रात्रीचे अकरा वाजून गेले होते. चांदण्या रात्रीत मी बाहेर अंगणात खुर्ची टाकून अंगावर ब्लॅंकेट घेऊन बसलो होतो. खूप वर्षांपूर्वीच्या आठवणींना ताजे करत होतो. डायरीचे प्रत्येक पान वाचताना मन भरुन येत होते. आठवणी मला अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची जाणीव करून देत होत्या. मी डायरी मिटली आणि खुर्चीला पाठीमागे रेलून आकाशातील ताऱ्यांकडे पाहू लागलो. असंख्य तारे होते... काही दिसत होते आणि काही दिसत नव्हते. कदाचित त्या ताऱ्यांमध्येच माझी तन्वी कुठेतरी असेल.. आणि तिथून ती मला पाहत असेल. कदाचित तिला तिथे खूप सारे मित्र-मैत्रिणीही भेटले असतील... पण तिला माझ्या व तिच्या आठवणी लक्षात असतील ना?
वार्याची एक थंडगार झुळुक अंगाला स्पर्शून गेली. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. पण मी खात्रीने सांगू शकतो.. हा अंगावर उभा राहिलेला काटा थंडीचा नव्हता, आम्ही दोघांनी निर्माण केलेल्या आठवणींमुळे तो काटा अंगावर उभा राहिला होता. आठवणी, किती सुंदर गोष्टी असतात ना...
" मिस यु... तन्वी.."
मी आकाशातील त्या ताऱ्यांकडे पाहत म्हणालो. " आता अजून किती वेळा ऑक्टोबरची थंडी मला त्रास देणार? पण तुला खरं सांगू का... मला ही ऑक्टोबरची थंडी जरी त्रास देत असली.. तरी तो त्रास मला आवडतो.. कारण त्या त्रासात आपल्या आठवणी आहेत! ज्यावेळी तू सोबत होतीस.. तेव्हा मला त्या क्षणांचे मोल नाही कळाले.. पण आता, तू आठवणींमध्येच कायमची बंद आहेस... मला गेलेल्या त्या क्षणांची किंमत कळाली आहे... तू बरोबर होतीस! आणि मी चुकीचा..." मी आकाशाकडे बघत म्हणालो. माझ्या डोळ्यांतून अलगद पाण्याचे थेंब वाहू लागले. हातातील बंद डायरीकडे मी बघितले.. ज्या डायरीमध्ये माझ्या आणि तन्वीच्या आठवणी कैद होत्या.. त्या डायरीच्या मुखपृष्ठावरून मी माझा हात फिरवला. त्या डायरीचे नाव मी पुन्हा पुन्हा वाचू लागलो आणि आठवणींमध्ये रमू लागलो.
" ऑक्टोबर.." मी डायरीचे नाव पुन्हा एकदा उच्चारले आणि डोळे मिटून खुर्चीला पाठीमागे रेलत पुन्हा एकदा आठवणींच्या भवसागरात बुडून गेलो...
_____________________________
“तुला काय वाटतं रे अभिषेक, मी नरकात जाईन की स्वर्गात? आता तुझ्यासोबत एवढे कांड केलेच आहेत.. तर नक्कीच नरकात जाईल ना? आणि तुझी मी तिथे वाट बघत असेन... तू सुद्धा नरकातच येणार आहेस मला माहित आहे.” तन्वी हसत म्हणाली. जसजशी ती हसत होती तसतसे मला वेदनांच्या झळा बसत होत्या. मला शब्द फुटत नव्हते की तन्वीच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे हे सुद्धा कळत नव्हते. वयाच्या तेराव्या वर्षी तिला थायरॉईड कॅन्सर झाला होता. आज ती पाच वर्षांची आहे आणि तिचा कॅन्सर अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता. डॉक्टरांनी तिला फक्त एका महिन्याची मुदत दिली होती. तन्वी अजून सात ते आठ महिने जगू शकत होती, पण त्यासाठी तिला लंडनला उपचार घेण्यासाठी जावे लागणार होते व त्यासाठी खूप खर्चदेखील होता. तन्वीच्या बाबांनी तन्वीला खूप समजावले होते की आपण लंडनला जाऊया.. पण तन्वी अजिबात तयार नव्हती. ती आता मरणार होती.. फक्त एकच महिना उरला होता तिच्या आयुष्याला... आणि मला आयुष्याची किंमत समजून आली. खरं आहे, जोपर्यंत आयुष्याची ठराविक मर्यादा आपल्याला कळत नाही... तोपर्यंत त्या आयुष्याची आपल्याला किंमत समजत नाही. मी तलवी ला आठवीपासून ओळखत होतो.आम्ही दोघेही खूप चांगले मित्र होतो. दहावीला आम्हाला सेम टक्केवारी पडली होती. आणि दोघांनीही कोल्हापूरच्या एकाच कॉलेजमध्ये एकाच साईडला ऍडमिशन घेतले होते. मला खूप वाईट वाटत होते.. मला माझ्या भावना सांभाळता येत नव्हत्या. तन्वी हसत होती आणि तिच्या हसण्यापाठीमागचे दुःख समजून मला रडू येत होते..
" तू कुठेही मरणार वगैरे नाहीस..." मी म्हणालो. ती अजून मोठ्याने हसली. अचानक ती माझ्याजवळ आली आणि माझ्या हातात हात घालून तिने माझ्या खांद्यावर आपली मान टेकवली. संध्याकाळचे सहा वाजून गेले होते आम्ही नदीच्या किनारी घाटावर बसलो होतो. सूर्यास्ताची सुंदर किरणे नदीच्या पाण्यावर पडली होती. कुठून तरी पक्षी किलबिल करत होते. वाहत्या पाण्याचा आवाज येत होता आणि वाऱ्यामुळे बेट हलत होते व त्याचा आवाज येत होता.
" तुला खरंच असं वाटतंय की मी मरणार नाही?" तन्वी एकदम गंभीर आवाजात म्हणाली.
" म्हणजे तू अजून तरी जिवंत आहेस ना?" मी तिला म्हणालो. तिला कॅन्सर होता त्यामुळे तिच्यासोबत नेहमीच एका बॅगेत ऑक्सीजन टँक असायचा. तिला श्वास घेण्यासाठी त्या ऑक्सिजन टॅंक ठेवलेल्या बॅगेतून एक लहानशी नळी कानावरून तिच्या नाकात घातली होती. एकूणच तिचे रूप खूप पालटले होते.. आणि तरीही त्यात ती खूप सुंदर दिसत होती.
" पण हा ऑक्टोबर महिना संपला.. तर मी मरून जाईन! कदाचित मला पुढची दिवाळी सुद्धा बघायला मिळणार नाही.. पण माझ्या वतीने तू साजरी कर... करशील ना?" ती म्हणाली आणि तिने माझा हात आपल्या हातात अगदी घट्ट पकडला. काहीवेळा आम्ही दोघांनी काहीच बोलले नाही. माझ्या गळ्यात हुंदका आला होता. माझे डोके तन्वीच्या डोक्याला टेकवून मी गुणगुणू लागलो.
" तुला माहिती आहे अभिषेक.. मला अजिबात वाटलं नव्हतं, की माझ्या आयुष्याचा शेवट असा होईल. माझी स्वप्ने, माझ्या इच्छा.. कायम शेवटपर्यंत अपूर्ण राहणार.. तुला माहिती आहे का? माझं स्वप्न होतं.. मला शेक्सपियरपेक्षा जास्त चांगलं लिहायचं होतं.. बुलेट घेऊन केदारनाथला सोलो ट्रॅव्हलिंगसाठी जायचे होते. दिल्ली ते काठमांडूचा प्रवास विमानाने करायचा होता. हॅरी पॉटर या पुस्तकापेक्षा चांगले जादुई पुस्तक मला लिहायचे होते. खूप स्वप्ने होती माझी... पण आयुष्याने मला शेवट पर्यंत साथ नाही दिली.. आणि ही स्वप्ने अधुरीच राहणार. तुला माहिती आहे का? मला माझ्या आयुष्यात असं काहीतरी करायचं होतं... जेणेकरून मी मरेन, पण माझे नाव अमर राहील.. पण.." शेवटचे वाक्य रडक्या स्वरात बोलत ती बोलायची थांबली. तिला रडू फुटले होते.. तिला रडताना पाहून माझे मन अस्वस्थ झाले. मी तिला रडू दिले... कारण जोपर्यंत ती मनसोक्त रडत नाही, तोपर्यंत तिला हलके वाटणार नाही..
" या एका महिन्यात मी काय करू? दररोज रात्री मी झोपल्यानंतर बाबा माझ्या खोलीत येतात.. माझ्याजवळ बसतात आणि माझ्या तोंडावरून हात फिरवतात... ते रडतात..! मी जागीच असते पण झोपल्याचे नाटक करत असते... मला बाबांना सोडून नाही जायचे रे..!" ती हुंदके देत म्हणाली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला शांत बसवण्याचा प्रयत्न करू लागलो.
" तन्वी, तू चक्क रडत आहेस... बापरे!" मी तिला शांत बसण्याचा शेवटचा प्रयत्न करत म्हणालो. माझ्याही डोळ्यातून अश्रू केव्हा बाहेर पडले ते मला कळले सुद्धा नाही.. अजून काही दिवसांनी मला तन्वीसोबत दररोजचे सूर्यास्त पाहायला मिळणार नव्हते... जो आज आम्ही एकत्र पाहत होतो. अंधार पडायला सुरुवात झाली होती.. आम्ही खूप उशिरा घाटावर बसलो होतो. पण मला हा सहवास आता हवाहवासा वाटत होता..
" मी गेल्यावर तू माझी आठवण काढशील?.." पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत ती म्हणाली.
" तुझ्यासारख्या सैतानाची आठवण कोण काढेल?.." मी म्हणालो आणि अचानक मला माझ्या भावना सांभाळता आल्या नाहीत. एकदम माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले आणि मला हुंदका फुटला. मी तिच्यापासून नजर लपवून दुसरीकडे पाहू लागलो... रेडू आवरण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत होतो.
" तू रडत आहेस?.. सिरियसली अभ्या?.." ती माझ्या गालांवर हात ठेवून माझा चेहरा तिच्याकडे वळवत म्हणाली. मी तिच्या डोळ्यांकडे बघितले.. आणि मी तिला मिठी मारली. तिच्या मिठीत मी रडू लागलो... ती माझी एकुलती एक मैत्रीण होती. खूप जवळची होती ती.. तिच्यासोबत खूप काही शेअर करत आलो होतो मी... आमचे नाते खूप वेगळे होते..
" तू वेडा आहेस का? माझ्यासाठी तुला रडायची काय गरज आहे?..." ती हलके हसत म्हणाली.
" नाहीतर काय करू मग? दररोज मला सकाळी पहाटे फोन करून त्रास कोण देणार? कॉलेजमध्ये पाठीमागच्या बेंचवर कोणासोबत बसून येणाऱ्या मॅडमची आणि सरांची अब्रू काढू मी? मला तुझ्या जाण्याचं दुःख नाही.... अजिबात नाही आहे... पण मला..." मी तिच्या मिठीतुन बाजूला होत म्हणालो. मी माझे रडू आवरले..
" पण काय.. आणि तुला माहिती आहे, मैत्रीमध्ये पण हा शब्द वापरायचा नाही.. तूच सांगितलं आहेस ना मला?" ती म्हणाली.
" अरे देवा, आपण मित्र आहोत?" मी तिची मस्करी करत म्हणालो. ती गेल्यानंतर मी खूप एकटा पडणार होतो.. तिच्या जाण्यापेक्षा मला माझा एकलकोंडेपणाची खूप भीती वाटत होती.. एखादी व्यक्ती आपल्या मनावर एवढा छाप का सोडून जाते?
" खूप उशीर झाला आहे ना..." ती म्हणाली व उठू लागली. नदीच्या वाहणाऱ्या पाण्याकडे मी बघत बसलो होतो..
" Life goes on..." तन्वी म्हणाली.
" पुन्हा एकदा बुलशीट!" मी म्हणालो आणि उठलो. दोघेजण पाठीमागे वळून घरी जाऊ लागलो. मी तिचा हात हातात घेतला.
" काय करत आहेस तू अभ्या..?" तिने आश्चर्यचकित होऊन विचारले.
" मी तुला सर्व काही सांगावं, हे गरजेचे आहे का?" मी तिच्याकडे न बघता म्हणालो. रस्त्याच्या दोन्ही कडेला झाडे होती.. आम्ही रस्त्यावरून चालत जाऊ लागलो होतो.. कदाचित आत्ताचे क्षण मला माझ्या आठवणींमध्ये साठवायचे होते. तिचा हात पाठीमागे पुढे करत मी पुन्हा गुणगुणू लागलो.. ती माझ्याकडे एकटक बघत होती. अचानक एकदम वाऱ्याची थंडगार झुळूक आमच्या दोघांच्याही अंगाला स्पर्शून गेली.. आमच्या दोघांच्याही अंगावर काटा उभा राहिला.
" असा माझा हात हातात घेऊन, पाठीमागे पुढे करून तुला नेमकं काय करायचं आहे?" ती म्हणाली.
" फार काही नाही... घरी जाऊन डायरीमध्ये लिहायचे आहे.. की आज तुझा हात मी माझ्या हातात घेतला आणि आयुष्याला अनुभवले..!" मी एकदम बोलून गेलो.
" तू तर एकदम फिलॉसॉफर झालास रे.. किती छान बोलून गेलास!" ती म्हणाली.
" मी नेहमीच छान बोलत असतो, आणि आहेत मी तत्ववेत्ता!" मी म्हणालो. थंडीचे दिवस होते.. नुकताच ऑक्टोबर महिना चालू झाला होता.. अंधार पडू लागला होता तसे गारवा वाढत होता. तेवढ्यात तन्वीने आपला हात माझ्या हातामध्ये घालून ती मला बिलगली..
" आणि मला आता घरी जाऊन माझा डायरीमध्ये लिहायचे आहे की आज मी तुझ्यासोबत सूर्यास्त पाहिला, तुझा हात हातात घालून तुला बिलगले आणि आयुष्य अनुभवले.." तन्वी माझ्याकडे बघत म्हणाली.
रात्रीचे साडेअकरा वाजले होते.. मला झोप येत नव्हती, आजचे अनुभव डायरीमध्ये लिहून बाहेर रस्त्यावर फेऱ्या मारत होतो. कानात हेडफोन घातले होते आणि तमाशा चित्रपटातील 'अगर तुम साथ हो' हे गाणे ऐकत होतो. जेव्हा जेव्हा हे गाणे मी ऐकायचो.. स्वतःला मी त्या गाण्यात शोधायचो.. अचानक तन्वीचा विचार मनात आला. ती आता काय करत असेल? कदाचित झोपली असेल आणि नेहेमीप्रमाणे तिचे बाबा तिच्या शेजारी बसून तिचा चेहरा न्याहाळत असतील..
तेवढ्यात माझा फोन वाजला. मी बघितले, तन्वीचाच कॉल होता. मी उचलला..
" अजून का जागा आहेस?" ती म्हणाली.
" तुझ्या फोनमुळे जाग आली... एवढ्या रात्री का कॉल? मला शांतपणे झोपू सुद्धा नाही देणार का तू?" मी धडधडीत खोटे बोलत म्हणालो.
" अच्छा... म्हणजे माझ्या कॉल मुळे तुला जाग आली.. माझा कॉल लगेच एका सेकंदात उचललास..." तिने माझे खोटे पकडले.
" मला झोप येत नाही म्हणून जागा आहे.. आणि तू का जागी आहेस व कॉल का केलास?" मी म्हणालो.
" मलाही झोप येईना... म्हणून खिडकीतून आकाशासोबत बोलत आहे..." ती म्हणाली.
" तुझा आकाश नावाचा बॉयफ्रेंड आहे? तन्वी, तू मला सांगितले नाहीस..." मी तिची मस्करी करत म्हणालो.
" ए मंद.. आकाश म्हणजे स्काय... आणि त्या आकाशातील ताऱ्यांसोबत मी बोलत आहे.. एका महिन्यानंतर मी तिथेच असणार ना... म्हणून आतापासूनच त्यांना माझी ओळख करून देत आहे.." ती म्हणाली.
" खूप छान... कॉल का केलास?" मी म्हणालो.
" मी औषधे प्यायले..."
" काय?? तू औषध प्यायलीस... तन्वी... आर यु मॅड... हा महिनाभर तरी व्यवस्थित जग... मी आत्ता येत आहे तुमच्या घरी... थांब तुझ्या बाबांना फोन करतो... जरा तरी अक्कल आहे का?" मी घाबरून म्हणालो. तन्वीने औषध प्यायले होते.. ती जगायला हवी होती मला. मी घाबरून फोन ठेवणार तोवर तन्वीचा पलिकडून आवाज आला.
" मुर्खा, मी दररोज औषध पिते... आणि म्हणूनच तर अजून पर्यंत जिवंत आहे... माझं पुढचं बोलणं तर ऐकून घे!" ती म्हणाली आणि मी शांत झालो. मला वेगळेच काहीतरी वाटले होते.
" तू माझी काळजी करत आहेस.."
" तन्वी, प्लीज... मला झोप येते आहे,मी फोन ठेवतो."
" ऐक ना, फक्त तुला सांगत आहे मी.."
" काय? तुला झोप येत नाही ते..."
" मी ठरवलं आहे की.. मला सोलो ट्रॅव्हलिंगला जायला हवं.. आत्ता मी त्याचीच तयारी करत आहे. प्लीज तू बाबांना समजावून सांगशील ना उद्या? मी तीन ते चार दिवसात परत येईन.." ती म्हणाली.
" डोकं फिरल आहे का तुझं? तू कुठेही जाणार नाहीस.. अजिबात नाही, मुळीच नाही.." मी म्हणालो.
" अभ्या, मी तुला विचारत नाही सांगत आहे. मी सोलो ट्रॅव्हलिंग साठी निघतेय.. प्लीज हेल्प यार, बाबा न तूच समजावून सांगणार आहेस उद्या. मी फोन ठेवते आहे.. तशी मी चिठ्ठी लिहिली आहे.. बाय." ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला. मला तिची खरोखर काळजी वाटत होती. तिने एकटीने बाहेर वावरणे खूप धोकादायक होते.. तिची परिस्थिती खूप नाजूक होती.. आणि ती..
नाही, तिने जाता कामा नये.. मी तिला फोन करू लागलो.. पण ती उचलेना. मी अस्वस्थ झालो.. तिने एकटीने अजिबात जायला नको. अचानक माझ्या मनात एक विचार आला... मला त्या क्षणी काही कळाले नाही. मी सरळ घरात आलो. माझ्यारूम मध्ये येऊन माझ्या सॅकमधून वह्या व पुस्तके काढून त्यात माझे दोन टी-शर्ट ठेवले.. बेडवर अवधूत दादा झोपला होता. मी त्याला उठवू लागलो. अवधूत दादा एम.एस.सी लास्ट इयरला होता.
" दादा, अरे उठ ना.." मी एकदम त्याला हलवले. तो उठला. माझ्याकडे बघून तो जागचा हललाच.. माझ्या पाठीला मी सॅक अडकवली होती.
" तुमचं कॉलेज आहे आत्ता?" तो डोळे चोळत म्हणाला.
" अरे नाही रे... झोपेतून बाहेर ये.. मला तुझे एटीएम कार्ड हवे आहे. मी आणि तनवी सोलो ट्रॅव्हलिंग साठी जात आहोत.." मी म्हणालो आणि अवधूत दादा माझ्याकडे एकटक तसाच बघत राहिला. त्याला काहीच कळत नव्हते की मी हे काय बोलत आहे..
" तू स्वप्नात नाहीस.. मी सिरीयस होऊन सांगत आहे. प्लीज हेल्प दादा.. मला तन्वीला एकटे नाही सोडायचे..." मी म्हणालो.
" एवढे प्रेम करतो तिच्यावर? आणि तू काय बोलत आहेस तुला कळतंय का?" तो माझे खांदे हलवत म्हणाला.
" दादा मी काही प्रेम वगैरे करत नाही... ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तुला हे माहित आहे.." मी त्याला म्हणालो. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली.
" पण उद्या आई-बाबांना मी काय सांगू?" दादा माझ्याकडे त्याचे एटीएम कार्ड देत म्हणाला.
" आई-बाबांना काहीतरी सांगायला तू रात्रभर कारण शोधत बस.. मी चाललो.." मी म्हणालो आणि रूममधून बाहेर पडू लागलो.
" आल्यावर तू माझा खूप मार खाणार आहेस... आणि जास्त पैसे उडवू नकोस.. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही..." तो म्हणाला.
" हळू बोल, आईबाबा उठतील.." मी चौकटीतून आत डोकावत त्याला म्हणालो. त्याने एक स्माईल दिली. मी हळूच घराच्या बाहेर आलो. दरवाजा ओढून घेतला आणि तन्वीला कॉल करू लागलो. पण ती कॉल उचलेना.
मी तिच्या घरी पोहोचलो. तन्वीची आई तन्वीच्या लहानपणीच तिला सोडून गेली होती. तन्वी एकुलती एक होती. तिच्या बाबांचे तिच्यावर खूप प्रेम होते. तन्वीच्या घराबाहेर मी एकटाच उभा होतो. ती फोन उचलत नव्हती. 'ती गेली तर नसेल ना?' माझ्या मनात प्रश्न उभा राहिला. लांबून कुठूनतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता.
शेवटी तिने कॉल उचलला.
" काय रे? एवढे का फोन करतो आहेस? सुखाने मला टॉयलेटला तरी जाऊ दे..." ती म्हणाली.
" तू आत्ता कुठे आहेस?" मी म्हणालो. हवेत खूप गारवा होता. मला थंडी वाजत होती.
" माझ्या घरी आहे.. पण का?" ती म्हणाली.
" तू सोलो ट्रॅव्हलिंग साठी जाणार नाहीस?" मी तिला एकदम विचारले.
" तू मला हे का विचारत आहेस? एकदा ठरवलेली गोष्ट मी करतेच... पण प्लीज यार, उद्या माझ्या बाबांना समजावून सांग..." ती म्हणाली.
" तुझ्या खोलीची खिडकी उघडून जरा बाहेर रस्त्यावर बघतेस का? तुझी वाट बघत उभा आहे तिथे मी.. तू सोलो ट्रॅव्हलिंगला जाणार नाहीस.. मला सोबत घेऊन आपण डुओ ट्रॅव्हलिंगला जात आहोत." मी म्हणालो.
" आईशप्पथ! तू खरोखर आला आहेस?..." ती म्हणाली. मी तिच्या खोलीच्या खिडकीकडे बघत होतो.. तिने एकदम खिडकी उघडली व माझ्याकडे बघितले.. मी रस्त्यावरून तिच्या चेहऱ्यावरचा आश्चर्याचा भाऊ ओळखला.
" आय कान्ट बिलिव... थांब मी आत्ताच माझ्या डायरीमध्ये हे लिहिणार आहे... की तू माझ्यासोबत येणार आहेस... आलेच मी.." ती म्हणाली.
" हॅलो... मी तुझ्यासोबत येत नाही... तू माझ्यासोबत येत आहेस." मी म्हणालो पण तोपर्यंत तिने फोन ठेवला होता.
आकाशातील ताऱ्यांकडे पाहत मी तन्वीची वाट बघत होतो. तेवढ्यात पाठीमागून मला कोणीतरी मिठी मारली. मी पाठीमागे वळून बघितले, ती तन्वी होती.
" एवढ्या रात्री सुद्धा नटायला एवढा उशीर.." मी तिच्या डोक्यात मारत म्हणालो.
" आऊच... गप्प ना यार.. मला खरच विश्वास बसत नाही!!" ती म्हणाली.
" सोलो ट्रॅव्हलिंग... जाण्यासाठी पैसे आहेत का तुझ्याकडे?" मी तिला विचारले.
" तुला खरं सांगू?.. ऍक्च्युली... मी बाबांच्या पाकिटातून पैसे घेतले.." ती डोळे बारीक करत म्हणाली.
" तू पैसे चोरलेस?... तुला सांगू... तू नक्की नरकातच जाशील.." मी म्हणालो.
" आणि तिथे तुझी वाट बघेन..." ती हसली आणि माझ्या मनात समाधानाचे वारे वाहू लागले. तिच्या शेवटच्या दिवसात ती अशीच हसत रहावी असे वाटत होते मला.
" खूप छान... आणि कोठे जाणार होतीस तू.." मी म्हणालो.
" मी तर गोव्याला जाणार होते... आज रात्री साडे बारा वाजता ट्रेन आहे... आपण जायचं ना?" ती म्हणाली.
मी काहीच न बोलता पुढे चालू लागलो. आपल्या ऑक्सिजन टॅंक असलेल्या बॅगेसोबत ती माझ्या पाठीमागून येऊ लागली. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस.. रेल्वे स्टेशन जवळच होते. साडेअकरा वाजले होते.. आम्ही चालत जरी गेलो तरी अर्ध्या तासात तिथे पोहोचत होतो
" अरे थांब ना..." ती म्हणाली.
" चल ना यार.. किती हळू चालते तू..." मी म्हणालो.
" काय करू, माझ्यासोबत परमदीप सुद्धा आहे ना.." आपल्या ऑक्सिजन बॅगेकडे बघत तन्वी म्हणाली.
" परदीप... बर.. अजून कशाकशाची काय काय नावे ठेवली आहेस?" मी म्हणालो.
" तुला रेल्वेतून जाताना सांगेन..." ती म्हणाली व माझ्यासोबत येऊन चालू लागली.
" जर तू परमदीपसोबत अशीच हळू हळू चालू लागली स, तर आपले हे ट्रॅव्हलिंग पूर्ण व्हायच्या अगोदरच तू नरकात असशील... आणि तुला भरभर चालवण्यासाठी मला तुला उचलून घ्यावे लागेल..." मी थोडेसे हसत तिला म्हणालो.
सहा तासांचा प्रवास करून आम्ही पणजी मध्ये आलो. सकाळचे साडेसहा वाजून गेले होते. पूर्ण प्रवास चालू असताना तन्वी बडबडत होती आणि केव्हा ती झोपी गेली व मी ही झोपी गेलो कळलेच नाही... मला सकाळी साडेपाच वाजता तन्वीच्या मोबाईल मधील अलार्ममुळे जाग आली. तन्वी अजून झोपली होती... मी तिच्या गालावरून हात फिरवला. तिचा गजर बंद करून मी खिडकीतून बाहेर बघत होतो. तासाभराने आम्ही पणजीमध्ये पोहोचलो. घरी अवधूत दादाने काहीतरी सांगितलेच असणार. मी तन्वीला उठवले व आम्ही दोघेही बाहेर आलो. दादाने आम्हाला सांगितले होते वेव्ह बीच हॉटेल मध्ये त्याने दोन दिवसांसाठी खोली बुक केली आहे. शंभर वेळा थँक्स म्हणून घेतल्यावर दादाने फोन ठेवला.
"वेव्ह बीच हॉटेल.. तन्वी, आपल्याला तिथे जायचे आहे. माझ्या दादाने आपल्या दोघांसाठी तिथे दोन दिवसांसाठी खोली बुक केली आहे." मी तिला म्हणालो. पण ती अजून झोपेतच होती..
" तुझा दादा कसला भारी आहे... माझ्याकडून त्याला थँक्स सांग.." तन्वी म्हणाली.
" दमलो मी त्याला थँक्स म्हणून..." मी तिला हसत म्हणालो.
एका कॅब वाल्याला आम्ही पैसे दिले व त्याने आम्हाला वेव्ह बीच हॉटेल जवळ आणून सोडले. आम्ही हॉटेलमध्ये आलो. ओळख पटल्यावर आम्हाला रूम दाखवण्यात आली.
" आपण एका खोलीत राहायचे?" तन्वी माझ्याकडे एकदम वळून म्हणाली.
" नाही नाही... तू एका हॉटेलमध्ये राहा, मी दुसऱ्या हॉटेलमध्ये राहतो... चालेल तुला? पैसे आहेत का तुझ्याकडे?" मी तिच्याकडे बारीक डोळे करत म्हणालो.
" ओके... ओके.... ओ माय गॉड... आय कान्ट बिलीव..! आपण चक्क घरातून पळून आलो.... सोलो ट्रॅव्हलिंग! आणि गोवा.... आपण गोव्यात आहोत.." तन्वी रूममध्ये येत गोल फिरत म्हणाली.
" हो ना...! तुझ्यामुळे मी सुद्धा मरणार आहे.. जेव्हा आपण घरी कोल्हापूरला परत जाऊ... तेव्हा माझे बाबा काठी घेऊनच उभे असणार..." मी हसत म्हणालो.
सर्व आवरून आम्ही बीचवर आलो. सकाळचे साडेआठ वाजले होते... काही वेळापूर्वी बाबांचा मला फोन आलेला.. भरमसाठ शिव्या देऊन त्यांनी फोन ठेवला होता. अजून तन्वीला तिच्या बाबांचा फोन आला नव्हता.
" या परमदीपचे काय करू मी?" तन्वी आपल्या ऑक्सिजन बॅगकडे बघत म्हणाली.
" ए बाई, निदान हे दोन दिवस तरी त्याला जपून ठेव... नाही तर तुझा मृतदेह घेऊन कोल्हापूरला जावे लागेल... आणि मग काही क्षणातच तुझे बाबा मला तुझ्याजवळ नरकात पाठवतील..." मी तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणालो.
" ए गप ना.. बघ ना समुद्र किती सुंदर दिसत आहे.... किती निळाशार समुद्र आहे हा..."
" तू काहीही बडबडत आहेस... समुद्र तांबडा नसतो.. निळाशारच असतो.." मी हसत म्हणालो. बीचवर गर्दी होती. फॉरेनवरुन आलेल्या लोकांची संख्याच जास्त दिसत होती...
" नाही रे.. सौदी अरेबिया जवळ तांबड्या कलरचा समुद्र आहे ना?" तन्वी माझ्याकडे बघत म्हणाली.
" ते सोड... चल तिकडे जाऊया.." मी म्हणालो आणि तन्वीला समोर एक चर्च दाखवत तिकडे तिला नेऊ लागलो.
' मेमोरियल चर्च ' खूपच सुंदर होती. चर्चचे स्थापत्य खूप उत्तम होते. मी व तन्वी आतमध्ये आलो.. चर्च खूप मोठी होती. आता आम्हाला एक प्रिस्ट दिसले. आतमध्ये प्रवेश केल्या केल्या समोर येशू ख्रिस्त यांचे क्रॉस दिसले. तिकडे बघून मला खूप वेगळी भावना मनात उमटली. चर्चमध्ये सुंदर म्युझिक चालू होते. मी आणि तन्वी एका बाकावर बसलो आणि येशू ख्रिस्तांच्या स्टॅच्यूकडे पाहू लागलो.
" किती छान आहे ना?" माझ्या तोंडून शब्द निघाले.
" हो... पण मी हे मिस करणार.. अभिषेक तुला खरे सांगू.. तू खूप लकी आहेस! तुला किती मोठं आयुष्य मिळालं आहे.." ती माझ्या जवळ सरकत म्हणाली. मी तिचा हात माझ्या हातात घेतला.
" किती शांत वाटत आहे ना..." मी तन्वीने काढलेला विषय बदलत म्हणालो.
" अजून एका महिन्यानंतर मी कायमची शांततेत असेन... तेव्हा तू माझ्या जळत्या चितेला पाहून हसत असणार आणि मी माझी बॉडी सोडून ताऱ्यांमध्ये लुप्त होणार... मग परत कधीच तुला छळायला मी येणार नाही.. पहाटे पहाटे तुला फोन करून बाहेर माझ्या सोबत फिरायला यायला तुला कधी बोलवणार नाही... अख्या कॉलेजमध्ये तुझा पाठलाग करत फिरणार नाही.. आणखी बरंच काही... अजून एका महिन्यानंतर मी नाही करणार..." ती म्हणाली.
