दुभंगून जाता जाता... - 2 parashuram mali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दुभंगून जाता जाता... - 2

2

आजोबा या सगळ्या घटनेतून थोडेफार सावरले होते. पण आजी मात्र मी नसताना, माझ्या माघारी आईची आठवण काढून रडायची. शेजारच्या बायकांसमोर आपलं दु:ख हलकं करायची. माझ्या पोराला माझ्या माघारी कुणाचा आधार नाही. कसं व्हायचं माझ्या राजूचं. या विचारानं ती चिंताग्रस्त व्हायची. ती माझ्या भविष्याची खूपच काळजी करायची. आजोबांचंही याच्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. आजकाल ते दोघेही खुपचं चिंताग्रस्त होते. कारण थोडं वेगळं होतं. खरंतर सुरुवातीपासूनच माझा स्विकार करण्याला – माझा सांभाळ करण्याला मामांचा विरोध होता. पण आजी – आजोबांनी मामांची समजूत काढली. माझ्या आई – बाबांचा संसार सुरळीत सुरु झाल्यानंतर आणि दोघांमधील भांडणतंटा थोडासा कमी झाल्यावर परत मला आई – वडिलांच्याकडे पाठवता येईल. असं मामाला सांगून आजी – आजोबांनी मला माणगावला आणलं. पण आई – बाबा दोघंही असे अचानक या जगातून निघून गेले आणि माझा कायमस्वरूपी सांभाळ करण्याची जबाबदारी आजोळी आजी – आजोबांवर येऊन पडली.

आता मामाचं लग्न झालं होतं. पहिल्यापासूनचं माझा सांभाळ करण्याला मामाचा विरोध होता आणि आता मामापेक्षा मामीचं मत काही वेगळं नव्हतं. त्यामुळे घरामध्ये वारंवार खटके उडायला लागले. एक – दोन वेळा रागाच्या भरात मामानं आजी – आजोबांवर हात उगारला. त्यावेळी मी जरी लहान असलो तरी चांगलं वाईट न समजण्या इतकाही मी लहान नव्हतो. मला सगळं समजत होतं. मामानं आजी – आजोबांवर हात उगारलेला पाहून, त्या दिवशी मला खूप वेदना झाल्या. हे सगळं माझ्यामुळेच होतं आहे. याची मला कल्पना होती. पण मी काहीच करू शकत नव्हतो. शेवटी एक दिवस आजोबांजवळ जावून मी माझ्या मनातलं बोलण्याचा प्रयत्न केला.

घरात कुणीच नव्हतं.आजोबा पेपर वाचत बसले होते. मी आजोबांजवळ गेलो.

काय रे बाळा, असा चेहरा का पडलाय तुझा...?

काही नाही आजोबा. मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं.

बोल, काय पाहिजे आहे का तुला ?

नाही आजोबा मला काही नको...

मग...

आजोबा ते आपल्या गावातले जाधव सर सांगलीला शिक्षक आहेत ना... ?

होय, मग... ?

त्यांच्या शाळेमध्ये बालसंकुलमधील मुलंही शिकायला येतात. असं मी ऐकलय कुणाकडूनतरी...

हे ऐकताच पेपर वाचण्यासाठी खाली केलेली मान आजोबांनी वर केली. अचानक आजोबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. त्यांनी मला कडकडून मिठी मारली. मला काय बोलायचं होतं ते आजोबांना समजलं. आजोबा डोळ्यातील अश्रूंना आवरत मला म्हणाले...

बाळा आमच्या जीवात – जीव असेपर्यंत आम्ही तुला असं कुठंही सोडणार नाही. तू वाईट वाटून घेऊ नकोस... जसं तुझ्या मामाचा या घरामध्ये आणि शेतीमध्ये वाटा आहे . तेवढाच वाटा माझ्या लेकीचा आहे. तू माझ्या लेकीचं पोर आहेसं कुणी परकं नाहीस. तू तुझ्या मामाचं एवढं मनावर घेऊ नकोस.

माझं आणि आजोबांचं चाललेलं बोलणं मामीनं ऐकलं असल्याची रुखरुख माझ्या मनाला लागून राहीली होती. ती खरी झाली.

मामानं आपल्या आई – बाबांवर दुसऱ्यांदा हात उचलला होता. आजोबांना रक्तदाबाचा त्रास होता... वयही झालं होतं. या घडलेल्या गोष्टीचा त्यांनी खुपचं धसका घेतला. आजोबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या सगळ्या प्रकारामध्ये आजीही मनानं खुपचं खचून गेली. आता मात्र मला माझा मार्ग बघितला पाहिजे. असं वाटायला लागलं. त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही. रात्रीच कुठंतरी पळून जावसं वाटायला लागलं होतं. पण आजोबा दवाखान्यात होते. आजोबा – आजी अशा परीस्थितीत असताना त्यांना सोडून असं अचानक पळून जाणं मला योग्य वाटलं नाही. मी माझा निर्णय पुढे ढकलला.

आजी – आजोबांना मामांकडून होणारा त्रास मला बघवत नव्हता. हात उचलण्याच्या पलीकडे जाऊन मामाने आता आजी – आजोबांना मारहाण करायलाही सुरुवात केली होती. माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी आजी – आजोबा सगळं काही सहन करत होते. पण मला हा प्रकार सहन होण्यासारखा नव्हता. शेवटी मी पळून जाण्याचा निर्णय घेतला.

कुणालाही न बोलता घरातील थोडे पैसे घेतले आणि अंगावरील कपड्यासह घर सोडलं. मला सांगलीला जायचं होतं. कसा-बसा मिरज रेल्वेस्थानकावर आलो. जवळ होते तेवढे पैसे गाडीला दिल्यामुळे आता काहीचं पैसे शिल्लक नव्हते. पोटात कावळे ओरडत होते. त्याचबरोबर बालसंकुलात पोहचण्यासाठीही मला पैसे लागणार होते. त्यामुळे दोन दिवस रेल्वेस्थानकावर भिक मागितली. थोडेफार पैसे गोळा झाले. दोन दिवस वडा-पाव खाऊन दिवस काढले. रेल्वेस्थानकावरचं झोपलो. तिसऱ्या दिवशी बालसंकुलात जाऊन दाखल व्हायचं ठरवलं तोच शासनाच्या बालकल्याण संकुलातील एक गाडी आणि एक पोलीस गाडी रेल्वे स्थानकावर येऊन थांबली. माझ्यासमोरचं भिक मागणाऱ्या दोन मुलांना त्यांनी गाडीत घातलं हे बघून मी घाबरलो. पोलीस मलाही धरून नेतील या भीतीने मी वाऱ्याच्या वेगाने पळायला लागलो. एवढ्यात माझ्या जवळच उभे असलेल्या एका व्यक्तीने पकडा – पकडा म्हणून ओरडायला सुरुवात केली. माझ्यापाठोपाठ पोलीस सोडून दुसरीचं व्यक्ती धावत होती. ती व्यकी माझ्यापाठीमागून का धावत आहे हेच मला कळत नव्हतं. पण त्या व्यक्तीच्या पाठीमागे पोलीस होते. शेवटी ती व्यक्ती पोलिसांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली. मी मात्र पकडला गेलो. मीच चोरी केली असं समजून पोलिसांनी मला बेदम मारलं. खरा चोर दोन दिवसांनी सापडला.

मला पोलिसांनी मारल्याचं दु:ख वाटलं नाही. उलटं या घटनेचा फायदाच झाला, असं वाटायला लागलं. कारण मला जिथे जायचं होतं तिथे मी आपोआपच आलो होतो. म्हणजेच पोलीस मला घेऊन बालसंकुलात आले होते. डेस्टट्युट चिल्ड्रन होम, निरीक्षणगृह, बालसुधारगृह असे तीन विभाग होते. बालनिरीक्षण गृहातील अधीक्षकांनी माझ्याकडून सर्व माहिती घेतली त्यानंतर मला बालनिरीक्षण गृहात दाखल करण्यात आले. बालसंकुलाच्या शाळेत ६ वी च्या वर्गात मला प्रवेश देण्यात आला. याचं शाळेत जाधव सर सहा.शिक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांनी मला ओळखलं ते माझ्याजवळ आले आणि मधल्या सुट्टीत त्यांनी मला भेटायला सांगितले.

मधल्या सुट्टीत मी जाधव सरांना भेटायला गेलो, तर त्यांनी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला...

तू कसा आलास या शाळेत ? कुणी आणलं इथं तुला ?

मी उत्तर देणार तोच... तिथेचं उभे असलेले शाळेतील शिपाई मामा म्हणाले... अहो सर या मुलानं रेल्वे स्टेशनवर चोरी केली होती. पोलिसांनी पकडून याला बालसंकुलाच्या हवाली केलं आहे. आई – वडील कुणी नाहीत या मुलाला. हा मुलगा अनाथ आहे...

जाधव सर माझ्याकडे रागाने पाहू लागले... मी चोरी केली होती हे ऐकून त्यांना वाईट वाटलं. सर म्हणाले...

राजू तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... आई – वडील नसताना आजी – आजोबांनी तुझा सांभाळ केला... तुला पोटाशी धरलं हे त्यांचं चुकलं का...? त्याची शिक्षा तू अशी द्यावीस हे मला अजिबात आवडलेलं नाही. तू असं का केलस...?

अनेकवेळेला तुला बालसंकुलात दाखल करण्यासंबंधी मी तुझ्या आजी – आजोबांशी बोललो. पण तुला बालसंकुलात पाठविण्याबाबत त्यांनी मला ठाम नकार दिला. आम्ही जिवंत असेपर्यंत आम्ही राजूला कुठेही पाठवणार नाही. असे म्हणणाऱ्या आणि तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आजी – आजोबांच्या प्रेमाची परतफेड तू अशी केलीस... ? काय सांगू मी त्यांना राजूनं चोरी केली म्हणून सांगू...? तुमचा राजू चोर आहे म्हणून सांगू... ? हे ऐकल्यानंतर त्यांना काय वाटेल... याची कल्पनातरी केली आहेस का तू... ?

या आणि अशा प्रश्नांनी मी कोलमडून गेलो... मला निर्दोष साबीत करण्याचा, मी चोरी केली नाही हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण सरांचा माझ्या बोलण्यावर विश्वासचं बसला नाही.

शेवटी आजी – आजोबांच्याजवळ जी बातमी जायची ती गेलीचं पण त्यांचा माझ्यावर विश्वास होता. मी सुखरूप आहे हे कळल्यावर त्यांना आनंद झाला. दुसऱ्या दिवशी लगेचच दोघेही मला भेटायला बालसंकुलात आले. मला पाहताच त्यांचे अश्रू अनावर झाले. मी चोरी केली नसल्याचं जाधव सरांना समजलं होतं. आजी – आजोबांना त्यांनी सत्य घडलेली परिस्थिती सांगितली.