Gets swayed… - 6 books and stories free download online pdf in Marathi

दुभंगून जाता जाता... - 6

6

हे बघ राजू, तुझी मावशी तुझ्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. तू कोल्हापूरला जाण्याच्या तयारीला लाग. तुला लवकरात लवकर ११ वी च्या वर्गात प्रवेश घ्यायला हवा.

खरंतर बालसंकुल सोडण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. बालसंकुल प्रशासनाने गुणवत्ता पाहून माझी मुदतही वाढवली होती. आणखी दोन वर्षे मी इथे राहून शिकू शकणार होतो. मला काय करावं काहीच कळत नव्हते. मी जाधव सरांना जाऊन भेटलो.

सर , माझी मावशी पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला बोलवते आहे. इकडे बालसंकुलने माझी मुदतही वाढवली आहे. मला काय करावं हेच कळत नाही. यावर जाधव सर म्हणाले...

राजू, पुन्हा अशी संधी तुला मिळणार नाही. हवं तर तू दोन वर्षांनी पुढच्या शिक्षणासाठी मावशीकडे जाऊ शकतोस. तुझ्यावर जो शाळेने आणि बालसंकुलने विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला तू तडा जाऊ देवू नकोस. एवढीच माझी इच्छा आहे.

खरंतर सर जे बोलत होते तेचं बरोबर होते. आजवर मातृत्वाचा ओलावा लाभला तो इथेच. आजवर इथेच खेळलो,बागडलो,लहानाचा मोठा झालो. आई – वडिलांची, ते नसल्याची कधीही जाणीव करून न देता माझे हट्ट पुरवणारे इथले शिक्षक ,कर्मचारी या सर्वांना सोडून जायला मला नको वाटत होतं.

मला बालसंकुल सोडून कोल्हापूरला जायचं नाही. असा निर्णय मी आजोबांना कळवला. आजोबा ताबडतोब दुसऱ्या दिवशीच सांगलीला आले. बालसंकुल आणि शाळा प्रशासनाशी परस्पर बोलून त्यांनी माझा शाळा सोडल्याचा दाखला घेतला. माझा नाईलाज होता. सगळं माझ्या मनाविरुद्ध घडत आहे असं वाटत होतं. पण आजी – आजोबांच्या अट्टाहासापुढे माझं काहीच चालले नाही.

मी कोल्हापूरला पुढील शिक्षणासाठी मावशीकडे आलो. माझं शिक्षण सुरु झालं... आणि एक दिवस अचानक आजी हे जग सोडून गेल्याची बातमी कानावर येऊन आदळली... मी गावी आलो. आता आजोबांचं काय होणार...? या विचारानं मी चिंताग्रस्त झालो. आजोबांच्या कुशीत येऊन हमसून – हमसून रडलो.

काळजी करू नकोस बाळ तुझ्या मावशीने मला शब्द दिला आहे. ती तुझा सांभाळ चांगला करेल. आणि उरला प्रश्न माझा... मी तर झाडाचं पिकलेलं पान, कधीतरी गळून पडणारचं... हे जरी खरे असले तरीही, मी गळून पडणाऱ्यातला नव्हे... पक्षी हजारो मैलांचा प्रवास करूनही थकत नाहीत तर माणसानं का थकावे...? उंच भरारी घे... मोठं स्पप्न पहा... मला तुला प्रोफेसर झालेलं पहायचंय... आजोबांनी आपली इच्छा बोलून दाखविली खरी पण त्यांची इच्छा पूर्ण झालेली बघायला मात्र ते या जगात राहीले नाहीत. आजोबांची आणि माझी ही भेट शेवटची भेट ठरेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते.

आजी गेल्यानंतर आजोबांचे जेवणाचे – चहा – पाण्याचे हाल व्हायला लागले. आजी होती तेव्हा सर्व काही वेळेत मिळायचे. आजोबांना खायला – प्यायला द्यायला मामी मात्र टाळाटाळ करू लागली. आजीच्या अशा अचानक जाण्याचा आजोबांनी धसका घेतला. ते आजारी पडले. आजोबा आजारी पडल्याचे मला कुणीही कळविले नाही. आजारपणात आजोबांवर योग्य उपचार करण्यात आले नाहीत. एक दिवस आजोबांनी या जगाचा निरोप घेतला.

आता मात्र एकटेपणाची खरी जाणीव मनाला होऊन गेली. आपलं या जगात प्रेम करणारं, आपल्याला हवं – नको विचारणारं आणि आपली काळजी घेणारं कुणीच नाही असं वाटायला लागले. जसे आजी – आजोबा हे जग सोडून गेले तसे मावशीच्या आणि कुटुंबातील इतर लोकांच्या स्वभावातील बदल प्रकर्षाने जाणवू लागला. माझा कॉलेजमधील प्रवेश निश्वित झाला. जवळच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यात आला. त्या प्रवेशासाठी हजारभर रुपये खर्च झाला. तो झालेला खर्च मावशी कित्येक दिवस बोलून दाखवत होती.

राजू, तुला आता आम्ही बसून खायला घालू शकणार नाही. बाहेर किती महागाई वाढली आहे बघितलं आहेस का... आज बाजारात काही विकत घ्यायला गेलं तर किती महाग मिळतं याची तुला कल्पना नाही.

मावशीला काय बोलायचं होतं हे मला समजत होतं. फक्त ऐकून घेण्याशिवाय मी काहीच करत नव्हतो. बालसंकुल सोडल्याचा खूपच पश्चाताप व्हायला लागला होता. माझ्या राहण्या-खाण्याच्या आणि शिक्षणाच्या खर्चाच्या बदल्यात घराच्या आजूबाजूला असलेली कोरडवाहू शेतीची निगराणी करणे, शेतीतील भाजीपाला विकायला कोल्हापुरात घेऊन जाणे, घरामध्ये असलेल्या दोन गाई आणि एक वासरू यांच्या वैरणीची ( चाऱ्याची ) जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. सायकलवरून शेतातील भाजीपाला कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी व इतर कोल्हापूर परिसरात फिरून विकू लागलो. कॉलेज व्यतिरिक्त सुट्टीच्या वेळेत जनावरांसाठी आजुबाजुंच्या शेतात ( वावरात ) जाऊन वैरण ( ऊसाचा पाला, गवत ) घेऊन येऊ लागलो.

या सर्व कामाव्यतिरिक्त मावशीच्या घरी खानावळ असल्यामुळे जवळच असलेल्या डॉ. अविनाश पोतदार हॉस्पिटलमध्ये जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम करू लागलो. शिक्षण, भाजीपाला विकणे, डबे पोहचविणे, जनावरांचे शेण-घाण, चारा घेऊन येणे या सर्व कामांचा खूप मोठा बोजा माझ्यावर पडू लागला. कधीकधी मिळणारा सकाळचा चहा आणि दोनवेळच्या मापात मिळणाऱ्या जेवणावर दिवस निघणे कठीण होऊ लागले होते. मी वारंवार आजारी पडू लागलो. अनियमित वेळेला मिळणारं अपुरं जेवण, कामाचा ताण यामुळे मी एके दिवशी आजारी पडलो. मला डॉ. अविनाश पोतदार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जवळजवळ दहा दिवस तिथे माझ्यावर उपचार सुरु होते. त्या काळामध्ये जाधव सरांची खूपच ओढाताण झाली. सरांनी माझ्या दवाखान्याचं सर्व बिल भागवलं. याकाळात स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात मला शिकविणारे प्राध्यापक नीळकंठ मंगेशकर सर यांनी खूप मोठा आधार देवून मला मदत केली.

या सगळ्या दुखण्यातून मी बाहेर पडल्यानंतर मला कोल्हापुरात नातेवाइकांच्या घरी शिक्षणासाठी ठेवायचं नाही असा जाधव सरांनी निर्णय घेतला. नीळकंठ मंगेशकर सरांना जाधव सरांनी सर्व हकीकत सांगितली. ११ वी चे अजून सहा महिने बाकी होते, मध्येच कॉलेज सोडलं तर संपूर्ण वर्ष वाया जाणार होतं. त्यामुळे नीळकंठ मंगेशकर सर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हॉस्टेल कोल्हापूर, येथे राहण्याची सोय करून दिली खरी पण जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च भागणे गरजेचे होते. त्यामुळे प्राध्यापक नीळकंठ मंगेशकर सरांनी श्री.भगवान माने या हॉटेल व्यावसायिक मित्राला सांगून कोल्हापूर मधील रुईकर कॉलनी येथील सागर हॉटेल येथे वेटरचे काम मिळवून दिले. संध्याकाळी ६ ते रात्री दोन वाजेपर्यंत काम असायचे त्या कामाच्या मोबदल्यात तिथे मला महिना ५०० रुपये आणि दोन वेळचे जेवण मिळू लागले.

गडमुडशिंगी येथून कॉलेजला येणारा आणि माझ्याच वर्गात शिकणारा गौतम कांबळे नावाचा मित्र माझ्यासाठी नियमित सकाळचा नाष्टा घेऊन यायचा.आजवर अनेक चांगल्या – वाईट प्रसंगात त्याने मला दिलेली साथ-सोबत मला उभारी देत राहते. आजही आमच्या मैत्रीच्या नात्याची वीण घट्ट विणली गेली आहे.

११ वी च वर्ष पूर्ण झालं. आता पुढच्या शिक्षणाचं काय ? राहायचं कुठं ? जेवणाचं काय ? हे सगळे प्रश्न मनाला भेडसावू लागले. सुट्टी असल्यामुळे पुढच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी काहीतरी काम करणे गरजेचे होते. नीळकंठ मंगेशकर सर यांनी भडगाव येथील माने इंटरप्रायजेस ( थम्स-अप,कोका-कोला कारखाना ) येथे काम मिळवून दिले तिथे काही दिवस काम केल्यानंतर, माणगाव येथील गोकुळ शिरगाव येथे इंजिनीअर म्हणून कार्यरत असणारे आणि सुकुमार पाटील आणि सुरेश चौगुले यांच्या ओळखीने आणि पुढाकाराने राज इंडस्ट्रीज गोकुळ शिरगाव येथे हेल्पर म्हणून काम मिळवून दिले. तिथे काही दिवस काम केल्यानंतर जाधव सरांना माझ्या शिक्षणाची चिंता सतावू लागली. मी कामच करत राहिलो तर माझ्या आयुष्याचं नुकसान होईल.मी शिक्षण घेवून कुठंतरी सावलीला बसून नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा होती.

माणगाव हायस्कूलचे माझी मुख्याध्यापक भोसले सर यांच्याकडे जाधव सर मला घेऊन आले. घडलेली सर्व हकीकत मुख्याध्यापक भोसले सर यांना जाधव सरांनी सांगितली. भोसले सर यांच्या मदतीने भडगाव येथील शिवराज महाविद्यालय, येथे १२ वी कला शाखेत प्रवेश मिळाला पण पुढे आणखी प्रश्न आ वासून उभा होता राहायचं कुठं ? जेवणाचं काय ? जाधव सर पुन्हा मला भोसले सरांकडे घेऊन आले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED