दुभंगून जाता जाता... - 9 parashuram mali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दुभंगून जाता जाता... - 9

9

आता कुठे जायचं हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता.त्याचं रात्री मी डॉ. दिक्षीत सरांचं घर गाठलं. घडलेली सर्व हकीकत मी डॉ. दिक्षीत सरांना सांगितली. यावर सर मला म्हणाले,

राजू थोडे दिवस माझ्या घरी रहा... पुढं बघू आपण काय करायचं ते... तू चिंता करू नकोस.

डॉ. दिक्षीत सरांचं मन मोठं होतं, मी सरांच्या सूचनेचा आदर करत म्हणालो...

नको सर,माझी बाहेर कुठेतरी व्यवस्था केली तरी बरे होईल.

विद्यापीठामध्ये सरांच्या ओळखीचे मकरंद भावे नावाचे मित्र अर्थशास्त्र विभागात कार्यरत होते. डॉ. दिक्षीत सरांनी भावे सरांना माझी सर्व माहिती दिली. भावे सरांनी दुसऱ्याच दिवशी गोपाळ कृष्ण गोखले विद्यार्थी वसतिगृहात माझी राहण्याची व्यवस्था केली. वसतिगृहात फक्त राहण्याची व्यवस्था होती.डॉ. दिक्षीत सरांनी सकाळच्या नाष्ट्याची आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था विद्यापीठाच्या कଁटिंग मध्ये केली. ‘कमवा आणि शिका’ ही विद्यापीठाची योजना असल्याचं मला कळाले. विद्यापीठाच्या कଁटिंग मध्ये, ऑफीसमध्ये, बागेमध्ये आणि इतर वेगवेगळ्या विभागामध्ये विद्यार्थ्यांना सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास काम करावे लागतं. त्याच्या बदल्यात विद्यापीठ विद्यार्थ्यांना सकाळचा चहा, नाष्टा आणि दोन वेळचे जेवण देत असे.याबाबत मी डॉ. दिक्षीत सरांना पूर्वसूचना न देताच माझे कଁटिंग मध्ये भरलेले पैसे मी कଁटिंगमधून परत घेतले व सरांना दिले.

सुरुवातीला सरांना खूप राग आला. पण नंतर सर या गोष्टीसाठी राजी झाले. मला नेहमी वाटायचं जीवनामध्ये एकदा फुकट घ्यायची सवय लागली तर ती सवय जाणार नाही. दुसऱ्याकडून घेतलेल्या फुकटच्या गोष्टीची आपल्याला किंमत कळणार नाही. जेवढं आपण कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर मिळवेन तेवढी आपल्याला मिळविलेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत राहणार आहे. राहण्या-जेवणाचा एकदाचा प्रश्न मिटला होता. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही. ही बालसंकुलने घालून दिलेली शिकवण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कामी येत होती. ती कमवा व शिका योजनेतही आली.

बालसंकुलमध्ये आम्हां मुला-मुलींच्या स्वावलंबी आणि कृतीशील शिक्षणावर प्रामुख्याने भर दिला जात होता.टेलरिंग, कटिंग, ब्युटी पार्लर, कारपेंटर, सुतारकाम, लोहारकाम, वेल्डिंग, ग्राफिक डिजाईन अशा प्रकारची अनेक कामे आम्हांला शिकविण्यात आली होती. ही कामे आम्हांला भविष्यातील वाटचालीमध्ये कामी आली.

मला एम.एड. सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला पण १६०००/- ( रुपये सोळा हजार ) भरायला लागणार होते. प्रवेशाची शेवटची फेरी असल्यामुळे त्याचं दिवशी पैसे भरून प्रवेश निश्चित करायचा होता. डॉ. दिक्षीत सरांनी कोणताही विलंब न लावता त्यांच्या विद्यार्थ्याकडून ताबडतोब पैसे पाठवून दिले. माझा प्रवेश निश्चित झाला. डॉ. दिक्षीत सरांच्या मदतीने आणि प्रोत्साहनाने माझं एम.एड चं शिक्षण सुरु झालं...

माझ्या एम.एड.च्या प्राध्यापिका डॉ. शुभांगी शास्त्री यांनी मला आर्थिक, भावनिक आधार देवून पुढं चालत राहण्याची प्रेरणा दिली. मधल्या जेवणाच्या सुट्टीत सगळी मुलं घरून आणलेला डबा खात असत आणि मी मात्र भटकत रहायचो,कुठंतरी बसून असायचो. या वेळी मला माझ्या शाळेतल्या मित्र – मैत्रिणींची खूप तीव्रतेने आठवण येत असे. ते लहानपणीचे एकमेकांबद्दल असलेले प्रेम, ती घट्ट जिव्हाळ्याची मैत्री, तो ओलावा मला कॉलेज जीवनात कुठंही दिसला नाही. माझ्या मनाला नेहमी प्रश्न पडायचा, आजही पडतो, माणूस मोठा झाल्यावर, खूप शिक्षण घेतल्यावर त्याच्या मनामधले माणसांबद्दलचे प्रेम वाढण्याऐवजी संपत का जातं...? माणूस जसजसा शिक्षण घेईल तसा सुसंस्कृत आणि ज्ञानी बनण्याऐवजी व्यवहारी आणि स्वार्थी का बनत जातो...? त्याच्यामधली संवेदनशीलता का संपत जाते...?

स्वतःला तज्ञ समजणारे इतर लोकांना तत्वज्ञान शिकवत असतात पण तेच तत्वज्ञान स्वतःच्या अंगी किती उतरवतात...? जगी सांगे ज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था स्वतःला तत्वज्ञानी म्हणणाऱ्या लोकांची असते... आणि अनेकवेळेला असे घडते की, हे लोक अशा लोकांना तत्वज्ञान सांगत असतात ज्या लोकांना तत्वज्ञानाची नाही तर प्रत्यक्ष मदतीची गरज असते. रिकाम्या पोटी तत्वज्ञान काय कामाचे...?

असेच एकदा जेवणाच्या मधल्या सुट्टीत मी इकडेतिकडे भटकत असल्याचे डॉ. शुभांगी शास्त्री मଁडमांच्या लक्षात आले. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले आणि म्हणाल्या...

राजू, तू घरून जेवणाचा डबा का आणत नाहीस...? घरी कोणकोण असतं तुझ्या...? यावर मी म्हणालो, मी आपल्या विद्यापीठाच्या गोपाळ कृष्ण गोखले वसतीगृहात राहतो.

घरी कोणकोण असतं...?

तुझे आई - बाबा काय करतात...?

मी बालसंकुलमध्येच लहानाचा मोठा झालो आहे. माझे आई-बाबा लहानपणीच वारले.

मग आजपर्यंत तू शिक्षण कसं घेतलसं...?

यावर मी म्हणालो...

मी आजपर्यंत बालसंकुल, बालगृह आणि विविध वसतीगृहात राहून शिक्षण घेतले आहे.

हे सर्व ऐकून डॉ.शुभांगी शास्त्री मଁडम निरुत्तर झाल्या.

त्या दिवसापासून शास्त्री मଁडम माझ्यासाठी नियमित दुपारच्या जेवणाचा डबा आणू लागल्या. आम्ही एम.एड. करणारे आणि वसतिगृहात राहणारे असे सात विद्यार्थी होतो. आम्हां सर्वाना शास्त्री मଁडम दुपारच्या जेवणाचा डबा नियमित घेऊन यायच्या. शास्त्री मଁडम सणावाराला घरी बोलावून आम्हांला गोडधोड खायला करून द्यायच्या. आपल्याजवळ जर नम्रता, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी हे गुण असतील तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चांगली माणसे भेटतातच... फक्त आपले विचार आणि इतरांप्रती असलेली आपली भावना शुद्ध आणि स्वच्छ असली पाहिजे. प्रत्येक कामामध्ये समर्पण वृत्ती आणि बांधिलकी असेल तर तीच बांधिलकी आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जाते. ही आजोबांची शिकवण प्रत्येक टप्प्यावर मी आचरणात आणण्याचा आणि त्यापद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत होतो...

एवढे सगळे टप्पे पार करत असताना पुढे आशेचा किरण दिसत असताना... आयुष्याच्या वळणावर अशी घटना घडली जी घटना मी कधीही विसरू शकत नाही.

