दिलदार कजरी - 4 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 4

४.

घेई छंद..!

त्या नंतर दिलदारच्या दिलाने एकच आवाज दिला.. 'कजरी कजरी.' कजरी नामात तो गुंगला, गुंतला. ध्यानी मनी स्वप्नी.. कजरी दिसू लागली. रोज सकाळ संध्याकाळ त्या देवळाकडे पाऊले पडू लागली. समशरेसिंगाने लाख समजावले पण दिलदार है कि मानता नहीं.. असे व्हायला लागले. रात्रंदिन तो ती दिसेल याच्या विचारात मग्न बसू लागला. लागले नेत्र ते कजरीतीरी असे काहीतरी. देवळाबाहेर नि देवळाच्या आत, चुकला फकीर मशिदीत सापडावा तसा दिलदारसिंग सापडायला लागला.

न राहवून समशेर सांगे,

"सरदार, तुम्ही हा नाद सोडा. ज्या गोष्टीला शेवट नाही ती अशी पुढे रेटू नका.."

"समशेर, तू माझा एकुलता एक यार, तू पण असे बोलावेस?"

"सरदार, हे धोकादायक आहे."

"प्रेमात कोणत्याही धोक्याची नाही मला परवा.."

'आज, उद्या, परवा .. नसेल परवा पण म्हणून सबंध टोळीला असे धोक्यात टाकावे? सरदार, पोलिस आपल्या टोळीचा माग काढतील अशाने .."

"टोळी? मी मनातून डाकूगिरी काढून तिथे कजरीला बसवले आहे.. या दिलदारसिंगने दरोडेखोरी नि डाकूगिरी सोडली.."

"सरदार.."

"असे ही मी एकाही डाक्यात सामील नव्हतो कधी.. शरीराने मी टोळीत होतो. मनाने कधीच नाही. सरदार म्हणून मी कधीच काहीच केले नाही .."

"पण तरीही सरदार .."

"समशेर, आज पासून मी तुझा सरदार नाही. फक्त मित्र. हे सरदारपण सोडले मी.."

"पण मोठे सरदार ..?"

"ते असतील सरदार. मी लवकरच त्यांना सारे सांगतो.."

"तुम्ही परत विचार.."

"यार.. तुम्ही वगैरे सोड.. तू म्हण.."

"पण सरदार .."

"परत सरदार? नको.. यातून काहीतरी मार्ग काढायला हवा.."

"ठीक आहे.. सरदार.. नाही दिलदार, जशी तुझी मर्जी. आता पुढे काय करणारेस तू?"

"विचार! विचार तू मला.. नि मी करतो नुसताच विचार! चार दिवस की चार महिने झाले तरी नुसता विचार .. विचार .."

"तुला मी पहिल्याच दिवशी सांगितलेले.. ज्या गोष्टीत पुढे काही घडण्यासारखे नाही अशा गोष्टी पुढे नेऊच नयेत. पण तू.. कजरीनामाचा जप करतोयस. ती तिकडे देवीच्या भजनात गुंग.. तू कजरीदेवीच्या.. विचार कर.. देवळातील भटजीबुवा तुझ्या टोळीत, नव्हे झोळीत त्यांची मुलगी देतील?"

"समशेर, ते सोडून दुसरे काहीही सांग. कजरी माझ्या दिल आणि दिमागवर येऊन बसलीय. तिकडून ती उठणार ही नाही नि जाणार ही नाही. तेवढे सोडून बोल.."

"तेवढे सोडून काय बोलू? एकतर आजूबाजूच्या टोळ्या भारी व्हायला लागल्यात. परवा त्या दिवाणसिंगानी एका गावाला लुटले. आजवर कोणाची हिंमत होती? आपले थोरले सरदार निवडणूक लढवण्यात गुंग.. तू असा.. तोळामासा झाल्यासारखा.."

"तोळामासा? नाही .. खरे तर हो.. मासा.. पाण्यावाचून मासा. कजरीबिन दिलदार .. तडपतोय. तडफडतोय.."

"आणि बडबडतोय सुद्धा. दिलदार जरा दिलावर हो उदार आणि सोड ते एकतर्फी प्रेमप्रकरण.. सरदारांना पत्ता लागला ना तर काही खरं नाही.."

"तेवढे सोडून बोल समशेर.. उनके सिवा रौनक नहीं मैफिल में .. कहता है दिलदार .. ऐ दिलवर .."

"रौनक? पहन ले ऐनक.. गा आता गाणं.. रघुपति राघव कजरी कजरी.."

समशेरच्या समजवण्यातून समजेल अशा अवस्थेत दिलदार नव्हताच. दिनरात कजरीनाम जप .. ध्यानी मनी स्वप्नी एकच ध्यास.. जेवताना ही हाती एकच घास.. जिथे तिथे एकच भास.. आणि नाही झाला भास तर भासाचा आभास.. कजरी.. कजरीची मूर्ती डोळ्यासमोर आणून दिवसरात्र बसलेला दिलदार. तरणाताठा टोळीचा प्रमुख असा बसून काढतो दिवस.. संतोकसिंगाला काय करावे ते कळेना. कजरीकथा तर त्याला ठाऊकही नव्हती. नाहीतर आतापर्यंत तिला पळवून आणणे त्याला कठीण थोडीच होते? पण दिलदारसिंगला तिला पळवून आणायचे नव्हतेच.. तिचे ह्रदय पळवून आणायचे होते. त्या टीव्ही नामक डब्यातून पाहिलेल्या चित्रपटांची शिकवण म्हणा की परिणाम म्हणा.. त्याच्या प्रेमक्षुधेला हे परिमाण मिळालेले. शम्मी कपूरच्या धसमुसळेपणाहून अमोल पालेकरचे हळूवार प्रेम आवडू लागलेले. मुग्ध कजरी नि पाठोपाठ गुलाबाचे लाल फूल घेऊन तो. आजवर कोणा टोळीतल्या सदस्याने गुलाबाच्या फुलाला असे हळूवारपणे हाती घेतले नसेल. आवडले फूल की आणले तोडून .. इतके सोपे जीवन तत्वज्ञान त्यांचे. यात दिलदारसिंगसारखा कोणी अ तत्वज्ञानी त्या टोळीतच असावा .. दिलदारच्या ध्यानी मनी दिसणारी कजरी प्रत्यक्षात कमी नि स्वप्नात जास्त दिसू लागलेली. दिलदार गावाबाहेरच्या त्या देवळातल्या देवीच्या दर्शनाचे पुण्य गाठीशी बांधत होता. काही वेळा कजरी दर्शन झालेले. पण बहुतेक वेळा खरीखुरी देवीच बघून परतावे लागायचे. दिसली कजरी तरी तिच्याशी काय कसे कधी बोलावे.. दिलदारच्या दिलात हा प्रश्न सतत घर करून होता. एकाएकी तिच्यासमोर जाऊन तिला सर्व सांगून टाकावे असे वाटे त्याला, पण ते क्षणभर. अशी हिंमत आपल्यात नाही हे त्याला ठाऊक होतेच.

कजरीचे पहिले दर्शन होऊन काही महिने उलटून गेलेले. प्रेमकथेची रेकाॅर्ड एकाच ठिकाणी अडकलेली. ती पुढे सरकण्याचे नाव नाही. आणि पुढे काही होईल अशी शक्यताही नाही. पण ते वयच वेडे असते म्हणतात. त्यामुळे वेडेपणा करत दिलदार 'मैं शायर तो नहीं' म्हणत कविता करायला लागला. प्रेम माणसाला कवी बनवते म्हणतात. चंबळच्या खोऱ्यात नि डोंगरदऱ्यात आजवर त्याच्या पूर्वजांपैकी कुणी कविता लिहिली नसेल कधी. लिहायला वाचायला तर तो शिकला नव्हता, पण त्याची कविता आतून बाहेर आपोआप पडत असावी. शब्द आपसूक तोंडातून येत होते. आणि ऐकायला, खरंतर ऐकवायला एकुलता समशेर होताच ..

"यार समशेरा, तुला कधी असे झालंय का रे?"

"असं म्हणजे कसं?'

"म्हणजे मला दिनरात तीच दिसते. तिचाच विचार चार प्रहर.."

"मला असं कसं होईल दिलदार. मला इतरही कामं असतात. लुटालुटीचा हिशेब मलाच ठेवावा लागतो दिलदार. तू सरदार पुत्र.. तुला चालते तसे मला कसे चालेल.. आणि असं व्हायला कोणी दिसली तर पाहिजे की नाही?"

"अरे, मला तर कविता सुचायला लागलीय हल्ली." "गाणं? आपल्या टोळीत अशा शब्दात कोणी गाणं लिहिलं नसणार .."

"अरे, प्रेमाची गाणी आपण लिहित नाही. प्रेमच लिहून घेतं आपल्याकडून."

"सरदार काय म्हणतील दिलदार? पण मला सांग तू खरंच कविता करतोयस?"

"अर्थात, समशेर. मी करत नाही. प्रेमच माझ्याकडून करवून घेतंय.. ऐक जरा.. जरा काव्यमय आहे.. पण समजून घे.."

"तू म्हणतोस तर ऐकावेच लागेल."

"ऐक.. मी म्हणजे एक भुंगा. भ्रमर. कजरी एखाद्या कमळाच्या फुलासारखी. होतं काय ना, कमलदलं मिटली की आत भुंगा अडकतो.. गुंततो. कमलपुष्पास हे भ्रमराचे गुंतणे ठाऊकच नाही. पण भ्रमरास तर ठाऊक आहे.. क्षणार्धात ती नाहीशी झाली पण भेटीची हुरहूर लावून.. मी अशा भुंग्यासारखा..

शोधत फिरतो मी तुला

फुलाफुलांतूनी

न दिसशी कुठेच तू

म्हणूनी उदास मी मनी

 

ताटव्यात त्या फुलांच्या

आहेस का सांग तू

की नभीच्या चांदण्यांत

सांग ना आहेस तू

 

रात दिन ध्यास तुझा

गेलो मी गुंतूनी ..

 

सुंदर जे दिसते मला

वाटते तू असशी तिथे

न दिसशी तू तशी

वाटते ते रिते रिते

 

झुरणाऱ्या या मला

देशील का संजीवनी..

 

भासे तुजविन सारे पोकळ

न अर्थ कुठल्या गोष्टीला

दिसशील तू हुरहूर मनी

छंद एकच तो लागला

 

एकदातरी दिसूनी मला

आणिशी अर्थ जीवनी ..

 

कशी आहे?"

"कोण? कजरीभाभी की कविता?"

"भाभी? काय कसे कधी होईल.. माहिती नाही."

"कविता चांगलीय.. पण चंबळच्या खोऱ्याने डाकूंच्या तोंडून असली शुद्ध भाषा नि कविता ऐकली नसणार.. शाळेतही न जाता शिकलास तू.."

"शिकलो नाही .. ही आतून आलेली कविता आहे. आपोआप.."

"म्हणजे आपली टोळी गावात शिरली की आपोआप सारे गावकरी गुडूप होतात.. तसे काहीतरी. पण नाही. इथे सारे शब्द बाहेर येऊन उभे राहतात. कवितेत जाऊन बसायला!"

"समशेर, तुला पण लागले की कळायला.."

"तुला सांभाळून घ्यायचे तर कळून घ्यायलाच हवे ना!"