माझी आई Rahul द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझी आई

**माझी आई**
"आई "ह्या शब्दात पूर्ण ब्रम्हांड सामावलेल आहे.... स्वामी तिन्ही जगाचा "आई"विना भिकारी हेच काय ते परम सत्य....
जगाच्या आधी (9महिने ) पहिला सहवास "आई ", पहिला श्वास "आई ", जन्माला येण्याचा ध्यास "आई ", जन्माला आल्यानंतर इवलुश्या केविलवाण्या नजरेत सामावलेली पहिली व्यक्ती "आई, "उच्चारलेला पहिला शब्द "आई ", पहिली गुरु म्हणजे " आई ", आहो इतकंच काय तर पृथ्वीवरचा पहिला देव म्हणजे "आई ",.......
पृथ्वीवरच अमृत हे "आईने "पाजलेल्या दुधाच्या प्रत्येक थेंबात आहे.. स्वर्ग तिच्या गालावर खळखळून उठलेल्या हास्यातं आहे.... नरक तिच्या पापणी आड लपू पाहणाऱ्या डोळ्यातील आश्रु मध्ये आहे.. पंढरपूर, काशी "आईच्या " पायाशी आहे.. तिने दिलेला आशिर्वाद देवापेक्षा मोठा आहे....आणि माझी "आई "अशीच आहे..
...... माझ्या आईच नाव "चंद्रभागा".. नावाप्रमांणे सतत धावणारी,
नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना म्हणजे.. कर्ममय प्रार्थना, सारखी चोवीस तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे.आणि माझी आई अशीच आहे...
माझी आई फार शिकलेली नाही, पण आयुष्याच्या शाळेत अनुभवाचे शिक्षण मात्र तिने पक्क घेतलंय... मी काय बोलणार आई बद्दल.... मी माझ्या आई बद्दल बोलण, म्हणजे ओसाड रस्त्यावर, सतत कोणाचीतरी पायधूळ मस्तकावर घेऊन गडगळणाऱ्या खडकाने मेरू पर्वताच्या उंचीबद्दल बोलल्यासारखं होईल.....
संघर्ष चे दुसर नाव म्हणजे आई.... , त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आई... अशीच आहे माझी आई...
जगाच्या आणि देवांच्या ही आधी कळत नकळत पणे का होईना 9 महिने अगोदर आई मला ओळखू लागली..... माझा श्वास, माझी धडपड, माझं असणं.. हे कोणासाठी नाही पण माझ्या आईसाठी मात्र माझे अस्तित्व होत.....
मी जन्माला आल्यानंतर तो तिच्या आयुष्यातील पहिला दिवस असेल की मी रडताना ती मात्र हसत होती...... त्यानंतर असा दिवसच उगवला नाही, की मी रडताना ती हसली..
माहित नाही किती पथ्य पाळली असतील.... डॉक्टर ने सांगितलं हे खाऊ नका मुलाला त्रास होईल... तिने ते वर्ज्य केले.... असा त्याग फक्त आईच करू शकते...
तिने उगाळलेली गुट्टी.., तिच्या आभाळाएव्हढया बोटांनी आमच्या इवल्याश्या तोंडी चारल्या नंतर.., अलगदपणे मान आईच्या खांद्यावर टाकून आलेला तो तृप्ततेचा ढेकर... आज इतक्या वर्षात तसा ढेकर पुन्हा कधी आलाच नाही....
वडिलांचा साधा भोळा स्वभाव, घरची परिस्थिती, आजूबाजूचे वाद विवादांचे वातावरण... ह्या सगळ्यातून तिने आम्हाला वाढवलं... मी आणि माझी बहीण ही तिच्या संसाररुपी वृक्षाला मातृत्व प्रदान करणारी फळेच.... म्हणतात ना झाडाला लागलेले फळ दिसते पण त्याखालचे मुळ कोणाला दिसतं नाही.. त्याखालचे मुळ म्हणजे माझी "आई "...
आजवर अनेक समस्या उद्भवल्या पण प्रखरतेने "आईने " त्यांना तोंड दिले.. संसाराचे शिवधनुष्य तिने लिलया पेलले आहे..
"आई " नेहमीच श्रेष्ठ असते ., पण माझी "आई "माझ्यासाठी खास आहे.कारण माझ्या आईने माझ्या वयाच्या 24 व्या वर्षी देखील माझा सांभाळ अगदी लहान मुलासारखा केला आहे., एका दिवाळीत हातात पाऊस फुटला आणि हात भाजला गेला... त्या जखमेचे चटके माझ्या हाताला आणि तिच्या हृदयाला बसले होते.. अगदी लहान मुलासारखं तिने मला न्हाऊ, खाऊ घातलं.. आईची माया आंधळी असते, हेच खरे...
तिने आपला कंप पावणारा हात माझ्या तोंडावरून कितीवेळा फिरविला असेल, याची गणतीच करता येणार नाही....
माझ्या जखमेने रात्र - दिवस हळ-हळ नारी ती माझी " आई "..
असाच एका गणपतीला माझ्या गाडीचा अपघात झाला..पायाच्या अंगठ्याजवळ टाके पडले.. टाके मला पडत होते पण हृदय तिचे शिवले जात होते.. त्यावेळी "आई "ने माझी खुप सेवा केली.. वयाच्या ह्या टप्यात देखील तिने माझ्यातला लहान बाळ जागा ठेवला.. मुल कितीही मोठं झालं, तरी आईच्या दृष्टीने ते लहान असतं..
जिथे जिथे मी अडखळलो तिथे तिथे माझी "आई " माझा भक्कम आधार झाली..माझा बाप झाली.. माझी गुरु झाली..आईने माझ्यासाठी, माझ्या बहिणीसाठी जितकं केल आहे..कदाचित कोणी करू शकले नसते...
मनातील भावनांना शब्दांची जोड देऊन व्यक्त झालो आहे.. ह्यात कोणतेही तत्व ज्ञान नाही... आणी तसंही आईचे हृदय हे जगातल्या सर्व तत्त्वज्ञानाच माहेरघर असतं.....
🙏🙏😊 राहुल केर्लीकर 😊