आज ती पहाटे पहाटेच उठली, खूपच अस्वस्थ होती. आज पुन्हा तिला पंकजची आठवण सतावत होती. आज तर तो तिच्या स्वप्नात दिसला होता. काही दिवसांपासून तीच मन खूप अस्वस्थ असायचं तिला पंकजची आठवण खूप त्रास देत होती. त्याला एकदा भेटावं अस खूप वाटत होतं. पण नेहमीप्रमाणे मन आणि बुद्धी एकमेकांशी लढत होत्या.
मन - आता त्याच लग्न होणार आहे मग त्याला आपल्याला कधीच नाही भेटता येणार, त्याच्या लग्नाआधी शेवटचं त्याला भेटावं डोळेभरून बघावं, पुन्हा एकदा त्याच्या मिठीत शिरावं, कुणाचाही विचार पर्वा न करता.
डोकं - नाही नाही प्रिया हे चुकीचं आहे, तुझं लग्न झालय एक मुलगी आहे तुला आणि अजूनही तुझं मन पंकजकडे कस काय ओढ घेऊ शकते, आवर स्वतःला… तुझ्यावर जबाबदाऱ्या आहेत आता , तुला अस नाही करता येणार. तू तुझ्या नवऱ्याला फसवत तर नाहीय ना.
मन - नाही मी त्यांच्यावरही प्रेम करते आणि मी कुठे कायम त्याच्या सोबत राहायला जातेय, फक्त एकदा भेटायचं मला त्याला. आणि मला बाकी काही नको.
डोकं - आणि घरी चुकीन कुणाला कळलं की तू खोटं बोलून पंकजला भेटायला गेली तर, कुणी तुम्हाला सोबत बघितलं तर.
मन - तो माझा मित्र आहे मित्राला तर मी भेटूच शकते ना, आणि काही बहाणा बनवेल. माझ्या नवऱ्याचा विश्वास आहे माझ्यावर मी त्यांना धोका नाही देणार. फक्त एक भेट.
रोज तीच मन आणि बुद्धी भांडायचे. मुलगी लहान आहे म्हणून सहज घराबाहेर पडायला जमत नव्हतं. आणि दिवामाघून दिवस जात होते.
पण आज सकाळी तो चक्क स्वप्नात आला
स्वप्न -
घरी कुणी नव्हतं, सासुसासरे गावाला गेले होते, नवरा कामावर आणि मुलगी शेजाऱ्यांकडे. अचानक दारावरची बेल वाजली आणि तिनी दार उघडलं. आणि बघतच राहिली. समोर पंकज उभा होता. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला काय करू नि काय नाही तिला कळतच नव्हतं. मन तर अगदी फुलपाखरू होऊन नाचू लागलं. ती त्याच्या कडे फक्त बघत उभी होती. त्यानेच तिला भानावर आणलं आणि विचारलं.
पंकज - मी घरात येऊ का?
प्रिया - (भानावर येत) अरे हो ये ना. बस तू मी पाणी आणते.
लगेच पाणी घेऊन आली त्याच्या हातात ग्लास दिला आणि पुन्हा आपल्याच विचारात हरवून गेली. त्याला बघून तिचा विश्वासच बसत नव्हता. जे कितीतरी दिवसांपासून ती मनात ठरवतेय ते आज अस पुढे येईल. त्यानी पुन्हा तिला आवाज दिला ती भानावर आली. तो घरी आला म्हणून काहीतरी त्याच्या आवडीचं बनवायचं होतं तिला.
पंकज - तुला मी आलेलो आवडलेलं नाही का?
प्रिया - नाही रे उलट मी तर तुला कधीपासून भेटायचा विचार करतेय, आणि आज माझी इच्छा अशी पूर्ण होईल मला वाटलंच नव्हतं.
पंकज - काय? भेटायचं होत तर एकदा बोलून तर बघायचं ना माझ्या कडे, मी लगेच आलो असतो.
प्रिया - बर आता आलास ना. काय आवडेल तुला खायला काय करू? सांग पटकन.
पंकज - अग नको आपण गप्पाच करूयात ना
प्रिया - त्यानी पोट नाही भरणार आणि घरी आलाय आणि तसाच गेला तर मला बर नाही वाटणार.
पंकज - ठीक आहे, तू एवढा आग्रह करतेय तर तुझ्या हातचे प्रिया स्पेशल मस्त चमचमीत पोहे कर मग.
प्रिया - चालेल. आता बनवते.
पोहे करताना ती त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल सगळी माहिती विचारते.
आणि 15 मिनिटात पोहे घेऊन येते. एक प्लेट त्याला देते आणि एक आपण स्वतःसाठी घेते.
पंकज - उंम्म्मम्म्म मस्त झालेत पोहे.
प्रिया - धन्यवाद. तुझ्या बायकोलाही आणशील माझ्याकडे तिलाही शिकवेल.
पंकज - हो नक्कीच.
पोहे खाताना थोड्या फार अवांतर गप्पा करतात लहानपणापासून सोबत वाढलेले असल्यामुळे खूप काही असत त्यांच्याकडे बोलायला जुन्या आठवणींना उजाळा द्यायला.
ते बोलतच असतात तेवढ्यात प्रियाची मुलगी भुकेमुळे रडायला लागते. आणि प्रियाची झोप उघडते. भानावर येते तेव्हा तिला कळत की हे स्वप्न हो. ती लगेच तिला दूध देऊन पुन्हा झोपवते. ती विचार करत असते की अस कास स्वप्न पडलं कदाचित आपण जात त्याला आठवतोय म्हणून असेल. बापरे असाच होत राहील तर वेड लागेल मला.
पण आता मात्र तीच मन खूप कासावीस होत होतं, पंकजच्या एक भेटीसाठी. ती उठते सगळं आवरते पण आपल्याच विचारांमध्ये असते. तिचंच मन तीच्याशी द्वंद्व खेळत असतं.
1 मन -"त्याला बोलू का स्वप्नाबद्दल. आणि भेटायलाही बोलावते."
2 मन - " नको नको काय विचार करेल तो लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर पण हिला माझी ओढ वाटते, आणि आता तर त्याचही लग्न होणार आहे. उगाचं काही चुकीचं तर वाटणार नाही ना त्याला."
1 मन - " पण आता राहवले जात नाहीये, खूप आठवण येतेय आणि त्यात हे आजच स्वप्न. फक्त एकदा भेटवसं वाटतंय."
2 मन - " नीट विचार करून घे आधी, नंतर पच्छाताप नको व्हायला."
आणि प्रियाचा निर्णय होतो. दोन दिवसांनी पंकजचा वाढदिवस होता. तिनी वाढदिवसाच्या दिवशीच त्याला भेटुयात अस ठरवलं. पण पुन्हा विचार आला अरे त्याची होणारी बायको तर येणार नसेल ना त्याला भेटायला. आता तिचा काही प्लॅन पण असु शकतो वाढदिवसाच्या दिवशीचा. मी पण तर केला होता ना माझ्या नवऱ्याचा वाढदिवस लग्नाआधी. त्याला एकदा विचारून घेते. आणि तिने पंकजला मॅसेज केला.
मॅसेज करून वाढदिवसाचा काही प्लॅन आहे का विचारलं आणि त्याची होणारी बायको कुठे आहे ती येऊ शकते का हे ही विचारून घेतलं. ती घरी माहेरी गेली होती 10 दिवसांसाठी आणि तीच वाढदिवसाला येन शक्यच नव्हतं. अस त्यांनी सांगताच प्रिया खूप खुश झाली.
शेवटी तिने तिच्या मनाचा आवाज ऐकला. इतक्या दिवसांपासून ज्याला ती थोपवत आली होती तो मनाचा विचार आता निर्णयावर आला, तिचं मन ज्याला साद घालत होतं ते ही आता पूर्ण होणार होतं. पण ती त्याला भेटायला येणार आहे हे मात्र तिने पंकजला सांगितलं नाही. तिथे पोचल्यावर सरप्राईज देऊ अस तिच्या मनात होतं.
दोन दिवसानंतर भराभर आवरून "मी येते जरा बाहेरून काम आहे " अशी थाप मारून आणि मुलीला आजी आजोबांच्या सुपूर्त करून, गाडीला किक मारली आणि निघाली, पंकजला भेटायला. तिची उत्सुकता आता शिगेला पोचली होती. तिच मन आता त्याला भेटूनच शांत होणार होतं.
-----------------------------------------------------------
समाप्त