Shevtacha Kshan - 32 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 32


ती विचार करत तिथेच हॉस्पिटलमधल्या एक बाकड्यावर बसली.." आता काय करू?? घरी तर सगळं आई सांभाळून घेतील पण मी ऍडमिट असताना इथे कोणाला थांबावं लागेल कुणाला सांगू?? गौरवला सांगितलं तर तो तिकडे एकटा आहे. आणि त्याच मन फार हळवं आणि कमजोर आहे.. अस काही मी जर फोन वर सांगितलं आणि त्याने तिकडे टेन्शन घेऊन आजारपण ओढवून घेतलं तर.. नको नको, मी त्याला फोनवर नाही सांगणार काहीच.. फक्त लवकर ये म्हणून सांगते, पण काय झालं असं अचानक विनाकारण मी का बोलवतेय?? अस साहजिक प्रश्न विचारेल तो..तेव्हा मी काय सांगणार?? आणि साधं खूप आठवण येत आहे म्हणून तू सगळं सोडून ये सांगितलं तर तो त्याच एवढं मह्त्वाचं काम आणि एवढी चांगली त्याच्या प्रगतीला पूरक ठरणारी संधी सोडून का येईल?? त्यापेक्षा दुसऱ्याला कुणाला बोलावून घेते.. आई पप्पाना बोलावते, त्यांना सांगते सगळं.. पण पप्पाना पण नोकरीवर जायच असते आणि त्यांना एवढ्या सूट्ट्या नाही मिळणार आणि तेही तसे इकडे कधी राहिले नाही त्यामुळे इकडचा परिसर त्यांनाही माहिती नाही पण ते थोडाफार तरी करू शकतील.. बाबांना (गार्गीच्या सासरे) तर काही शक्यच नाही.. ते तर खूपच घाबरतात... ताई पण नोकरी करतात त्यामुळे त्यांना ही बोलवता येणार नाही.. प्रतिकला सांगून बघू का? नाही नाही, त्याच्यावर तुझा काय हक्क आहे?आणि त्याने आताच एका मुलीबरोबर नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली आहे, त्यात अस माझं लुडबुड करणं अजिबात योग्य नाही.. खूप दिवसांनी त्याने move ऑन केलंय.. त्याच्या खुशीमध्ये अस काही सांगून त्याला दुःखी करणे बरोबर नाही.. आणि माझ्याबद्दल असं काही कळल्यावर तो काय करेल माहीत नाही नकोच त्याला कळायला.. जाऊ दे देवाने नशिबात जर मरण लिहिलाय तर त्याला कोण थांबवू शकतं.. पण माझं पिल्लू, ती अजून लहान आहे तिला माझी गरज आहे, मी जर गेली तर तीच काय?? नाही नाही मी तिला अस सोडून नाही जाऊ शकत..

काहीतरी विचार करत ती तिथून उठली .. आज कॅब करून घरी आली.. घरात गौरांगी खेळत होती आणि आई बाबा तिच्याच जवळ बसून तिला खेळवत होते.. गार्गी घरी पोचताच त्यांनी लगेच विचारलं..

बाबा- डॉक्टर काय म्हणालेत बेटा?? काही आलंय का रिपोर्ट मध्ये समजण्यासारखं? सगळं ठीक आहे ना??

गार्गी त्याच्याच कडे एकटक बघत कुठल्यातरी विचारात गढून गेली.. त्यांनी तिला हलवून पुन्हा विचारलं

आई - काय ग काय झालं ? कसला विचार करतेय?? सांग ना काय म्हणाले डॉक्टर सगळं ठीक आहे ना??

गार्गी - हो आई , सगळं ठीक आहे, ते थोडं अशक्तपणा वाढलाय त्यामुळे होतंय.. औषधी ,गोळ्या दिल्यात त्यांनी आता रेग्युलर घेतल्या की होईल सगळं ठीक..

तिने कसनुस हसत उत्तर दिलं.. खरं तर सत्य सांगायची तिची हिम्मतच झाली नाही.. त्यांना धक्का बसला असता म्हणून तिने काहीच त्यांना सांगितलं नाही.. "सद्धे अस अचानक काही न सांगता त्यांना धक्का बसणार नाही यापद्धतीने सांगायला हवंं, आणि ते पुढे बघू कस सांगायचं, आता काहीच सुचत नाहीय.. "

तीच लक्ष गौरांगीकडे गेलं, ती तिला काहीतरी सांगू पाहत होती.. तिने गार्गीच हात पकडून तिला बाल्कनीमध्ये घेऊन गेली आणि कुठेतरी बोट दाखवत..

