दिलदार कजरी - 5 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 5

५.

स्वप्नात रंगला तो..

शेजारचे गाव. कजरीचे. दिवालपूर. गाव मोठे. म्हणजे खाऊन पिऊन सुखी. हिरवीगार शेते. पाण्याने भरलेली तळी. देवीचे देऊळ. त्याबाहेर पिंपळाचे मोठे झाड. त्याच्या बाजूचा पिंपळाचा पार. घोड्याच्या टापांचा दूरवरून आवाज येतो. हळूहळू वाढत जातो. पारावारचे गावकरी एकेक करून उठतात. आवाजाच्या दिशेने बघतात. मग धावाधाव सुरू होते. घोडे मातीचा धुरळा उडवत गावात भरधाव शिरतात. ही दिवाणसिंगाची टोळी. दिवालपूर लुटायला आलेली. दिवाणसिंग शेफारलाय हल्ली. त्याचे साथीदार हवेत गोळीबार करतात. गावकरी घाबरून घरात नि बाहेर चिडीचुप शांतता. दिवाणसिंगाची माणसं इकडेतिकडे मोकाट सुटतात. सगळीकडे धूळच धूळ. मग दिवाणसिंग स्वतः देवीच्या देवळामागच्या घरात शिरतो. कजरी त्याच्या नजरेतून सुटलेली नाही. तशी कोणाच्या नजरेतून सुटावी अशी नाहीच आहे ती. पुजारी कापत उभा आहे. बंदुकीच्या टोकावरून दिवाणसिंग कजरीला उचलतो.. आपल्या घोड्यावर पुढ्यात टाकून निघतो.. मोहिम फत्ते झाली.. समाधानाने कजरीला सांगतो..

"चिंता मत करना.. तुम्हें रानी बनाकर रखूंगा.."

एकाएकी बंदुकीची एक गोळी दिवाणसिंगाच्या कानाजवळून सुर्रकन जाते.. घोडा बुजून एकाएकी थांबतो.. मग टाच मारल्यावर पुन्हा धावू लागतो. दिवाणसिंगामागे काही जण लागलेत. दिवाणसिंग घोडं दामटतोय. गोळीबार होतोय.. सगळीकडे टापांचा आवाज. शेवटी दिवाणसिंगाचा घोडा पाय घसरून पडतो. पाठोपाठ तो आणि कजरीदेखील. पाठून दिलदार आपल्या घोड्यावरून पोहोचतो.. दिवाणसिंगच्या दिशेने दोन गोळ्या झाडतो. दिवाणसिंगकडे न पाहता शिताफीने कजरीला उचलून घोड्यावर घालून परत निघतो. भरधाव. घोड्यावर स्वार असताना विचारचक्र सुरू आहे.. तिचे मन जिंकायचे तर काय करावे? आपल्या गुहेत घेऊन यावे की तिच्या घरी सुखरूप पोहोचवून सगळ्यांची मने जिंकावीत? त्याचा निर्णय होत नाही. कजरीला तो तिच्या घरी सोडतो .. ही घ्या तुमची ठेव परत म्हणत पुजारीबुवाच्या पाया पडतो.. एकदम ओठांवर नुकताच ऐकलेला डायलाॅग येतो.. 'हमें आशीर्वाद देना पिताजी..' कजरी त्यापाठोपाठ पाया पडते.. नि लाजते..

दिलदारसिंगचे डोळे उघडले तेव्हा समोर समशेर उभा होता.

"काय दिलदार.. स्वप्न वाटतं.. कजरीभाभी वाटतं स्वप्नात आलीय. हसतोयस तोंड फाड फाडून.."

दिलदार एकाएकी भानावर आला. दिवाणसिंग नि त्याचा डाका नि कजरीला पुढ्यात घालून आणलेली.. स्वप्नच सारे.. पण सकाळ सकाळी पडलेले. ते खरे व्हायला पाहिजे.

"यार समशेर.. काय स्वप्न पाहिलं सांगू .. कजरीला घोड्यावरून घेऊन आलो.. त्या दिवाणसिंगाच्या तावडीतून.."

"तू नुसती स्वप्नं पाहात बस.. मला कामं आहेत. कालच्या धाडीचा हिशेब करायचा आहे. आणि काल आपल्या त्या गुलजारसिंगानी एकीला उचलून आणलीय. त्या लक्ष्मणगढमधून. त्याची खबरबात घ्यायचीय. तू बस इथे.. मी निघतो."

समशेरसिंग निघून गेला. दिलदार विचार करत तसाच पडून राहिला. पुढे काय करायचे नि काय होणार? तसे कजरीला जबरदस्ती पळवून आणणे कठीण नाही, गुलजारसिंगने कसे एक घाव दोन तुकडे सारखे केलेय.. पण दिलदारच्या दिलास ते पटत नाही. ही डाकूगिरीच पटत नाही त्याला. ताकदीच्या बळावर लुटालूट एकवेळ ठीक पण माणसाच्या ह्रदयास लुटणे कसे शक्य आहे? पण त्याच्या कजरीस कोणी पळवून नेले तर? त्याआधी काहीतरी केले पाहिजे. एकाएकी त्याला वाटले, समशेरसिंगाला सांगून खोटा डाका घालावा. कुणी कजरीला उचलून पळू जाऊ लागले की दिलदारने जिवावर उदार होऊन तिला वाचवावे नि तिच्या दिलाचे दार त्याच्यासाठी उघडून घ्यावे.. ह्या विचाराने तो उठला. समशेर तोवर आपल्या कामासाठी निघून गेलेला. नंतर असे काही शक्य आहे का ते पाहू म्हणत ओढाळ वासरू गायीकडे जावे तसा दिलदार उठून परत आपसूक त्या देवळाकडे निघाला.

आज देवळात सगळीकडे सजावट नि रोषणाई होती. माणसांची लगबग सुरू होती. पाठून सनईचा आवाज येत होता. इकडेतिकडे सगळीकडे घाई गर्दीचा माहोल होता. माणसं येत जात होती. लगीनघाई जणू. शेवटचा लगीनघाईचा विचार मनात आला नि दिलदार चपापला. कजरीचेच तर नसावे शुभमंगल? या विचाराने तो अस्वस्थ झाला. बरोबर समशेरपण नव्हता सगळ्या बित्तंबातम्या द्यायला. पण त्याला कजरी विवाहाबद्दल माहिती असती तर तो आधीच बोलला असता. त्यातल्या त्यात दिलदारला धीर आला.. बाजूला उभा राहून निमूटपणे तो पाहू लागला. वातावरण लग्नाचेच होते. देऊळ म्हटले की गावातील कोणाचेही असू शकते लग्न.. कजरीचेच कशाला? पण मन चिंती ते वैरी न चिंती.. दिलदार उगाच येरझाऱ्या घालू लागला.. कोणाला तरी विचारावे कोणाचे लग्न आहे असा विचार करून तो पुढे झाला. अर्ध्या तासभर फेऱ्या मारून धैर्य एकवटल्यावर विचारून मिळालेली माहिती ऐकून तो मटकन खाली बसला.. पुजाऱ्याच्याच मुलीचा विवाह समारंभ होता तो. भर मंडपातून तिला पळवून नेणे सोडून आता उपाय दिसत नव्हता, पण पळवून नेणे दिलदारच्या उदार दिलास पटत नि परवडत नव्हते. आता शुभमंगल झाले की डोक्यावर अक्षता टाकू नि हा अध्याय समाप्त करू म्हणत दिलदार तसाच बसून राहिला. कजरी विवाह घटिका समीप येत होती नि दिलदारच्या धडधाकट दिलाची धडधड धडाधड वाढत चालली होती.. आता ते धडधाकट दिल धड चालेल याची शाश्वती नाही म्हणत तो मटकन बसलेला ..

खरेतर या परिस्थितीत दोन पर्याय होते. तडक निघून परत जाणे अथवा आपल्या टोळीस घेऊन कजरीचे अपहरण करणे. दुसरा पर्याय तसा खोऱ्यात सर्वमान्य होता. परत येऊन रडत बसण्यास मात्र मान्यता नव्हती. पण दोन्हीपैकी काही न करता थिजल्यासारखा दिलदार गपगार बसून नुसता पाहात राहिला.. वेळ जात होता. घटिका नि पळे जात होती. दिलदारच्या नजरेस नवऱ्यामुलाची वरात पडली.. गावच्या प्रथेप्रमाणे मुंडावळ्यांमुळे न मुलाचे तोंड दिसत होते.. ना ही नंतर नव्या नवरीचे.. लग्न लागले. दिलदार सुन्न बसून होता.. ठणाणा करीत.

.. आणि एकाएकी त्याचे ध्यान गेले, तर कजरी नवरानवरी बरोबर खिदळत बोलत उभी होती.. पुजाऱ्यास दोन मुली असू शकतात, कदाचित तीन ही .. ही शक्यता त्याच्या मनात आलीच नव्हती अजूनपर्यंत. दिलदारच्या अंगात अचानक त्राण आले. वीज संचारावी तसा तो उठून उभा राहिला. जणू काही कजरी त्याच्या हातीच लागली अशा उत्साहाने सर्व पाहात उभा राहिला. एखादा बेशुद्ध पडलेला कुणी एकाएकी अंगात ताकद येऊन उभा रहावा तसा दिलदार उभा राहिला. बदलले काहीच नव्हते, पण जणू कजरी हाती लागलीच असा विश्वास त्याला मनात वाटायला लागला. देवळाबाहेर एका पारावर त्याने बस्तान ठोकले. लोकांच्या जेवणाच्या पंगती उठत होत्या. कजरी मधून मधून दर्शन देत होती. पहिल्यांदा तिला पाहिले त्यानंतर तिला इतका वेळ तो प्रथमच पाहात होता. नाहीतर श्रावणातल्या पावसासारखी क्षणिक दर्शन देऊन नि आनंदाचा शिडकावा करून ती नाहीशी होत असायची. दिलदार तळ ठोकून बसल्यासारखा बसलेला. इतक्या गर्दीत दिलदारकडे कोणी बाहेरून आलेला म्हणून पाहत नव्हते, नि बिन कामाचा बसलाय म्हणून कोणी विचारत ही नव्हते. लग्नाच्या गर्दीचा फायदा म्हणून दिलदार खूश होता. मध्येच त्याच्या मनात विचार आला.. ह्या मुंडावळ्यांमागे कोण आहे ते दिसत नाही. लग्न लागता लागता त्याच्या टोळीने नवरीचे अपहरण केले असते तर? कजरीची मोठी बहीण हाती लागली असती! नसती आफतच म्हणायची. म्हणजे तिला परत पाठवायचे अजून एक काम मागे लागले असते. एकूण नवरीला पळवून न नेल्याचेच योग्य होते.. त्याने मनाशी म्हटले.

लग्न सुरळीत पार पडले. बिदाई झाली. तहानभूक हरपून दिलदार कजरीला पाहात बसलेला. तसा दूर होता तो, म्हणजे कोणाच्या नजरेत यायला नको असा. कजरी त्याच्या नजरेत आज अधिकच सुंदर दिसत होती. सगळीकडे सामसूम झाली नि दुपारी तो मग नाखुशीनेच परत फिरला. एखाद्या लहान मुलासारखे मागे वळून पाहात चालता चालता एका सायकलीवर धडकला..

"अरे, देखकर नहीं चलता.. पूरी डाक गिरा दी हाथ से.."

"माफ करना डाकिया बाबू.."

या शिवाय दिलदार काय बोलणार होता? निमूटपणे ती डाक म्हणजे पत्रे हातात गोळा करत त्या डाकियाच्या हाती दिली. तसा तो पोस्टमन शांत निघाला म्हणून ठीक.. नाहीतर गावात शोभा व्हायची.

मग दिलदार नाकासमोर पाहात सरळ जंगलात परतला. सकाळपासून तो भुकेला होता ते त्याला परतल्यावर ध्यानात आले. तरीही सर्वप्रथम समशेरच्या कानावर आजचा साद्यंत वृत्तांत देण्याची, एखाद्या शाळेतून घरी परतून मुलाला घरी सर्व सांगायची घाई असते, तशी घाई झालेली.

सगळे ऐकून झाल्यावर समशेर म्हणालाच, "दिलदार, नीट विचार कर. झाले काहीच नाही अजून. अजून सगळे पहिल्या सारखेच आहे. तू पण तोच नि ती पण तिथेच.." दिलदारच्या उधळलेल्या घोड्याला लगाम घालत समशेर म्हणाला नि दिलदारचे उडणारे विमान जमिनीवर त्यामुळे एकाएकी जमिनीवर उतरले. तरीही दिवस मावळला तरी त्याचे कवित्व राहिलेच. प्रेमी जीव इतक्यात कसली हार मानतोय.. स्वतःशीच हसत नि मनातल्या मनात कजरीशी बोलत दिलदार पडून राहिला.. नि कजरीची स्वप्ने पाहात केव्हातरी निद्राधीन झाला..

असं ठरवून स्वप्न कोणी पाहात असेल का? दिलदार मात्र तयारीचा गडी निघाला. आजच्या स्वप्नात थेट सकाळच्या लग्नसमारंभाचा रिप्ले पाहिला त्याने. फक्त नवरा नि नवरी बदललेले. कजरी नि तो एकमेकांना हार घालत होते. स्वप्नातल्या स्वप्नात सारी हौस पुरवून घेत तो उठला तेव्हा सगळे टोळीतले साथीदार नव्या मोहिमेची तयारी करण्यात गुंतलेले. गुलजारसिंगने पळवून आणलेली 'ती' कौतुकाने दुरून पाहात होती. दिलदारला आश्चर्य वाटले, पळवून आणलेली ती.. इतकी हरखून कशामुळे गेली असेल.. ती ही एका दिवसात? की तिची हौस फिटवली गुलजारसिंगने? म्हणजे कजरीदेखील अशीच खूश होईल? पण गुलजार तसा पूर्णवेळ डाकू .. दिलदारने तर मनानेही डाकूत्वाचा त्याग केलेला. अशा कोणाशी कजरी खुशीत राहिल? आणि डाकूंच्या टोळीचा त्याग करावा तर जावे कुठे आणि पोटापाण्याचे काय? विचार करता करता दिलदारला जाणवले, आजकाल त्याला प्रश्न फारच पडतात .. उत्तरे न माहिती असणारे .. नुसतेच प्रश्न!