तू_ही_रे_माझा_मितवा... - 9 Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तू_ही_रे_माझा_मितवा... - 9

#तू_ही_रे_माझा_मितवा...💖💖💖💖

#भाग_९

“हेलो,तनु sorry त्रास देतोय थोडा, ऋतू उठलीय का? फोन घेत नाहीये आणि मेसेजला रिप्लाय पण नाहीये..”

खरंतर वेद कालच्या घाईगडबडीच्या प्रवासाने आणि जागरणाने पार थकून गेला होता पण विकेंडमुळे सगळं निवांत होतं,तो जरा उशिराच उठला होता,त्यात ऋतू फोन उचलत नाहीये म्हणून त्याने तनुला फोन केला.

“अरे,हो ते काय झालं सकाळीच तिच्या घरून फोन आलेला,लागलीच निघून ये म्हणून,मग ती गेली इंदापूरला,एव्हाना पोहोचली असेल.काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढच म्हणाली.”

“प्रॉब्लेम? काय..? तुला तर माहिती असेलच ना?” मनात काहीबाही शंका यायला लागल्याने तो जरा गोंधळला.

“अरे म्हणजे खात्रीने नाही सांगू शकत काय ते,खरतरं ती घरच्यांबद्दल जास्त बोलत नाही. घरचे प्रॉब्लेम शेयर करायला नाही आवडत तिला.ती आल्यावर तिलाच विचार. बघ कदाचित तुझ्यासोबत मनमोकळं बोलेल ह्या विषयावर.”

“ओके..पण कधी येणार काही बोलून गेली का?” त्याची घालमेल आवाजात स्पष्ट जाणवत होती.

“नाही...पण काळजी करू नको...फ्री झाली की अगोदर तुलाच फोन करेल ती..” त्याला चिडवायला ती म्हणाली.

“होप सो,जास्त काही सिरीयस नसावं...ओके चल,तुला काही मेसेज किंवा कॉल आला तर सांग मला,आणि हो एक महत्वाचं सांगायचं राहिलं..ऐक”

तिच्याशी महत्वाचं काही बोलून त्याने फोन ठेवला पण मनात असंख्य विचार डोकावत होते.तेवढ्यात फोन वाजला म्हणून त्याने उत्सुकतेने बघितला,जयचा फोन होता.

“ये साल्या साक्षात...तुझा नको तेव्हा फोन येतो राव..” वैतागत तो म्हणाला.

“काय भावा,भवानी बरोबर...म्हणजे सॉरी वाहिनी, अजूनही वहिनी बरोबर आहेस का?”जय तुसडेपणाने म्हणाला.

“ये साल्या गप्प ना! बोल काय झालं”

“भावा तुझ्याच कामाची गोष्ट होती म्हणून फोन केलेला,तू अजूनही त्या लेडीज रूम मध्ये असशील तर नंतर बोलू हरकत नाही.” जय अत्यंत कुजकटपणे म्हणाला.

“ये साल्या,किती बकवास करतो रे,अक्कल आहे का थोडी.” वेद वैतागत म्हणाला.

“गम्मत करतोय भावड्या,तू पण ना! बरं ऐक तू काल बोलला होतास ना गोव्याचा प्लान,त्याचे डिटेल्स द्यायचे होते.सगळं टकाटक अरेंज झालंय..आपला जिगरी मित्र आहे तिथे साक्षात! शनिवार रात्रीची बर्थडेसाठी जसं तू सांगितलंय अगदी सेम अरेन्ज्मेंट तो करून देणार आहे...आहेस कुठे,साक्षात जयराज नाईकचा मित्र प्रपोज प्लान करतोय एवढं सांगितलं त्याला”

“भारी...मस्त...धन्यवाद मनात नसतांना सुद्धा एवढं केल्याबद्दल..” वेद खोचकपणे म्हणाला.

“बास का महोदय,आहे त्याला सामोरं जायचं इतकंच, ते म्हणतात ना..दिल आया गधीपे तो परी क्या चीज है.....!”

“च्यायला साक्षात तू सुधारणार नाहीस हा! एक गोष्ट डोक्यात फिट बसवं काय, तुला आता तिच्यावरचा राग सोडून,तिच्याशी मनापासून मैत्री करायची आहे.शिक जरा रेवाकडून. तिला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होता,पण मला ऋतू आवडते म्हणून किती सेन्सिबली तिने तिचा राग बाजूला ठेवला आणि तू? अजूनही तिला काहीही बोलतो.” वेद जरा तिरमिरीत म्हणाला.

“ये भावा,तुझं प्रेम मान्य केलंय म्हणून तर एवढी खास अरेन्ज्मेंट केली ना,ते तुला उगाच चिडवायला म्हणत असतो रे मी. बरं! ते सोड, तुझा आराम झाला असेल तर संध्याकाळी भेटायचं का? रेवाला विचारलंय मी,ती रेडी आहे.”

“अवघड आहे रे आज..”

“का? दोन तास आमच्यासोबत घालवले तर काही प्रॉब्लेम होईल का कुणाला?” कडवटपणे तो म्हणाला.

“साल्या असं काही नाही,बरं चल भेटू,कुठे भेटायचं ते मेसेज कर.ओके?

“ok बॉस”

फोन झाल्यावर त्याने मेसेजेस बघितले,ऋतूचा काहीच रिप्लाय नव्हता.त्याची घालमेल वाढली,पण तिच्या फोनची,मेसेजची वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून त्याने फोन बाजूला ठेवला आणि आवरायला घेतलं.

*****************************
वेदला फोन करण्याअगोदर,

“Hello रेवा,जय बोलतोय”

“जय,इतक्या सकाळी? काय झालं?”

“अगं मेसेजेस नाही का वाचलेस तू माझे?”

“अरे काल रात्री खूप पाहुणे होते घरात,रात्री उशिरापर्यंत गप्पागोष्टी चाललेल्या,फोन बघितलाच नाही,बोल ना काय झालं.”

“अरे वेद घरी गेला होता काल पण मॅडम त्याच्या आठवणीत वेड्या झाल्या होत्या म्हणून एका रात्रीत drive करून पुण्यात आलेय साहेब.इतकच नाही तर सरळ तिच्या रूमवर भेटायला गेला तो रोमिओ. इतका राग येतोय ना त्या नाटकी पोरीचा,च्यायला इतकं स्वार्थी कुणी असतं का,आठवण येतेय म्हणून ‘रोना धोना & उसको बुलाना ?’ ”

“जय,हे सगळं खरं आहे?” जडावलेल्या आवाजात तिने विचारलं.

“रेवा,ये यार तू शांत हो...हे बघ,आपला वेद थोडा वेडा आहे हे माहितीय न आपल्याला,त्याला फक्त वठणीवर आणायचंय.हो ना?”

“हम्म..बोल” दीर्घ श्वास घेत ती म्हणाली पण मनातून खूप दुखावली गेली होती.

“बर ऐक, आपली जी ट्रेनी ट्रीप ठरतेय न month end ला त्यात मॅडमचा वाढदिवस येतोय,तर महाशयांना अगदी हटके स्टाईलने त्या नौटंकीला प्रपोज करायचंय म्हणून मला फोन केलेला.माझा तो मित्र आहे न गोव्याचा,ज्याने बुकिंग वैगरे केलं त्याला काही अरेन्ज्मेंट करायला सांगितलंय,भाऊ एकदम फॉर्ममध्ये आहे.”

“मग मी माझं येणं cancel करतेय जय, मी नाही येणार हा प्रपोजचा तमाशा पाहायला.जय सगळं संपलं रे, आता आपण काहीच करू शकत नाही,तो माझा कधीच होऊ शकणार नव्हता तर देवाने का त्याला माझ्या आयुष्यात आणलं रे ?” ती आता मात्र रडणं थांबवू शकली नाही.

“रेवा,ऐक ना,प्लीज रडू नको गं,मी तुला असं रडवायला फोन केलेला नाहीये.अगदी आपल्याला पॉसिबल होईल तोपर्यंत आपण त्याला तिच्यापासून वाचवायचा प्रयत्न करू शकतोच ना? तुझं खरं,अगदी मनापासून प्रेम आहे ना मग असं गिव्हअप नाही करायचं.आपलं मागेच ठरलं आहे ना by hook or crook तिला दूर करायचं? मी कायम सोबत आहे तुझ्या. प्लीज रडू नको. आता खरी गम्मत ऐक,...एक तर माझ्याकडे ट्रीपची अरेन्ज्मेंट देऊन वेदने लई भारी काम केलंय,आता तुला फक्त मी सांगतो तसं वागायचंय,एकदा का हा प्लान यशस्वी झाला का वेदपासून ती कायमची दूर....जाळ आणि धूर!”

पलीकडून फक्त रेवाच्या दबक्या रडण्याचा आवाज येत होता.जय तिला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता पण रेवा आता पार मनातून खचली होती. ओळख झाल्याच्या पहिल्या दिवसापासून वेदच्या प्रेमात होती ती.ओळख करू पाहणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही मुलीला तिने ह्या न त्या प्रकारे त्याच्या जवळपास ही भटकू दिलं नव्हतं पण वेद्च्या दृष्टीने ही फक्त मैत्री होती.त्यात कसा कुणास ठावूक वेद ऋतूच्या प्रेमात पडला आणि तिची स्वप्न उद्ध्वस्तच झाली आणि आता तर तो ऑफिशियली तिला मागणी घालणार होता म्हणजे तिच्या आयुष्यातलं हे रंगीत पान कायमचं मिटलं जाणार होतं. तिला बराच वेळ समजावल्यानंतर ती थोडी शांत झाली. मुसमुसतच त्याला म्हणाली-

“जय,वेदला माझं प्रेम कधीच समजलं नसेल का रे? त्याच्या आवडीच्या रंगाचा ड्रेस,त्याला आवडणारा परफ्युम,त्याला आवडणारी गाणी,त्याचे आवडते मूव्हीज...हे आणि खूप काही,त्याला कधी थोडीही हिंट मिळाली नसेल का माझ्या प्रेमाची..” पुन्हा तिला हुंदका अनावर झाला.

“रेवा,रेवा प्लीज ना,रडू नको, मला कळतंय तुझी परिस्थिती काय आहे आणि वेदला तुझं प्रेम भले ही कळलं नसेल पण मैत्री मात्र कळली आहे आणि हीच मैत्री त्याच्या प्रेमावर भारी पडेल बघ..थोडं फिल्मी वाटेल पण -“प्यार दोस्ती हैं|” आणि तू त्याची खरी दोस्त आहे,त्याच्या प्रेमावर साक्षात तुझाच हक्क आहे आणि हे त्याला कळेल हळूहळू, प्लीज रेवा आपल्याला फक्त एवढंच करायचंय हा त्याचा प्रपोज प्लान फ्लॉप करायचाय म्हणजे तुला त्याच्या जवळ जायला वेळ मिळेल आणि या वेळी मैत्रीण म्हणून नाही एक स्टेप पुढे आणि पुढेच,कळतंय न रेवा.” त्याच्या आवाजात कळकळ होती,तिच्यासाठी काहीही करण्याची तयारी होती.तो परोपरीने तिला विनवत होता.

“जय,असे आपले किती प्लान फ्लॉप झालेत रे,हे सगळं मला आता अशक्य वाटतंय,पण ठीक आहे बोल काय करायचंय,एक लास्ट ट्राय.” ती शांत होत म्हणाली.

“रेवा, फोनवर नाही सांगत,आज संध्याकाळी भेटू आपण.वेदला पण बोलावतो,तो येण्याच्या अर्धातास तरी लवकर ये म्हणजे सविस्तर सांगतो,माझा गोव्याचा मित्र सॅम फुल मदत करणार आहे.आता ह्या पोरीला नाही वेदच्या आयुष्यातून बाद केलं तर नाव सांगणार नाही”

“बरं,कुठे भेटायचं?”

“ते सांगतो मी,अगोदर त्या मुर्खाशी बोलतो.”

“जय खरंच वेद इतक्या रात्री तिच्यासाठी आला आणि रात्री तिच्या रूमवर गेला?इतकं प्रेम करतो तो तिच्यावर?” ती पुन्हा रडवेली झाली.

“रेवा,ऐक,माणूस वहावत जातो ग एखाद्याच्या पाठी,त्याला कळत नाही काय योग्य,अयोग्य..आणि ऋतुजासारख्या मुलींना तर सवय असते ना पोरं पटवायची,नखरे करायची आणि आपला हिरो त्यातल्या त्यात राईटर,सेंटी एकदम, तिच्या अदांवर लगेच फिदा झाला आणि तो काय एकटा फिदा नाही, तो आरुष आहे,फायनान्सचे दोन,तीन बंदे आहेत,फुल लाईन मारतात तिच्यावर ती ही सोयीस्करपणे भाव देते एकेकाला,बघ ना,काल वेद नव्हता तर आरुषसोबत होती.ती दूर गेली ना ,की बरोबर तुझं प्रेम समजेल त्याला don’t worry ! चल भेटू संध्याकाळी.जास्त विचार करू नको.”

“अच्छा,..आणि हो खूप खूप खूप थांक्यू.”

“बाईसाहेब,आता काम झाल्यावरच धन्यवाद बोला,आता चालेंज खूप मोठं आहे.”

“ओके बाबा,bye”

***************

“रीमा,तुझा निर्णय पक्का आहे तर?” श्रीकांत मोहिते काहीसे वैतागून म्हणाले.इकडे मीनाताई हतबल होऊन खुर्चीवर बसल्या.
“हो बाबा,उगाच ओढून ताणून हे लग्न टिकवणं आता आम्हा दोघांनाही शक्य नाही.ज्या नात्यात प्रेमच राहिलं नसेल ते नातं पुढे नेण्यात अर्थ नाही.परस्पर संमतीने वेगळं व्हायचं आम्ही ठरवलंय.राजेशही आज त्याच्या घरच्यांशी बोलणार आहे,कदाचित त्याचे आईबाबा तुमच्याशी बोलतील तेव्हा तुम्हीही “mutual divorce” बद्दलच बोललात तर बरं होईल आणि ....”

रीमाचं बोलणं पूर्ण होतं तोच ऋतू आत आली सगळे शांत झाले.तिघांच्या चेहऱ्यावरचे सुतकी भाव पाहून ती जरा घाबरली. ‘ताई घरी आलीये म्हणजे नक्की काहीतरी मोठं भांडण झालेलं दिसतंय’ तिच्या मनाने अचूक हेरलं. हातातली पर्स टेबलवर ठेवत सर्वांकडे एकवार शांतपणे बघून ती आत गेली. थोड्यावेळाने चेहरा नॅपकिनला पुसत ती बाहेर आली आणि खुर्चीवर बसून सर्वांकडे बघत म्हणाली.

“अरे माझ्यासाठी भांडण थांबवायची गरज नाही,continue, continue ,चालू ठेवा,बाय द वे आज कुणाचं भांडण आहे?” ऋतू कडवटपणे म्हणाली.

“rutu mind your language...” श्रीकांत मोहित्यांनी आवाज चढवला.

“सॉरी बाबा, ठीक आहे चालू द्या” आवाजाच तोच सूर कायम ठेवत ती म्हणाली.

“ बाबा तुम्हाला समजलंय ना त्याच्या घरच्यांशी तुम्हाला काय बोलायचंय आणि हो मी माझा जॉब आणि राहतं घर सोडणार नाहीये आणि हे त्यालाही मान्य आहे आणि डिवोर्सनंतरही मी तिथेच राहणार आहे.तो घर सोडणार आहे. मला कुणाच्या सहानुभूतीची गरज नाहीये,अगदी तुमच्याही.” रीमा अगदी शांतपणे म्हणाली.तिच्या ह्या दोन वाक्यांनी ऋतूला सगळी परिस्थिती समजली.काही महिन्यांपासून ताईच्या संसारात सतत कुरबुरी चालू आहेत हे तिला माहित होतं पण ही गोष्ट डिवोर्सपर्यंत जाईल हा विचारही तिने केला नव्हता, ‘इतकं मोठं दुखः घेऊन ही बोलत होती आणि आपण नेहमीप्रमाणे बालिशसारखं काहीतरी बोलून गेलो’ ह्या विचाराने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

“ये ऋत्या तू का रडतेय?काहीही विशेष झालं नाहीये बाळा.उलट एका वाईट स्वप्नातून मला लवकर जाग आली हे महत्वाचं नाही का?” तिचे डोळे पुसत रीमा म्हणाली आणि तिचे डोळे पुसता पुसता स्वतःही रडायला लागली.इकडे आईनेही डोळ्याला पदर लावला आणि ती आत गेली.मोहिते हतबल होऊन सिगरेट फुंकत बाहेर येरझरा मारायला लागले.