" फुss, फुss " अस सांगत होती.. त्यांच्या घरच्या ब्रह्मकमळाच्या वेलाला आज सुंदर फुल आलं होतं.. आणि तेच ती गार्गीला दाखवत होती.. ते फुल बघून गार्गीचीही काही क्षणासाठी विचार शृंखला तुटली आणि ती तिच्या मुलीसोबत बोलत बोलत त्या फुलाकडे बघू लागली..

गार्गी - अरे वाह, किती सुंदर आहे ना हे फुलं..

गौरांगी तिच्याकडे आणि फुलाकडे बघत खूप आनंदानी टाळ्या वाजवत होती..

गार्गी - तुला कुणी दाखवलं हे फुल??

गौरंगी तिच्या आजीकडे बोट दाखवत

"आss आss"

गार्गी - अच्छा , तुला आवडलं ?

तिने पूर्ण शरीर डोलवून "हो हो" सांगितलं

गार्गी - कस आहे बाळ फुल?

तिने उजव्या हाताच्या अंगठ्याला तर्जनी जोडून उरलेली तिने बोट वर करत

"शुंss शुं ss"

म्हणून सांगितलं.. तिच्या अशा मोहक हालचालीकडे बघून गार्गीला भरून आलं तिने पटकन तिला उचलून घेत मिठीत घेतलं.. आणि तिचे खूप सारे पापे घेऊ लागली.. तिच्या मनाची अस्थिरता आणि तिच्या मुलीपासुन दूर जाण्याची भीती तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती..

गेल्या 3 - 4 दिवसांपासून गार्गी सारखी कुठल्या तरी विचारांत हरवलेली असायची.. तब्येत बरी नाही चक्कर येतात आहे म्हणून तिची सासू तिची खूप काळजी घ्यायच्या तिला घरात कुठल्याच कामाला हात लावू देत नसत.. या वयातही त्या घरातली सगळी काम करून गौरांगीकडेही लक्ष द्यायच्या.. आणि गार्गीची तर अगदी मुलीसारखी काळजी घ्यायच्या.. गार्गीला त्यांना अस काम करताना बघून खूप वाईट वाटायचं पण त्या तिला अजिबात कुठल्याच कामाला हात लावू देत नसत त्यामुळे गार्गीच नाईलाज होता.. "आपली सगळे इतकी काळजी घेत आहेत की मी बरी होईल म्हणून आणि मी यांच्यापासूनच सत्य लपवत आहे.. त्यांना, माझ्या मुलीला मी हवी आहे आणि मी अस हलगर्जीपणा करून उगाच माझा जीव आणखी धोक्यात घालत आहे.. मला यांना सांगायलाच हवं, पण मी जिवंत राहून पण मी आधीसारखी जगू शकेल का?? की उगाच यांच्या जिवावर आणि गौरववर एक ओझं बनून राहील? जर सगळं व्यवस्थित झालं तर ठीक अन्यथा पुन्हा जर तो वाढला किंवा पसरला तर पुन्हा असाच सगळं होत राहील आणि माझ्या या आजारपणाचा माझ्या घरच्यांना त्रास होत राहील.. मी कधीच विचार नव्हता केला की डिलिव्हरी सोडली तर आयुष्यात कुणाला माझं इतकं करावं लागू शकेल.. " गार्गी पुन्हा विचारात गढली..

आज 7 दिवसांनी ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची भेट घेण्यासाठी पोचली..

डॉक्टर - अरे गार्गी, ये ये बस.. काय विचार केलाय मग, करायचं ना ऑपरेशन??

गार्गी - डॉक्टर काही विचारायचं होतं...

डॉक्टर - हा, विचार ना...

गार्गी - ओपरेशन न करता किती दिवस मी जगू शकते??

डॉक्टर - तुला ओपरेशन का करायचं नाहीय?? जीवाशी खेळायचं आहे का?

गार्गी - तस नाही डॉक्टर मी ओपेरेशन करायचाच विचार केलाय.. माझ्या आई वडिलांना इकडे बोलावणार आहे मी.. अजून त्यांना सांगितलं नाहीये, सांगेल लवकरच.. मी इथे फक्त थोडं चेक अप करायला आले होते.. आणि जाणून घ्यायला आले होते की अजून किती दिवस आहेत माझ्याकडे??

डॉक्टर - गार्गी हे बघ सर्वात आधी तर तुझा ट्युमर कॅन्सरस आहे , हा ट्युमर या स्टेजला खूपच झपाट्याने वाढतो, आणि तो वाढत जाण खूप धोक्याचं आहे.. नंतर आता तुला तुझा एकेक अवयव निकामी होताना जाणवेल.. आणि शेवटची स्टेज येईल.. तर ही स्टेज येण्याआधी आम्ही काही उपचार करू शकतो पण नंतर जर केस हाताबाहेर गेली तर मग मात्र सगळंच अवघड होऊन बसेल.. तू आता ज्या लोकांचा विचार करतेय ना त्याच लोकांचा विचार कर की तू नसताना त्यांच काय होईल.. म्हणजे तुला जाणवेल की तुला लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करावी लागेल.. आणि हो डोक्यावरचा ताण सर्वात घातक आहे तू जेवढं टेन्शन घेशील तेवढा ट्युमर जोरात वाढेल.. लवकर निर्णय घे .. आणखी काही त्रास होतोय का??

गार्गी - हो डॉक्टर... मला या डाव्या डोळ्याने थोडं कमी दिसायला लागलंय.. कधी कधी एक हात पूर्ण सुन्न पडतोय.. काही दिवस औषधी घेऊन ट्युुमरची ग्रोथ कमी करता येईल का??

डॉक्टर - हो तोच प्रयत्न आहे, तुला ज्या गोळ्या दिल्या आहेत त्या त्यासाठीच दिल्या आहेत, पण जर तूझ्या डोक्यावर कसलाही ताण येत असेल तर मात्र त्या गोळ्या असर करणार नाहीत.. तू लवकरात लवकर सगळ्यांना सांग..

गार्गी - हो मी सांगते.. थँक्स डॉक्टर..

गार्गी घरी आली.. आल्या आल्या तिला दरवाज्यातच चक्कर आली.. पण दरवाजाचा आधार घेत कशीबशी उभी राहिली.. तिच्या सासूने आधार देत तिला घरात घेऊन खाली बसवले.. पाणी प्यायला दिलं.. ज्या हातात ग्लास पकडला तो सुन्न पडत चालला होता त्यामुळे ग्लास खाली निसटला.. आणि तिचा हात एकदम ढीला पडला.. सासूबाईंनी तिला दुसरा ग्लास आणून त्यांच्या हातानेच पाणी पाजलं आणि तिचा ढीला पडलेला हात चोळू लागल्या.. त्यांची काळजी बघून गार्गीला एकदम भरून आलं.. "ज्या वयात मी यांची सेवा करायची त्या वयात यांना माझी काळजी घेत बसावं लागतंय.. पण त्यांची काळजी मला हे दर्शवतेय की त्यांना मी हवी आहे.. मी आजच बोलते त्यांच्याशी.. " तिने मनातच निर्धार केला..

थोडावेळणी गार्गीने औषधी घेतली आणि तिला बरं वाटू लागलं.. आणि तिने गौरंगी ला झोपवून तिच्या सासू सासऱ्यांना समोर बसवून खूपच शांतपणे सगळं सांगितलं.. त्यांना हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसला आणि आता पुढे कस करायचं हा सर्वात मोठा प्रश्न त्यांना पडला..

गार्गी - आई बाबा तुम्ही घाबरून जाऊ नका. मला खरच तुमच्यावर ताण यावा अस वाटत नाहीय पण डॉक्टरांनी आता फक्त 7 दिवसांची वेळ दिली आहे.. तेव्हा माझा विचार आहे की मी माझ्या आईवडिलांना इकडे बोलावून घेते..

आई - चालेल त्यांची मदत होईल मग.. आमचे तर हातपायच गळून गेले हे ऐकून.. गौरवला सांगितलं का??

गार्गी - नाही आई.. तो तिकडे एकटा आहे मी त्याला उगाच टेन्शन नाही देऊ शकत..

आई - अग पण त्याला सांगावच लागेल ना.. त्याला माहिती असायला हवं..

गार्गी - हो आई बघुयात ते.. तुम्ही खरच काही काळजी करू नका.. मी हॉस्पिटलमध्ये बोलून ओपेरेशन ची तारीख घेऊन घेते.. आणि आई पप्पांना तास कळवते..

आई - हो चालेल..

(थोडं थांबून विचार करत)

आणि याला खर्च किती येईल?? म्हणजे पैशाची जुळवाजुळव करावी लागेल ना म्हणून विचारतेय.. नसतील तर आताच कुणाशी बोलून बघावं लागेल..

गार्गी - अ.. हे तर मी विचारलच नाही.. मी विचारून सांगते.. माझ्या कडे गौरंगीसाठी जमा केलेला फंड आहे तसा.. काही गौरव कडे असतील..

आई - हो आणि काही माझ्या पण अकाउंटला असतील ते काढून घे..

गार्गी - हो आई बघुयात.. आणि तरी पण जर कमी पडलेच तर मग आई पापांना विचारू..

आई - ठीक आहे..

गार्गी बोलता बोलता कुठल्या विचारात गेली.. तेव्हा

आई - काय झालं ग??आणखी काही अडचण आहे का??

गार्गी - काही नाही आई? पैसे तर जमा करता येतील पण ओपेरेशन जर पूर्णपणे यशस्वी नाही झालं तर मला याच आजारासह जगावं लागेल.. आणि ज्या स्टेजला मी आहे त्या स्टेजला ओपेरेशन यशस्वी होणं याची पूर्ण शाश्वती डॉक्टरांना पण नाहीय, झालं तर होऊन जाईल म्हंटले ,अन्यथा निदान माझं आयुष्य तरी वाढेल अस त्यांनी सांगितलं.. पण जर पुढेही हेच सगळं होऊ शकते किंवा होणार असेल तर आता एवढे पैसे वाया घालवून कशाला एवढं सगळं करायाचं.. त्यापेक्षा जितकी जगले तितकी जगले.. आज ना उद्या प्रत्येकाला मरण तर येतेच ना..

आई - वेडीं झाली आहे का?? निदान त्या लहानश्या जीवांचा तरी विचार कर..तिला तुझी गरज आहे आणि तू जर गेली तर कोण बघणार आहे तिच्याकडे?? आणि प्रत्येकाला जावंच लागतं पण हे काही वय आहे का मरण्याचं.. अजून 30शीची आहेस तू.. आणि राहिला प्रश्न पैश्यांचा तर पैसे माणसासाठी असतात, माणूस पैश्यांसाठी नव्हे.. ते पुन्हा कमवल्या जाऊ शकतात.. पण तू गेली तर आम्ही तुला कुठल्याच पद्धतिने परत मिळवू शकणार नाही.. आणि तुला नाही वाटत का आम्हाला तुझी गरज आहे..

गार्गी - तसं नाही आई, तुम्हाला माझी गरज आहे, पण आज मी तूमची काळजी घ्यायची तर उलट तुम्हाला माझी घ्यावी लागत आहे, आज नाही तर उद्याही जर असंच असणार असेल तर मला नाही अस जगणं सहन होणार..

आई - तू हा विचार का नाही करत की जर पुढे तू चांगली झालीस आणि या सर्वांतून बाहेर पडली तर .. तेव्हा तर तू आमची काळजी घेऊ शकशील ना.. तेव्हा आम्ही आता घेतलेल्या काळजीचे सगळे हिशोब व्याजासकट चुकते करून घेऊ तुझ्याकडून .. पण आता उगाच अस मूर्खासारखा काहीही विचार करू नको.. पटकन तुझ्या आई वडिलांशी बोलून घे..

गार्गी - हो, थँक्स आई, मला आधार आणि सकारात्मक विचार दिल्याबद्दल..


तिने हॉस्पिटलमध्ये फोन लावून सगळी विचारपूस केली खर्च किती लागेल वगैरे.. आणि पुढे डॉक्टरांच्या सल्ल्याने ओपेरेशन ची तारीख घेतली..


नंतर तीने लगेच तिच्या वडिलांना फोन केला.. आणि नाईलाजाने पण फोनवरच त्यांना थोडीशी वरवरच कल्पना दिली .. आणि ओपेरेशन ची तारीख सांगून त्यांना शक्य तितक्या लवकर निघून यायला सांगितलं.. ओपेरेशन करण्याची तारीख 6 दिवसांनंतरची होती.. त्यांच्या मुलीला अस काही आजार असल्याचं ऐकताच ते खचून खाली बसले.. पण कस बस स्वतःला सावरत ते घरी पोचले आणि त्यांनी गार्गीच्या आईलाही सगळं सांगितलं.. ऑफिसमध्ये एक खूप महत्वाच्या कामावर गार्गीचे वडील काम करत होते.. ते सोडून लगेच निघून जाणं त्यांना शक्य नव्हतं, नाहीतर यांच्यावर लीगल ऍक्शन होऊ शकल्या असत्या.. त्यामुळे त्यांनी लगेच पुढे तीन दिवस काम करून ते काम संपवण्याचा प्रयत्न केला आणि चौथ्या दिवासापासून 15 दिवसांच्या सुटिचा अर्ज टाकला..

आज रात्रीच्या गाडीने ते दोघेही गार्गीकडे निघणारच होते.. सकाळी गार्गीच्या वडिलांना थोडं ऑफिसमध्ये काम होतं, आणि सुटीचा अर्जही वरीष्ठांकडून मंजूर करून घायचा होता, तेव्हा "मी तेवढं आवरून लगेच येतो " अस म्हणत त्यांनी गार्गीच्या आईला सगळी पॅकिंग करून ठेव म्हणून सांगितलं आणि ते ऑफिसकडे निघाले..

क्रमशः
-------------------------------/------------------/-----/---------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED