Pathmor saundarya books and stories free download online pdf in Marathi

पाठमोरं सौंदर्य

बसस्थानकातील अमीतची टपरी म्हणजे गणेशच्या चार-पाच मित्रांचा लाईन मारण्याचा अड्डाच होता. अभ्यास करता-करता कंटाळा आला की, गणेश आंबट-चिंबट गप्पा ऐकण्यासाठी, बसस्थानकात येणाऱ्या पोरी पाहण्यासाठी त्यांच्यात सामील व्हायचा. अमीतची टपरी म्हणजे असं एक माहिती केंद्र होतं जिथे गावातल्या, गावाबाहेरच्या, राजकारणातल्या, लफडयांच्या सगळया गोष्टी माहिती व्हायच्या.

एके दिवशी अमीतच्या टपरीत गणेश बसला होता. तेवढयात त्याला बस मधून कोणीतरी स्त्री उतरताना दिसली. तिचा चेहरा पलीकडे असल्याने त्याला तिचा चेहरा दिसला नाही. पण तिचं पाठमोरं सौंदर्य अप्रतिम होतं. एखाद्या कलाकारानं एखाद्या साच्यातून सुंदर लावण्यखणीची मुर्ती साकारावी तशीच त्या साच्यातील सुंदर मुर्तीच्या आकृती प्रमाणेच किंबहुना त्याहून सुरेख,रेखीव शरीर होतं तिचं. तिच्या अशा पाठमोऱ्या सौंदर्याने गणेश मोहीत झाला. तिचा चेहरा पाहण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली. पण ती थेाडया वेळात त्याच्या नजरेआड झाली. ती नजरेआड होताच त्याचं मन बेचैन झालं. मित्रांना कलटी मारुन तो बसस्थानकाच्या बाहेर आला.

ती त्याला रिक्षात बसताना ओझरतीच दिसली.पण तिचा चेहरा काही त्याला दिसला नाही. गणेशने पटकन गाडीला किक मारली आणी तो रिक्षाचा पाठलाग करु लागला. रिक्षाच्या बरोबरीनं जावून तिचा चेहरा पाहण्यासाठी तो धडपड करु लागला. पण रस्ता अरुंद होता. शिवाय रस्त्यात खुप गर्दी होती. रिक्षा थेाडा वेळ डोळयाआड होताच त्याचं मन बेचैन होत होतं. तो पुन्हा वेगानं गाडी चालवून रिक्षाला गाठत होता. रिक्षावाला पण जोरात रिक्षा पळवत होता. एखादा शिकारी जसा आपलं सावज टिपण्यासाठी तिक्ष्ण नजर ठेवतो. त्याप्रमाणे तो रिक्षावरील नजर किंचीतही ढळू देत नव्हता. रिक्षा छ.शिवाजी महाराज चौकात आली. तेवढयात गणेशला त्याचा मित्र ‘सच्या’ रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसला. त्याच्यासाठी थांबावं तर रिक्षा डोळयासमोरुन नाहीसा होईल. अन् मग त्याला त्या सुंदरीचा चेहरा दिसणार नाही. या विचारात त्याने सच्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं. तरी सच्याने गणेशला बघीतलचं.सच्या गणेशला मोठयानं हाका मारु लागला. तेव्हा तर गणेशने मुद्दाम न ऐकल्यासारखं करुन गाडीचा वेग वाढवला.

रिक्षा आता एका जागेवर थांबला. त्या सुंदरीनं पैसे काढून रिक्षावाल्याला दिले. गणेश रिक्षाच्या मागेच थांबला. पण तिचा चेहरा पलीकडे असल्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसु शकला नाही. ती सुंदरी आता एका बोळीतून चालू लागली. त्याने पण रस्त्याच्या बाजूला गाडी लावली.ती कुठं जाणार? तिचं घर कुठं आहे? याबाबत त्याच्या मनात कुतुहल जागं झालं. तो तिच्या मागे-मागे चालू लागला. चालता-चालता तिचं पाठमोरं सौंदर्य न्याहाळू लागला. तिचं ते पाठमोरं सौंदर्य पाहून त्याचं मन आणखी तिच्याकडे आकृष्ट झालं.

आता तो तिच्या पुढं जावून तिचा चेहरा पाहू शकत होता. पण आता त्याला तिचं घर माहित करुन घ्यायचं होतं. म्हणून तो तिच्या गतीनचं तिच्या मागेच चालत होता. तेवढयात त्याला त्याचे वडील समोरुन येताना दिसले. त्यांना पाहून तो पटकन एका किराणा दुकानात शिरला. सुदैवानं त्याच्या वडीलांनी त्याला पाहिलं नव्हतं. तेवढयात दुकानदारानं त्याला विचारलं काय देवू? काही घ्यायचं नसताना त्याने दोन चॉकलेट घेतले. वडीलांना थोडं दूर जाऊ दिलं. पुन्हा रस्त्याकडं पाहिलं, तर त्याला ती सुदरी दिसली नाही. त्याचं मन बेचैन झालं. त्या रस्त्यानं तो जोरात चालू लागला. सुदैवानं ती त्याला रस्त्याच्या उजव्या बोळीत शिरताना दिसली. त्यामुळे काहीतरी हरवून गवसल्यावर जसा आनंद व्हावा. तसा आनंद त्याला त्याक्षणी झाला.

तिच्या जवळ जाईपर्यंत त्याने चालण्याचा वेग वाढवला. तिच्या जवळ जाताच तिच्या सारख्या गतीनं तिच्यापासून थोडं अंतर ठेवून तो चालू लागला. वाटेतला प्रत्येक माणूस तिला पाहत होता.त्यावरुनच तिच्या सौंदर्याचा अंदाज येत होता. थोडं अंतर चालून गेल्यावर ती डाव्या बोळीमध्ये शिरली आणी गणेशच्या मनात तिच्याविषयी आणखी कुतुहल जागं झालं. कारण ती ज्या बोळीमध्ये शिरली होती. ती बोळी देहविक्रय करणाऱ्या वेश्यांची होती. त्याच्या मनामध्ये आलं, इतकी सुंदर असणारी स्त्री या मार्गाला कशी आली असेल?

ती तर त्या बोळीमध्ये शिरली होती. पण त्याला आत जावसं वाटेना? जर मला कोणी इथं पाहिलं तर लोक काय म्हणतील? सगळीकडं आपली बदनामी होईल? असे विचार त्याच्या मनात आले. पण तिचा चेहरा पाहण्याच्या कुतुहलापोटी तो इकडं-तिकडं पाहत तिच्या मागं-मागं चालू लागला. तेवढयात त्याला त्याच्या वडीलांचा फोन आला. बहुतेक त्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली गाडी पाहिली असावी असा विचार त्याच्या मनात आला. त्याने पहिल्यांदा फोन उचलला नाही. परत त्यांचा फोन आला. आता जर नाही उचलला तर घरी गेल्यावर बोलणे खावे लागतील. म्हणून त्याने फोन उचलला. त्यांनी एकाच दमात त्याला तीन प्रश्न विचारले, “कुठे आहेस? फोन का उचलत नव्हता? आणी गाडी इथं रस्त्यात का लावलीस?” आता तिन्ही प्रश्नांचं काय उत्तर द्यावं? हे त्याला कळेना. तरी तो म्हणाला, “मी इकडं मित्राच्या घरी आलो आहे, गाडी लावली इथून जवळच मित्राचं घर आहे.” तेवढयात त्याचे वडील म्हणाले, “बरं.पटकन ये बरं इकडं, मला जरा महत्वाचं काम आहे, गाडी पाहिजे.” आता काय करावे? त्याला काही सुचेना “बरं येतो.” म्हणून त्याने फोन ठेवून दिला.

त्याचं एक मन म्हणत होतं. आपले वडील आधीच रागीट स्वभावाचे आहेत. आणी आपण तर गाडी जेथे लावली तेथून बऱ्याच अंतरावर आहोत. आपण जर लवकर नाही गेलो, तर वडील चिडतील. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे त्यामुळे त्यांना पटकन गाडी पाहिजे आहे. त्यामुळे आपल्याला पटकन तिकडं गेलंच पाहिजे. तर दुसरं मन म्हणत होतं, जिचा चेहरा पाहण्यासाठी आपण इतक्या लांब आलो आहोत. तो सुंदर चेहरा पाहता नाही आला तर त्या गोष्टीची रुखरुख आपल्या मनाला कायम लागून राहील. मनाची अशी द्विधा मन:स्थिती असताना काही झालं तरी तिचा चेहरा पाहूनच परत जायचं असं ठरवून त्याने मोबाईल बंद करुन टाकला.

तो झपाझप पावलं टाकीत तिच्या जवळ गेला.तो तिचा चेहरा पाहणार तेवढयात, त्याच्या गल्लीतले आंबट शैाकीन रम्या आणी जन्या त्याला समोरुन येताना दिसले. तेवढयात तो पटकन एका खोलीत शिरला. त्या खोलीमध्ये दहा-पंधरा सुंदर मुली गिऱ्हाईकाची वाटच पाहत होत्या.त्याला पाहताच त्या त्याला छेडू लागल्या. एक दोघी जणी तर अंगाला खेटु लागल्या, त्याच्याशी लगट करु लागल्या. त्याला या बाबतीत काहीच अनुभव नव्हता. तशा प्रकारानं त्याचं हदय जोरजोरानं धडकु लागलं. तेवढयात त्याच्या दुर्देवाने रम्या आणी जन्या त्याच खोलीत आले. त्यांनी त्याला पाहिलं, अन् त्याला म्हणाले,

“का?, गण्या, इकडं कसा काय?वाट चुकला काय?”

त्याला काय बोलावे सुचेना. त्याने काही न बोलता तेथून पटकन पळ काढला. तो रस्त्याला आला. त्याने सगळीकडे नजर फिरवली पण त्याला ती दिसली नाही. जिच्यासाठी जिवाचा आटापिटा केला ती पुन्हा अदृश्य झाल्याने तो आणखी निराश झाला. पण त्याने तिला पाठीमागून पाहिलं होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीवरुन व तिच्या लाल साडीवरुन तो तिला ओळखु शकणार होता. तिला पाहिल्या शिवाय परत जायचचं नाही असे ठरवून तो तिचा शोध घेऊ लागला. गल्लीतल्या प्रत्येक खोलीत जावून तिला शोधू लागला. आणी शेवटी एका खोलीमध्ये त्याला ती दिसली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीवरुनच त्याने तिला ओळखलं. त्याचं मन आनंदून गेलं. आता तिचा चेहरा पाहण्याची वेळ आली होती. तो तिच्याजवळ गेला आणी त्याने तिचा चेहरा पाहिला. क्षणभर काय करावं? त्याला काहीच सुचेना. कारण जिच्या पाठमोऱ्या सौंदर्याने मोहीत होवून त्याने त्या पाठमोऱ्या सुंदरीचा चेहरा पाहण्यासाठी एवढी धडपड,धावपळ केली होती, ती सुंदरी नसून एक तृतीयपंथी होता.

त्याने तात्काळ तेथून पळ काढला. त्या गर्दीतून उडून पटकन बाहेर पडावं, असं त्याला वाटु लागलं. तो जोरानं पळत सुटला. अचानक त्याला त्याच्या वडीलांची आठवण झाली. ते त्याची वाट पाहत उभे आहेत. त्याच्या मनामध्ये एक-एक विचार येऊ लागला. रम्या आणी जन्यानं आपल्याला इथं पाहीलं आहे. ते नक्कीच आपलं नाव वडीलांना सांगणार. सगळया गल्लीमध्ये आपली बदनामी होणार. आपण काही केलं नसताना उगाच आपण बदनाम होणार. या विचाराने तो स्वत:वरच चिडला होता. फक्त एक चेहरा पाहण्यासाठी आपण आपला मित्र एवढचं काय आपल्या वडीलांकडेही दुर्लक्ष केलं होतं. या पश्चातापात आणी आता वडीलांना काय उत्तर द्यावं याच विचारात तो चालत होता.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED