Brother Bandaki books and stories free download online pdf in Marathi

भाऊ बंदकी

भाऊ बंदकी

दुपारचं जेवण करून मी बाहेर कट्ट्यावर पुस्तक वाचत बसलो झाडाखाली. लॉकडाऊनमुळे सगळे घरातच होते. मी थोडं आजूबाजूला पाहिलं. सर्व शांत होत. भर दुपार होती. चांगलच कडक ऊन होत. नाक्यावरून एक बाई डोक्यावर कापड घेऊन तोंडावर पदर ठेवून चालत येताना दिसली. कोण असेल म्हणून जरा जवळ आल्यावर बघितलं तर अंदाज आला माझी चुलती होती. मी बघून न बघितल्या सारखे केलं आणि पुस्तकात डोकं घातलं. चुलती माझ्यासमोरून हळू चालत गेली हे मला जाणवलं. पण मी काय लक्ष दिले नाही. गेले पंधराएक वर्षांपासून आमचं बोलणं नाही. चुलतीने बोलणं टाळलं होतं. आमच्या ह्या वडिलोपार्जित वाड्यावरून वाद होता चुलत्यात आणि वडीलात. वडील जाऊन पाच वर्षे झाली. घराच्या वाटणीत अर्धा वाडा त्यांना आणि अर्धा आम्हाला आला होता. आम्ही वरती बांधून प्रशस्त, व्यवस्थित केले होते. शेजारी चुलता आणि चुलती राहायची. दोन घराच्या मधोमध भिंत बांधली होती चुलत्यानं. नंतर वाटणीच खूळ चुलतीन काढलं होत. भावकीतून कळले होते की, आम्ही दोन्ही भाऊ कधी लक्ष देत नसत. आम्ही आणि आमचं घर एवढंच. कधी येणं जाणं नाही. बोलणं नाही. पण वडील जाताना एकच सांगून गेलते, माझ्या भावाला अंतर देऊ नका. तो चुकला पण माझा भाऊच आहे. हीच एक कुरकुर ते हृदयात घेऊन गेले.
मग चुलती परत बाहेर आली आणि नाक्यावर गेली. मी पाहिलं गाडी काढली. मागे गेलो. पुढं चुलती वळणावर उभी होती. मी तिच्यापशी गेलो आणि विचारलं, "काय ग काकू, काय झालं?" चुलती थोडं घाबरल्या स्वरात म्हणाली, "अरं तुझ्या काकाच्या बीपी आणि शुगरच्या गोळ्या संपल्यात दोन दिवस झाले. लै त्रास होतंय त्यांना. गाडी मिळत नाही ना रिक्षा, सगळं बंद आहे. मी म्हटलं, "बघू गोळ्या पाकीटं". तिने जुने पाकीट दिले आणि दोनशे रुपयांची नोट आणि म्हणाली जर जमल्यास अर्धा किलो डाळ पण मिळाली तर घे." मी पिशवी आणि पैशे घेऊन गाडीवर निघालो. चुलतीला एकच मुलगा होता सुनील. आम्ही बंटी म्हणायचो. लहानपणी एकत्र खेळायचो आम्ही. एकत्र खात-पीत खेळायचो. तो मला दाद्या म्हणायचा. पुसटस् आठवते, पण नंतर येणच बंद केलतं त्यांनी. फार जीव होता माझ्या आईचा त्याच्यावर. आणि छोटी चिमू ती पण फार गोड होती. नंतर त्यांनी यायचे बंद केल्यापासून परत बोलणं नाही. चिमू परदेशी असते. पाच वर्षांपूर्वी आली होती आणि बंटी हा कलकत्यात असतो. लव्हमॅरेज करून तिकडेच सेटल झाला. तो पण चिमू आली तेव्हाचं दिसला होता. परत काय आला नाही. चुलता भूसंपादन विभागातुन सेवानिवृत्त झाला होता. पेन्शनवर घर चालत असेल. आधे मधे चिमू आणि बंटी पैसे पाठवत असतील.. जर नसतील पाठवत तर कसं दिवस काढत असतील ह्या विचारांच्या घालमेलीत कधी मेडिकल दुकान आले कळालच नाही. उतरून गोळ्या घेतल्या. दोन महिन्यांच्या एकदाच घेतल्या परत त्रास नको म्हणून. बाजूला किराणा मालाचे दुकान चालू होते. तिथून डाळी, तांदूळ आणि इतर भाजी व टमाटे, बटाटा, कांदा असे वस्तू त्याच दुकानात भेटली. मग ते घेऊन निघालो. घरासमोर गाडी लावली. आई गेटसमोर आली होती. मी आईकडे बघत चुलत्याच्या घरात गेलो. चुलता खुर्चीवर बसला होता. त्यांनी माझ्याकडे बघितले. भिंतीवर वडिलांचा, चुलत्याचा फोटो लावला होता. कुंकू लावलेलं फोटोला बघून माझं मन भरून आलं. भावाचं प्रेम होतं शेवटी. चुलती आली. मी पिशवी तिच्याकडे दिली. चुलती भारावून आली होती. चुलता उठला. माझ्या डोक्यावर हात ठेवत डोळे पुसत आत गेला. चुलती स्वतःला सावरून, "एवढं सगळं आणलं.. घरात खरंच काय न्हवतं रे.. वरचे किती पैसे देऊ ?" मी दोनशेची नोट तिच्या हातात ठेवत, राहू दे म्हणालो. सगळं ह्या पैश्यापायी झालंय गं. चुलती न राहवता माझ्या गळ्यात पडून रडली. चुलता आतून गूळ शेंगा घेऊन आला. माझ्या खिशात टाकला. लहानपणी तो माझ्या खिशात असंच गपचिप टाकायचा हे आठवलं. मला चुलता विसरला न्हवता. मी सावरलो, चल येतो मी म्हणालो. काय लागलं सवरलं तर हाक मार म्हणून मी बाहेर आलो. आईने फाटक उघडलं. आत गेलो. आईचे डोळे पाणावले होते. तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि वडिलांच्या फोटोला दिवा लावला.
मग मी कधी काय आणायला जातो तेव्हा चुलती बाहेर येते. किश्यात पैसे ठेवते आणि पिशवी देऊन काय पाहिजे ते सांगते. आज महिना होत आला लॉकडाउनला. दिवस चालले आहेत पण आज सकाळपासून पलीकडील भिंतीचा आवाज येत होता जोरात. जसे भीतीवर मारल्या सारखे. आम्ही उठून बाहेर गेलो. बघतो तर चुलती घरा बाहेर रडत उभारली होती. मी विचारायच्या आधी ती मला रडून सांगू लागली, "बघ रे पिंट्या, काका कसं करायला ?" मी, आई आणि लहान भाऊ पटकन आत गेलो. चुलता पार घेऊन भिंतीवर मारत होता. आम्हाला बघितल्यावर पार बाजूला टाकली. आईकडे बघत पुढं आला. आईच्या समोर येऊन हात जोडत माफ कर मला वैने म्हणत खाली बसला. आणि ओकसाभोक्षी रडू लागला. आईच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं. चुलती तिथंच होती. ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. मी, माझा भाऊ, आमच्या बायका हे सर्व बघत उभे होतो. आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. चुलत्याला उठवून खुर्चीवर बसवले. तो थोडा शांत झाला. आईच्या डोळ्यातले पाणी बघून, त्याला कळले की आईने त्याला कधीच माफ केलंत. शेवटी ऋणानुबंधाची नाती तुटत नसतात. अखेर घर एकत्र आल होतं. आम्ही दोन्ही भावानी आणि आमच्या बायकांनी काय बोध घ्यायचा तो घेतला आणि ते कायम मनाशी बांधून ठेवला.


( ही कथा एका निनावी लेखकांनी लिहिलेली असून त्यांनी नावं न टाकता समाजाच्या हिता साठी व्हायरल केली असेन..)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED