#भाग_१
“इटर्निया बिजनेस सेंटर” नाव असलेले क्रोम प्लेटेड अक्षरे सकाळच्या कोवळ्या उन्हाने झळाळून निघाली होती. धावत पळत ‘ती’ तळमजल्याच्या लिफ्टजवळ आली.
3rd floor –“दि शोकेस मिडिया प्रा.लि.” ह्या नावावरून तिने हलकेच हात फिरवला, एक स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं आणि तिने लिफ्ट कॉल केली,लिफ्टमधे शिरल्यावर जरा केस एकसारखे केले, लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर आल्यावर ती घाईघाईने शोकेस मिडियाच्या ऑफिसमध्ये गेली, रिसेप्शनला ऑफर लेटर दाखवून तिने जुजबी माहिती घेतली.रिसेप्शनिस्टने उजव्या बाजूला हात दाखवत एका बोर्डकडे इशारा करत म्हटलं-
“ मॅम तुम्हाला ऑलरेडी उशीर झालाय, ह्या बाजूला कॉन्फरन्स रूम आहे आणि induction lecture ऑलरेडी सुरु झालंय, your senior Mr. Arush Jadhav is very strict about the timing, so go fast.
“Ok thanks..” म्हणत तिने तिचं डेस्कवरचं ट्रेनी-कार्ड घेतलं आणि रूमकडे धावली.
कॉन्फरंसरूमचा दरवाजा थोडा ढकलत तिने विचारले –
“मे आय कम इन सर”
कॉन्फरंस रूम पूर्ण भरली होती,प्रेझेंटेशन सुरु असल्याने थोडा अंधार होता.प्रेझेन्टेशन देत असलेल्या आरुष कपाळावर आठ्या आणतच दरवाज्याकडे बघितले पण क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव जरा मावळले.
..एका हाताने दरवाज्याचा हॅन्डल पकडून ती उभी होती. उंचपुरी,सतेज गव्हाळ रंग,टवटवीत चेहऱ्यावर गोडसर भाव, पाठीवर रुळणारे सॉफ्ट कर्ल केलेले मोकळे केस,इनशर्ट, ट्रेंडी बेल्ट,वेल फिटेड ग्रे ट्राउझर,शूज, खांद्याला स्टायलिश पर्स, हलकासा मेक अप, बोल्ड काजळाने अधोरेखित झालेले गर्द कॉफी रंगाचे डोळे..तिने पुन्हा विचारले-
“मे आय कम इन सर?”
भानावर येत आरुष म्हटला-“ एस...कम इन.... but this is first and last time…I won’t allow late comers in my sessions…please Mind it…Miss??”
“ऋतुजा मोहिते....” तिने जरा मान झुकवून उत्तर दिले.
“ठीक आहे... मिस ऋतुजा टेक युअर सीट..”
एव्हाना सेशन मधल्या सगळ्यांची नजर ऋतुजावर खिळली होती. तिने संपूर्ण हॉलभर नजर फिरवली आणि मागे असणारया खुर्चीकडे ती निघाली. ती बसेपर्यंत दबक्या आवाजातील कुजबुज सुरु होती.
आरुषने सर्वांना शांत करत पुन्हा एकदा सेशनचा ताबा घेतला. उंच,जेल लाऊन सेट केलेले दाट केस,स्लिम फिट शर्ट,ट्राउझर,टाय...ग्रेसफुल बॉडी लँग्वेज..ट्रेनी मुली तर आरुषला पाहताच फिदा झाल्या होत्या.
प्रेसेंटेशनच्या स्लाईडकडे वळत मागचा मुद्दा पूर्ण केल्यावर तो म्हणाला-
“So we were talking about the Brand….yes!!!…so जर मी तुम्हाला म्हटलं represent yourself as a brand then how will you represent?....yes anyone ?
त्याने नजर फिरवली सगळे एकमेकांशी चर्चा करत होते...मागे एक हात वर झाला तसं त्याने बघितलं...ती ऋतुजा होती.
त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणत तो म्हटला-
“Yes miss Mohite ..”
ऋतुजा उठून उभी राहिली. तिच्याकडे सर्व वळून बघायला लागले.
“सर मला जर स्वतःला ब्रांड म्हणून represent करायचं असेल तर मी म्हणेल-“I am Brand “पुणेरी” with added tagline –“माझी कुठेच शाखा नाही...”.
“Alright …Miss Mohite…उशिरा येऊन ही सेशनचा वेग बरोबर पकडला तुम्ही..” मघाचं स्मित हास्य कायम ठेवत तो म्हणाला.
तेवढ्यात हॉलच्या दुसऱ्या बाजूने हात वर झाला आणि त्याच्या पाठोपाठ एक आवाज आला-
“Excuse me sir, I have an objection to this answer…..”
सर्वांच लक्ष ऋतुजावरून पुन्हा त्या आवाजाकडे गेलं. ऋतुजाने ही जरा आश्चर्याने पहिले.तिच्या रांगेतल्या विरुद्ध बाजूला शेवटी तो उभा होता.....
उंचपुरा,निमगोरा,टेपर फेड हेयर स्टाईल, चेहऱ्याच्या ठेवणीला शोभणारी अगदी शोर्ट स्टबल दाढी..थोड्या ही स्माईल ने उजळत जाणारी गालवरची खळी,दांडावर बारीक फोल्ड असलेला शर्ट,फॉरमल जीन्स, डोळ्यात दिसणारा आत्मविश्वास...त्याने रोखून ऋतुजाकडे पाहिले आणि पुन्हा म्हणाला-
“मला यांच्या answer वर एक क़्वेरि आहे...”
“ओके...गो अहेड...” खुर्चीला टेकत आरुष म्हणाला.
“सर “माझी कुठेही शाखा नाही” हे ब्रँडिंग,मार्केटींगच्या दृष्टीने योग्य ठरतं का? कारण कुठेच शाखा काढायची नसेल तर कशाला हवा ब्रँड...आणि ...”
त्याच बोलणं पूर्ण न होऊ देता ऋतुजा मध्येच म्हणाली-
“ सर मला वाटतं ब्रँड ही ओळख असते ..मार्केटिंग,ब्रँड expansion ह्या पुढच्या गोष्टी ...तुमचा प्रश्न होता की तुम्ही स्वतःला ब्रँड म्हणून कसं रेप्रेसेंट करणार आणि मला वाटतं ते मी बरोबर केलय....ह्यांना तुमचा प्रश्न कळला नाहीये किंवा त्यांची “ब्रांड” ह्या शब्दाची कॉन्सेप्ट चुकीची आहे...”
तिच्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकत तो म्हणाला-
“ सर एकतर माझं बोलणं पूर्ण न ऐकून घेता ह्यांनी मला interrupt केलं..त्यामुळे माझे कॉन्सेप्ट किती क्लियर आहे ह्याविषयी यांनी बोलू नये ....”
दोघांच्या ह्या वादावादीत हॉल मधील चर्चा,कुजबुज वाढत असल्याचं बघून आरुषने सर्वांना शांत करत म्हटलं....
“ओके .... आपण आजच्या शेवटच्या brain storming सेशनला ही चर्चा कंटिन्यू करू या....आजचा विषय असेल मिस मोहिते यांनी केलेल ब्रँड representation आणि mr…..”
अजूनही उभ्या असलेल्या त्याच्याकडे हात दाखवत आठवल्या सारखं करत आरुष म्हणाला—
“वेद इनामदार....” त्याचा दमदार आवाज हॉलभर घुमला.
त्याच्याकडे एक रागीट नजर टाकून ती खाली बसली.
सेशनचं वातावरण पुन्हा शांत झालं आणि आरुषने पुढची स्लाईड घेतली. रंगात आलेलं सेशन थांबलं ते लंच ब्रेकला..
आज जॉबचा पहिला दिवस असल्याने अजून कुणी कुणाला जास्त ओळखत नव्हतं..वेगवेगळ्या कॉलेजेस मधून कुणी ऑन कॅम्पस तर कुणी ऑफ कॅम्पस सिलेक्ट झालेले होते..सेशनच्या सुरुवातीला झालेला इंट्रो जास्त कुणाच्या लक्षात राहिला नव्हता.सेशनला जवळ बसलेले त्या निमित्ताने सोबत होते एवढंच काय ते कारण...!!
जेवणाची प्लेट घेऊन वेद एका गोलाकार टेबलाजवळ येऊन बसला.
तो जेवण सुरु करणार तेवढ्यात मागून, एक गावाकडचा हेल असलेला खणखणीत आवाज आला-
“वेद बसू का भाऊ इथं...काय प्रोब्लेम बिब्लेम नाही ना..."
त्याने आवाजाच्या दिशेनं पाहिलं..मध्यम उंची, सावळा रंग..बारीक फ्रेमचा चष्मा आईने भांग पडून दिल्यासारखं साइड पार्टिशन.. आणि चेहर्यावर मिश्कील हसू. शेजारच्या खुर्चीवरून बॅग उचलून बाजूला ठेवत तो म्हणाला-
“अरे विषय आहे का !!.. बस ना भावा ....आणि माझं नाव लक्षात आहे तुझ्या?”
प्लेट टेबलवर ठेवत तो दबक्या आवाजात म्हणाला-
“ काय बोलतो राव नाव लक्ष्यात आहे का?...अरे सगळ्यांना आज दोनच नाव लक्षात राहतील ऋतुजा मोहिते आणि वेद इनामदार...”
वेदने हलकीशी स्माईल देत मान डोलावली तशी त्याच्या दोन्ही गालावरच्या खळ्या अजूनच स्पष्ट झाल्या.
“बर तुझ नाव काय?..इंट्रो मध्ये जास्त लक्ष नव्हत माझं..” तो पुढे म्हणाला.
“मी मायसेल्फ....साक्षात mr. जयराज नाईक फ्रॉम पिंपळगाव...”
दोन्ही हात हवेत पसरवत तो हसून बोलला.
“साक्षात Mr. जयराज नाईक..काय अवतार वैगरे घेतलाय का ?”
“साक्षात” वर जोर देत हलकसं हसत,भुवया उंचावत वेद म्हटला.
“येस..साक्षात!!! मला बनवल्यानंतर देवाने तो साचाच तोडून
फेकला की राव ...मग माझ्यासारखा अख्या पृथ्वीवर मी एकच ..साक्षात Mr. जयराज नाईक..”
त्याच्या ह्या फुटकळ जोक्सवर दोघही जरावेळ हसले. थोड्यावेळाने घाईने एक मुलगी आली आणि प्लेट त्यांच्या टेबलावर ठेवत ,घंटीसारख्या किणकिणत्या आवाजात तिने विचारले-
“ excuse me…मी इथे बसू का?...सगळे टेबल occupied आहेत”
जयराज आणि वेदने एकवार तिच्याकडे मग एकमेकांकडे पहिले,वेदने पुन्हा बॅग उचलून खाली खुर्चीला टेकून ठेवली आणि जयराज पटकन बोलून गेला-
“बस की काहीच प्रोब्लेम नाही...”
खांद्यावरची ओढणी सावरत ती बसली.बसतांना गोड हसत “थॅंक्यु” म्हणत तिने दोघांकडे पहिले आणि समोरच्या प्लेटला कुणाला दिसणार नाही असा चोरून, एका हाताने नमस्कार केल्यासारखं केलं. वेद्च्या मात्र ते नजरेतून सुटलं नाही.त्याने एक चोरटी नजर तिच्यावर टाकली. सिल्की केसांची उंच पोनीटेल,त्यातून एक बट निसटून तिच्या डोळ्यावर येत होती आणि ती तिला कानामागे टाकायचा वेडा प्रयत्न करत होती.छोट्या चणीची,गोरटेली,थोडे मोठे ओठ,काळेभोर डोळे,रेखीवपणे कोरलेल्या भुवया आणि थोडंस पसरट नाक..तिच्याशी नजरानजर झाल्यावर त्याने जरासं हसून नजर वळवली. तिनेही हसून दोघांकडे बघत म्हटलं-
“मी रेवा प्रधान..”