एकटे आयुष्य जगत आल्यामुळे प्रेमाला आसुसलेला मी, मला आई वडील नाहीत ही माहिती अनेक मित्र – मैत्रिणींना मिळाली... अशीच बोलण्यातून.... गप्पातून.... निघू शकतो विषय... तसाच निघाला... मला आई – वडील नाहीत... मी अनाथ आहे... ही बाब तिने हेरली... खरं तर त्या मुलीचं लग्न ठरलं होतं.... पण तिला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं... म्हणून एका मुलगीला हाताशी धरून आणि माझी गरीबी आणि स्वभावाचा फायदा घेऊन... अनाथपण, पोरकेपण तिने हेरले... तिने माझ्याशी मैत्री केली... मीही मित्र या नात्यानं तिच्याशी बोलू लागलो... गप्पा करू लागलो... पण तिच्या मनात काही वेगळचं होतं... लग्न ठरलेल्या मुलापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ती माझा वापर करत आहे हे माझ्या साध्या – भोळ्या मनाला त्यावेळी मला समजलं नाही. तिच्या मैत्रिणीने आमच्या दोघांबद्दल तिच्या होणाऱ्या नवऱ्याला आमच्या दोघांच्या सबंधाबद्दल फक्त उलटं-सुलट सांगितलं नाही तर खूप खालच्या थराला जाऊन सांगितलं.

त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिने होणाऱ्या नवऱ्याला होय आमचे संबंध आहेत असे सांगितले... त्याने मला ठार मारण्याच्या धमक्या द्यायला सुरुवात केली... मला काहीच समजत नव्हतं मी पुरता घाबरून गेलो होतो... घडलेली सर्व हकीकत मी डॉ. शुभांगी शास्त्री मଁडम यांना सांगितली. हे सर्व प्रकरण मिटविण्यासाठी डॉ. दिक्षीत सरांनी आणि डॉ. शुभांगी शास्त्री मଁडम यांनी पुढाकार घेतला. पण तत्पूर्वी तिने विष प्राशन केलं होतं... हा तिचा सगळा त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठीचा प्रयत्न चालू होता... तिला कोल्हापूर येथील सी.पी.आर. मध्ये दाखल करण्यात आलं. डॉ. शुभांगी शास्त्री मଁडम यांनी सही करून पोलीस केस स्वतःवर घेतली. डॉ. शुभांगी शास्त्री मଁडमांनी दवाखान्यात जाऊन तिची भेट घेतली. शास्त्री मଁडमांनी तिला विचारलं कुणावर प्रेम आहे तुझं ... ? ती म्हणाली ज्याच्याबरोबर माझं लग्न ठरलेले आहे त्याच्यावर... या सर्व प्रकरणामध्ये मी इतका फसलो होतो की, डॉ.दिक्षीत सर आणि डॉ.शुभांगी शास्त्री मଁडम जर माझ्या पाठीशी उभे राहू शकले नसते तर, मला वाटतं मी उध्वस्थ झालो असतो.

कसंतरी एम.एड.ची परीक्षा दिली. पण तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे धमकीचे फोन काही थांबले नव्हते. कारण तिच्या मैत्रिणीने आणि तिने त्याला आमच्या दोघांच्या संबंधाबद्दल इतक्या खालच्या पातळीवर सांगितले होते की त्याला संशय येणे साहजिकच होते असे आता मला वाटते.

धमक्यांचे फोन काही केले तरी थांबत नव्हते. मी डॉ. शुभांगी शास्त्री मଁडमांना सांगितले. त्यांना माझी काळजी वाटू लागली. रत्नागिरी या ठिकाणी डी.एड कॉलेजमध्ये अध्यापकांची गरज होती. योगायोगाने त्या कॉलेजचे संस्थापक डॉ. महेश केसरकर आणि सुलभाताई केसरकर यांना विनंती करून मला संधी देण्याची विनंती केली. त्यांनी डॉ. शुभांगी शास्त्री मଁडमांच्या विनंतीला मान देवून मला अध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी दिली.

अलीकडच्या काळात धमकीचे फोनही बंद झाले होते... सगळं काही सुरळीत सुरु होतं. नोकरीतून चार पैसे मिळत होते... डॉ.दिक्षीत सरांना आणि डॉ. डॉ. शुभांगी शास्त्री मଁडमांना अधूनमधून फोन करणे, कोल्हापूरला आल्यानंतर भेटायला जाणे सुरु होते. पण एक दिवस अचानक विद्यार्थी संख्येअभावी डॉ. केसरकर सरांनी कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला. कॉलेज सुरु रहावं यासाठी त्यांनी मनापसून प्रयत्न केला पण डी.एड ला विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला. दोन वर्षातच माझ्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली... आता काय करायचं...? हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला.