One more secret ... - Part 2 books and stories free download online pdf in Marathi

एक रहस्य आणखी... - भाग 2

भाग 1 वरून पुढे

"काय म्हणजे तू नक्की काय पाहिलंय? " रेवती म्हणाली.
काल रात्री जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा साधारणतः 2 वाजता अचानक कुणीतरी माझ्या अंगावरून चादर जोरात ओढून फेकून दिली. मी परत अंगावर घेतली तर परत कोणीतरी ती जोरात ओढून फेकून दिली. अचानक पलंगाखालून दोन हात आले आणि माझा गळा दाबायला सुरवात केली. जिवाच्या आकांताने मी ते हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि उठून बसलो. थोडं पाणी प्यावं म्हणून रूममधील बॉटल कडे पहिले तर लक्षात आलं कि बॉटल तर पूर्णपणे रिकामी आहे. रूममध्ये फक्त फॅनचा घर..घर.. आवाज होता. त्याच्या सोबतीला घडाळ्यातील टिक.. टिक आवाजही मला स्पष्ट जाणवत होता. रूमच्या बाहेर गर्द पडलेला काळाकुट्ट अंधार आणि भल्या मोठ्या वृक्षांच्या सुकलेल्या पानांचा आवाज माझ्या अंगावर शहारा आणत होते. मी ताडकन उठलो आणि पाणी पिण्यासाठी किचन कडे जाऊ लागलो तस माझ्या लक्षात आलं कि बाजूला एक सावलीही माझ्या सोबतच येत आहे .माझ्या मागून कुणाचेतरी रक्ताने माखलेले पाय उमटत होते. क्षणार्धातच मी मागे पहिले तर तिथे कोणीच नव्हते. शांतपणे पाणी पिऊन मी रूममध्ये येऊन बसलो आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. तेवढ्यात अचानकपणे जाणवले कि माझ्या हाताला भिंतीवरून आलेल पाणी लागतंय ते पाणी कुठून येतंय हे पाहण्यासाठी मी लाईट लावला तर समोरच दृष्य बघून माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझ्या श्वासाचा आवाज मला जाणवत होता कारण भिंतीवरून पाणी नाही तर चक्क रक्त येत होत. रूम रक्तानी लालबुंद झाली होती. बल्ब ही चालू बंद होत होता आणि एकदाचा बल्ब बंद झाला. एक भयानक आकृती जिचे कुरळे केस अस्तव्यस्त झाले होते, शरीरावर जागोजागी जखमा होत्या.. ओठ फाटलेले होते आणि त्यातून काळपट रक्त टपटप करून जमिनीवर पडत होत, अतिशय सुकलेली आणि हाडाला चिकटलेली तिची त्वचा, रक्ताने लाल झालेले तिचे हात माझ्या जवळ येत होते . माझ्या हृदयाची स्पंदने अतिशय जोरात धडधड करत होती.. हातपाय थरथरायाला लागली होती. एवढ्यात ती आकृती माझ्या जवळ येऊन उभी राहिली. माझ्या चेहऱ्याला न्याहाळले आणि अतिशय भेसूर घोगऱ्या आवाजात म्हणाली " तू पापी आहेस.... तुला आता या जगातून न्यायला मी आली आहे ". तिचा तो आवाज माझ्या कानात प्रखरपणे घुमत होता. तोच तिने तिच्या लांबसडक रक्तानी माखलेल्या हातानी माझा गळा दाबायला सुरवात केली. गळ्यावरील दाब वाढला... जोर वाढला.. माझे डोळे पांढरे होण्यास सुरवात झाली.. मला सर्व जगाचा विसर पडला... डोळ्यावर अंधारी यायला सुरवात झाली आणि शरीरातील सर्व शक्ती एकवटून मी ओरडलो " वाचवा.... वाचवा... ". एवढ्यात मम्मी पप्पा माझ्या खोलीत आले आणि नक्की काय झाले म्हणून विचारू लागले. मी घडलेली सर्व घटना सांगितली पण तुला भास झाला असेल किंवा तू कोणते वाईट स्वप्न पहिले असेल असे म्हणून मम्मी पप्पानी मला झोपायला सांगितले. मला खूप भीती वाटत होती म्हणून मी माझ्या वडिलांच्या खोलीत जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही.

"म्हणजे तुला म्हणायचं तरी काय? कि ते एक आत्मा किंवा भूत होते " रेवती म्हणाली .
"वाटत तर तसंच आहे. मी कधीच ह्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला पण काल जे मी पाहिलंय त्यावरून तरी असंच वाटतंय ".
"काल जो तू दगड हलविलास त्याचा तर हा परिणाम नसेल ना कारण तो साधू पण तेच वाक्य म्हणत होता कि तू पापी आहेस ".
"सध्या तरी काही सांगता येत नाही पण ती शक्यता ही नाकारता येणार नाही कारण तेव्हापासूनच हे सर्व घडत आहे ".
"मग आपण त्या साधूला भेटायचं का? "
"नको मीच भेटतो त्याला. सध्या तरी कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवत आहे असेच वाटत आहे. शिवाय ती सावलीही माझ्यासोबतच आहे असे मला वाटतंय".
"काय? अरे देवा! वाचव रे बाबा "
" एक काम करतो कॉलेज सुटल्यावर मीच त्या साधूला भेटून येतो ".
"ठीक आहे ".

कॉलेज सुटल्यावर रोहन गाडी घेऊन रेवणगढ गार्डन कडे जायला निघतो. रोजचा हवाहवासा वाटणारा रस्ता त्याला आज फारच भयाण वाटत होता. रस्त्याच्या कडेला असणारे झाडे पाहूनही त्याला भीती वाटत होती. शेवटी गाडी थांबली आणि रोहन आरक्षित जंगलामध्ये ( reserved forest) जाऊन त्या साधूला शोधू लागतो.

" काय हवय तुला.. कशासाठी इथे परत आलास आहेस " हे शब्द त्याच्या कानी पडतात. मागे वळून पाहतो तर तिथे ते साधू उभे होते.
"माफ करा बाबा मला मी तर फक्त चुकून तो दगड हलवला " असे म्हणत रोहन त्या साधूच्या पाया पडायला लागतो.
" ऊठ पोरा ऊठ रडू नकोस " साधू म्हणतात.
रोहन त्यांना काल रात्री घडलेली सर्व घटनांचा तपशील सांगतो आणि न राहवून विचारतो ह्या दगडाचे काय रहस्य आहे?
" मला एक सांग तुझा भूत, प्रेत, आत्मा हडळ, यक्षिणी यावर तूझा विश्वास आहे का? "
" आता पर्यंत तर नव्हता पण थोड्या प्रमाणावर आहे विश्वास ".
"अरे नादान बालका तू कधी हवेला पाहिलंय का पण त्याच अस्तित्व आहे ना, तू कधी सुगंध पहिला आहे का पण त्याचेही अस्तित्व आहे आणि तू ते अनुभवलं पण आहे. तसेच या गोष्टीचे पण अस्तित्व आहे ".
" मला या भुताटकी प्रकरणातून वाचावा बाबा आणि त्या दगडाचे काय रहस्य आहे सांगा तरी एकदा ".
"त्या दगडावर अभिषेक करून वाईट आत्म्याची पूजा करतात काही लोक ज्याला साधारण भाषेत "काळी जादू " म्हणतात ".
"काळी जादू...... "रोहनचा श्वास भरून येतो आणि हृदयाचे ठोके जोरात धडधडायला लागतात.
" बाबा ह्यातून निघण्याचा काही तर मार्ग असेल ना कृपया मला ह्यातून निघण्यासाठी मदत करा ".
"माफ कर मला पण मी तुझी कुठलीही मदत करू शकत नाही ".
"का पण काय कारण? " रोहन विचारतो.
" कारण एवढी सिध्दीही माझ्यात नाही आणि शक्तीही माझ्यात नाही आहे".
रोहन हताश होऊन निघू लागतो तेवढ्यात तो साधू म्हणतो " बेटा जेव्हा माणूस आणि दानव यांच्यात लढाई असते ना तेव्हा दानवाची शक्ती केव्हाही जास्तच असते पण एक लक्षात ठेव मानवाकडे एक शक्ती आहे जी सर्व शक्तीमध्ये बलवान आहे आणि ती शक्ती म्हणजे त्याच्या मनाची शक्ती. तू कधीही आपल्या मनाला कमजोर करू नकोस. या लढाई मध्ये एक वेळ असा येईल जेव्हा तुला वाटेल कि तू सर्व काही गमावलं आहेस पण तिचं खरी वेळ असेल तुझ्या मनाच्या शक्तीच्या परीक्षेची म्हणजेच तुझ्या संकल्प शक्तीची. देव तुझी सदैव रक्षा करेल ".

काहीवेळात रोहन घरी परततो एवढ्यात रेवतीचा त्याला Hiiii हा whatss app msg दिसतो पण त्याचा मूड इतका off असतो कि तो ते msg ला रिप्लाय न करताच झोपून जातो. साधारणतः रात्रीचे 3 वाजले असणार अचानक रोहनच्या कानावर ठप... ठप.... असा आवाज पडतो. रोहन उठून मोबाईल मध्ये पाहतो तर रात्रीचे 3 वाजले असतात. ठप.... ठप.. या आवाजाची तीव्रता वाढतच असते. हा आवाज वर असलेल्या हॉल मधून येत असल्याचे त्याला जाणवते. मोबाईल चा टॉर्च on करून तो वर हॉलकडे जायला निघतो. पायऱ्यावर काही दिसते का याचा कानोसा घेण्याचा तो प्रयत्न करतो तेव्हा त्याला दिसते कि पायऱ्यावर कोणाचेतरी रक्ताळलेले पाय वर हॉलच्या दिशेने गेले आहे. रोहनला संपूर्ण शरीलाला थंडी वाजू लागते आता वर काय दिसेल या विचाराने तो अतिशय घाबरून जातो आणि घाबरत घाबरतच वर जाऊ लागतो. तो जसजसा वर जाऊ लागतो तसतसा त्याला अतिशय दुर्गंध येऊ लागतो जणू काही एखाद जनावर मरून पडलंय. तो हॉल मध्ये पोहचतो त्याच्या लक्षात येते कि हॉलमध्ये सर्वीकडे काळोख पसरला आहे. तो आपल्या मोबाईल च्या टॉर्चच्या प्रकाशात खाली काही पाहण्याचा प्रयत्न करतो आणि हॉलच्या पांढऱ्या फरशांवर लालबुंद रक्त आणि मास पसरलेले असते. तेव्हा त्याच्या लक्षात येते कि त्याच्या घरी असलेला त्याचा प्रिय ससा " टूहू " याला कोणीतरी मारलंय. समोर त्याला जे दिसलं त्यामुळे कुणीतरी आपल्या हृदयात तप्त झालेला सुळा घुसवलाय एवढ्या वेदना त्याला झाल्या कारण समोर रेवती एका हातात मेलेल्या सशाला धरून गोल गोल फिरवत होती आणि त्या पांढऱ्या फरश्यावर ठप... ठप.... करत आदळत होती. एक हिंस्त्र श्वापद आपल्या सावजावर तुटून पडावं तस ते भासत होत. सश्याला फरशीवर ठप.... ठप.... करत आदळल्यावर त्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडून त्या रेवती च्या केसावर आणि कपड्यावर उडत होत्या. त्या सश्याचे फरशीवर पडलेले डोळे ही रोहनला स्पष्ट दिसत होते. एकदाच रेवती ने त्या सश्याला आपल्या दोन्ही हातात पकडलं आणि तोंड लावून खाण्यास सुरवात केली. रोहनला हे सर्व पाहून मळमळायला लागलं होत. मोबाईल चा टॉर्च रेवती वर मारल्या गेला. तिचे संपूर्ण तोंड रक्ताने भरले होते आणि चेहऱ्यावर काही भागाला सश्याचे पांढरे केस लागले होते. रेवती आणि रोहनच्या नजरा एकमेकाला भिडल्या. रोहनच्या काळजाचा ठोका चुकला तिची क्रूर नजर त्याला गिळंकृत करेल कि काय असेल त्याला भासत होते. रेवतीने रोहनकडे अतिशय क्रूरपने पहिले आणि भेसूर आवाजात हसण्यास सुरवात केली. क्षणातच तिची शुद्ध हरपली आणि ती बेशुद्ध झाली.

पुढची कथा 3 भागात
- निखिल देवरे

आपण जर ही कथा वाचत असाल तर उत्तम पण भाग 2 कसा वाटला याचा अभिप्राय दिल्यास दुधात साखर. 🙏🙏 कृपया आपल्याला हा भाग कसा वाटला हे अभिप्रायाने कळवा 🙏🙏

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED