दिवाना दिल खो गया (भाग २) preeti sawant dalvi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दिवाना दिल खो गया (भाग २)

सिलू आज ऑफिसला थोडा उशीराच पोहोचला. त्याने त्याचे आजचे काम पूर्ण केले आणि तो घरी आला. आज अम्माने जेवणासाठी खास बेत केला होता. सगळेकाही सिलूच्या आवडीचे होते. दरवाजात येताच जेवणाचा खमंग वास सिलूच्या नाकात शिरला. मग लगेच फ्रेश होऊन सिलू आणि त्याचे अम्मा-अप्पा जेवायला बसले. सिलू आज अगदी तृप्त होईपर्यंत जेवला.

हे पाहून अम्माला ही खूप बरे वाटले.

झोपताना ही सिलूला आज मुग्धाचे विचार येत होते.

आज पण त्याने त्याचे आवडते गाणे ऐकले आणि तो झोपी गेला.

सिलूला आज एक सुंदर स्वप्न पडले होते. त्यामध्ये त्याला एक सुंदर बाग दिसली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडे होती. अगदी वेगवेगळ्या फुला-फळांनी ती बाग बहरली होती. त्या बागेत एक रंगीबेरंगी कारंजे होते आणि हो एक झोपाळा सुद्धा होता आणि त्या झोपाळ्यावर मुग्धा बसली होती. ती खूप आनंदाने झोके घेत होती. सिलू तिच्याजवळ गेला आणि तो तिला काही बोलणार तेवढ्यात त्याला जाणवले की, तो विमानतळावर होता आणि त्याच्या नावाची घोषणा होत होती. कारण आज त्याची अमेरिकेची फ्लाइट होती. त्याचे एक मन त्याला मुग्धाजवळ राहून ते सुखद क्षण अनुभवायला सांगत होतं आणि दुसरं.....

तो पुन्हा मुग्धाजवळ जात होता तेवढ्यात त्याला कोणीतरी ओढतच विमानाजवळ घेऊन गेले आणि सिलूची झोप मोडली. तो खूप घामाघूम झाला होता. त्याने ग्लासातले पाणी घटाघटा प्यायले आणि तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

सिलूला आज रात्रभर झोप नव्हती. तरी तो वेळेवर ऑफिसला जायला निघाला. तो स्टेशनवर पोहोचला. इतक्यात त्याला उमा दिसली पण मुग्धा तिच्याबरोबर दिसत नव्हती. सिलू थोडा काळजीत पडला. तेव्हा अचानक तिथे मुग्धा आली. आज तिने साडी नेसली होती. किती सुंदर दिसत होती ती त्या साडीत. ती उमाशी बोलत असताना तिची नजर सिलूवर पडली. तर आपले सिलू महाशय तिलाच न्याहळत होते. दोघांची नजरानजर झाली आणि चक्क सिलू लाजला.

मुग्धाला हे पाहून फारच हसू आले. ती हसतच ट्रेन मध्ये चढली.

आता हे नेहमीच झाले होते. रोज त्यांची नजरानजर होत असे. पण अजूनही त्यांची हवी तशी भेट झाली नव्हती.

एक दिवस अचानक भरपूर पाऊस पडत होता. इतका की सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.

आज ट्रेन ही वेळेवर नव्हत्या. काही ट्रेन तर ट्रॅकमध्ये पाणी साचल्यामुळे कॅनसल झाल्या होत्या. तरीही सिलू स्टेशनवर गेला आणि पाहतो तर काय..

तर आज मुग्धा त्याच्या आधीच स्टेशनवर आली होती. पण आज ती एकटीच दिसत होती. भरपूर पावसामुळे आज स्टेशनवर गर्दी ही फार कमी होती. नेहमीप्रमाणे आज त्या दोघांची नजरानजर झाली. तेवढ्यात ट्रेन आली. सिलूला वाटले आता मुग्धा ट्रेन मध्ये चढणार. पण हे काय आज मुग्धा ट्रेन मध्ये चढलीच नाही. ती एकटक सिलूला बघत होती.

सिलूला क्षणभर काहीच कळले नाही. ट्रेन निघून गेली. हळूहळू गर्दीही कमी झाली. आता त्या फ्लॅटफॉर्मावर ती दोघचं होती. पाणी वाढतच चालले होते. पावसाच्या सतत च्या माऱ्याने दोघेही पावसाच्या पाण्याने चिंब भिजले होते.

इतक्यात जोराची वीज कडाडली व जोरात ढगांची गडगडाट झाली. तो आवाज इतका मोठा होता की, मुग्धा घाबरून धावतच येऊन सिलूला घट्ट बिलगली.

सिलूला तर हे सगळे स्वप्नच वाटत होते. ते सगळे अगदी अनपेक्षित होते. काहीवेळ असाच निघून गेला आणि मग मुग्धा भानावर आली. तिची सिलूला बघायची ही हिम्मत झाली नाही. ती अगदी धावतच घरी निघून गेली.

सिलू काहीवेळ त्याच जागेवर असाच उभा होता आणि तो क्षण वारंवार आठवत तो आनंदाने घरी निघून गेला.

अचानक आलेला हा पाऊस सिलूसाठी खूपच लकी ठरला होता. दोन दिवस पावसाचे हे थैमान चालूच होते. काही लोकांचे खूप नुकसान झाले ह्या अवकाळी पावसामुळे.

सगळेकाही बंद होते दोन दिवस. पाऊस थांबल्यावर आणि पाणी ओसारल्यावर सगळे काही पूर्ववत सुरू झालं.

सिलूला अमेरिकेत जाण्यासाठी आता एकच आठवडा बाकी होता. त्याला पुढचे दोन दिवसच इकडच्या ऑफिसला जायचे होते. त्यानंतर काही दिवस सुट्टी आणि मग सिलू अमेरिकेतल्या ऑफिसमध्ये असणार होता.

सिलूने तयारी केली आणि तो नेहमीप्रमाणे स्टेशनवर गेला. मुग्धा तिथेच उभी होती. तिने उमाच्या कानात काहीतरी सांगितले तसे उमा सिलूजवळ आली आणि तिने सिलूकडे चक्क त्याचा नंबर मागितला. सिलूने ही लगेच तो दिला आणि मग उमा त्याला थॅंक यू बोलून मुग्धाकडे गेली आणि मग दोघीही ट्रेनमध्ये चढल्या.

त्यादिवशी सिलूने एक क्षण देखील फोन नजरेआड होऊ दिला नाही. काय माहीत कधी मुग्धाचा फोन येईल.
पण पूर्ण दिवस मुग्धाचा फोन काय एक मेसेज सुद्धा आला नाही. सिलू जेवून झोपायच्या तयारीत होता.

इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. सिलूने नाव न बघताच फोन उचलला तर तो त्याच्या ऑफिसमधल्या एका स्टाफचा होता. त्याने भराभर बोलून फोन ठेवला.
एव्हाना रात्रीचे पावणे अकरा वाजले होते.

सिलूने रूमची लाईट बंद केली आणि तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला.
असाच काहीवेळ गेला आणि बरोबर रात्री ११ वाजता एका अपरिचित नंबरवरुन सिलूला मेसेज आला.

आणि माहीत आहे तो नंबर कोणाचा होता?

अहो, मुग्धाचा!!

क्रमश:

(सिलू मुग्धाशी नेमके काय बोलेल आणि ह्या दोघांची लवस्टोरी सुरू होईल का? हे तुम्हाला लवकरच कळेल. तोपर्यंत हा भाग आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा)

धन्यवाद

@preetisawantdalvi