोन नंबर सुद्धा बदलला होता आणि आकाशने सुद्धा घर आणि फोन नंबर दोन्ही बदलले होते त्यामुळे तुम्हा दोघांपैकी मला कोणीच मिळत नव्हते. इतक्या दिवसांनी - किंबहुना वर्षांनी मला अपर्णा सिस्टर चा फोन आला आणि आकाश इथे असल्याचे कळले; लगबगीने हातातली सगळी कामे सोडून मी आकाश ला भेटायला म्हणून आले व इथे पाहतो तर काय आकाश अशा अवस्थेत...."

अनु ला पुढे बोलवेना तिला अचानक हुंदका आवरेना... डोळ्यातून पाणी गळू लागले... सानिका सुद्धा जस जसे ऐकत होती तस तसे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. तिला सुद्धा आपल्या जिवलग मैत्रिणीची झालेली अशी व्यथा पाहून खूप वाईट वाटत होते व दाटून येत होते, पण तिने अनुला शांत करण्यासाठी तिचा हात हातात घेतला व तिला शांत केले. दोघीनी आपला आवेग आवरला शांत झाले व कॉफी घेतली. थोड्या वेळाने सानिका अनुला म्हणाली, "तुझ्या प्रमाणेच मला सुद्धा गैरसमज झाला होता आणि आकाश ला सुद्धा पण आकाश ला पल्लवी भेटली होती साधारण वर्षभरापूर्वी... एका कॅम्प मध्ये तिथे तिने आकाश ला समजावले की जे काही झाले ते सर्व निव्वळ गैरसमजातून झाले. तिने मला भेटण्यासाठी आकाश ला गळ घातली व भेटण्यास तयार केले. इकडे माझी परिस्थिती सुद्धा काही चांगली नव्हती शेवटच्या वर्षात आईच्या आजारपणामुळे आणि नंतर आई गेल्यावर खूप त्रास झाला. त्यात आकाश पासून दूर असल्यामुळे जास्त त्रास व्हायचा तो असता तर या सगळ्या प्रसंगात मला धीर मिळाला असता पण नियतीच्या मनात कदाचित तसे नसावे असे मानून मी सुद्धा आले दिवस ढकलत होते आणि एके दिवशी अचानक आकाश घरी आला ! मला तर काही सुचेनाच. धड राग पण येत नव्हता आणि धड आनंद पण होत नव्हता... प्रसंगच असे घडले होते ना.. मग शेवटी बाबानी पुढाकार घेऊन आम्हाला लग्नासाठी विचार करण्यास भाग पडले पण त्याआधी आम्ही एकमेकांशी जेव्हा बोललो त्यातून खूपशा गोष्टी मला कळल्या तेंव्हाच मला हे सुद्धा कळले की कदाचित तुझ्या बाबतीत सुद्धा असेच झाले असणार म्हणून मी तुला शोधात होते पुन्हा एकत्र येण्यासाठी.

आमचे लग्न ठरले तेंव्हासुध्दा मी व आकाश ने तुला खूप शोधले पण इतर कोणी संपर्कात नसल्याने आम्हाला तुझ्याबद्दल काही कळले नाही. आज सकाळीच आम्हा दोघांचे बोलणे झाले - महिन्याभरात आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येत आहे त्यानिमित्ताने तुला व मंदार ला एकत्र बोलवूया आणि थोडा वेळ सुद्धा घालवू. त्यानंतर आकाश नेहमीप्रमाणे क्लिनिक ला गेला. संध्याकाळी वाढदिवसानिमित्त थोडी खरेदी साठी जायचे ठरले. थोड्या वेळाने आकाश ने मला फोन करून सांगितले की त्याला तुझा पत्ता मिळाला आहे आणि तो मला न्यायला येणार होता. खूप आनंदात होता तो - आपल्या बेस्ट फ्रेंड ला तो खूप दिवसांनी भेटणार होता ना ! पण खूप वेळ झाला त्याचा काही फोन येईना. शेवटी एकदाचा त्याचा फोन आला पण आवाज त्याचा नव्हता, तुझा होता व आकाश इथे असल्याचे कळले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मनात नसत्या शंका - कुशंका येऊ लागल्या व मी आई - बाबाना घेऊन इथे आले व पाहते तर माझा आकाश बेड वर निपचित पडला आहे..." सानिकाचे बोलणे ऐकून अनुला सुद्धा खूप वाईट वाटले. तिला सुद्धा या दोघांना भेटायचे होते पण ते अशा पद्धतीने नाही. शेवटी जे होते ते भल्यासाठीच असे मानून अनु व सानिका पुन्हा ICU च्या इथे आले. सानिकाने आई - बाबाना खाऊ दिला व घरी जाऊन विश्रांती घेण्यास सांगितले. अनु ला सुद्धा तिने घरी जाऊन विश्रांती घेण्यास सांगितले परंतु ती तयार नव्हती उलट तीच सानिकाला आई बाबाना घरी घरून जाण्यास सांगत होती व स्वतः इथे थांबते म्हणत होती. शेवटी सानिकाने अनुला समजावले व दुसऱ्या दिवशी सकाळी येण्यास सांगितले. अनु मग आकाशच्या आई बाबाना त्यांच्या घरी सोडून आपल्या घरी गेली.

केंव्हा एकदा सर्व गोष्टी मंदार ला सांगते असे तिला झाले होते. कारण आकाश व मंदार सुद्धा तितकेच चांगले मित्र होते व आकाशच्या जाण्याचे त्याला सुद्धा वाईट वाटले होते.

तो सुद्धा आकाश ला आकाश ला शोधण्यात अनुला मदत करत होता. मध्यंतरी अनु व मंदार च्या लग्नाच्या वेळेस सुद्धा त्यांनी त्या दोघांना खूप शोधले होते. त्यामुळेच आता जेंव्हा मंदार घरी येईल तेंव्हा त्याला हे सर्व ऐकून खूप आनंद होईल. त्यामुळे अनु मंदार ची आतुरतेने वाट पाहत होती....

क्रमशः


सदर कथानक हे पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


- © डॉ. प्रथमेश कोटगी

(सदर कथेचे पूर्ण हक्क हे लेखकास्वाधीन असून यातील अंशतः किंवा पूर्ण भागाचे पुनः प्रकाशन करायचे असल्यास वा चित्रीकरण करायचे असल्यास लेखकाची तशी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)