दिलदार कजरी - 15 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 15

१५

भेट पहिली खडकाखाली

रात्रभर दिलदार तळमळत राहिला. बाकी टोळी कुठेतरी धाड घालायला निघून गेलेली. संतोकसिंग नव्हता तरीही बाकीचे सारे व्यवस्थित सारे पार पाडतं. संतोकसिंगच्या नेतृत्व गुणांचेच त्यातून दर्शन होत होते.व्यवस्थित लावून दिलेली शिस्त आणि टोळीची उद्दिष्टे अतिशय सुस्पष्ट असणे.. दयामाया या शब्दांना जवळ फिरकू न देणे वगैरे त्याची मूलभूत तत्वे सारेच टोळीकर कोळून प्यायले होते. सारे त्या मार्गावरून टोळीची दहशत बसवत टोळीची बरकत वाढवीत होते, तेव्हा दिलदार त्यावर हरकत घेत आपल्या दिलाची पुकार ऐकत बसलेला. त्यात आता कजरीची पडलेली भर.

कजरीच्या भेटीनंतर दिलदार अजूनच सैरभैर झाला. तिला जेव्हा दिलदारच्या मुळाबद्दल कळेल तेव्हा काय होईल? दिलदार खूप विचारात पडला. समशेर सांगायचा ते हेच होते. उगाच नसत्या फंदात न पडता पुढील विचार करावा.. ही एकतर्फी प्रेमकथा इथेच संपवावी. कजरी चार आठ दिवस पाहिल वाट पण नंतर विसरेलच. अशा विचारात तो उठला. नि स्वतःच्या नकळत तयारीला लागला. कितीही कळत असले तरी वळत नव्हते .. सायकलीवर बसून निघताना आठवले.. चार शब्दांची का होईना पण चिठ्ठी लिहायची राहिली. मागे फिरून कागदावर चार शब्द लिहिले त्याने, 'खरंच. गंगा मय्याची शपथ..'

ती चिठ्ठी जपून ठेवत परत दुचाकीवर टांग मारली. त्याची सायकल भरधाव निघाली.

मनात विचार होते, हे शक्य नाही. आणि शरीराची कृती त्याच्या अगदी उलट म्हणजे, कजरीला भेटायला आतुर असा तो. गावात पोहोचला तशी कजरी हळूच भेटायला आली. हातातील चिठ्ठी तिला दिली. चार दोन वाक्ये बोलून झाली.. आज बोलताना डाकू नि त्या गावचा विषय निघाला नाही.. कजरी त्या चिठ्ठीमुळे तशी खुशीत वाटतेय हे खरे. त्या वयात कोणाला तरी मनापासून आपण आवडतो याचे अप्रूप तर असणारच होते. दिलदार समोर असूनही 'तो मीच' हे सांगू शकत नव्हता.. छोट्या गावात अशा भेटी कोणाच्याही डोळ्यांत येतात .. त्यावर कजरीनेच तोडगा काढलेला..

"तुम्ही चिठ्ठी आणता ना.. लोकं विचारतील एक दिवस .."

"कोणाला?"

"कोणाला काय? मला किंवा तुम्हाला.."

"काय?"

"काय काय? हेच नेहमी नेहमी काय काम आहे? आणि या गावचे नसूनही पोस्टमन कुठले पत्र देताहेत? ते ही फक्त मला.."

"मग?"

"मग असे.. इथे भेटू नका.."

"पण माझ्या मित्राच्या चिठ्ठीचे काय? बिचारा काय करेल.."

"तुम्ही कि नाही नदीच्या किनारी भेटा.. संध्याकाळी. किंवा तिकडे तुम्हाला मी एक जागा दाखवीन तिकडे चिठ्ठी ठेऊन जा.. माझा आवडता खडक आहे त्याच्याखाली.."

"खडक आणि आवडता?"

"का? नसू शकतो?"

"असू शकतो. कोणाला काय आवडावे याचे नियम थोडीच आहेत..?"

"आणि कोणाला कोण आवडावे याचे देखील नाहीत. तर तुम्ही या.. मी दाखवेन.. फक्त इथून थोडे दूर आहे.. तुम्हाला इतक्या दूरवर यावे लागेल.."

"माझी सायकल आहे की.."

"पण जाताना सांभाळून हां.. त्या जंगलात .."

"तो विषयच नको.. मला पाहूनच सारे घाबरतील.."

"काहीतरीच.."

"काहीतरीच नाही. समजा मी पण त्यांच्यापैकी एक आहे.."

"म्हणजे? डाकू? की डाकिया?"

"डाकिया डाकू समजा.."

मग नदी किनारी भेट झाली. एक प्रचंड मोठा खडक होता.. त्याखाली एक गुहा तयार झालेली. समोर शांत वाहणारी नदी. पाठीमागे हिरवेगार डोंगर.. निसर्गरम्य परिसर आणि समोर कजरी सारखी रम्य बाला..

"तुमचा तो मित्र.. त्याच्याबद्दल तुम्ही काहीच कसे सांगितले नाहीत अजून .."

"तुम्ही त्याला एकही चिठ्ठी लिहिली नाहीत .. तो म्हणाला, तुम्ही काही सांगाल.. त्यानंतरच .."

"मला एक सांगा, तुमचा तो मित्र बुद्धू आहे का?"

"का?"

"काही नाही .."

एवढे बोलून ती फुरंगटून बसली. दिलदारला तिच्या फुगलेल्या गालांचा नि त्यामागील कारणाचा हिशेब लागेना .. हिने का रागवावे? थोडीशी रागातच ती म्हणाली,

"हा दगड आहे ना.."

"आहे.."

"ते मला ही ठाऊक आहे.. तर कधी मी नाही आले तर याच्याखाली चिठ्ठी ठेऊन जा.."

"पण तुम्ही आलात तरच बरे वाटेल.."

"मी घेईन ती नंतर.."

"नाही, म्हणजे चिठ्ठी कोणाच्या हाती नको पडायला .."

"ते खरंय.. पण कधी नाही आले तर इकडे ठेऊन जा.."

"आणि त्या मित्रास काही निरोप?"

"काही नाही .."

"नाही कसं? सांगा ना काहीतरी.."

"बरं, फक्त सांगा तो एक नंबरचा बुद्धू आहे.. हे सांगायला मात्र विसरू नका.."

"सांगतो.. बुद्धू तर बुद्धू .. काहीतरी निरोप तर मिळाला ना.. तो खूश होईल."

पुढील कित्येक दिवस अशी चार शब्दी चिठ्ठ्यांची वाहतूक सुरू राहिली. दिलदार लिहित होता. 'देवीने देवीस सुंदर घडवलेय.' 'रात्रंदिन आता कजरीचा विचार' 'तू न मी आणि..' अशी कितीतरी चार शब्दी प्रेमपत्रे लिहून झाली.

कजरी वाचून मनोमन सुखावत होती. दिलदार शक्य तितक्या वेळी तिला भेटत होता. मधून मधून तो संतोकसिंगचा विषय निघाला तरीही आता दिलदार तो विषय जणू नाहीच असे समजून त्यावर विचार करणे टाळत होता..

एके दिवशी मात्र 'तो' प्रसंग आला असे दिलदारला वाटले .. कजरी नेहमीप्रमाणे आली, पण हातात एक चिठ्ठी घेऊन. दिलदारच्या दिलाची धडधड वाढू लागली. काय असेल चिठ्ठीत? पहिल्या प्रेमाची पहिली चिठ्ठी .. कजरीचे पहिले पत्र.. काय लिहिले असेल? प्रिय की प्रियतम? जानम की जानू? दिलवर की जिवलग.. की अजून काही? आजवर तिला नाव ही सांगितले नव्हते. एका निनावी आशिकाला काय लिहिल ती? पाकिट हाती देत म्हणाली,

"आज माझे एक काम कराल?"

"एक कशाला.. शंभर करेन. आणि वा! माझ्या मित्राला चिठ्ठी .. तो खूपच खुश होईल.."

"नाही. चिठ्ठी त्याच्यासाठी नाही .."

"मग?"

"हरिनामपुरात द्यायची आहे.."

"हरिनामपूर?"

"तुम्ही तिकडेच आहात ना कामाला?"

"आं.. होय.. पण मी तिकडे कोणाला ओळखत नाही .."

"पोस्टमनला काय.. म्हटले तर सगळेच ओळखीचे, म्हटले तर कोणीच नाही .."

"हे खरं.. चिठ्ठी कोणाला द्यायची आहे?"

"तिकडे एक गुरूजी आहेत. हरिनाथ गुरूजी. त्यांना."

"हरिनाथ गुरूजी? हरिनामपुरात? देतो. एका पोस्टमनला काय कठीण आहे.. तसा मी ओळखतो गुरूजींना.. पण तुम्ही कसे काय ओळखता ..?"

"आधी या गावातल्या शाळेत होते गुरूजी. आम्ही लहान होतो तेव्हा. मी त्यांची लाडकी होते खूप.."

"वा! हुशार असणार तुम्ही! तशा आताही आहातच म्हणा.."

"हुशार असण्याची काय गरज? गुरूजी शिकवतील तर हा माझा खडकही शिकू शकतो.."

"खरंच? काही विशेष .. नाही इतक्या वर्षांनी गुरूजींची आठवण आली.."

"तेच. संतोकसिंगच्या टोळीने पळवून नेलेले गुरूजींना. मला कालच कळले म्हणाना. नंतर सोडून दिले म्हणे. त्या डाकूंनी बघा गुरूजींना पण सोडले नाही .. त्यांची खुशाली विचारायला लिहिले. ते काही उत्तर देतील तर घेऊन या.."

"देतो. गुरूजींची भेटही होईल."

"तुम्हाला काय वाटते? गुरूजींना पळवून त्या डाकू लोकांना काय मिळाले असेल?"

ऐकता ऐकता दिलदारला परत घामाच्या धारा सुटल्या.

"आता ते मला कसे ठाऊक? आता गुरूजी परतलेत.. एक महिन्यानी. सुखरूप. मग ठीक आहे."

"तुम्हाला ठाऊक आहे? एक महिन्यानी सुखरूप परतलेत ते?"

"छे हो, आताच तुम्ही म्हणालात ना."

"पण ते एक महिन्यानी .."

"गावात लोक चर्चा करत होते.. म्हणून."

जग इतके छोटे असावे? आता गुरूजींना भेटणे आले. गुरूजींशी बोलताना आपण कजरीबद्दल काय काय सांगितले.. नि नक्की काय सांगितले त्याला आठवेना. पण एक मात्र होते, दिलदार बाकी डाकूंसारखा नाही इतके मात्र त्यांना ठाऊक झाले होते.. तरीही डाकूच्या टोळीतील कोणीही डाकूच असायचा. आणि पूर्वजन्मीची पापं जशी हात धुवून या जन्मात त्रास देतात, तसे आपले डाकूंच्या टोळीतील वाढणे त्रास देणार .. न टोळी सोडू शकत ना टोळीला आपले म्हणू शकत.. मास्तरांसाठी दिलेले पत्र नीट जपून ठेवत दिलदार निघाला. आता खरोखरीच हरिनामपुरात जाणे आले. ते ही कजरीच्या गावावरूनच जाणे भाग आहे. ती डोंगरावरच्या रस्त्याची थाप इथे उपयोगी पडणार नाहीच.. केव्हातरी रात्री हळूच जायला हवे. आणि तिने पाहिले तर? काहीतरी थाप ठोकावी लागेल. एक थाप पचवायला पुढे थापांच्या थप्प्या रचाव्या लागतील तर!