One more secret ... - Part 4 books and stories free download online pdf in Marathi

एक रहस्य आणखी... - भाग 4

एक रहस्य आणखी.... भाग 4

रोहन रुद्रदमणचा पत्ता घेऊन आपल्या मिणमिणत्या नेत्रात शेवटची आशा म्हणून रुद्रदमणच्या घरी पोहचतो .रुद्रमणचे घर अगदी जुनाट वाड्यासारखे होते. घराच्या प्रवेशद्वारावर तुळशीचे वृंदावन त्याची शोभा वाढवत होते . घरात गुलाब आणी मोगरा पुष्पे सुंगधाचा गारवा देत होते. बाजूलाच गोमाता रवंथ करीत बसली होती. एका छोटूस्या आणी टुमुकदार ओट्यावर रोहन रुद्रमणची वाट पाहत उभा होता. एवढ्यात

ओम शिवोहंम ...ओम शिवोहंम
रुद्रनामम ...भजेहम ..
काल त्रिकाल, नेथ्र त्रीनेथ्र,
सुल त्रिशूल गाथ्रम
सत्य प्रवावं, दीव्य प्रकाश
मंत्र स्वरूप मात्रम
निश प्रपाधी, निष्ठ लँकोहम
निज पूर्ण बोध हम हम
हे मंत्र रोहनच्या कानावर पडतात. एक सकारात्मक ऊर्जा त्याच्या भोंवती रिंगण घालत आहे हे त्याला बाहेरच्या वातावरणातून उमगले होते.

थोड्याच वेळात एक दीव्य तेजोमय युवक जो साधारण 28-29 वर्षाचा होता.... त्याच्या चेहऱ्यावर एक सोनेरी कांती होती.... गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या... केस अतिशय लांब असले तरी त्याच्या व्यक्तिमत्वाला ते अतिशय सुशोभित करीत होते... संपूर्ण शरीरावर वर दीव्य तेज होते ज्यामुळे आजुबाजुचा परिसर प्रकाशमान झाला होता.... काया अतिशय बलदंड होती. कित्येक action हिरो त्या समोर फिके पडेल असे रोहनला भासत होते. बोटात त्रिशुलच्या आकाराची भली मोठी अंगठी होती.
रोहन आणि रुद्रदमणच्या नजरा एकमेकांच्या नजरेला भिडल्या होत्या. त्याच्या त्या दीव्य नजरेसमोर रोहनची नजर खूप केविलवाणी भासत होती.
" काय हवंय तुला " एका भरगच्च आवाजाने रोहन आपल्या विचारक्षेत्रातून बाहेर आला. काही काळ मंत्रमुग्ध झालेल्या रोहनला काय बोलाव हे कळतंच नव्हतं.
"मला तुमची मदत हवीय " अतिशय केविलवाण्या स्वरात रोहन म्हणाला.
" काय मदत करू शकतो मी? "
रोहनने घडलेल्या सर्व घटना अतिशय विस्तृतपणे रुद्रदमणला सांगितल्या . जश्याजश्या गोष्टी सामोरी येत होत्या तसेतसे रुद्रदमणच्या चेहऱ्यावरचे भावही बदलत होते.
" असंभव फक्त एक दगड हलवला म्हणून कुठलीही काळी शक्ती तुम्हाला एवढा त्रास देत नाही"
रुद्रदमण म्हणाला.
" पण हे सर्व तेव्हापासूनच घडतयं " रोहन म्हणाला.
" जर खरचं असं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव या खेळात तुझा प्राणही पणाला लागला आहे ".
" चालेल जर प्रेमासाठी माझा प्राणही गेला तरीही चालेल पण जी चूक मी केली आहे त्याची शिक्षा मलाच मिळायला हवी ".
" सर्वप्रथम मला रेवती आणि सर्वजणांना भेटायचं आहे " खड्या आवाजात रुद्रदमण म्हणाला.
" उद्या माझे आई बाबा बाहेर जाणार आहे तर उद्या आपण सर्वजण माझ्या घरी भेटले तर चालेल का?"
रुद्रदमण आपली सहमती दर्शवितो. रोहनच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पाहत होता. शांत पाण्यात कुणीतरी भलामोठा दगड मारल्यावर जसे असंख्य वलयं उमटतात तसेच शांत रुद्रदमणच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे वलय उमटले होते.

दुसऱ्या दिवशी सर्वजण रोहनच्या घरी जमतात. रुद्रदमणच्या आगमनामुळे त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळेच तेज दिसत होते. रुद्रदमन काय सांगणार यासाठी त्यांचे कान आसुसले होते. विभोर करणारी उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर होती. सर्वांसाठी ऑरेंज जूस रोहन घेऊन आला. रूम फ्रेशनरचा घमघमाट त्या रूम मध्ये दरवळत होता. सर्वजण ऑरेंज जूस पिण्यात दंग होते. रुद्रदमन फक्त नि फक्त रेवतीकडे पाहत होता. रेवतीही त्याची नजर चुकवीत होती. रुद्रदमणच्या नेत्रातील तेज लुकलुकत होते आणि एका पहाडी आवाजात तो रेवतीला म्हणाला
" तु का आली आहेस इथे? "
" मी... मी.. तुम्हीच तर सांगितल होत सर्वांना भेटायला " रेवती अडखळत म्हणाली.
" मी तुला विचारतोय का आली आहेस इथे? "
एका घोगऱ्या आणि जाड भरड्या आवाजात रेवती म्हणाली " तु माझ्या मधात नको येउस नाहीतर फुकाट मरशील . मला जे करायचं ते मी करणारच नाहीतर रेवतीचा पण मुडदा पाडणार ".
रेवती जवळपास 5-6 फूट उंच हवेत उडते. हातात असलेला ग्लास ती रोहनकडे भिरकावते आणि एका असुरी हास्यास सुरवात करते. रोहन थोडक्यात तो ग्लास चुकवितो. रेवती काही तांडव करण्याआधी रुद्रदमन त्याची त्रिशूल ची अंगठी तिला दाखवितो आणि काही मंत्रास सुरवात करतो. रेवती अचानक हवेतून खाली पडते जणू त्या काळ्या शक्तीने तिचे शरीर सोडून बाहेर प्रस्थान केले होते. रेवती अतिशय धाडकन जमिनीवर पडली होती " काय झालंय मला? काहीतरी विचित्र वागत आहे मी? सांगा नक्की काय झालंय मला? तिची अवस्था कोमेजलेल्या पुष्पासारखी झाली होती. तिच्या चेहऱ्यावरची कांती तर केव्हाच मावळली होती. अतिशय दयनीय अवस्थेत आपल्या जीवनाशी ती झुंज देत होती. रेवतीला सर्वजण झोपू देतात. अचानक रुद्रदामनची नजर समोर असलेल्या भिंतीवर पडते तिथे रक्तानी लिहले असते " तु त्याला जास्त दिवस नाही वाचू शकणार ". रूद्रदमनच्या चेहऱ्यावर काळजीचे आणि भीतीचे ढग निर्माण होतात. त्याच्या मानेवरून घामाचे थेंब हळूच टपकू लागतात. डोळेही कसल्यातरी विचाराने विचलित होतात.

" रोहन या सगळ्यांची जिथून सुरवात झाली तेथे मला घेऊन चल " एका भारदस्त आवाजात रुद्रदमन म्हणाला. रोहन रुद्रदमनला आपल्या कारमधून रेवणगढ रिझर्व्ह फ़ॉरेस्ट ला घेऊन जाऊ लागतो. रुद्रदमन अतिशय बेचैन झाला होता. त्याच्या मनाची विचलता दृष्टीस पडत होती. शेवटी एकदा गाडी रेवणगढ रिझर्व फ़ॉरेस्ट जवळ थांबते. रोहन रूद्रदमनला त्या दगडाच्या जागेवर घेऊन जातो. रुद्रदमन हातात एक विशिष्ट मंतरलेले तांदूळ घेऊन त्या दगडाजवळ काही विशिष्ट मंत्र म्हणून ध्यान करण्यास सुरवात करतो. अचानक तिथल्या वातावरणात बदल व्हायला सुरवात होते... एक प्रचंड वादळ तिथे निर्माण होते... आकाशात वीज कडकडायला सुरवात होते... रोहनला काय सुरु आहे हे कळतंच नव्हते.. त्यांच मन आता चिंतातुर झालं होत. काही वेळातच रुद्रदमनने आपले डोळे उघडले त्याच्या नेत्रातील शिरा रक्ताळल्या होत्या. एक विशिष्ट मुद्रा करून त्याने रोहनला आपल्या जवळ बोलावले. रुद्रदमन काय सांगणार म्हणून रोहनने आपले कान टवकारले होते.
" रोहन नक्कीच इथे कुठल्यातरी वाईट शक्तीचे अस्तित्व आहे पण एक गोष्ट कान देऊन ऐक त्या वाईट शक्तीचा तुझ्यावर काही प्रभाव नाही.. तुझ्या आयुष्यात एक रहस्य आणखी आहे.. !
" म्हणजे? " रोहन कुतूहलाने विचारू लागला.
" म्हणजे तु तुझ्या जीवनात काहीतरी असं केलंय ज्यामुळे या काळ्या शक्तीला आवाहन झालंय. जरुरी नाही तूच केल असेल काही गोष्टी आपल्या आई वडिलांकडून किंवा पूर्वजांकडून आलेल्या असतात, काही गोष्टी मागच्या जन्मातूनही आलेल्या असतात. तुझ्या भूतकाळात तुला पुन्हा एकदा डोकवावं लागेल आणि लगेच या प्रश्नांची उत्तर शोधावी लागेल ".
रोहनच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.
" घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे "
" सध्या तरी मला काय कराव लागेल " हात जोडून रोहन केविलवाण्या स्वरात बोलू लागतो.
" पुनर्जन्माबद्दल तर तु काही करू शकत नाही. फक्त तूझ्या आई वडिलांचा इतिहास कुठल्या दृष्ट काळ्या शक्तीशी निगडित आहे का याची खातरजमा कर "
" खूपच अवघड काम आहे हे " रोहन विचलित होऊन म्हणाला.
" देव तुझी सदैव रक्षा करो ".

रोहन दोन दिवस दिवस - रात्र एक करून आपल्या आई वडिलांचा इतिहास शोधू लागतो. त्याच्या पूर्वजांच्या प्रत्येक गावी जाऊन येतो पण त्याला तशी काहीच माहिती मिळत नाही. रोहनच्या हृदयाची स्पंदने प्रचंड वेगाने धडधडत होती. काही प्रश्नार्थक चिन्हेही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. सततच्या ताण तणावाने त्याचा चेहराही ओसरला होता. रोहन सगळ्यांना कॉल करतो आणि त्याच्या घरी भेटायला बोलावतो.

रुद्रदमन, आरती, अमित हे सर्वजण दुसऱ्या दिवशी रोहनच्या घरी जमा होतात. रोहनच्या घरी त्यादिवशीही कुणी नव्हते. आईवडील कुठल्यातरी कामानिमित्त बाहेर गेले होते. सर्वजण हतबल होऊन बसले होते. काळजी आणि नैराश्याचे धुके सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते. कमालीची शांतता त्या घरात होती त्या शांततेला भेदून रुद्रदमणचा आवाज सर्वांच्या कानी पडला.
" मी जे कार्य तुला दिले होते ते तु पूर्ण केलेस का? "
" मी खूप प्रयत्न केला रुद्रदमनजी. माझ्या आई बाबांना खडान खडा विचारला.. माझ्या प्रत्येक पूर्वजांच्या गावी जाऊन आलो पण तसा कुठला इतिहास आहे अशी माहिती नाही मिळाली "
"म्हणजे माझी शंका खरी ठरली "
"काय? " रोहन विचारू लागला
" या शक्तीचा उगम तुझ्या मागच्या जन्मातला आहे "
" मग यावर काही उपाय आहे का? "
"हो आहे ना शक्ती परिवर्तन - Energy transformation "
" म्हणजे? " सर्वजण एकदम विचारतात.
" मानवी शरीर हे संपूर्ण पंचमहाभूत तत्वांनी बनलेलं आहे. मानवाला या सृष्टीनेही काही शक्ती प्रदान केल्या आहेत ज्यात मुख्यतः संकल्प शक्ती, प्राण शक्ती, वरुण शक्ती आणि विश्वशक्ती ह्या कुठल्या नि कुठल्या पंचमहाभूत तत्वाच प्रतिनिधित्व करत असतात. यापैकी विश्वशक्ती ज्याला तुम्ही cosmic energy म्हणता हे तुमच्या स्मृती (आठवणी ) च प्रतीक आहे.
" म्हणजे आम्हाला नाही समजलं " आरती म्हणाली.
" तुमच्याच भाषेत सांगतो. तुम्ही जो कालचा दिवस जगलाय तो तुमच्या साठी कालच संपलाय पण या अनंत कोटी ब्रह्माण्डात तो दिवस कुठे ना कुठे जतन राहतो. संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास ज्याला तुम्ही टाइम् ट्रॅव्हल म्हणता म्हणजेच चालू काळातून भूतकाळात जाणे ती संकल्पना हीच आहे. आपला भूतकाळ, आपल्या आठवणी, आपला मागचा जन्म या सर्व गोष्टी या अनंत कोटी ब्रह्माण्डात कुठे ना कुठे उपलब्ध असतात आणि त्यांच प्रतीक म्हणजेच विश्वशक्ती.. "
" अच्छा असं आहे ते " आरती म्हणाली
" माणूस जेव्हा झोपेत असतो तेव्हा त्याला त्याच्या शरीरानुसार आणि त्याच्या अध्यात्मिक आभामंडला नुसार थोड्याफार प्रमाणात विश्वशक्ती मिळत असते. मोठमोठाले योगी ध्यान करून सामान्य माणसाच्या कित्येक पट जास्त विश्वशक्तीवर आपले अधिपत्य गाजवतात " रुद्रदमन म्हणाला.
" मग आपल्याला ही cosmic energy आय मिन विश्वशक्ती कशी काय मदत करू शकते? " रोहन विचारतो.
" जर माझ्या शरीरातील विश्वशक्तीने तुझ्या शरीरात प्रवेश केला तर तुझ्या भूतकाळाच्या गाभ्यात या संकटाची चाहूल कुठून झाली या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकतो ".
" चालेल मला हे मान्य आहे " रोहन म्हणतो
" पण लक्षात ठेव शक्तिपरिवर्तन हे या सृष्टीच्या विरुद्ध आहे. जेव्हा माझ्या शरीरातील विश्वशक्ती तुझ्या शरीरात प्रवेश करेल तेव्हा तुला शरीरातील प्रत्येक हाड मोडल्यावर जेवढ्या प्रचंड वेदना होतात तेवढ्याच वेदना तुला होईल. आता बोल मान्य आहे का? "
" मान्य आहे, या दृष्ट शक्तीशी लढायला हेही सहन करेल मी " रोहन म्हणतो.
" ठीक आहे तर मग आपल्याकडे वेळ खूप कमी आहे हे काम आपल्याला आजच कराव लागेल. इथे आपल्याला ऐकांत मिळणार नाही म्हणून आपण ही प्रक्रिया माझ्या घरी करू " रुद्रदमन म्हणतो. सर्वजण होकारार्थी माना डोलावतात.

आता सर्वजण रुद्रदमनच्या घरी जातात. रुद्रदमन सर्वांना आपल्या ध्यानकक्षेत घेऊन जातो. तिथे असंख्य पणत्या लावलेल्या असतात... झेंडू आणि गुलाबाच्या फुलांचा सुंगंध दरवळत असतो... समोर पवित्र मंतरलेले जल होते... आणि भव्य महादेवाची मूर्ती. रुद्रदमन आपले स्थान ग्रहण करतो आणि रोहनला त्याच्या समोर बसायला सांगतो.

रुद्रदमन ध्यान करण्यास सुरवात करतो. आपले डोळे मिटून तो मंत्र मनात जपत होता. काही वेळातच आकाशातून एक प्रचंड पांढरी शक्ती रुद्रदमणच्या शरीरात प्रवेश करते आणि तिचं शक्ती रोहनच्या शरीरात प्रवेश करायला सुरवात करते. रोहन प्रचंड वेदनेने तडफडायला लागतो त्याचा ओरडण्याचा आवाज सर्वत्र ध्यानकक्षेत घुमत होता. आरती आणि अमनचा देहही थरथरायाला लागतो. दहा मिनिटाच्या त्या प्रक्रियेत रोहन आपला प्राण गमावेल असेच त्याला वाटत होते. शेवटी रुद्रदमणने मंत्राचा जाप बंद केला. आकाशातून येणाऱ्या पांढऱ्या शक्तीचा प्रवेशही बंद झाला होता. रोहनचा देह निपचित खाली पडला होता. त्याची शुद्ध हरपली होती. काही वेळातच तो शुद्धीवर आला. रुद्रदमणने त्याला थंडगार सरबत प्यायला दिले. तो अतिशय दमला होता
" काय.. नक्की? " एवढेच त्याने विचारले
" माफ कर रोहन पण मी तुझी यापुढे मदत नाही करू शकणार " रुद्रदमन म्हणाला.

क्रमश:

- निखिल देवरे

आपण जर ही कथा वाचत असाल तर उत्तमच पण या कथेचा भाग 4 कसा वाटला याचा अभिप्राय दिल्यास दुधात साखर.
🙏 कृपया आपल्याला हा भाग कसा वाटला हे रेटिंग, अभिप्रायाने कळवा. 🙏






इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED