गोट्या - भाग 9 - माझ्या गुरुजीची दस्ती Na Sa Yeotikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

गोट्या - भाग 9 - माझ्या गुरुजीची दस्ती

माझ्या गुरुजीची दस्ती

शाळेच्या सहलीत गुरुजींचा रुमाल पाण्यात पडतो तेव्हा एक विद्यार्थी ते रुमाल आणून सरांना देतो. गुरू-शिष्याची अनोखी लघुकथा

शाळेच्या मैदानात सारी मुले गोळा झाली होती. शाळेला नियमितपणे न येणाऱ्या मुलांचे चेहरे देखील आज दिसत होते. साऱ्यांच्या चेहऱ्यावर खुशीची एक लहर दिसत होती. पाचव्या वर्गातील राम, विकास, उत्तम, शीला, सीमा हे विद्यार्थी सर्व मुलांना एका झाडाखाली बसवून पवार सरांच्या येण्याची वाट पाहत होते. आज निमित्त होते निसर्ग सहलीचे. रामपूर हे गाव सीता नदीच्या काठावर वसलेले दीड हजार लोकसंख्या असलेले गाव. त्या गावातील जिल्हा परिषदेची पाचवी पर्यंतची शाळा आणि त्या शाळेत पवार सर हे एकटेच शिक्षक त्या 35 मुलांना शिकवण्याचे काम करायचे. शिकवण्याचे कुठले ते तर सांभाळायचे काम करायचे. पाच वर्ग आणि शिक्षक एकटाच. त्यामुळे पाचव्या वर्गातील काही मुलांना त्यांनी शिक्षकमित्र म्हणून तयार केले होते. त्यात राम हा विद्यार्थी खूपच प्रामाणिक आणि पवार सरांचा आवडता विद्यार्थी होता म्हणून सारे मुलं पवार सरांच्या नंतर रामचे बोलणे ऐकायचे. नदीच्या काठावरील महादेवाच्या मंदिरात आपण सहल काढू या असा हट्ट त्याने पवार सरांजवळ केला होता आणि सर तयार ही झाले. म्हणून आज भल्या पहाटे सारीच्या सारी मुले मैदानात गोळा झाली होती. सोबत जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली देखील होती.
" सर आले .... सर आले ..." पवार सरांची गाडी शाळेच्या मैदानात आल्याबरोबर सर्व मुलांनी एकच गलका केला. पवार सरांनी शाळेचे दार उघडले, वर्गनिहाय सर्व मुलांची हजेरी घेतली, काय चमत्कार आहे, आज 100 टक्के उपस्थिती आहे, व्वा खूपच छान. मोठी मुलं पुढे, लहान मुले मध्यभागी आणि शेवटी मोठ्या मुली या पद्धतीने रांग तयार केली आणि नदीकडे शाळेची सहल निघाली. अर्धा ते एक किमी अंतरावर ठरवलेलं ठिकाण होते. झाडे लावा, झाडे जगवा, आपली मुले शाळेत पाठवा मुलांनी असे नारे देत रस्त्याने जात होते. मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह संचारला होता. लवकरच सारे मुले नदीच्या काठावर पोहोचली. सारे मुले गोलाकार होऊन बसले. पवार सरांनी मुलांचे वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन केले. वेगवेगळे खेळ खेळले. तोपर्यंत सर्व मुलांना खूप भूक लागली होती. म्हणून सर्वांनी आपल्या सोबत आणलेली डबे उघडली. कोणाच्या डब्यात पोहे, कोणाच्या डब्यात मुरमुरे, कोणी आणली खिचडी तर कोणी भाजी-पोळी आणली होती. पवार सरांनी रामला जवळ बोलावून घेऊन त्याचा डबा उघडायला सांगितलं. त्याच्या डब्यात ज्वारीची भाकर आणि बेसन होतं. सरांनी त्यांचा डबा त्याला खाण्यासाठी दिला. भाजी-पोळी-दही त्यात होती. राम त्यादिवशी खूप दिवसानी पोळी खाल्ली होती तर पवार सर देखील बऱ्याच दिवसांनी बेसन-भाकर खाल्ले होते. दोघे ही जेवण करून तृप्त झाले होते. सर्वांचे जेवण संपल्यावर पवार सरांनी मुलांना नदीच्या पात्रात घेऊन गेले. ज्याठिकाणी पाणी कमी होते त्याठिकाणी घेऊन जाऊन मुलांना माहिती देऊ लागले होते.
दुपारचे दोन वाजले होते. हिवाळ्याचे दिवस असले तरी कडक ऊन लागत होते. सरांना बोलतांना घाम आला होता म्हणून आपल्या पॅन्टच्या खिशातील दस्ती काढून घाम पुसले. तेवढ्यात अचानक वाऱ्याची एक हलकी झुळूक आली आणि पवार सरांची दस्ती पाण्यात पडली. सरांनी ते पकडण्याचा प्रयत्न केला पण पकडू शकले नाहीत. " सरांची दस्ती पाण्यात पडली " म्हणून सारे मुले एकदाच ओरडली. राम मात्र तसे काही न म्हणता, मागेपुढे विचार न करता पाण्यात उडी घेतली. " अरे राम " असे म्हणेपर्यंत तो पाण्यात पडलेल्या दस्तीजवळ जाऊन पोहोचला होता. रामला खूप छान प्रकारे पोहता येते हे सर्व मुलांना माहीत होते मात्र पवार सरांना त्यादिवशी कळाले. सरांनी रामच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. तेव्हा रामने माझ्या गुरुजींची दस्ती आहे असे कसे जाऊ देईन असे म्हणाला. सरांना भरून आल्यासारखे झाले. त्यांनी रामला आपल्या जवळ घेतले आणि सर्व मुलांना रामसाठी तीन टाळ्या वाजविण्याची सूचना दिली. सर्व मुलांनी जोरजोरात टाळ्या वाजविल्या. रामने पवार सरांची दस्ती पाण्यातून काढून दिली तर पवार सरांनी रामला पोहण्यासाठी प्रोत्साहन देऊन चॅम्पियन बनवले. स्विमिंगमध्ये राम महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे हे पाहून पवार सर गदगदीत झाले. गुरू-शिष्याचे नाते असावे तर असे.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769