दुभंगून जाता जाता... - 1 parashuram mali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

दुभंगून जाता जाता... - 1

लेखक

परशुराम माळी

1

( दुभंगून जाता जाता... या कादंबरीतील वस्तू, घटना, पात्रे, प्रसंग, ठिकाण काल्पनिक असून, त्यांचा वास्तवाशी ( सजीव – निर्जीव ) तिळमात्र संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. )

आई जग सोडून गेली त्यावेळी माझं वय न कळण्याचं होतं... आई गेली तशी काही दिवसांतच बाबाही गेले. कारण आजारपणाचं असंल तरी खरं कारण काही वेगळंच होतं. ते मला मी मोठं होईल तसं समजत गेलं... मी थोडं मोठं झाल्यावर म्हणजे मला थोडं कळायला लागल्यावर ज्यांच्या घरात आम्ही भाड्याने राहत होतो तेथे जाऊन मी विष्णू मामांकडून सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला...

बोरगावच्या बस स्थानकावर उतरलो... विष्णूमामाचं हॉटेल बसस्थानकावरचं होतं...

विष्णु मामा आहेत का...?

नाही आले आज... काही काम होतं का...

हॉटेलात असणाऱ्या कामगाराने प्रश्न केला... त्यावर मी म्हणालो...

होय,मला भेटायचं होतं...

मी बोलावून आणतो... बस तोपर्यंत.

कामगाराने सायकलवर ढेंग टाकली आणि तो विष्णूमामाला बोलवायला गेला.

दहा मिनिटातच विष्णूमामा हजर !

अरे राजू कधी आलास ? केवढा मोठा झालायस रे !

असे म्हणून,विष्णूमामाने गालावरून हात फिरवला आणि आत जाऊन माझ्यासाठी त्यांनी चहाचा कप आणला.

कितवीला आहेस ? कोणत्या शाळेत जातोस ?

आता पाचवीला आहे... तिथल्याचं गावाकडच्या शाळेत जातोय.

कुठं माणगावला ?

होय...

आजी – आजोबा कसे आहेत...?

बरे आहेत...

बोल काय काम काढलास... ?

मामा मला माझ्या आई – बाबांबद्दल जाणून घ्यायचं होतं.

यावर विष्णुमामा म्हणाले...

हे बघं राजू तो सगळा भूतकाळ आहे आणि अजून तुझं वय या सगळ्या गोष्टी समजण्याचं नाही. मला वाटतं तू तुझ्या शिक्षणावर लक्ष दे... भरपूर अभ्यास कर... मोठा हो.

पण मामा मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय... अनेकजण माझे वर्गमित्र आणि वर्गाबाहेरही माझ्या ओळखीचे, माझ्या आई – बाबांबद्दल मला विचारत असतात... त्यावर मला काय उत्तर द्यायचं तेचं कळत नाही. अनेकजण माझ्या शेजारचे लोक माझी आई पळून गेली... कुणीतरी परपुरुषाने तिला घेऊन गेलं आहे ... असं बोलताना ऐकल्यावर माझं मन अस्वस्थ होतंय... माझे बाबा दारुडे होते... ते खूप दारू प्यायचे असं मला सांगितलं जातंय... तुही बाबांसारखा होशील. असं मला हिणवलं जातंय.

अनेकवेळा आजी – आजोबांना मी विचारण्याचा प्रयत्न केला पण ते सांगत नाहीत. ही गोष्ट टाळण्याचा ते प्रयत्न करतात, म्हणून मी तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आलो आहे.

राजू, मी तुला समजू शकतो. पण कुणी कितीही अवहेलना केली, अपमानित केलं तरी तू खचून जाऊ नकोस... रडत बसू नकोस... पुढं बघून तू तुझं काम करत रहा... मला मान्य आहे हे इतकं सोपं नाही. पण तुला काळजावर दगड ठेवून इथून पुढचं आयुष्य जगावं लागेल. तरच तुझा या जगात टिकाव लागणार आहे. मी तुझं मन मोडणार नाही... खरं काय ते सांगतो पण मला तू वचन द्यायला हवं... तुझ्या शिक्षणावर, अभ्यासावर एकूणच तुझ्या आयुष्यावर या गोष्टीचा कोणताही परिणाम झाला नाही पाहिजे.

हो मामा, मी वचन देतो तुम्हांला...

हे बघं राजू, तुझ्या बाबांना तीन भाऊ, एकत्र कुटुंब, पोटापुरती शेती, घरी सूतगिरणीचा व्यवसाय सगळं कसं आनंदात सुरु होतं. हे सगळं तुझ्या बाबाच्या म्हणजेच मधूच्या लग्नाअगोदरची परिस्थिती. मधुचं लग्न झालं आणि घरामध्ये तुझी आई म्हणजेच मनिषा आणि मधु यांचे वारंवार खटके उडायला लागले. मधूचा स्वभाव थोडा संशयी होता. तो वारंवार मनिषावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा. या मारहाणीला मनिषा कंटाळली होती. कधीकधी या दोघांचे भांडण खुपचं टोकाला जायचे. अनेकवेळा मनिषाने मधुच्या मारहाणीला कंटाळून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

या सगळ्या गोष्टीला कंटाळून मधूच्या आई – बाबांनी आणि भावांनी म्हणजेच तुझ्या आजी – आजोबांनी व चुलत्यांनी मधूला वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून मधु आणि मनिषा कुरुंदवाड सोडून बोरगावला आले... मधूनं आपला सूतगिरणीचा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय जोमात सुरु झाला. काही काळानंतर दोघही संसारात चांगले रमले. तुझा जन्म झाला. पण पुन्हा मनिषा आणि मधुमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. याचं मुख्य कारण होतं मधूचा संशयी स्वभाव आणि व्यसन. मधूचे आई – बाबा म्हणजेचं तुझ्या आजी – आजोबांनी तुझा स्विकार करायला नकार दिल्यामुळे, तुला काही दिवस तुझ्या आजोळी माणगावला आजी – आजोबांकडे ठेवण्यात आलं. त्यावेळी तू साधारण तीन वर्षांचा होतास. एकदा सूतगिरणीत कामाला असणाऱ्या कामगारासोबत मनिषाचा पाय घसरला. ही गोष्ट मधूच्या निदर्शनास आली. त्याचं रात्री मधूने मनिषाला घराबाहेर हाकलून दिले. ते दिवस पावसाळ्याचे होते. रात्रभर पाऊस असताना मनिषा कुठंल्या निवाऱ्याला आणि कुठं गेली काहीचं कळालं नाही. असं आठ दिवस ती बाहेर फिरत होती. आम्ही घरातले सर्वजण, मी स्वतः त्यावेळी मनिषाला खूप शोधलं. तुझ्या आजोळी माणगावला मामाकडे चौकशी केली असता, मनिषा तिकडे आली नसल्याचे कळाले. अचानक एका रात्री कुत्री भुंकण्याचा आवाज ऐकू आला. साधारण रात्रीचे २.०० वाजले होते. मनिषा घरासमोर उभी होती... केस विस्कटलेले होते, दोन – तीन ठिकाणी पायाला – हाताला आणि कपाळावर रक्ताचे डाग होते... साडी फाटली होती... आठ दिवस काय खाल्लं असेल हिने... ? कुठे राहिली असेल बिचारी... ? या आणि अशा अनेक प्रश्नांनी मला घेरलं होतं. झालेल्या जखमांच्या वेदनेमुळे ती आरडत- ओरडत होती.

मनिषाला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप झाला होता... पण काय करणार मधुच दररोज दारू पिऊन येणं, घाणेरड्या, वाईट, वंगाळ नको तश्या शिव्या देवून मारहाण करणं आणि चारित्र्यावर वारंवार संशय घेणं या सगळ्या गोष्टीला कंटाळून तिनं असं केलं असावं असं मला वाटतं.

हंबरडा फोडून रडत होती. हात जोडून मधुजवळ माफी मागत होती... मी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन तिला आमच्या घरात येण्याचा आग्रह केला. माझ्या आईन घरातून साडी आणून तिच्या अंगावर घातली. एवढ्यात मधु दार उघडून बाहेर आला. दारूच्या नशेत असल्यामुळे आम्ही तेथून माघारी फिरलो आणि आमच्या घराजवळ येऊन थांबलो... मधूने प्रेमाने मनिषाला जवळ घेतले... दोघांनाही रडू कोसळलं. मधूने मनिषाला घरात घेतलं. हे दृश्य पाहून माझ्यासह माझ्या कुटुंबातील सर्वांना खुपच आनंद झाला. आम्ही निश्चिंत होऊन घरात गेलो.

सकाळी लवकर उठून देवपूजा आवरली आणि हॉटेलात आलो. अकरा – साडे अकराच्या दरम्यान ताबडतोब घराकडे येण्याचा निरोप आला आणि मी कामगाराला सांगून, घरी आलो पाहतो तर,घराबाहेर लोकांची गर्दी ! मधूने मनिषाचा गळा आवळून तिला ठार केलं होतं. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मधूला शोधण्याचा प्रयत्न केला असता तो रात्रीचं पळून गेल्याचं समजलं. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पंचनामा करण्यात आला. अंतविधी उरकण्यात आला. त्यानंतर आठ दिवसांनी तुमच्या शेतात ऊसाच्या बांधावर मधूचा मृतदेह सापडला. मधून विषप्राशन केलं होतं.

ही सगळी माझ्या आई – बाबांची कर्मकहाणी ऐकताना माझं मन सुन्न झाले. आपोआपच माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. विष्णुमामानं मला जवळ घेतलं.

रडू नको राजू, आणि हो स्वतःला एकटा समजू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी. काही लागलं तर मला जरूर सांग,पण शिक्षण चांगलं घे. चांगला अभ्यास कर... काळजी घे...

मी विष्णूमामांचा निरोप घेऊन घरी परतलो.

त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही. रात्रभर मी खूपच अस्वस्थ होतो. असले हे आयुष्य माझ्याचं नशिबी यावं याबद्दल मी स्वतःच्या नशिबाला दोष देत होतो. स्वतःला कोसत होतो. आजी – आजोबांना न सांगता मी बोरगावला जाऊन आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दोघांनाही ही गोष्ट आवडली नाही. त्यांना वाटत होतं की, हे सत्य मला समजू नये. ते माझ्यापासून लपविण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जागी ते बरोबर होते. या घडलेल्या गोष्टीचा माझ्या मनावर, माझ्या शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये असं त्यांना वाटत होते. विष्णूमामाकडून हे सर्व ऐकल्यानंतर काही दिवस या गोष्टीचा मला खूप त्रास झाला.