तिच्याकडे बघत जयराज म्हणाला-“मी जयराज नाईक आणि हा तर तुला माहित असेलच वेद इनामदार”
वेदकडे बघत ती म्हणाली-“ हो ते समजलं मघाशी..”
पुन्हा एक हलकी स्माईल देत त्याने शांतपणे जेवायला सुरुवात केली.
त्यांच्यापासून दोन तीन टेबल सोडून ऋतुजा बसली होती तिच्यासोबत तिचे नुकतेच झालेले फ्रेंड्स सौम्य आणि अनुज बसले होते. दुरून एकदोन वेळा नजरानजर झाल्यावर टाकलेले रागीट कटाक्ष दोघांमध्ये चांगलच युद्ध रंगणार आहे याची वर्दी देत होते.
लंच ब्रेकनंतरचे दोन सेशन संपल्यावर ब्रेन स्टोर्मिंग सेशनमध्ये मात्र सकाळच्या विषयाला धरून जणू दोन गट पडले होते. आपसूकपणे वेदच्या बाजूने जयराज,रेवा बोलत होते तर सौम्या,अनुजने ऋतुजाची बाजू उचलून धरली होती.
वेद शांतपणे,संयमाने त्याची बाजू मांडत होता तर ऋतुजा तिच्या मुद्द्यांना धरून आक्रमक झाली होती. आरुष मात्र बघ्याच्या भूमिकेतून सगळ्यांची मते, मुद्दे मांडण्याची पद्धत यावर लक्ष केंद्रित करू पहात होता मात्र ऋतुजा बोलायला लागल्यावर तिच्या टपोऱ्या डार्क कॉफी रंगाच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारा आत्मविश्वास, तिचे विभ्रम, मोहक हालचाल त्याला क्षणभर सगळं विसरायला लावत होती. वेद आणि ऋतुजामुळे झालेले दोन्ही गट मागे हटत नव्हते,डिस्कशनचा सूर जाऊन आता जवळपास भांडणाचा सूर लागत होता तेव्हा आरूषने मात्र मध्यस्थी करत वाद थांबवले आणि पहिला दिवस संपला.
काहीवेळा पूर्वी झालेल्या विषयावर बोलतच सगळे बाहेर पडत होते.ऋतुजा सौम्याशी बोलत बाहेर निघाली तेवढ्यात आरुषने तिला आवाज दिल्याने ती थांबली, सौम्या तिला बाय करून निघून गेली.
“मिस मोहिते एक सांगायचं होतं..इफ यु डोन्ट माईंड” आरुष जरा चाचरत बोलला.
“ I wont mind बोला ना सर”
खांद्यावरची पर्स सावरत ऋतुजा म्हणाली.
“You have spark.. you can go far ahead जरा रागावर कंट्रोल ठेव..ओके?
“ओके सर ...मी लक्षात ठेवेन..thanks” थोडंस पडक्या आवाजात ती म्हणाली.
“that’s good,bye see you tomorrow..”आरुष गोड हसत म्हणाला.
त्याच्या ह्या पर्सनल अटेन्शन ने एक अनामिक धडधड तिला जाणवली आणि उत्तरा दाखल गोड स्माईल तिच्याही गालावर आली.
वेळ झाला म्हणून ती लिफ्टची वाट न बघता जिन्याने धावतच ती खाली निघाली.
वेद पार्किंगला पोहचला तेव्हा त्याच्या लाडक्या यामाहा एफझेडच्या मागे तिरकस व्हाईट प्लेजर लावलेली होती ते पाहून तो चिडला.त्याने वॉचमनला आवाज दिला.
“अरे दादा कुणी लावली अशी गाडी ... तुमच लक्ष नाही का?”
“अहो साहेब पोरी बी अश्या गाड्या लावतात ना, आम्ही काही बोलायच्या अगुदरच तुरुतुरु पळून जातात बघा,थांबा आपण जरा जरा उचलून जागा करू गाडी काढायला.”
तो वॉचमन अजीजीने बोलला. वेद ने आणि वॉचमनने ती गाडी जरा उचलून बाजूला करताच गाडीचं stand जमिनीला घासल्या गेल्याने आवाज झाला तशी ऋतुजा पार्किगमध्ये आल्यावर ओरडली-
“ओ वॉचमन दादा काय करताय..ती माझी गाडी आहे.”
गाडी जवळ आल्यावर वेदला पाहताच तिला अजूनच राग आला आणि ती वॉचमनकडे पहात रागाने बोलली-
“दादा माझ्या गाडीला या नंतर हात लावायचा नाही सांगून ठेवते..”
“दादा यांनतर माझ्याही गाडीच्या मागे कुणाची गाडी पार्क झालेली दिसली तर सरळ साईडला ढकलेल हे ही लक्षात ठेवा...”
गॉगल लावून,पाठीला सॅक अडकवत तो म्हणाला.
“वेद काय बोलायचंय ते सरळ बोल...आणि मला बोल ना! ..आडून काय बोलतोय..”
ती ही गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
“सरळ बोलायचं ना मग ऐक माझी गाडी आजूबाजूला असतांना शिस्तीत गाडी लावायची ते ही अगदी व्यवस्थित....”
तिच्याकडे लक्ष न देता मोबाईलमध्ये डोकं घालत तो म्हणाला.
“मूर्ख ...स्टुपिड.ओव्हरस्मार्ट...”
तोंडातल्या तोंडात पुटपुटत गाडी जरा मागे घेत असतांना तिचा तोल जाऊ लागला आणि ती ओरडली.तिचा ओरडा ऐकून त्याने झटकन एका हाताने गाडीचं हॅन्डल आणि दुसऱ्या हाताने मोबाईल सावरत तिला आधार दिला.तिचा चेहरा अगदी त्याच्या डोळ्यासमोर होता.तिचा गव्हाळ रंग, कॉफी रंगाचे डोळे अगदीच कमाल combination होतं ती गोंधळून गेली..त्याने ताकदीने गाडी सरळ करत तिलाही उभं केलं.तिने त्याचा हात झटकत दीर्घ श्वास घेत फक्त कोरड,कसनुसं तोंड वेंगाडत, थँक्स म्हणत गाडीचा ताबा घेतला.
“हा काय विषयये ...भलाईचा जमानाच नाही....काय नमुनाय !”
गाडीवर बसतं स्वतःशीच तो म्हणाला आणि त्याने त्याची गाडी स्टार्ट केली.
दुसऱ्या पार्किंग लाईन मधून रेवा हा सगळा प्रकार बघत होती....डिक्कीतून हेल्मेट काढून तिने उगाचच जोरात सीट आपटलं अन हेल्मेट घालायला पाठमोरी झाली, मागे गाडी थांबल्याचा आवाज आला...ती मागे वळली,तसं
“चल रेवा बाय....सी यु ”
गोड स्माईल देत वेद म्हणाला.. मागे येत असलेल्या ऋतुजाने पुढे जायला जागा नसल्याने ,इरीटेट होईल एवढ्या जोरात त्याला हॉर्न दिला. जरा पुढे घेऊन, साईडला गाडी करत “जा ना....बाई” म्हणून त्याने रागाने तिच्याकडे बघितले.. तेवढाच राग त्याला देऊन तिने गाडीचा वेग वाढवला आणि ती निघून गेली...मागे वळून रेवाला पुन्हा बायसाठी हात उंचावत वेद ही निघाला.
पहिल्या जॉबचा पहिला दिवस प्रत्येकासाठी कुठल्यातरी अनोळखी कारणाने खासच होता हे मात्र नक्की..........!!
क्रमशः
©हर्षदा