शेवट गुन्हेगारीचा... - (भाग-१) Sopandev Khambe द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेवट गुन्हेगारीचा... - (भाग-१)

'अन्नापाडा' मुबई शहराच्या मध्यवर्ती वसलेली एक गजबजलेली मोठ्ठी झोपडपट्टी, परप्रांतीय लोकांसाठी ही वस्ती म्हणजे एक वरदान, इथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येऊन राहत तसेच गुन्हेगारांचा हा अड्डा होता तडीपार केलेले गुन्हेगार, तुरुंगातून पळालेले कैदी, आणि गुन्हे करून पाळालेले गुन्हेगार इथे वास्तव्यास असत,वस्ती दाटीवाटीची, गल्लीबोळाची असल्याने ही जागा लपून राहण्यासाठी या सर्व लोकांना फायद्याची ठरायची, त्यात ह्या झोपडपट्टीवर राजकीय वरदहस्त असल्याने इथे फारसी कायदेशीर कार्यवाही होत नसे. मराठी कुटुंब फारच कमी, मद्रासी, उत्तरप्रदेश या ठिकाणचे कुटुंब जास्त प्रमाणात वास्तव्यास असत.
कृष्णा नाडर हा आपली पत्नी रमय्या हिच्या सोबत हैद्राबाद मधून मुंबईला उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवण्यासाठी येतो, एका नातेवाईकांच्या ओळखीने त्यांना अन्नापाड्यात छोटीसी खोलीदेखील मिळते पण रोजगाराचे काय? त्यावरही तोडगा निघतो त्याच नातेवाईकांच्या मदतीने ते एक इडली वडा सांभारची गाडी जवळच असलेल्या एका इंडस्ट्रिसमोर लावायला सुरुवात करतात, तिथले लोकल गुंड आधी सुरुवातीला विरोध करतात पण त्यांना हप्ते सुरू झाल्यावर ते त्यांना त्रास द्यायचे बंद करतात, कृष्णाला थोडीफार हिंदी येत होती पण रमय्याची हिंदीची बोंब होती तिला तामिळ व्यतिरिक्त इतर कोणतीच भाषा येत नव्हती, कृष्णा तिला समजावून सांगत असे आणि दोघे मिळून छोटासा धंदा करत होते,रोजचे भागेल इतकी कमाई सुरुवातीला होत असे, हळूहळू त्यांनी मसाला डोसा, सांबर भात देखील सुरू केले त्यामुळे कमाई देखील वाढली होती. सर्वकाही सुरळीत चालले होते रमय्या देखील थोडे थोडे हिंदी शिकली होती.जवळ जवळ दीड दोन वर्षे झाली होती रमय्या गरोदर राहिली होती म्हणून बाळंतपणासाठी चार पाच महिने कृष्णाने तिला गावी हैद्राबादला सोडले, त्याला राहून परवडण्यासारखे नव्हते म्हणून तो परत आला आणि आपली इडली-वडा सांभारची गाडी सुरू ठेवली सोबतीला गल्लीतल्या एका मद्रासी मुलाला पगारावर ठेवले.
सहा महिन्यांनी तो तिला घेऊन आला तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला होता तो पाच महिन्याचा झाला होता, त्याचे नाव व्यंकट ठेवण्यात आले होते, नवीन पाहुण्याच्या उपस्थित मुंबईतला त्यांचा संसार पुन्हा सुरू झाला होता, रमय्याला आता धंद्यासाठी फार वेळ देता येत नव्हता पण कामावर मुलगा ठेवल्यामुळे फार अडचण होत नव्हती. मुंबईत हळू हळू कृष्णा आपल्या कुटुंबासोबत बऱयापैकी स्थिरस्थावर होत होता, काही वर्षात तिथेच त्याने पक्की रूम विकत घेतली, छोटा व्यंकटदेखील हळुहळू मोठा होत होता, जवळच्या प्राथमिक शाळेत त्याचे शिक्षण पूर्ण होत होते.

व्यंकट आता हायस्कूल मध्ये इयत्ता नववीत शिकत होता, त्यावेळी एक घटना घडली कृष्णा ज्या ठिकाणी इडली सांभारची गाडी लावायचा त्याच ठिकाणी एक हॉटेल बनले होते त्या हॉटेलवल्याचे आणि कृष्णाचे वरचेवर खटके उडत असत, आजदेखील असेच काही कारणावरून बाचाबाची झाली, कृष्णा-रमय्या हॉटेलवाल्याशी भांडत होते त्यांचे भांडण विकोपाला गेले होते त्याचवेळी व्यंकट तिथे येतो भांडण पाहून त्याचाही राग विकोपाला जात असतो अशातच हॉटेलवाल्याचा एक माणूस रमय्यावर धावून जातो आणि हे व्यंकटला सहन होत नाही आणि बाजूला पडलेला एक लोखंडाचा रॉड तो उचलतो आणि त्याच्या आईवर धावून गेलेल्या माणसाच्या पाठीमागून डोक्यावर सर्व शक्तीनिशी प्रहार करतो, तो माणूस जमिनीवर कोसळतो, त्याच्या डोक्यातून रक्ताच्या चिलकांड्या उडतात, बरेचसे लोक तिथे जमतात हॉटेलवाल्याचे बाकीचे लोक त्या जखमी व्यक्तीला उचलतात आणि रिक्षात टाकून त्याला हॉस्पिटलकडे घेऊन जातात. हॉटेलवाला पोलिसांना फोन करतो, कृष्णा आणि रमय्या खूप घाबरतात आणि व्यंकटला घरी जायला सांगतात पण तो हटायला तयार नसतो कसे तरी त्याला दमदाटी करून घरी जायला सांगतात. कृष्णा हॉटेल मालकाशी गयावया करतो माफी मागतो पण काही फायदा होत नाही. रमय्या मुलामागे घरी जाते, आजूबाजूला बातमी पसरलेली असते तेव्हा तिथे गल्लीचा दादा विरुभाई येतो आणि रमय्याला समजावतो व्यंकटला इथे ठेवणे योग्य नाही पोलीस उचलतील मॅटर शांत होई पर्येंत त्याला माझ्याबरोबर पाठव ती काहीही विचार करण्याच्या मनस्थितीत नसते ती त्याला विरुभाई बरोबर पाठवते, तो त्याला घेऊन राघूभैयाच्या अडयावर जातो, तिथे एका सिहंसनासारख्या खुर्चीवर आडदांड माणूस बसलेला असतो, तो असतो राघूभैया त्याला त्याच्यासमोर उभे करून त्याची सगळी स्टोरी राघुभैयाला विरुभाई सांगतो त्यावर राघूभैया हसला आणि करारी आवाजात म्हणाला, "छोकरा काम का है अच्छेसे संभालो इसको" रघुभैया म्हणजे अन्नापाडा झोपडपट्टीचा किंग, पाड्यातले सगळे अनधिकृत धंदे, सगळी गुन्हेगारी राघूच्या नावाखाली चालत असते, त्याच्या नावानेच अक्खी झोपडपट्टी चळाचळा कापते इतकी त्याची दहशत असते. राघूभैया मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार होता, तो देखील लहानपणी बिहारमधून खून करून मुंबईत पळून आलेला अन्नापाड्याचा पूर्वीचा भाई अन्नाभाई ज्याच्या नावाने त्या झोपडपट्टीला 'अन्नापाडा' नाव पडले त्याच्या गुन्हेगारी तालमीत लहानाचा मोठा झाला आणि तिथेच आपले गुन्हेगारीचे साम्राज्य पसरवले पुढे अन्नाभाईचा उतरत्या वयात कॅन्सरच्या आजाराने अंत होतो आणि ह्या साम्राज्याचा राघूभैया किंग बनतो, त्याच्यावर चोऱ्या,खून,दरोडे,खंडणी वसुली, अपहरण, अवैध दारू आणि जुगाराचे अड्डे चालवणे अशा अनेक गुन्ह्याखाली पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये असतो पण राजकीय वरदहस्त आणि पोलिसातील ओळखी यामुळे शक्य असूनही त्याला कोण अटक करत नसे.

क्रमशः

(संपूर्ण कथा आणि कथेतील पात्र काल्पनिक आहेत, कोणतेही साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन करणे कथेचे उद्दिष्ट नाही. कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत.)