“ताई प्लीज नीट सगळं उलगडून सांग काय झालं ते,चल आत.” तिला ओढतच ऋतू आतल्या खोलीत घेऊन गेली.
तिचे डोळे पुसत ऋतू म्हणाली-

“गेल्या काही महिन्यांपासून जीजू तुझ्याशी नीट बोलत नाही आणि तुझा राग राग करतात, ‘आमचा संसार म्हणजे फक्त एक adjustment’ एवढंच तू सांगत राहिली हे असं का? काय झालंय हे नीटसं कधी शेयरच केलं नाही,ताई नेमका काय प्रॉब्लेम होता तुमच्यात? तो सोल्व नाही होऊ शकत का?नाही म्हणजे हे समजून घ्यायला मी लायक नाही असं तुला वाटत असेल तर राहू दे नको सांगू.तसंही आपल्या घरात कुठे काय ताळमेळ आहे.कधी आई-बाबा एकमेकांशी नीट बोलले नाही की तुझं लग्न होऊन फक्त दीड एक वर्ष झालं त्यात हे divorce प्रकरण, मला कुणी सांगणार देखील नाही की नक्की काय प्रॉब्लेम आहे.”

“रुत्या म्हणून तर तुला बोलावून घेतलं ना ग बाळा..” रीमा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

“ohh come on yaar मी आता बाळ नाहीये,केव्हा समजेल तुम्हाला? मलाही घरातल्या गोष्टी सांगत जा राव. आईबाबांची भांडणं होतात तरी दोघांपैकी कुणीही सांगत नाही. सारखं-‘काही नाही बाळा टेन्शन घेऊ नको’ एवढंच.घरातले टेन्शन झेपणार नाही इतकी मी लहान वाटते तर मग हे माझ्या लग्नासाठी मुलं का बघतात? इतकं दुटप्पी का वागतात तुम्ही सगळे? ताई तू तर सांगू शकली असतीस ना मला तुझ्या आयुष्यात इतकं काही घडतंय ते? पण नाही,नेहमी फोन केल्यावर-“काही नाही ग ,छोट्याश्या कारणाने वाद झाले होते आता ठीक आहे,तू टेन्शन घेऊ नको” इतकं pamper नका करू यार.मी काही टेन्शनने मरणार नाहीये ” ऋतू संतापाने लाल झाली होती. रीमाने तिला शांत केलं.

“ये वेडाबाई,असं नाहीये की कुणी तुला responsible समजत नाही म्हणून घरचे प्रॉब्लेम्स सांगत नाही.त्यामागे एवढाच हेतू असतो की लहानपणापासून अभ्यासात हुशार आहेस,तुझ करियर तू ठरवलं होतं.आताही तू कामाच्या ठिकाणी नेहमी top ला असतेस म्हणून तुझ्या ह्या वाटचालीत उगाच टेन्शन का द्यावं म्हणून आम्ही तुला थोडं दूर ठेवतो आणि विशेष म्हणजे तू शेंडेफळ न घरातलं म्हणून मग तुला जास्त जपतात सगळे.तू नेहमी टोकाचे आणि वाईटच विचार का करतेस?”

“मला personal, professional, private space हे सगळं वेगवेगळं ठेवता येतं.कधी कळणार तुम्हाला? प्लीज नका करू असं,मला घरात ताळमेळ नाही याचं टेन्शन येतं ताई.आईबाबा एकमेकांना कधी चांगलं म्हणत नाही याचं टेन्शन येतं,आई जे नेहमी तुला सांगते ना की ‘जाऊदे ऋतू समोर नको बोलू तिला त्रास होईल’ ह्याचं टेन्शन येतं,तुमच्या ह्या वागण्याचा मला जास्त त्रास होतो. तुम्ही नका मला अशी विशेष वागणूक देऊ. मला हे दडपण वाटतं आणि तू आता विषय बदलवू नको सांग काय झालं ते.” ऋतू भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली.

“हो सांगतेय अगदी पहिल्यापासून सांगते.शांत हो.एकदम शांत, ऐक - तुला आठवतंय,माझ्या लग्नात एक मुलगी सारखी पुढे पुढे करत होती,तुला एक दोन वेळा जवळपास ओरडलीच होती ती म्हणून तू आणि तुझ्या मैत्रिणीने तिच्या सँडल लपवून ठेवल्या होत्या आणि सँडल हरवल्या म्हणून तिने पाठवणीच्यावेळी मस्त गोंधळ घातला होता? आठवतेय?” रीमा खिडकीतून बाहेर पाहत शून्यात हरवत म्हणाली.

“हो स्पष्ट आठवतेय ती शिष्ट,कसली माजोरडी होती ग ती,चांगला धडा शिकवला होता तिला.” ऋतू मागचं आठवून किंचित हसली.

“हम्म,तीच रेवती,राजेशची बेस्टफ्रेंड,त्याची बालमैत्रीण,कॉलेजलाही सोबत होते ते. त्यांची मैत्री त्यांच्या कॉलेजात अगदी प्रसिद्ध. हे दोघं नक्की लग्न करणार यावर कुणाचंही दुमत नव्हतं आणि विशेष म्हणजे राजेशच्या आईवडिलांनी त्याला 'रेवतीशी लग्न करणार का?’ असं धडधडीत तिच्यासमोर विचारलं तेव्हा त्याने सर्वांची ह्यावर खिल्ली उडवली होती.'रेवती फक्त माझी जिवलग मैत्रीण आहे काहीबाही विचार करू नका'असं तो स्पष्ट म्हणाला होता.मग ३/४ कांदेपोहे कार्यकम झाले त्याचे आणि मी पाचवी वैगरे असेल,मी त्याला आवडले आणि आमचं लग्न ठरलं.तुला आठवत असेल टिळा ते लग्न किती छान दिवस होते माझ्यासाठी.अधून मधून डिनरला भेटणं,लेट नाईट गप्पा..खूप भारावलेले दिवस होते ते आणि त्या धुंदीत मला कळलंच नाही की त्याच्या बोलण्यात ‘रेवती’ हा शब्द इतक्यावेळा का डोकावतो.लग्नाच्या खरेदीपासून ते यथावकाश लग्न झाल्यावर नवीन घर लावण्यापर्यंत त्याचे सर्व निर्णय रेवती घ्यायची.कधीकधी दुखावले जायचे पण मग मनात विचार यायचा’असं काही असतं तर राजेशने तिच्याशीच लग्न केलं असतं ना?’ मग स्वतःच्या संकुचित विचारांचं हसू यायचं. यालाच नवऱ्यावरील प्रेम,पझेसिव्हनेस म्हणतात असं म्हणून मी विसरून जायचे.तिचं ही घरी येणंजाणं सर्रास चालू असायचं.आली की-“अगं केवढी चहापत्ती घालतेस चहामध्ये राजेशला लगेच acidity होते,इतकं मसालेदार खातो का आता राजेश,नाही काय आहे त्याला त्रास होतो ना पासुन् तर अगदी साडी,ड्रेस,परफ्युम,फिरायची ठिकाणं,हॉटेल्स,फर्निचर..आणि अजून काय नाही सगळ्या गोष्टीत तिची ढवळाढवळ चालू झाली.मी काही बोलायला गेले की त्याचं नेहमीच उत्तर-‘ती माझी जिवलग मैत्रीण आहे आणि तुला ती माझ्याबद्दल इतकं सगळं सांगून मदतच करतेय,इतका वाईट विचार करू नको तिच्याबद्दल. पुढे पुढे तर तिची लुडबुड अधिकच वाढायला लागली.कधीकधी तर सायकोसारखी वागायची.मला काहीही खाजगी प्रश्न विचारायची.मला चीड आली, मी राजेशला सांगितलं तर त्याने तिरमिरीत तिला फोन लावला.ती चक्क नाही म्हटली आणि रडायला लागली.तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाईल वैगरे बोलायला लागली.याने मला दोन सणसणीत थापड लगावल्या आणि तो तिला समजवायला निघून गेला.हे असे छोटे मोठे किस्से घडत राहिले.तिच्या खोटारडेपणाचे प्रत्यय मला पदोपदी येत होते पण राजेश आणि त्याचे घरचेसुद्धा काहीही ऐकायला तयार नव्हते.हे असं कितीतरी महिने चाललं मग एके दिवशी त्याचे काही कॉलेजचे मित्र घरी आले होते आणि घरीच पार्टी करत ते बसले होते मी आतल्या खोलीत होते.त्याचं सगळं बोलणं कानावर पडत होतं.मी दुर्लक्ष करत होते पण ‘रेवती’ ह्या एका मुद्द्यावर त्याचं डिस्कशन आलं आणि मी कान टवकारले.एकाने त्याला खूप शिव्या दिल्या आणि म्हणाला-“साल्या ती रेवती इतकं प्रेम करते तुझ्यावर,जीव टाकते आणि तू तिला नाकारलस,तिच्यापेक्षा कोण तुला चांगल ओळखतं रे? तुमची मैत्री ह्या लेव्हलला होती साल्या की फक्त एक पाउल तू पुढे टाकायचं होतंस. ती कधीपासून तयार होती की तू लग्नाची मागणी घालशील आणि तुझ्या बाबांनी सरळ विचारलं तेव्हाही नाही म्हटलास.माहितीय तिने आतापर्यंत लग्न का केलं नाही ते –‘कारण तू नाही तर कुणी नाही’हेच आम्हाला सांगत असते,आम्ही मूर्ख, तिला समजावत असतो पण ती ही हट्टी आयुष्यभर अशीच राहील. तू कर मजा साल्या” मी तर हे ऐकून हादरून गेले आणि माझी शंका खरी ठरली. त्यादिवशीनंतर त्याचं वागणं बदललं.माझ्या प्रत्येक गोष्टीत त्याला खोट दिसायला लागली.रेवतीशी भेटीगाठी वाढल्या.कधीकधी आठवडा आठवडा घरी यायचा नाही.कंपनीचं काम आहे म्हणायचा पण आता मला कळून चुकलं होतं हा आपल्या लग्नाचा शेवट आहे.मी त्यांची मैत्री इतकी सहजपणे घ्यायला नको होती गं.मला कळायला हवं होतं की मैत्रीचीसुद्धा एक अस्पष्ट सीमा असते त्यानंतर मैत्री हमखास प्रेमात बदलतेच. आतापर्यंत फिल्मी वाटत होतं हे सगळं आणि बघता बघता खरं ही झालं.तुला तर माहितीये सहा महिन्यांपासून तो म्हैसूरला आहे ते काही कंपनीच्या कामासाठी नाही तर वेगळं होण्यासाठी. परवा त्याचा फोन आला तो म्हणाला “माझी चूक झाली हे लग्न करून.मला रेवतीचं प्रेम समजलच नाही आणि आता समजलंय तर तुझ्यासोबत रहावत नाहीये. तुझा खूप मोठा अपराधी आहे मी मान्य आहे पण हे असं जगणं मला ही शक्य नाही.आपण वेगळं होऊ या रीमा.” मी तर अगोदरच मनाची तयारी केली होती.सुदैवाने जॉब चालू आहे ही सर्वात मोठी जमेची बाजू आणि राहतं घर जे माझ्या नावावर आहे ते त्याच्या पुढच्या emi सकट मी माझ्याकडे ठेवलं,माझे दागिने आणि थोडी इन्वेस्टमेंट,कॅश,सगळं द्यायला तो तयार आहे ,फक्त मी नकोय त्याला आणि आरामात डिवोर्स मिळावा एवढी त्याची अपेक्षा.”

बोलून बोलून रीमाला दम लागला होता,एका दमात तिने पाण्याचा ग्लास रिकामा केला आणि उसनं हसू आणून तिने ऋतूकडे पाहिलं.ऋतूच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या होत्या न राहवून ती रीमाच्या कुशीत शिरली.कितीतरी वेळ ती हुंदके देऊन रडत होती.तिला शांत करत रीमा म्हणाली-

“ये वेडाबाई,इतकं काही वाईट झालं नाहीये.आयुष्य आहे हे चालायचं.लोकांना यापेक्षा खूप मोठी दुखः आहेत.आयुष्याची घडी पुन्हा बसेलही,मला ही घर संसार,मुलंबाळ सगळं हवं आहे,आयुष्याचा फक्त थोडा वेग मंदावलाय,आयुष्य संपल नाहीये. रडू नको बाळा.”

आवंढा गिळत ती म्हणाली-“ताई इतकं सगळं झालं पण तुला कधीच सांगावसं नाही वाटलं का गं?नेहमी एकच उत्तर असायचं तुझं ‘थोडे वाद झालेय होईल सगळं ठीक’,हे थोडं होतं का ग? आपण त्याला असं म्युचुअलमध्ये नाही सोडायचं,त्याने सरळ सरळ extra marital affair केलंय ताई,आपण त्या दोघांवर फ्रॉड केस टाकू शकतो.इतकं सहज कसं माफ केलस तू त्याला यार. त्याला त्याची चूक कळायला नको का ताई? त्याला धडा शिकवायला नको? आईबाबा तयार झाले त्याला सहजपणे सोडायला? अरे ते एकमेकांना माफ करत नाही आणि त्यांच्या लाडक्या मुलीचं आयुष्य खराब करणाऱ्या माणसाला असंच सोडायला तयार झाले? no way रीमाताई. मी फोन करते त्याला आणि खूप शिव्या देते.” ती संतापाने थरथरत होती,ती तिचा फोन चाचपडू लागली.
तिचा हा संताप पाहून रीमाने तिला शांत केलं,तिच्या हातून मोबाईल काढून घेतला.तिचे हात हातात घेत ती म्हणाली-

-“तुझं अगदी बरोबर आहे ऋत्या,अगदीच ही शुद्ध फसवणूक आहे,आपण केस केली तर जिंकू सुद्धा,बाबा पाण्यासारखा पैसा खर्च करतील. आपल्याला कमीय का पैश्यांची? पण मला सांग त्याने काय होईल? माझ्या एका मैत्रिणीची केस चालू आहे तीनचार वर्ष झाले फक्त पैसा खर्च होतोय,वेळ जातोय आणि वाट्याला फक्त मनस्ताप येतोय.आता तर तिच्या घरचे ही वैतागले आहे तिला. आयुष्य ओझं वाटायला लागलंय असं म्हणतेय ती आता.खूप वाईट वाटायचं तिच्यासाठी आणि आता स्वतःवर ही वेळ आल्यावर कळतंय ही मानसिक स्तरावरची लढाई किती कठीण असते. मनातलं क्षणोक्षणीचं द्वंद्व तिऱ्हाईतपणे पहावं लागतं तेव्हा काय यातना होतात. केसेस चालत राहतात वर्षानुवर्ष,कुणाला धडा शिकवायला जावं तर आपल्याच आयुष्याची काही पानं अक्षरशः पुसली जातात.किती लोकांची फरपट होते आणि मग आपल्याच माणसाविषयी सहानुभूती न वाटता तो माणूस,त्याची ही कोर्ट कचेरी ओझं वाटायला लागते.त्यापेक्षा त्याची कर्म त्याच्याकडे. मला आयुष्य असं कुढत,नकारात्मक नाही जगायचं,कसं जगायचं हे माझ्या हातात आहे.त्यामुळे लवकर ह्या लग्नातून बाहेर पडायचं बस्स एवढं ठरवलंय.स्वतःच्या पायावर उभी आहे हीच आता माझी मोठी strength आहे कारण MUTUAL DIVORCE म्हटला तरी इतका सहज नाही होत.त्याच्याही बऱ्याच formalities असतात,बराच वेळ जातो,कुल ऑफ टाइम न काय काय ,खूप लीगल गोष्टी आहेत यात.लग्नाच्या बेडीत अडकणं खूप सोप्पंय पण यातून बाहेर निघणं तेवढंच कठीण! सगळ्याच पातळीवर दिव्य! पण तुम्ही सगळे आहात ना माझ्या सोबतीला नाही का ?आईबाबांना समजावणं हे मोठं काम होतं पण स्वीकारलंय त्यांनी ते आता.तू सुद्धा सोबत आहे असं समजू ना?”

खूप वेळापासून अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध आता फुटला होता,ऋतूने तिला मिठी मारली.कितीतरी वेळ दोघी रडत होत्या.ऋतूच्या मनात कुठेतरी खोल रेवती आणि रेवा ह्या दोन नावांमधील साधर्म्य बैचैन करतं होतं.

बाहेर कोवळी सकाळ जाऊन आता धगधगीत दुपार झाली होती.

*************

संध्याकाळी---
“वेद,तुझ्यासाठी काय ऑर्डर करू?” मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेल्या वेदला जयने जरा ओरडूनच विचारले. “रात्री कॉल करते तुला” हा ऋतूचा एवढासा मेसेज जवळपास १०० वेळा पाहून झाला होता.

“अं...काय म्हणालास?” त्याने वर बघत विचारलं.

“अहो राजे काय मागवू तुमच्यासाठी? आज्ञा द्यावी.” जय चिडून म्हटला.

“हम्म, एक कॉफी बस्स.”

“का रे?खाऊन घे ना काहीतरी.” रेवा काळजीने म्हणाली.

“नाही,इच्छा नाहीय ग काही खायची,कॉफी पुरे.”त्याच्या डोळ्यांवर अजूनही झोप दिसत होती.

“वेद,काय होतंय? बरं वाटत नाहीये का?”

“नाही,I am ok…,थकलोय बस्स.” उसनं हसू आणत तो म्हणाला.

“बरं,ऐक तू काल ऑफिसला नव्हतास, सुट्टी टाकलेली तर ऋतुजाला सांगून जायचं ना रे.किती काळजीत होती ती.बरं आम्हालाही काही सांगितलं नव्हतंस तू, आम्ही कशी मदत करणार तिची? असं नको रे करत जाऊ,रिलेशनशिपमध्ये थोडं जबाबदारीने वागायला शिक ना.”

हे असं बोलायला रेवाला मनस्वी त्रास होत होता पण वेद यायच्या अर्धा तास अगोदरच ते भेटले होते आणि जयने तिला सगळं व्यवस्थितपणे समजावून ठेवलं होतं.अगदी त्याच्या मास्टर प्लान सकट सगळं तिला पटवून दिलं होतं आणि ती आता बरहुकूम वागणार होती,कितीही त्रास होणार असला तरी.

“अरे हो,थोडा बालिशपणा झाला माझ्याकडून पण ठीक आहे इथून पुढे काळजी घेईन,thanks आणि तू आहेस ना माझं असं चुकलं की कानउघडणी करायला.रेवू ह्या मुर्खाला ही सांग ना जरा ऋतुसोबत व्यवस्थितपणे बोलायला.” तिच्याकडे पाहून गोड हसत तो म्हणाला.

त्याचं हे गोडं हसणंच तर तिला पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला भाग पाडायचं.

“जय,प्लीज आपल्या वेदसाठी तरी आपल्याला मागचं हळूहळू का होईना विसरावं लागेलं.” ती नाटकीपणे म्हणाली.

थोडावेळ गप्पागोष्टी करून ते जायला निघाले,रेवा आणि वेद्ला एकांत मिळावा म्हणून जय जरा लवकर गेला.

“रेवा घरी कशी जाणार आहे? सोडू का तुला घरापर्यंत.” तो काळजीने म्हणाला.

“हम्म,घरापर्यंत नाही पण कॉलनीच्या अलीकडे सोड.” ती किंचित हसत म्हणाली.

“का ग?घराचे खरडपट्टी काढतील का? घरी सांगितलं नाहीस का तू माझ्याबद्दल?” तो हसत म्हणाला.

“तुझ्याबद्दल?” ती गोंधळून म्हणाली.

“अगं वेडे म्हणजे फ्रेंड आहोत,कलीग आहोत असं काही.”

“अहह..हो,तेच म्हणजे माहितीय की घरी पण मला जरा काम आहे म्हणून म्हटलं बाकी काही नाही.” बोलत बोलत ते गाडीपर्यंत पोहचले. त्याने गाडी स्टार्ट केली.

“ओके नो प्रॉब्लेम,बस,व्यवस्थित बस”

ती त्याच्यामागे बसली खरी पण त्याच्या खांद्यावर हात ठेवायचं तिला प्रचंड दडपण आलं.

“अग काय झालं व्यवस्थित बस.”

तिने एक हात अलगदपणे त्याच्या खांद्यावर ठेवला,ही जागा आपल्या हक्काची,मानाची लवकरात लवकर व्हावी यासाठी मनोमन तिने देवाला साकडं घातलं आणि वेद असाच कायम आपल्या जवळ रहावा ह्या सुखस्वप्नात ती गुंग झाली.

**************

आज खूप दिवसांनतर ऋतूने आईबाबा आणि ताईसोबत दिवसभर इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या.तिच्या बराचश्या प्रश्नांचा,गैरसमजांचा थोडा का होईना तिला उलगडा झाला होता आणि एकाच वेळी मन शांत आणि जडावलेलं ही वाटत होतं.रीमाने ह्या परिस्थितीला दिलेला सकरात्मक दृष्टीकोन सगळ्यांना पटल्याने मोहिते कुटुंब जरा सावरलं होतं. बंगल्याच्या टेरेसगार्डन मधलं शांत,सुगंधी वातावरण अजूनच मनाला हळवं, कातर बनवत होतं. दोघी बहिणी शांतपणे गप्पा मारत तिथेच बसून होत्या. वेद फोनची वाट बघत असेल याची जाणीव झाल्यावर ती जरा बेचैन झाली.सारखं लक्ष फोनकडे जात होतं..रीमाने तिची चलबिचल ओळखली.

“मग? काय नाव आहे त्या हँडसमचं?" तिने मिश्किलपणे हसत विचारलं.

“ वेद” ती भ्रमिष्टासारखी बोलून गेली आणि दुसऱ्या क्षणाला भानावर आली.

“ताई..ये काय ग?” ती लाजून रीमाच्या कुशीत शिरली.

“ऋत्या,मघाशी तुझा फोन हातून काढून मी बाजूला ठेवला ना तेव्हाच दिसला एक हँडसम मुलगा स्क्रीनवर. म्हटलं उगाच टपली टाकून बघावी.हे तर खरंच निघालं.”

“ताई,यार दुष्ट आहेस तू?” ती लाडिकपणे बोलली.

“दुष्ट तर दुष्ट,बरं मी इथे बसलेलं चालेल ना तू फोनवर बोलत असतांना की काही प्रायव्हसी हवी आहे?” तिला अजूनच चिडवत ती म्हणाली.

“नाही ग,चल झोपायला.तुला ही झोप येतेय ना?मला नाही काही प्रायव्हेट वैगरे बोलायचं.” एवढं बोलून ती उठली.

“ऋत्या वेडाबाई,मी जातेय आत झोपायला,तू ये बोलून झालं की आणि असं तोंड पाडून बोलू नको. मयत नाही झालीय घरात. सगळं छान आणि व्यवस्थित झालंय काय आणि ह्या वेद्चे सगळे डीटेल्स उद्या द्यायचे मला.” तिच्या गालावर एक चिमटा घेत ती म्हणाली आणि निघून गेली.

“लव्ह यु ताई,गुड नाईट” गाल चोळत ती म्हणाली.

इकडे वेद कितीतरी वेळ उगाच फोनच्या स्क्रीनवर नजर टिकवून बसला होता.तिचा आवाज ऐकायला त्याचे कान आतुर झाले होते.कालच्या भेटीची खूप वेळा मनातल्या मनात पारायणे करून झाली होती.तिचं ते चिडलेलं लोभस रूप त्याच्या नजरेसमोरून हटायलाच तयार नव्हतं.

“ये यार कर ना कॉल,किती वाट बघायची?” मोबाईल मधल्या तिच्या फोटोकडे बघत तो म्हणाला,थोड्यावेळाने तिथंच टेबलावर डोकं ठेऊन तो झोपी गेला.

बऱ्याच वेळानंतर ऋतूने त्याला फोन केला.रात्रीच्या शांततेत फोनच्या कर्कश आवाजाने तो खडबडून उठला.ऋतूचा फोन म्हणून त्याने तो गडबडीत उचलला.

“हॅलो,बोल ना. कॉल केलेला तू.” शांत आणि थकलेल्या आवाजात ती म्हणाली.

“कॉल नाही ऋतू कॉल्स केलेले..” डोळ्यांवर पाणी मारायला म्हणून तो उठला.

“हो बाबा,बघितले मी,जरा प्रॉब्लेम झालाय घरी म्हणून आले न सांगता.काही सुचत नव्हतं.”

ती अजूनही जरा हरवलेली होती.

“आता बरी आहेस ना?काय प्रॉब्लेम झालाय?म्हणजे जर तुला काही सांगावस वाटत असेल तर सांग.” तो सावधपणे म्हणाला.

“ सांगेन प्रत्यक्ष भेटल्यावर ,फोनवर सांगण्याइतकं कॅज्युअल नाहीये.”

“ओके...उद्या येतेय परत? ये ना लवकर.तू बोलते तर आहेस पण तुझ्या आवाजातलं दुखः कळतंय मला. हे बघ सिम्पथी नाही पण काहीतरी guidanceतर नक्कीच देऊ शकेन. ट्रस्ट मी.” त्याला तिचा हा जडावलेला आवाज समजत होता.

“अरे,आता ठीक आहे मी आणि घरचेही.सावरलोय बऱ्यापैकी.आपण बोलू ह्या विषयावर काहीच हरकत नाही. दुःख उगाळून सिम्पथी घ्यायला नाही आवडत मला पण तुला सांगितल्याशिवाय आता रहावणारही नाही हे ही तितकंच खरंय आणि हो उद्या येतेय पण रात्री. बाबा येणार आहेत सोडवायला.”

“ये त्यांना कशाला त्रास देते,मी येतो ना घ्यायला,प्लीज.” तो अजीजीने म्हणाला.

“वेद,कसं शक्यय ते? त्यांना काय सांगू?” ती लटक्या रागाने म्हणाली.

“त्यांना सांग मी बसने जातेय आणि पुढच्या स्टॉपला उतरून जा.मी थांबतो तू म्हणशील तिथे” त्याच्या आवाजात उत्साह ओसांडून वहात होता.

“ये बाबा,असं काहीही होणार नाहीये आणि इतकी काय घाई लागलीय तुला मला घ्यायला यायची”

“सोना आजचा संपूर्ण दिवस ह्या एका फोन कॉलची वाट बघत घालवलाय मी.”

“हो का? मग इक्वल झालं. मी सुद्धा कालचा दिवस असाच घालवला होता.”

“कसा?” मुद्दाम तिला चिडवत तो म्हणाला.

“नालायक,तुला माहीत आहे,गप्प बस.” ती प्रेमाने म्हणाली.

“हो पण मला तुझ्याकडून ऐकायचं ना.” तो ही मागे हटणार नव्हता.
“साहेब जरा भानावर या,मी माझ्या घरी आहे.”

“तोच तर विषय आहे ना,भानावरच नाहीये मी अजूनही,चुकलंच काल जरा माझं”

“काय? काय चुकलं? तिने गोंधळून विचारलं.

“काल कॉफी घेतली खरी पण जरा गोड करायला हवी होती तिला,म्हणजे प्लेन कडवट कॉफी ऐवजी जरा स्वीटकॉफी टेस्ट करायला हरकत नव्हती.”

“स्वीटकॉफी?” तिने निरागसपणे विचारलं.

“हम्म! कुणाचं तरी बोलणं जसं स्वीट आहे ना,तसच कॉफी पण स्वीट करता येते.”

त्याचं हे सूचक बोलणं ऐकून खरतरं लाजेने गोरीमोरी झाली होती ती,तोंडातून शब्दही निघत नव्हता,कसबस सावरत ती म्हणाली.

“वेद भेटल्यावर एक रपटा मिळणार आहे तुला नालायका”

“रपटा वैगरे नकोय स्वीटकॉफी म्हणजे स्वीटकॉफी आणि ती नाही भेटली तर तुला रपटा.”

“नालायका असा रपटा देऊन माझा सांभाळ करणार का?” ती खोटा रुसवा आणत म्हणाली.

“वेड्या अग तू मेहंदी जरी लाऊन बसली ना तरी त्या मेहंदीची एक रेष मी खराब होऊ देणार नाही समजलीस ना. फक्त तुझ्या लिपस्टिकची तेवढी गॅरेंटी देत नाही.”

आणि तो खळखळून हसला, आता मात्र काय बोलावं हे तिला सुचेना.

क्रमशः

©हर्षदा

{लोभ असावा, लाईक्स, कमेंट्समधून दिसावा😂}