शेवटचा क्षण - भाग 15 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेवटचा क्षण - भाग 15



"गार्गी.. ऐ गार्गी.. " गौरव तिला उठवत होता.. तिला हात लावताच त्याला तीच अंग अगदी लोखंडाच्या तव्यासारखं गरम जाणवलं... लावला तसाच हात त्याने मागे ओढला..
"हिला तर ताप भरलाय.. काल रात्री झोपायला आली तेव्हा तर ठीक होती.. आणि आता इतकं तापलेलं अंग.. अचानक.. " तो विचर करत होता त्याला काही कळतच नव्हतं अस एकदम कसा ताप भरला ते.. " आता हिला उठवायलाच हवं " तापामुळे गाढ झोपली होती ती.. त्याने 2 - 3 दा तिच्या चेहऱ्यावर थंडं पाणी शिंपडले.. आणि तिला जाग आली..
ती उठली हे बघून त्याच जीव भांड्यात पडला.. ती उठताच घाईघाईने तो बोलू लागला..

" गार्गी , अग काल तुला बरं वाटत नव्हतं का?? किती तापलंय तुझं अंग.. चल पटकन फ्रेश हो आपण डॉक्टरकडे जाऊयात.. "

तो बोलत होता पण गार्गी डोकं घट्ट पकडून बसली होती.. तीच डोकं खूप दुखत होतं.. ती काहीच बोलत नाहीय बघून तो पुन्हा तिच्याजवळ येत विचारू लागला.. "काय झालं ?? डोकं दुखतंय का ?? मी चेपून देऊ?? "

गार्गी - " हो डोकं तर खूप दुखतंय अस वाटतंय फाटेल हे आता.. कदाचित तापामुळे असेल.. तुम्ही एक भांड्यात थंड पाणी आणि मीठ आणता का?? सद्धे माझी उठून उभा राहायची पण स्थिती नाहीय.."

गौरव - " हो आलोच मी , तुला त्रास होतोय ना.. तू .. तू.. पड थोडावेळ.. उठून नको बसू.. मी आलोच"

गार्गी पडली , आणि पुन्हा तिला झोप लागली.. गौरव आला आणि तिला तस बघून तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागला.. पट्टि ही ठेवताच लगेच तापत होती.. 20 मिनिटे तो तसाच तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता .. त्यांनतर तिचा ताप हळूहळू थोडा कमी झाला.. आता तिलाही थोडं बरं वाटायला लागलं.. ती उठून बसली.. गौरवाने लगेच काळजीनेच विचारलं..

गौरव - " आता कस वाटतंय??"

गार्गी - " आत जरा ठीक वाटतंय पण डोकं थोडं दुखतंच आहे.. थांबेल थोडावेळानी.. तुला ऑफिसला नाही जायचं का?? "

गौरव - " वेडी आहेस का ग?? तुला इथे एवढा ताप भरलाय आणि मी ऑफिसला जाऊ का?? मी सुटी टाकतो आजची.. आणि आज दिवसभर तू आराम करायचाय, कळलं?? कुठलीच कारण नकोत मला.. पण त्याआधी डॉक्टर कडे जाऊन यायचं का?? अचानक एवढा ताप कस काय भरला?? "

गार्गी - " नको नको , त्याची गरज नाहीय.. मी ठीक आहे.. असाच भरला असेल होईल ठीक.. डॉक्टर नको प्लीज"

गौरव - " गार्गी ही डॉक्टरांना घाबरण्याची वेळ नाहीय.. निष्काळजी पण नको करायला.."

खर तर कालच्या अति रडल्या मुळे आणि सारख्या विचारांमुळे तीला ताप भरला असावा असं गार्गीला वाटलं.. आणि दुसरं म्हणजे डॉक्टरांकडे जायला ती खूप घाबरायची.. आणि हे गौरवला माहिती होतं..

गार्गी - " नको गौरव प्लीज मी होईल एक दिवसात ठीक .. माझा काढा घेतला की.. डॉक्टर नको ना "

गौरव - " ठीक आहे संध्याकाळ पर्यंत वाट बघुयात, जर ताप कमी झाला तर ठीक नाहीतर मी तुझं काहीही ऐकणार नाही.. "

गार्गी - " हम्म .. ठीक आहे.."

गौरव - " बरं मी थोडी हलकी हलकी खिचडी लावतो तू ती खाऊन काढा घेऊन आराम कर.. "

गार्गी - " गौरव अरे मी लावते ना.. तू राहू दे"

गौरव - " गार्गी फक्त एक दिवस तरी माझ्या हातच कसंबसं खाऊन घे.. एवढ काही वाईट नाही करत मी स्वयंपाक, किमान खिचडी तरी.. "

यावर दोघेही हसले.. गौरव आवरायला निघून गेला.. आणि गार्गी पुन्हा तिच्या विचारांच्या कोषात गेली..

प्रतीक तू काल सांगितलंस, त्याचा काही अर्थ नाहीय खरं आहे पण मला या निरर्थक गोष्टीचा किती त्रास होतोय तुला कस सांगू.. बघ ना रे माझा गौरव माझी किती काळजी घेतो किती नशीबवान आहे मी.. तू म्हंटल ते खरच आहे गौरव खरच माझ्यासाठी अगदी योग्य आहे.. पण मी?? मी त्याच्यासाठी तेवढीच योग्य आहे का?? माझ्या मनात प्रतिकविषयी भावना ठेवून मी त्याची नकळत फसवणूक तर करत नाहीय ना.. नाही नाही मी त्याला सगळं सांगून देईल, उगाच त्याच्यापासून लपवून हा खोटेपणा मी नाही करणार.. पण तो समजून घेईल का?? त्याने काही गैरसमज करून घेतले तर?? खर तर मी आधीच त्याला सांगायला हवं होतं हे.. पण मला वाटलं मी विसरुन जाईल सगळं.. पण काल नंतर अस वाटतंय की मी कधीच नाही विसरू शकणार.. काय करू सांगू का नको?? नको नको, तू मनातच ठेव तसही जर हे सगळं निरर्थक आहे तर त्याला इतकं महत्व का देतेय.. तस नाही माझं प्रेम माझ्या भावना निरर्थक नाहीत.. पण परिस्थिती त्याला निरर्थक बनवतेय..

ती मागे उशीला टेकून विचार करत होती, आणि तिच्याही नकळत तिचे अश्रू डोळ्यातून गालावर वाहत होते.. गौरव काही कामानिमित्त तिथे आला गार्गीच लक्षच नव्हतं ती तिच्याच विचारांत होती पण गौरव ला तिचे अश्रू दिसले आणि त्याने एकदम तिच्या जवळ बसत..

गौरव - " काय झालं गार्गी??"

त्याच्या आवाजाने गार्गी ताडकन उठून बसली.. आणि त्याच्याकडे बघत होती.. तोच पुढे बोलू लागला..

गौरव - "तू रडतेय?? काही दुखतंय का? डोकं दुखतय का?? आपण जाऊया ना डॉक्टरकडे .. ते औषधी देतील तुला बरं वाटेल.. अस रडु नको ग मला नाही बघवत तुझ्या डोळ्यातले आसू.. " तो तिचे डोळे पुसत बोलला..

त्याच अस काळजी करणं बघून तिला पुन्हा भरून आलं... आणि रडत रडतच ती त्याला बिलगली.. त्याला काहीच कळत नव्हतं अगदी गोंधळलेल्या अवस्थेतही त्यानी तिला त्याच्या कुशीत मोकळं होऊ दिलं.. तिच्या पाठीवरून आणि डोक्यावरून हात फिरवत तो तिला फक्त शांत करायचा प्रयत्न करत होता.. थोड्यावेळाने शांत होऊन ती बाजूला झाली.. पण काहीच न बोलता शांत राहिली..

गौरव - " काय झालंय ग राणी?? तू एवढी अस्वस्थ का आहे?? तुला घराची आठवण येतेय का?? तस असेल तर 4 - 5 दिवस राहून ये आईकडे... "

गार्गी - " नाही तसं नाहीय.. घरची आठवण नाही येत आहे.. "

गौरव - " मग काय झालं?? "

ती अजूनही शांतच होती, सांगू का नको या संभ्रमात अडकली होती..

गौरव - " गार्गी , कुठंली गोष्ट त्रास देतेय तुला?? काल रात्रीपर्यंत तर सगळं ठीक होत ना, मग रात्री एकाएकी अस काय झालं?? सांगशील का मला??"

ती फक्त नजर उचलून एकटक त्याच्याकडे बघत होती.. त्याला तिच्या मनाची चलबिचल कळली असावी..

गौरव - " गार्गी, मी तुझा नवरा आहेच पण त्याआधी तुझा एक मित्र आहे.. त्या नात्याने तरी तू मला निसंकोचपणे सांग काय झालं?? मला मित्र मानतेस ना??"

गार्गी - " मला तुला काही सांगायचं आहे गौरव.. पण तू मला चुकीचं तर समजणार नाही ना याची भीती वाटतेय, माझी व्यथा समजल्यावर तू बदलणार तर नाहीस ना?? मला समजून तर घेशील ना?? म्हणून तुला सांगाव का नको असं माझ्या मनात द्वंद्व सुरू होत. ."

गौरव - " गार्गी, मी बोललो ना निसंकोच होऊन सांग, तू अस मनात ठेवून दुःखी होत राहशील ते मला नाही बघवणार.. आणि राहिला मी समजून घेण्याचा किंवा बदलण्याचा प्रश्न तर मी वचन देतो की तू काहीही सांगितलं तरी माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही.. कारण ते कुठल्याच गोष्टींचं बांधील नाही.. कदाचित कुठली धक्कादायक गोष्ट अ्सेल तर पचवायला थोडासा वेळ लागेल पण मी वचन देतो मी नक्कीच तुला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.."

गौरवच्या बोलण्यामुळे गार्गीचा गोंधळ थांबला आणि तिने गौरवला सगळं सांगायचं ठरवलं.. गार्गीच्या बोलण्यावरून गौरवला पुसटशी कल्पना आली होती की काय मुद्दा असू शकतो.. त्याच्या हृदयाचे ठोके कमालीचे वाढले होते पण चेहऱ्यावर मनाचा काहीच ठाव न लागू देता कानात प्राण आणून तो शांत बसून गार्गीच्या बोलण्याची वाट बघत होता.. मनोमन माझा अंदाज खोटा ठरू दे देवा अशी प्रार्थना करत होता.. आणि गार्गी सांगायला कुठून सुरुवात करावी या विचारांत अडकली होती.. गार्गीची गोंधळलेली अवस्था बघून गौरवच तिच्याकडे बघून बोलला..

गौरव - " काय झालं गार्गी??तू.. तुला.. म्हणजे.. तुला कुणी आवडतं का?? " तो जर अडखळतच बोलला..

गार्गीने चमकून त्याच्या कडे बघितलं.. आणि लगेच खाली मान घालून मानेनेच होकार दिला.. ते बघून गौरव ने त्याचे डोळे मिटून घेतले आणि एक सुस्कारा सोडत डोळे उघडले.. पुढे ती खालमाणेनेच बोलू लागली..

" मी नववीत होते , तेव्हा माझं मन माझ्याही नकळत त्याचा विचार करू लागलं.. मी त्याच्या कडे खेचले जातेय अस मला जाणवायला लागलं.. ह्या भावना अगदी नवीन होत्या त्यावेळी माझ्यासाठी.. मला काही कळत नव्हतं मला काय होतय, तो नवीन नव्हता माझ्यासाठी पण जे आता वाटायला लागलं होतं ते या आधी कधीच वाटलं नव्हतं..

बोलता बोलत ती तिच्या आणि त्याच्या आठवणींमध्ये हरवली...



--------------------------- --------------------

क्रमशः