दुभंगून जाता जाता... - 7 parashuram mali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दुभंगून जाता जाता... - 7

7

आजी – आजोबा हे जग सोडून गेल्यानंतर जाधव सरांनी एक पालक या नात्याने माझ्यासाठी जे काही करायला लागतं ते सर्व केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या ओळखीच्या लोकांना भेटून पुन्हा मला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी शिकावं,मोठं व्हावं ही त्यांची तळमळ आणि धडपड होती.

माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, कितीही गरीबी असली, तरी कुणासमोर मन हलकं करू नको, लाचारपणाने, स्वाभिमान गहाण ठेवून कुणापुढेही हात पसरू नको. जे काही करायचं आहे ते कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले पाहिजे. आपली नीतिमत्ता ढळू देऊ नको. चोरी, लबाडी या गोष्टी माणसाला अधोगतीकडे घेऊन जातात. माणसामध्ये नम्रपणा, सहनशीलता आणि धैर्य असेल तरच माणूस प्रगती करू शकतो. ही त्यांची शिकवण मला जगायला आणि परीस्थितीशी लढायला प्रेरित करायची. माझी आजी मला नेहमी सांगायची परमेश्वर कृपेने आपल्याला जे मिळाले आहे, त्यात समाधान मानावे. जे नाही त्याची खंत करत बसण्यापेक्षा जे आहे त्यात माणसाने सुखी आणि आनंदी असावे.

अनेकांच्या आधाराने मी पुढे जात असतांना, प्रामाणिकपणा, नम्रपणा कधीच सोडला नाही. याचं माझ्या वर्तणुकीमुळे आणि स्वभावामुळे शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग माझ्यासाठी,माझं भलं होण्यासाठी धडपडत राहीले. बालसंकुल मधील काळजीवाहक कुलकर्णी सर, चतुर्वेदी सर यांनी स्वयंशिस्त, स्वावलंबन, स्वच्छता याचे महत्व आणि धडे दिले. त्यामुळे आयुष्याच्या पुढच्या प्रवासात कुठल्याही कामाची लाज न बाळगता पडेल ते काम करत राहीलो. बालसंकुल सोडताना कुलकर्णी सर मला म्हणाले होते...

राजू, कितीही अडचण आली तरीही शिक्षण सोडू नको, काही अडचण आली तर मला जरूर सांग. या त्यांच्या आधारामुळे मला बळ मिळायचं. कुलकर्णी सर एवढेच बोलून थांबले नाहीत तर,त्यांनी मला अनेकवेळा प्रत्यक्ष मदतही केली.

जाधव सर पुन्हा मला भोसले सरांच्याकडे घेऊन आल्यानंतर जाधव सर भोसले सरांना म्हणाले...

कामाच्या बदल्यात राहण्या – जेवणाची कुठंतरी व्यवस्था झाली तर बर होईल.असं जाधव सर भोसले सरांना म्हणाले. भडगाव येथील बालनिरीक्षणगृह, बालसुधारगृह, डेस्टीटयूट चिल्ड्रन्स होम या शिवराज एज्युकेशन सोसायटीच्या तीन शाखा तेथे कार्यरत होत्या. येथे प्रवेश घेण्यासाठी भोसले सर यांनी मला पाठवले मी जाधव सरांना घेऊन आलो. पण मी १२ वी च्या वर्गात शिकत असल्यामुळे मला तिथे प्रवेश मिळाला नाही. कारण तिथे फक्त १० वी पर्यंतच्याच मुलांना प्रवेश होता.

पुन्हा आम्ही भोसले सरांकडे आलो भोसले सर यांनी शिवराज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक राजाराम देसाई यांना विनंती केली. भोसले सर यांच्या विनंतीला मान देवून मला प्रवेश देण्यात आला. शिक्षण घेत काळजीवाहक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. मुलांवर लक्ष ठेवणे, त्यांचा अभ्यास घेणे, सकाळ, संध्याकाळ मुलांच्या नाष्टा, जेवणाच्या वेळी हजर राहणे, मुलांना जेवण वाढणे तसेच ऑफीसच्या कामात शेखावत सरांना मदत करणे, छोटी – मोठी कामे करत मी शिक्षण घेऊ लागलो. त्याच दरम्यानच्या काळात शिवराज एज्युकेशन सोसायटीचे डी.एड. कॉलेज स्थापन झाले होते. मला डी.एड.कॉलेजमध्ये शिपाई म्हणून कामावर घेण्यात आले.

नंतरच्या काळात क्लार्क म्हणून पदोन्नती मिळाली तिथेच राहून शिक्षण,नोकरी, मुलांची जबाबदारी ही सर्व कामे पार पाडत असताना शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही. याच श्रेय शिवराज महाविद्यालय, भडगाव. येथे कार्यरत असणारे कोल्हटकर सर यांना जातं. खरंतर मी १२ वी नंतर शिक्षण सोडलं होतं. कुठंतरी एम.आय.डी.सी. मध्ये काम करण्याचा मी विचार करत होतो. त्याचदरम्यान महाविद्यालयाचा निकाल लागला होता मी १२ वी ला कला शाखेत दुसरा आलो होतो. पण मी पुढच्या वर्गात प्रवेश घेतला नव्हता. मला १२ वी ला इंग्लिश शिकविणारे कोल्हटकर सर यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी मला कॉलेजवर बोलवून घेतलं खरं पण मला प्रवेश मिळू शकला नाही. कारण प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली होती. प्राचार्य सुभाष राणे सर यांनी मला प्रवेश देण्यास नकार दिला.

श्री. कोल्हटकर सर यांनी स्वतःजवळचे १६००/- ( रुपये एक हजार सहाशे ) भरून कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला. पुन्हा माझ्या तुटलेल्या शिक्षणाचा श्री गणेशा सुरु झाला. आमच्या महाविद्यालयात कार्यरत असणारे प्राध्यापक कोळेकर सर, आणि चौगुले सर यांनी मला शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी खूप मोठे आणि मोलाचे प्रयत्न केले. त्यामुळेच मी माझ्या शिक्षणाचा खर्च भागवू शकलो.

मायेच्या,प्रेमाच्या आधाराला पारखा झालेला, भूकेलेला मी कधी कधी खूप खचून जायचो, एकटेपण खायला उठायचे. आपल्याला आई – वडील असते तर असं एकटे घरापासून दूर रहायला लागले नसते. आई – वडिलांच्या पंखाखाली आधाराच्या सावलीत आनंदाने, मोकळेपणाने जगायला मिळाले असते हा विचार करत तासनतास बसायचो. माझ्याचं वाट्याला हे जगणं का यावं याचं खूप दु:ख वाटायचं. रात्री एकांतात धाय मोकलून रडायचो, नाउमेद होऊन जायचो. एकांत – एकटेपणात सोबत होती ती फक्त पुस्तकांची... आधार होता तो फक्त पुस्तकांचा. त्या काळात वाचनाची अफाट आवड माझ्या मनात निर्माण झाली... ती आजही आहे.

अनेकवेळा आत्महत्येचे विचारही मनात यायचे. तसा प्रयत्नही माझ्याकडून झाला पण माझा मित्र गौतम याने अनेकवेळा या गोष्टींपासून मला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. एकांत – एकटेपण विसरण्यासाठी चुकीच्या मित्रांच्या संगतीत येऊन व्यसनाच्याही आहारी गेलो. मी माझ्या आयुष्याला कोणत्या दिशेनं घेऊन चाललोय याचा मला कोणताच अंदाज नव्हता... दिशा भरकटल्या होत्या... डोळ्यासमोर अंधार होता... आणि अशा अंधारात एक प्रकाशाचा आणि आशेचा किरण आयुष्यात आला तो म्हणजे डॉ.अनिल दिक्षीत सर लिखित ‘संघर्षाची दोन पावलं ’ या पुस्तकाच्या रूपाने...

‘संघर्षाची दोन पावलं’ या आत्मचरीत्र वाचनाने माझं जगच बदललं. माझ्या खचलेल्या, नाऊमेद झालेल्या मनाला नवी उभारी मिळाली. जगात आपलेच दु:ख खूप मोठे आहे असे वाटून खचून जाणारा मी... आपलं दु:ख हे खूप लहान आणि क्षुल्लक आहे हे कळायला या पुस्तकाने मदत झाली. अनाथ आणि एकटेपणाची भावना संपून गेली. भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये खूप मोठं बळ निर्माण झाले. नवी ऊर्जा देण्याचं आणि पंखांमध्ये बळ पेरण्याचं काम ‘संघर्षाची दोन पावलं’ या पुस्तकाने केले.

त्यानंतर पुन्हा कधीही मी आत्महत्येचा विचार माझ्या मनाला स्पर्शही करू दिला नाही... इथून पुढच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही अशी नुसतीच प्रतिज्ञा केली नाही. तर त्याचा आयुष्यात प्रत्यक्ष अंमल केला.

मी पुन्हा नव्या जोमाने काम करत शिक्षण घेत राहिलो. बी.ए. च शिक्षण पूर्ण करत असताना ‘संघर्षाची दोन पावलं’ या पुस्तकाच्या परीक्षणामध्ये माझा प्रथम क्रमांक आला होता. महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मला बक्षीस मिळणार होते. योगायोगाने बक्षीस समारंभाला डॉ.अनिल दिक्षीत सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. सरांच्या हस्ते मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. सरांशी खूप बोलण्याची इच्छा होती पण सर कार्यक्रमाच्या घाईगडबडीत असल्यामुळे मी बोलू शकलो नाही. सरांनी मला ‘संघर्षाची दोन पावलं’ या पुस्तकाचे मी केलेले परीक्षण घेऊन घरी भेटायला येण्यास सांगितले.

सरांना भेटायला मी घरी गेलो... पुस्तक परीक्षणाचे सरांनी खूप कौतुक केले. त्यानंतर माझे अधूनमधून फोन करणे, घरी भेटायला जाणे सुरु झाले. सरांनी स्वतः लिहिलेली आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.स.खांडेकर यांची पुस्तके दिली. ज्यामुळे माझे वाचन विश्व वाढायला मदत झाली. एक दिवस मी सरांकडे काम मागायला गेलो होतो. त्यावेळी सर मला म्हणाले, पगार किती घेशील ? मी म्हणालो, तुम्ही द्याल तो घेईन... यावर सर मला म्हणाले, आणि शिक्षणाचं काय...? त्यावर मी सरांना काहीच उत्तर देऊ शकलो नाही. आयुष्यभर कामच तर करायचं आहे. आता तुझं शिक्षण घेण्याचं वय आहे. तुला पैशाची गरज लागली तर मला सांग मी तुला पैसे देईन पण कामाचा विचार अजिबात मनात आणू नकोस. असे सर नेहमी सांगत रहायचे. सरांच्या घरी मोठं ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयातील थोर साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि.स.खांडेकर यांची पुस्तके मला वाचनासाठी दिली. वि.स. खांडेकर यांच्या साहित्याचा परिचय डॉ. दिक्षीत सरांमुळेच झाला. सशाचे सिंहावलोकन, ऋतू न्याहाळताना, पहिली पावलं, अंतरीचा दिवा, उल्का, रानफुले, विकसन, सांजसावल्या, क्षितीजस्पर्श,समाजशिल्पी, वन्हि तो चेतवावा, सरत्या सरी, स्वप्न आणि सत्य अशा असंख्य पुस्तक वाचनाने माझं जग बदलायला मदत झाली. मी आतून बाहेरून ढवळून निघालो.