आईची आई Adv. krishna patil. द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आईची आई

......मदर्स डे #### आईची आई ###.....

आईची आई म्हणजे आज्जी कशी होती आता आठवत नाही. आईचा आज्जीवर आणि आज्जीचा आईवर खूप जीव होता एवढं मात्र आठवतंय.

आई एकुलती एक. तिला सख्खा भाऊ नाही. सख्खी बहिण नाही. आज्जीचे माहेर तांदळगाव. गावापासून दोन तीन मैलावर. .

मी एकदम लहान होतो. त्यावेळी आज्जी खूप थकली होती. अगदी झोपून होती. माचूळी शेजारीच तिला एक बाजलं टाकलं होतं. तिथे दिवसा पण अंधार असायचा. आई थोड्या थोड्या वेळाने आज्जीकडे जात होती. चहा देऊ का? साबुदाण्याची खीर देऊ का? तांदळाची पेज देऊ का? असं सारखं विचारत होती. आज्जीचा फक्त कण्हण्याचा आवाज यायचा. आज्जी कण्हतच म्हणायची "अन्नावरची वासनाच उडालीय बघ. तोंड कडूईक झालय. आता काहीही नको".

आईची चिंता वाढली होती. ती आज्जीकडं सारख्या येरझाऱ्या घालत होती. आजीच्या तोंडावरनं हात फिरवत होती. तिचा जीव टांगणीला लागलेला. तडफड-तडफड चाललेली.

आज्जीने तिला लहानाची मोठी केली. अंगाखांद्यावर खेळवलं. आई चांगली दहा वर्षाची झाली तरी आज्जी तिला काखेला घेऊनच फिरायची. ती आज्जी आज शेवटच्या घटका मोजत होती. आईच्या डोळ्यादेखत ती कुठे तरी अज्ञात प्रवासाला निघाली होती. आतड्याचं शेवटचं माणूस जाणार होतं. मायेचं सारंच संपणार होतं. मग आई एकटी पडणार होती.

आई डोळ्याला पदर लावायची. सारखं डोळं पुसायची. कधी हरिपाठ म्हणायची. कधी आज्जी वरून लिंबू ऊतरून टाकायची. कधी एखादा दामटा करून तिकाटण्यावर नेऊन टाकायची. आईला बरं वाटू दे म्हणून देव्हाऱ्यातल्या देवाला नवस करायची. चुलीतली राख घेऊन देव्हाऱ्यात ठेवायची. काहीतरी पुटपूटायची. मग तो अंगारा आज्जीच्या कपाळाला लावायची. चिमूटभर तिच्या तोंडात टाकायची.

आईची ही अशी तलकली झालेली. मला अगदी थोडं कळत होतं. मी पहिली दुसरीलाच असेन.

दिवस मावळतीला निघाला. अंधार पडू लागला. आईनं शेवग्याच्या शेंगाचं कालवण केलं. दोन तुकडं बशीत घेतलं. गरम अर्धी भाकरी घेतली. आज्जीजवळ कंदील लावून तिला चारत बसली. एक घास आज्जीनं खाल्ला. दुसरा घास खाताना तोंडच लूळं पडलं. बशी आणि भाकरी तिथेच ठेवून आईनं हंबरडा फोडला. "माझी हरणी ग. आता मी काय करू? आता तुझ्या नातवांना मोठं झालेलं कोण बघणार? आम्हाला वाऱ्यावर सोडून कशी गेलीस ग....

आज्जीचा तो काळ आणि मृत्यू एवढाच आठवतो.

आज्जी गेली. घर सुनं सुनं झालं. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या बायका घराकडे यायच्या. आई त्यांच्या गळ्यात पडून रडायची. आज्जीचं गुणगाण गायाची. एखादं बापय माणूस यायचं. आई त्यांना विचारायची, "आत्ता तुमच्या संग बोलतीय का हो माझी आई?"

रस्त्याच्या कडेलाच घर. आज्जी कायम अंगणात बाजल्यावर बसलेली असायची. येणाजाणाऱ्याला बोलवायची. बसा म्हणायची. पाणी द्यायची. आईला चहा करायला लावायची. पण प्रत्येकाला बोलवल्याशिवाय राहायची नाही. आईला पण याची सवय झालेली होती.

आता आज्जी गेल्यानंतर अंगण ओस पडलं. बाजलं निर्जीवपणे पडून राहीलं. जाणारा येणारा बाजल्याकडे बघून हळहळत असे. आईला मग जास्तच भडभडून येत असे.

त्यानंतर आई आज्जीची रोज आठवण काढायची. सकाळी उठलं की आज्जीच्या समाधीला चहा घालायची. जेवायच्या अगोदर निवद दाखवायची. सणासुदीला निवद दाखवल्याशिवाय आम्हाला पण जेवायला द्यायची नाही.

आज इतक्या वर्षानंतरही आईचा जीवघेणा आक्रोश लक्षात आहे. ती काळोखी रात्र... घरभर पसरलेला कंदीलाचा कावीळ झाल्यागत प्रकाश. आजारी आज्जीची उदासी.. आईनं आणलेल्या बशीतल्या शेवग्याच्या शेंगा... आजीने खाल्लेला शेवटचा घास.. त्यानंतर आईचा हंबरडा... ते उदास आणि दुःखी वातावरण... येणाऱ्या जाणाऱ्या जवळ आई आज्जीचे गुण गायाची. ती कशी होती. तिनं कसं लहानाचं मोठं केलं. सगळं गाव तिला कसं नावजत होतं. ती किती कष्टाळू होती. तिनं कसा प्रपंचा उभा केला. वगैरे सांगत राहायची.

आज वाटतं, आईचं एकटेपण त्यावेळी किती भयानक होतं? तिला हक्काचं आधार देणारं कोणीच नव्हतं. तिच तिच्या आईची आई झाली होती. तिचं दुःख वाटून घेता आलं असतं तर? तिचा आघात कमी करता आला असता तर?

पण असा विचार करून तरी काय उपयोग?
शेवटी ज्याचं दु:ख त्यानच भोगायचं.. आज्जी गेली. त्यानंतर काही वर्षातच आई गेली. आईच्या त्यावेळच्या दु:खाला आपण काहीच करू शकलो नाही ही खंत मात्र कायमची राहीली..!!

ॲड. कृष्णा पाटील.
तासगाव. जि. सांगली.