" तू मला पुन्हा रडवणार असे दिसत आहे... जर पुन्हा तू हा विषय काढलास तर... तर मी गोवा सोडून परत कोल्हापूरला जाईन आणि तू बस एकटीच इथे रडत.." मी तिचा हात घट्ट धरत म्हणालो.
मी आणि तन्वी समोर असलेल्या प्रिस्टकडे गेलो. त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पूर्ण चर्च फिरली. तेवढ्यात आम्हाला बाहेरून कसलातरी आवाज ऐकू आला. आम्ही दोघेही बाहेरच्या बाजूला आलो. दोन फॉरेनर एकमेकांसोबत भांडत होते. बहुतेक ते स्पॅनिश बोलत होते की फ्रेंच मला माहित नाही.. पण ती इंग्लिश नक्कीच नव्हती. गर्दी जमली होती.. त्यांचे भांडण मारामारी पर्यंत गेले.
" अजून जोरात भांडा..." तन्वी एकदम हळू आवाजात म्हणाली.
" तुला त्यांचे भांडण पाहायचंय? सिरियसली?" मी तिला म्हणालो.
" अरे खूप मज्जा येत आहे रे बघायला... भांडा , अजून भांडा... आणि अभ्या... त्यांची भाषा ऐकून मला खूप हसू येत आहे.." तन्वी एकदम जोरात हसत म्हणाली.
" Quien se rio? Quien se rio....?" अचानक त्यांच्यातील एक व्यक्ती आमच्याकडे बघत म्हणाली. तन्वी अजून हसत होती.. मी तिला शांत बसवण्याचा प्रयत्न करत होतो... बहुतेक तन्वी हसत होती म्हणून ते चिडले होते..
"Te reíste de nosotros ... morirás ahora ... no te dejaré ..." त्यापैकी एक व्यक्ती तन्वीकडे आली आणि म्हणाली. तन्वी शांत बसली. ती व्यक्ती तन्वीच्या डोळ्यांत डोळे घालून रागाने बघू लागली. बाकीचे लोक आमच्याकडे बघू लागले.. मी घाबरलो.. मी तन्वीला हळूच मागे घेतले.. व तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागलो.
"Dónde fuiste Nos sonreíste... ahora mira cómo te sonrío..." ती व्यक्ती हसत म्हणाली. आता मलाही हसू येणारच होते तेवढ्यात ती व्यक्ती आमच्याजवळ आली. त्या व्यक्तीने तन्वीची बॅग घेतली. तन्वी पार घाबरून गेली होती. आम्ही तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागलो पण त्या माणसाने तन्वीचा एक हात खूप घट्ट पकडला होता.
" अभ्या काहीतरी कर ना... बहुतेक तो पैसे घेत आहे पर्समधून.." तन्वी म्हणाली.
" अजून मोठ्यामोठ्याने हस... हस ना? काय झाले..." मी तिला म्हणालो.
"Déjala en paz, lo más probable es que tenga cáncer de tiroides ... Mira su nariz y su bolsa de oxígeno ... Va a morir de todos modos ... Y no estás discutiendo conmigo ... Cobarde"
त्या व्यक्तीसोबत भांडणारी अजून एक व्यक्ती म्हणाली. जर याने अवधूत दादाने मला दिलेले एटीएम कार्ड घेतले तर? मी घाबरून गेलो. अचानक तन्वीची बॅग तपासणारी व्यक्ती पाठीमागे बघू लागली..
" You cobarde... You...!" असे म्हणतात ती व्यक्ती पुन्हा त्याच्यासोबतच्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर भांडू लागली. तन्वीला मी मागे खेचले व भरभर पुढे जाऊ लागलो.
"हुश्श... वाचले बाबा.." तन्वी म्हणाली.
" जर तू सापडली असतीस ना त्यांच्या तावडीत... तुझे बाबा येथे तुला वाचवायला आले नसते.. आणि तू आत्ताच गेली असतीस.. वर!" मी म्हणालो.
" पण सिरियसली, त्यांची भाषा किती फनी होती.." ती म्हणाली.
" हो? चल चल.. पुन्हा तिथे जाऊन हसूया मोठमोठ्याने..." मी पाठीमागे वळत पुन्हा त्यांच्याकडे जात म्हणालो. तेवढ्यात तन्वीने माझा हात पकडला व हसत मला स्माईल दिली...
" अभिषेक माय स्वीट हार्ट... प्लीज.." ती म्हणाली.
" तनु , तुझी मला खूप काळजी वाटत आहे.. कधी हे सोलो ट्रॅव्हलिंग संपतय कोणास ठाऊक.." मी म्हणालो.
" आपण फक्त असे फिरतच राहायचे का? काहीतरी करूया ना?.." ती म्हणाली.
" चल, त्या स्पॅनिश माणसांच्या कडे जाऊया... आणि मोठमोठ्याने हसूया! मग ते आपले पैसे काढून घेतील... त्यानंतर आपण भीक मागत बसुया... चालेल का?" मी तिची चेष्टा करत म्हणालो.
" ग्रेट आयडिया... पण त्या स्पॅनिश माणसांकडे जायला नको. चल आपण भीक मागू या..!" ती म्हणाली.
“ तुला ताप वगैरे आला नाही ना? आपण भीक मागण्यासाठी गोव्याला आलो आहोत?”
“ हो! तू चल रे माझ्यासोबत... चल रूमवर जाऊ.. तिथेच तुला झणझणीत प्लॅन सांगते!”
" तन्वी हे तू काय करत आहेस.... आईशप्पथ तुला सांगतो मी... मी खूप मोठी चूक केली आहे तुझ्यासोबत येऊन.. यार तू मला भीक मागायला लावत आहेस?" मी तिला म्हणालो. तन्वी मला भिकाऱ्यासारखे नटवत होती. स्वतः तशीच बनली होती.
" आणि मेकअप करण्यासाठीचे सामान सुद्धा सोबत आणले आहेस?.." मी तिला म्हणालो.
" एक दिवस भिकाऱ्याची आयुष्य जगून बघूया की..."
" आपण येथे दोनच दिवस राहणार आहोत.."
" असू दे रे... माझी खूप दिवसांपासून इच्छा होती, असं काहीतरी डेरिंग करायची.." ती म्हणाली.
" सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्या विचारांना.." मी म्हणालो.
" खूप खूप धन्यवाद... आणि खूप चिकना दिसत आहेस भिकारी झाल्यावर.." ती म्हणाली आणि हसू लागली.
" अच्छा... आणि काय?" मी म्हणालो व मला हसू आवरले नाही. तन्वी हे सर्व करत होती आणि ती हसत होती. हे बघून मला खूप छान वाटत होते.
" लेट्स गो?" ती म्हणाली.
मला आणि तन्वीला अशा वेशात बघून हॉटेलचे मॅनेजर आमच्याकडे एकटक पाहत होते. मला खूप गिल्टी फील होत होतं.. तन्वीने फक्त हसून इशारा केला आणि तो मॅनेजर आपल्या कामाला लागला. आम्ही हॉटेलमधून बाहेर आलो. हॉटेल टू स्टार होते. माझे वय वीस वर्षे आणि तन्वीचे 18 वर्षे असे सांगितले गेले होते. बापरे! पण आम्ही दोघेही सतरा वर्षांचे होतो.
हॉटेल बाहेरून आम्ही रस्त्यावरून फिरू लागलो. पण कुठूनही आम्ही भिकारी वाटत नव्हतो.
" तुझ्या परमदीप मुळे बहुतेक आपल्याला कोणी भिक देईल असे दिसत नाही. फक्त कपडे बदलले म्हणून कोणी भिकारी होत नाही.. त्याला कला लागते.." मी तिच्याकडे हसत पाहिले.
" भैय्या पाच रुपया... पाच रुपया.."
" ए चल हट... जाओ यहांसे... भिकारी कही की.."
तन्वीला पहिला अनुभव असा आला आणि मी समजून घेतले की आता खूप मेहनत करावी लागणार... आणि खूप शिव्या देखील बसणार होत्या! आम्ही रोडवरून पुढे जाऊ लागलो. आम्ही एखाद्या भिकारी लवर्स प्रमाणे दिसत होतो.
" hii you guys..." कोणीतरी एक फॉरेनर बाई आमच्याकडे बघत म्हणाली.
" Hi lady, please give money... Please please..." तन्वी म्हणाली.
"Ohh yeah..." ती म्हणाली आणि तिने आपल्या पर्समधून काही पैसे तन्वीचा हातावर ठेवले. आमची पहिली कमाई! ती स्त्री निघून गेली.
" भिकारी इंग्लिश बोलत नसतो..!" मी हसत म्हणालो.
" असू दे रे, हे बघ तिने चक्क पन्नास रुपये दिले आहेत!" ती मला पैसे दाखवत म्हणाली.
" अभ्या, मला वाटतं आपण दोघे वेगवेगळे जायला हवे... म्हणजे जास्त पैसे गोळा होतील.. आणि तेवढी मज्जा येईल.."
" अजिबात नाही... मी तुला सोडून कुठेही जाणार नाही.." मी म्हणालो.
" एका तासाचा प्रश्न आहे आणि इतक्यात काय मरत नाही मी..." ती म्हणाली आणि माझ्या विरुद्ध दिशेने जाऊ लागली. मी सुद्धा विचार करत करत पुढे जाऊ लागलो. मला भीक मागायची होती.
" साब, पाच रुपया? साब दो ना..." मी एकाकडे मागत म्हणालो. पण त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले. बापरे! खूप अवघड काम असते की हे...
बारा वाजायला आले, जवळजवळ दोन तास झाले मी भीक मागत फिरत होतो. खरंच भिकारी होऊन जगणे सोपे नसते.. मी तन्वीला एका कोपऱ्यात येऊन फोन केला. आम्ही दोघेजण हॉटेलमध्ये भेटलो. हॉटेलमध्ये आत प्रवेश करताना हॉटेलचे सेक्रेटरी चांगलेच वैतागले.
" कितनी कमाई केली?" अर्धवट मराठी आणि अर्धवट हिंदी बोलत तन्वी म्हणाली.
" फार काही झाली नाही... पण अनुभव मात्र खूप चांगला आला... नव्या शिव्या ऐकायला मिळाल्या आणि त्या शिव्या आता मी तुला देणार आहे." मी म्हणालो.
" मी पाचशे रुपये गोळा केले...! कळतंय का तुला?"
" मी सहाशे रुपये गोळा केले...!" तिच्यासमोर चिल्लर टाकत मी म्हणालो.
" भिकारी शोभतोस यार..."
" खरंच का... पण खरं सांगू तुला? भिकारी होऊन जगणं खूप अवघड असतं... आपण आज हॉटेलमध्ये राहत आहोत.. पण ते रस्त्याच्या कडेला राहत असतात.. त्यांना कधी भीक मिळते.. तर कधी मिळत नाही. खूप शिव्या देतात त्यांना... हा अनुभव खूप छान होता.."
" तू अनुभव गोळा केलेस? आणि मी पण... पण त्यापेक्षा जास्त मी एन्जॉय केला..." ती म्हणाली.
" जेवायला जाऊया का? आपल्याकडे पैसे आहेत आता...!" मी म्हणालो.
जेवून आम्ही पुन्हा समुद्र किनारी फिरायला गेलो. आम्ही तिथे बघितले... तर खूप जोडपी तिथे फिरायला आली होती. एक जोडपे तर खुल्लमखुल्ला चुंबन घेत होते. मी आणि तन्वी त्यांच्याकडेच पाहत होतो.
" कसे किस करत आहेत बघ ते..." मी तन्वीला हसत म्हणालो.
" मला बाबांची आठवण येत आहे.. त्यांनी अजून मला फोन नाही केला..." ती म्हणाली.
" मला केला होता.. मीच सांगितलं त्यांना... की तुला फोन करू नये म्हणून.." मी खोटे बोललो.
" तुला त्यांनी फोन केला होता? आणि तू मला सांगितले नाहीस?" ती माझ्यावर चिडत म्हणाली.
" तू माझं ऐकून तर घ्यायला हवं होतंस.. तुला आईस्क्रीम हवं का?" मी अडखळत म्हणालो.
" तू खूप वाईट... तिकडे बघ तिकडे... आईस्क्रीम आहे तिथे.. आता चल, दे मला.." ती म्हणाली.
संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. मी आणि तन्वी दिवसभर गप्पा मारत आणि काही ना काही वेगळे करत हिंडत होतो. वेगवेगळ्या चर्चला भेट देत होतो. आम्ही आता सनसेट पॉईंटला आलो होतो.
" आज खूप धमाल आली ना.." ती म्हणाली.
" तन्वी, आज आपण खूप धमाल केली... मला खूप छान वाटतंय.."
" तुला एक सांगू?" ती म्हणाली. आम्ही सनसेट पॉईंटवर पोहोचलो होतो आणि एका बाकड्यावर बसत समुद्राकडे पाहत होतो.
" विचार ना..."
" मी गेल्यानंतर माझ्या काही वस्तू तुला मला द्यायच्या आहेत.."
" मग त्या तू मरताना मला देऊ शकतेस... निदान त्यांच्याकडे बघून तरी..." मी बोलता बोलता थांबलो.
" त्यात माझी डायरीसुद्धा आहे.. पण ती वाचू नकोस काय.." ती म्हणाली. सूर्य हळूहळू खाली येत होता.
" आपण रात्री मूव्ही बघायला जाउया?" मी तिला विचारले.
" नक्की जाऊया..." ती म्हणाली.
" तुला अमर राहायचं आहे ना..."
" होतं.. पण आता या एका महिन्यात मी असं काय करू जेणेकरून मी कायमची अमर राहू शकते, माझा मरणानंतरही.."
" मला वाटते तू सत्याग्रह करावा... आता समुद्र ही जवळ आहे... कर मिठाचा सत्याग्रह! इतिहासात तुझा फोटो चमकून येईल..." मी तिची मस्करी करत हसू लागलो.
" काहीही काय रे.." ती म्हणाली.
" आणखी काय देणार आहेस तुझ्या मृत्युनंतर मला?"
" तुझा माझ्या बाबांचा इस्टेटीवर डोळा नाही ना?" ती बारीक डोळे करत म्हणाली.
" तू मेल्यावर मी तुझ्या बाबांना लुटणार... फक्त तू एकदाची मर...!" मी म्हणालो.
" हे भगवान.. माझ्या अगोदर मी तुझा खून करेन! जर तू असं काहीतरी केलं तर.."
आम्ही दोघेही हसू लागलो. सूर्य समुद्राच्या आत शिरत होता असे दृश्य दिसत होते. सूर्याची लांबलचक किरणे समुद्रावर पडली होती आणि पूर्ण समुद्र तांबडा झाला होता.
" हे बघ तांबडा समुद्र..." तन्वी हसत म्हणाली.
" अभ्या, तुला सुद्धा एक लेखक व्हायचे आहे ना?"
" हो, आणि माझं यश बघायला तू इथे नसणार... त्यावेळी तुला खूप मिस करेन मी.." मी म्हणालो. आम्ही सूर्यास्ताचा आनंद घेऊ लागलो. किती शांत वाटत होते!
" तू खूप मोठा लेखक होशील.. जर तू माझ्यावर काहीतरी लिहिलेस तर." ती म्हणाली.
" तुझ्यावर असं काय लिहू मी? एवढ्या लवकर तर सोडून चालली आहेस सर्वांना... हा, जर तू माझ्या प्रेमात पडलीस... तर मी लिहीन तुझ्यावर काहीतरी.." मी म्हणालो.
" मी, आणि तुझ्या प्रेमात... डोकं फिरलय का तुझं... याच्यापेक्षा मी आहे तशीच सुखी आहे असं समजेन स्वतःला..." ती म्हणाली.
काही वेळ आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. समोरच्या सुर्यास्ताचा आनंद आम्ही लुटू लागलो. किती सुंदर दृश्य होते ते! मला अचानक हुंदका आला.. अंगावर काटा उभा राहिला. मी तिच्याकडे पाहीले... ती समोरच्या समुद्राकडे पाहत होती... माहित नाही का, पण मला खुप मोठ्याने रडू वाटत होते!
" एक्सक्युज मी..." मी तन्वीला म्हणालो आणि बाजूला एके ठिकाणी जाऊ लागलो. पाठीमागे वळून बघितले तर ती अजूनही तशाच निरागस चेहऱ्याने समुद्राकडे पाहत होती. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आयुष्य किती कठीण आहे हे मला समजून आले.
रात्रीचे आठ वाजले होते. मी आणि तन्वी एका ग्रुप मध्ये शेकोटी शेकत बसलो होतो. त्या ग्रुपमधील एकटा खूप छान गिटार वाजवत होता. थंडी असल्याने मी आणि तन्वी एकमेकांना खूप बिलगून बसलो होतो.
"ये अक्तुबर की सर्दी..." गिटार वाजवणारा गाणे गात होता. मी आणि तन्वी त्या गाण्याच्या सुरासोबत इकडे तिकडे झुलत होतो. दुरून कुठूनतरी कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येत होता... थंडी खूप होती. मी त्या शेकोटीकडे पाहत होतो.. तन्वीच्या खांद्यावर हात टाकून मी माझ्या वेगळ्याच विश्वात होतो. भविष्याचा विचार करत होतो.. अधूनमधून माझी नजर तन्वीकडे जाई.. गिटारवाल्याकडे पाहत ती छोटीशी स्माईल द्यायची आणि पुन्हा आपले डोळे मिटून गाण्याचा आनंद घ्यायची. सर्वजण गप्पा मारत होते.
" एक शायरी हो जाये.." ग्रुपमधील एकजण म्हणाला.
" तुम अपना दुपट्टा नही संभाल सकती, मेरे बेचैन दील क्या संभालोगी.." माझ्या शेजारी बसलेल्या एकाने म्हटले.
" वाह वाह.. अब तुम भी शायरी बताओ कोई..." एकटा माझ्याकडे बघत म्हणाला. मी नकार देत होतो कारण मी काही शायर नव्हतो. शेवटी तन्वीनेसुद्धा आग्रह केला.
" बरं ऐका.... जब मैंने तुम्हारे साथ सांसे ली,मुझे जिंदगी के होणे का एहसास हुआ!" मी म्हणालो. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.. मला एखादा शायर असल्यासारखे वाटले.
रात्री रूममध्ये एकीकडे मी तर दुसरीकडे तन्वी आपली डायरी लिहीत होती. आजचे आलेले अनुभव लिहित होतो आम्ही. दुसऱ्या दिवशीही आम्ही खूप धमाल केली.. एका जुन्या चर्चमध्ये आम्ही गेलो. तिथले स्थापत्य पूर्ण पडले होते. जागा खूपच जुनी होती. तिथे कोणीच नव्हते.
" अभ्या, फॉल्ट इन अवर स्टार्स हा सिनेमा पाहिला आहेस?.."
" हो, आणि पुस्तकही वाचले आहे.. त्याची स्टोरी तुझ्याशी रिलेट करते का?" मी म्हणालो. तिने माझा हात आपल्या हातात घेतला आणि चर्चच्या बरोबर मध्ये मला नेले. तिने मला तिथे उभे केले आणि तसेच उभे राहायला सांगून ती एका बाकावर जाऊन बसली.
" हे काय करत आहेस तू?" मी म्हणालो.
" असं समज, मी सध्या मेलेले आहे... आणि मी मेल्यानंतर माझ्या आठवणींवर तू एक भाषण देणार आहे.. बोल ना.. मी समोर नाही आहे असे समज.. मी कुठेतरी दूर ताऱ्यांमध्ये लपले आहे असं समज... मी तुला पाहत नाही असंही समज... आणि माझ्यावर भाषण कर... अगदी ' द फॉल्ट इन अवर स्टार्स' मूव्ही मधल्या हेझल प्रमाणे... ती तिच्या मेलेल्या बॉयफ्रेंडसाठी भाषण करत होती जो बॉयफ्रेंड तिच्या समोरच बसला होता. आता तू माझ्या समोर भाषण कर मी मेले आहे असे समजून... बघूया तरी तू कसं करतोस.." ती म्हणाली आणि माझ्या डोळ्यात अश्रू जमा झाले. मी फक्त तिच्याकडे पाहतच राहिलो. गळ्यामध्ये हुंदका आला आणि कोणत्याही क्षणी तो हुंदका फुटण्याच्या तयारीत होता.
" चालू कर ना, मी खूप उत्सुक आहे.." ती म्हणाली. मी डोळे मिटले आणि एकदम उघडले..
" मी अभिषेक, तन्वीला आठवीपासून ओळखायचो..." मी तिच्याकडे पाहीले.. ती माझ्याकडे खूप लक्ष देऊन बघत होती. मी मोठा श्वास घेतला..
" तन्वी माझी खूप चांगली मैत्रीण होती. एवढी चांगली होती, की तिला सोडून मी दुसऱ्या कुणाशी मैत्री सुद्धा करू शकलो नाही... माझी एकुलती एक लाडाची मैत्रीण, तन्वी. असं म्हणतात की आठवणी आपल्याला अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची जाणीव करून देतात. माझ्या आणि तन्वीच्या मध्ये खूप साऱ्या आठवणी आहेत आणि मला माझ्या पुढच्या आयुष्यात त्या आठवणी तन्वी नसल्याची जाणीव करून देईल.. पण काही हरकत नाही. दररोज रात्री मी तिच्याशी गप्पा मारेनच... ती म्हणायची, की माझ्या मृत्यूनंतर मी ताऱ्यांमध्ये लुप्त होईन.. कदाचित सध्या ती ताऱ्यांमध्ये असेल.. प्रत्येक रात्री त्या ताऱ्यांकडे मी पाहीन आणि तिच्यासोबत घालवलेल्या अनमोल क्षणांना आठवेन. कदाचित त्यावेळी ती सुद्धा त्या ताऱ्यांमधून माझ्याकडे पाहत असेल.. आणि हो, तिचे स्वप्न होते.. की तिला अमर राहायचे होते. तिला असे काहीतरी करायचे होते, ज्यामुळे ती नसताना सुद्धा तिच्या आठवणी अमर राहिल्या असाव्यात. तिचे हे स्वप्न मी नक्की पूर्ण करेल. शेक्सपियरपेक्षा उत्तम असे तिला काहीतरी लिहायचे होते.. मी प्रयत्न करेन की तिचे हे स्वप्न मला पूर्ण करता येते का... तिला हॅरी पॉटर पेक्षा उत्तम जादुई पुस्तक लिहायचे होते.. हा प्रयत्न सुद्धा मी करेन! बुलेट घेऊन केदारनाथला सोलर ट्रॅव्हलिंग ला जायचे होते तिला... आणि हे स्वप्नसुद्धा मी पूर्ण करेन... जेव्हा नदीघाटावर मला ती सांगत होती की तिच्याकडे फक्त एकच महिना उरला आहे.. तेव्हा मला खूप वाईट वाटले होते... मी रडलो होतो त्यावेळी. हळूहळू मी तन्वीच्या एवढ्या जवळ गेलो की..." मला हुंदका आवरता आला नाही. मी बोलायचे थांबलो , तन्वीकडे बघितले... ती रडता रडता हसत होती.. टाळ्या वाजवत होती. मी एकदम तिच्याजवळ गेलो आणि तिला घट्ट आलिंगन दिले...
" तू सगळे मनापासून बोलला? मी तुला खूप मिस करेन..." ती म्हणाली.
" मीसुद्धा तुला खूप मिस करेन... तू मरणार आहेस.. आणि मरताना मला आयुष्यभराच्या यातना देऊन चालली आहेस.. कसा जगू तुझ्याशिवाय?" मी म्हणालो.
" वेडा आहेस का तू? मी तुझी गर्लफ्रेंड वगैरे नाही... तुला एखादी चांगली मैत्रीण भेटेल की..."
" पण तू भेटणार नाहीस ना..."
ती माझ्या मिठीतून बाजूला झाली. माझ्या दोन्ही गालांवर आपले हात ठेवत ती माझ्या डोळ्यांत पाहत होती.
" माझे नाव अमर करण्यासाठी तू काय करणार आहेस?.. आय ॲम क्युरिअस..."
" आणि मी तुला हे सांगणार नाही..."
" सांग नाही तर मी सुखाने मरू शकणार नाही..."
" जर देवाने तुझ्या ऐवजी मला हा कॅन्सर दिला असता तर खूप छान झाले असते... तू मला इमोशनली ब्लॅकमेल तर केले नसते... आणि इमोशनली ब्लॅकमेल करण्याची ताकद माझ्याकडे आली असती..." मी हसण्याचा प्रयत्न करत म्हणालो पण मला हसू आलेच नाही.
" एका पुरुषाने रडायचे नसते..."
" गरजेचे आहे का , की फक्त स्त्रीनेच रडावे?"
आम्ही कोल्हापूरला परत आलो. मी तन्वीला तिच्या घरी सोडायला गेलो होतो. गेल्या गेल्या तिने आपल्या बाबांना मिठी मारली. बाबांनीही तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांनी माझ्याकडे पाहिले व एक स्मितहास्य दिले. मी माझ्या घरी आलो.. बाबा खूप चिडले होते, पण त्यांनी मला काही बोलले नाही. रूम मध्ये गेल्यावर अवधूत दादाला त्याचे एटीएम कार्ड देत मी पुन्हा एकदा थँक्स म्हणालो.
" कसा झाला तुमचा प्रवास?" तो म्हणाला.
" नाईस..." मी म्हणालो.
ऑक्टोबर महिना संपायला आला आणि माझ्या हृदयाची धकधक वाढतच गेली. तन्वीच्या आयुष्याची मुदतही संपत होती. मी शक्य होईल तितका वेळ तिच्या जवळच घालवत होतो. गोव्यामध्ये रडताना पाहिल्यानंतर तिला पुन्हा कधी रडताना मी पाहिले नाही.
" अभिषेक.. ही ट्रॉफी पाहत आहेस का? माझा निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक आला होता त्यावेळी मिळाली होती मला... माझ्या आयुष्यातील पहिली ट्रॉफी.." तिच्या हातातील ट्रॉफी दाखवत ती म्हणाली. मी तिच्या घरी आलो होतो.
" आणि हे पाचशे रुपये पाहत आहेस... हे आपण जेव्हा गोव्यात होतो त्यावेळी भीक मागून कमावलेले होते.. त्यावेळी मी ते जेवणावर खर्च केले नव्हते. जपून ठेवले होते.." ती म्हणाली.
" आणि ही माझी डायरी.." माझ्या हातात डायरी देत ती म्हणाली. मी तिच्या हातातील डायरी घेतली. त्या डायरीचे मुखपृष्ठ वाचले..
" ऑक्टोबर.."
मी त्या डायरीचे नाव वाचले.
" त्यात तुझ्या आणि माझ्या आठवणी आहेत.." ती माझ्या शेजारी बसत म्हणाली.
" मी तुझ्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिणार आहे.. त्यातून तू कायमची अमर राहशील..." मी पटकन बोलून गेलो.
" हे तू बोलून गेलास... हेच खूप आहे माझ्यासाठी.. पण नक्की लिहायचं..! नाहीतर मी असे बोलले म्हणून विषय सोडून देशील.." ती हसत म्हणाली.
" तन्वी.. आय लव यू..." माझ्या मनात खूप दिवसांपासूनची असणारी गोष्ट मी तिला बोलून दाखवली.
" इडियट... गप्प ना..! सुखाने मरू दे मला.. नाहीतर तुझ्या प्रेमात वेडी होऊन जाईन.." ती हसत म्हणाली.
" खरंच?"
" मस्करी केली... तू माझा खूप चांगला मित्र आहेस. खूप खूप चांगला मित्र आहेस. माझ्या नशिबाने मला फार काही दिले नाही.. तुझ्या सारखा चांगला मित्र दिला.." ती म्हणाली आणि माझ्या खांद्यावर तिने आपले डोके ठेवले. माझा हात आपल्या हातात घेऊन तिने माझ्या हाताचे चुंबन घेतले. ज्या दिवशी तन्वीने नदीघाटावर मला सांगितले होते तिच्याकडे फक्त एकच महिना शिल्लक आहे... त्याच दिवसापासून तिच्याविषयी मला एक वेगळीच भावना निर्माण होत गेली होती. तिची डायरी अजुनही माझ्या हातात होती.. मी ती डायरी उघडली आणि त्या डायरीचे पहिले पान बघितले..
"लव यू अभिषेक... And I will miss you so much.."
त्या पानावर पहिलीच ओळ होती. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी तन्वीकडे पाहिले.. ती अजूनही तशीच माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती.
" तन्वी, तू खरंच माझ्यावर प्रेम करतेस?" मी म्हणालो.
ती काही बोलली नाही.
मी पुन्हा एकदा तिला तोच प्रश्न विचारला.. ती काहीच बोलली नाही. मी हातातील डायरी बाजूला ठेवली, तिच्याकडे पाहिले आणि तिला हलवू लागलो... अचानक तिचे डोके माझ्या खांद्यावरून खाली पडले.
तन्वी गेली होती.
बाहेरून मी घरात आलो. घरातील सर्वजण झोपी गेले होते. मी माझ्या खोलीत आलो. आज 31 ऑक्टोबर होता. याच दिवशी दहा वर्षांपूर्वी तन्वी मला सोडून गेली होती. मी माझ्या खोलीतील कपाट उघडले. त्यात एका कप्प्यात मी माझ्या हातातील डायरी ठेवली, तन्वीच्या डायरीवर ठेवली... तन्वीने मला तिची डायरी दिली होती. मी तो कप्पा पूर्ण उघडला आणि त्यातील तन्वीच्या आयुष्यातील पहिली ट्रॉफी हातामध्ये घेतली. माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ती ट्रॉफी मी आहे त्या जागेला पुन्हा व्यवस्थित ठेवली. माझ्या डायरीखालील तन्वीची 'ऑक्टोबर' नावाची डायरी माझ्या हातामध्ये घेतली. त्या डायरी वरून मी हात फिरवला.. मी डायरी उघडली. पहिल्या पानावर तिने लिहिले होते..
"लव यू अभिषेक... And I will miss you so much.."
मी डायरी मिटली, आणि आहे त्या जागेवर ठेवली.. त्या डायरीशेजारीच एक छोटासा लाकडी बॉक्स होता. मी तो उघडला.. त्या बॉक्समध्ये दोन छोटे छोटे कप्पे होते. एका कप्प्यात तन्वीचे गोव्यामध्ये मिळवलेले पाचशे रुपये होते आणि दुसऱ्या कप्प्यात माझे सहाशे रुपये! मी तरी कसा ते सहाशे रुपये खर्च करू शकलो असतो? मी सुद्धा ते जपून ठेवले होते पण तन्वीला सांगितले नव्हते.. मी तो बॉक्स बंद केला. कपाट बंद केले व माझ्या स्टडी टेबलवर येऊन बसलो. समोरील लॅपटॉप मी उघडला. काहीच वेळेपूर्वी मी एक पुस्तक लिहून पूर्ण केले होते.. लॅपटॉपच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला 'DONE' असे लिहिलेले एक चिन्ह होते. मी त्या 'DONE' वर क्लिक केले.
मी तन्वीच्या आणि माझ्या आयुष्यातील आठवणींवर पुस्तक लिहिले होते. तन्वीची आणि माझी डायरी एकत्र वाचून मी ते पुस्तक लिहिले होते. तन्वी या पुस्तकातून नक्कीच अमर राहील..!
लॅपटॉप बंद करून मी माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहू लागलो. आकाशातील तारे आज जरा जास्तच चमकत होते.. कदाचित ते माझ्या तन्वीला सांगत असावेत की मी तिला पुस्तकातून अमर केले आहे..
मी बेडवर आलो आणि पांघरून अंगावर घेऊन झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पसरले गेले. कदाचित उद्या, परवा किंवा आणखी कोणत्यातरी दिवशी... मी तन्वीला पुन्हा भेटू शकेन या खोट्या आशेने... आणि हीच खोटी आशा मनात घेऊन मी माझे डोळे मिटले आणि झोपी गेलो..
© अभिषेक ❤