“बरं येतोच मी.”
निनादला येत येत 11:30 वाजले. वृंदा थांबली होतीच जेवायची. दोघांचं जेवण झालं आणि निनाद लगेच झोपी गेला. तो खुप थकला होता. वृंदा देखील झोपली. झाला प्रकार ती विसरुन गेली.
काही दिवसांनी पुन्हा त्याच नंबर वरुन missed call आला. नेमकं या वेळेस निनाद घरी होता. वृंदाने त्याला नंबर दाखवला.
“बघ निनाद पुन्हा तोच नंबर..”
“बघू..”, निनादने नंबर बघितला आणि म्हटलं, “ बघुया.. अजून एकदा कॉल केला तर… नाहीतर complaint करु.”
पण तशी वेळंच आली नाही. जेव्हा पुन्हा फोन वाजला तेव्हा समोरुन एक ओळखीचा आवाज वृंदाला आला. निनाद ने आधीच फोन लाऊडस्पिकरवर टाकायला सांगितला होता. त्यामुळे दोघे मिळून पलीकडचा आवाज ऐकत होते. वृंदाने तो आवाज लगेच ओळखला. तो मनन होता.
“Hello मी मनन बोलतोय. वृंदा कशी आहेस तू?”
“..”, वृंदा स्तब्ध होऊन ऐकत होती. तिला काय बोलावं तेच सुचत नव्हतं.
निनादने वृंदाची ही स्थिती ओळखली. आणि तिचा हात दाबला. वृंदाच्या डोळ्यात बघून मी आहे असा तिला विश्वास दिला.
“का फोन केला आहेस तू?”
“मला बोलायचंय तुझ्याशी. जे झालं ते मी बदलू नाही शकत. पण मला तुझी माफी मागायची आहे. मला भेटशील का?”
“आता त्याने काही फरक नाही पडत. माझं लग्न झालं आहे.”,असं म्हणून वृंदाने सरळ फोन cut केला.
निनाद तिच्याकडेच बघत होता. काय चाललंय हे त्याला कळत नव्हतं. त्याने वृंदाला आवाज दिला. “वृंदाऽऽऽ…”
वृंदा काही न बोलता तडक आतल्या बेडरूममध्ये गेली. तिला आता डिस्टर्ब करणं योग्य होणार नाही म्हणून निनाद तिच्या मागे गेला नाही. वृंदा मात्र पुन्हा भुतकाळात हरवली. तिची कोवळ्या वयातली ती स्वप्न आणि त्यांचं तुटणं. बराच वेळ ती एकटीच बसुन होती.
अचानक वा-याच्या झुळकीने खिडकीत ठेवलेला रिकामा पेला खाली पडला. त्या आवाजाने वृंदा भानावर आली. घड्याळाचा काटा टिकटिक करत पुढे जात होता. तिला लक्षात आले की बराच वेळ झाला आहे. तिला निनादची आठवण झाली तशी तडक ती hall मध्ये आली. निनाद लॅपटॉप वर ऑफिस चं काम करत cot वर बसला होता.
“निनाद ऽ..”, वृंदाने त्याला आवाज दिला. तिला समोर बघून निनादने लॅपटॉप बाजूला केला आणि तिला हाताने जवळ बोलावले.
वृंदा येऊन त्याच्या मांडीवर डोकं ठेवून खाली बसली. निनाद तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागला. त्या स्पर्शाने तिला बरं वाटलं.
“निनाद मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली. मगाशी तो फोन आला होता ना…”
“हंम्म्…”,निनादने तिला बोलू दिलं.
“तो मनन चा फोन होता. कॉलेज मध्ये असताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो. नंतर तो जॉब साठी बेंगलोर ला गेला. मी त्याला लग्नासाठी विचारलं तर career चं नाव पुढे करुन टाळत राहीला तो. नंतर बोलणं कमी कमी होत गेलं आणि पुढे काहीच झालं नाही….”
“..”
“I am sorry निनाद. मला माहीत आहे तुला हे आवडलं नसणार. बायकोचं अफेयर असणं कोणत्या नव-याला आवडेल. Sorry…”, वृंदा रडत म्हणाली.
“..”
“बोल ना रे काहितरी…”
“अगं काय बोलू मी…”
“तू रागावला आहेस ना?”
“नाही गं. मी का रागवेन तुझ्यावर..”
“मग बोलत का नाहीस?”
“तू इकडे वरती बस बघू.”, निनादने तिला खांद्याला धरुन वर आपल्या शेजारी बसवले. “हे बघ मी नाही रागावलो आहे तुझ्यावर. प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. आणि ज्यावेळी तू ते केलंस तेव्हा मी तर नव्हतो तुझ्या आयुष्यात. आणि..”
“आणि काय?”
“आणि फोन बद्द्ल बोलशील तर हो मला आलेला थोडा राग. Insecurity. पण थोडाच वेळ. कारण मला माहीत आहे तू फक्त माझीच आहेस. त्यामुळे आता इतका विचार नको करुस.”
“पण आता का फोन करतोय हा…मला नाही बोलायचं त्याच्याशी...”
“हे सर्वस्वी तुझ्यावर सोडतो मी वृंदा. तुला जे योग्य वाटतं ते तू कर. आणि मला माहीत आहे की तू काहीही चुकीचं नाही करणार.”
निनादने वृंदा कडे बघितलं. ती त्याच्याच डोळ्यात बघत होती. मग अचानक ती उठली आणि तिने स्वत:चा फोन घेतला. तो unknown नंबर dial केला. फोन लाउडस्पीकर वर ठेवला.
“Hello मनन, मी वृंदा बोलतेय.”
“वृंदा खरंच तू फोन केला आहेस...?”
“बोल काय बोलयचंय तुला?”
“मला भेटशील का? भेटून बोलू.”
“ नाही मनन. मला तुला भेटण्याची इच्छा नाही. जे आहे ते फोनवरंच बोल.”
“ठीक आहे. वृंदा मला माहीत आहे की मी तुला खुप दुखावलंय. Career च्या मागे धावता धावता आपल्या नात्याचा बळी दिला मी. जेव्हा भानावर आलो तेव्हा कळलं की मी खुप उंचीवर पोचलो पण तरीही बरंच काही रिकामं राहीलं. राहून राहून तुझी आठवण येत होती. चौकशी केली तर कळलं की तुझं लग्न झालंय. आधी खुप चलबिचल झाली मनात की बोलू की नको. वृंदा खरंच माफ कर मला.”
“ही वेळ आहे का आता सगळं बोलायची. मी आधीच सांगितलंय ना की माझं लग्न झालंय.”
“हो माहीत आहे मला. तुझ्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ नाही करायची आहे मला. माझ्या घरचे लग्नासाठी मागे लागले आहेत माझ्या. पण मी एक नातं नीट जपलं नाही याचं शल्य नेहमी राहील माझ्या मनात हे guilt घेऊन नवीन आयुष्याची सुरवात कशी करु? Please मला माफ कर..”
वृंदा काहीच बोलत नाहीये हे बघून निनाद ने तिला खुणेनेच ‘बोल’ असा इशारा केला.
“मनन माझ्या आयुष्यातले काही आनंदी क्षण मी तुझ्याबरोबर जगले. जे झालं ते आता मला आठवायचं नाहीये. मी तुला माफ करत आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. फक्त एकच वचन हवं आहे..”
“कोणतं?”
“पुन्हा कधी मला contact करण्याचा किंवा मला भेटण्याचा प्रयत्न करु नकोस.”
“नाही करणार... and Thank you. Bye. Take care.”
फोन ठेवला तसं वृंदाला खुप हलकं वाटू लागलं. मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं तिला. निनाद कडे बघून तिला खुप अभिमान वाटला. आणि त्याच विचारात तिने निनादला कडकडून मिठी मारली.
काही दिवसांनी निनाद ला त्याच्या मावस भावाचा फोन आला. प्रणव. त्याचं लग्न होतं कोकणात पुढच्या आठवड्यात. त्याने आग्रहाने दोघांना एक आठवडा आधीच यायला convince केलं. नेमकं त्याच आठवड्यात त्या दोघांची पहिलीवहीली Anniversary होती. आता ती तिकडेच celebrate करु असं दोघांनी ठरवलं. नातेवाईकांची भेट पण होईल.
कोकणातला नयनरम्य निसर्ग, समुद्र किनारा, नारळी पोफळीच्या बागा यांमुळे तिथला मुक्काम छानंच असणार याची दोघांनाही खात्री पटली. प्रणवच्या लग्नाच्या तयारीत दोघांनीही मिळून हातभार लावला.
निनादची मावशी म्हणजे प्रणवची आई खुपंच प्रेमळ आणि सुग्रण होती. तिच्या हाताखाली वृंदाने बरेच पदार्थ शिकून घेतले. पण निनादने सुद्धा आग्रहाने शिकून घेतले.
यावर मावशी म्हणालीच, “ बायकोवर फारंच प्रेम दिसतंय.”
वृंदा काहीच न बोलता खाली मान घालून काम करु लागली.
निनाद लगेच म्हणाला, “ हो आहेच. आणि असं कोणी म्हटलंय गं की स्वयंपाक ही स्रियांचीच मक्तेदारी आहे म्हणून. मला आवडतो स्वयंपाक करायला. नेहमी नाही पण कधीतरी करुच शकतो मी.”, निनाद कापलेला कांदा बाजूला ठेवत म्हणाला.
“हो बाबा. तुम्हा आजकालच्या पोरांसोबत कोणी जिंकलंय का बोलण्यात. माझी सून कशी असेन काय माहीत..”, मावशी खोबरं किसत म्हणाली.
“तू नको काळजी करु मातोश्री. मी आधीच सगळा स्वयंपाक शिकून घेईन.”,प्रणव आत येऊन एक tomato खात म्हणाला.
“बायको साठी शिकून घेशील. आणि आई साठी काही नाही..”
“तुझ्या साठी पण करेल की. काय गं आई तू पण..”
“बरं बरं बघू. चला जेवायला बसू. होतंच आलंय सगळं.”, मावशी म्हणाली.
“हो मग आपण बीच वर जाऊ.”, प्रणव निनादला म्हणाला.
तेवढयात मळयातून प्रणव चे बाबा आले. सगळयांची जेवणं झाली. आणि सगळं आवरून झाल्यावर प्रणव दोघांना घेऊन समुद्रकिना-यावर गेला.
तिकडे वाळूत अनवाणी फिरण्या पासून ते लाटांचे पाणी एकमेकांवर उडवण्या पर्यंत दोघं मनसोक्त फिरले. नंतर होडीत बसुन थोडं लांबपर्यंत सैर करुन आले. दोघांनी Anniversary अशीच सगळ्यांसोबत मौजमजा करुन celebrate केली.
प्रणव च्या लग्नाच्या आदल्या दिवशी बाकीचे सगळे नातेवाईक आले. लग्न खुप छान पार पडले. निनाद आणि वृंदाला दोघांचे लग्न आठवत होते. दोघं एकमेकांना चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हते. लग्न झाले तशा सुट्ट्याही संपल्या. नव्या वधूवराला आशिर्वाद आणि एक छोटंसं गिफ्ट देऊन दोघं निघायची तयारी करु लागले. निनाद ची आई, बाबा, सुलेखा काही दिवस कोकणातंच थांबणार होते. दोघं जण छान आठवणी घेऊन घरी आले.
©हर्षदा शिंपी-बागुल