Manachya vaatevarti Avyakt to an mi - 3 books and stories free download online pdf in Marathi

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 3

पुढे...

काही भावना अश्या असतात ज्यांना आपण ओळख आणि नाव दोन्ही ही देऊ शकत नाही... त्या शेवटपर्यंत तश्याच राहून जातात...दबलेल्या... आता बघा ना, त्यादिवशी अचानक अतुलला काय झालं काय माहित आणि तो लगेच निघून गेला... मला माझ्या मनात काय चाललंय हे जाणवत होतं पण ते नक्की आहे काय हे ओळखता येत नव्हतं...आणि तसंच काहीसं अतुलच्या बाबतीतही होत असावं...आता विचार केला तर वाटतं की त्या वयात घडतं असं, अचानक कोणीतरी वाटायला लागतं 'खास'...पण मला त्या वयातही आणि आताही का तोच एक 'खास' वाटतो??? काय म्हणावं याला?? हं...बोलली ना, काही भावनांना नाव आणि ओळख नाही देऊ शकत..

चेतनला येऊन आठवडा झाला होता...आता माझा सगळा दिवस रशु, चेतन आणि ताईसोबत जायचा... चेतन त्याच्या कॉलेजच्या एकूण एक गोष्टी मला सांगायचा... त्याचे कॉलेजचे किस्से ऐकून मज्जा वाटायची...पण या आठवड्याभरात मात्र अतुलचे दर्शन काही घडले नव्हते आणि एरव्ही त्याच्याकडे दहा चकरा मारणारी माझी ताई ही घरीच बसून होती...का जात नसेल ही त्याच्या घरी?? मी सांगू का ताईला, चल बाहेर जाऊन येऊ म्हणून?? किंवा विचारू का सरळ सरळ की मी जाऊ का तिकडे?? नको, नको...असं कसं डायरेक्ट विचारू?? भीती वाटते...असे एकणाऐक विचार माझ्या डोक्यात येऊन जात होतो, आणि त्या विचारांत मी हे पण विसरली होती की माझा दहावीचा बोर्डाचा रिझल्ट आहे आज...आणि याची आठवण ही मला चेतन ने करून दिली...अरे देवा..!! हा अतुल मला पागल करून सोडणार आहे..स्वतःलाच दोन शिव्या दिल्या मी...दुपारी तीन वाजता गॅझेट येणार होते...२००४ चा तो काळ, तेंव्हा असे ऑनलाइन रिझल्ट येत नसत...आता मात्र माझी धकधक अजून वाढली, पोटात फुलपाखरू उडायला लागलेत...जर कमी मार्क्स आले तर काय विचार करेल अतुल मझ्याबद्दल??? मी किती ढ आहे हेच वाटेल त्याला...किती बालिश विचार होते ते..आणि शेवटी निकाल कळला मला... चेतन जाऊन पाहून आला...मी ८४ टक्क्यांनी पास झाली होती....बाप रे..!! मला स्वतःलाही विश्वास होत नव्हता...आता ताईने काही सेकंदात ही गोष्ट तेंव्हा 'व्हायरल' केली होती... ताईच्या घरचे खूप कौतुक करत होते माझं, किती लाड करत होते...कोणी पेढे भरवत होतं तर कोणी पाठ थोपटत होतं, पण माझे डोळे मात्र त्या एका व्यक्तीला शोधत होते...तो मात्र दिसला नाही.... संध्याकाळी मी आणि रशु जेंव्हा गच्चीवर होतो तेंव्हा अतुल आला आणि रशूला बोलला,

"अग रशु...तुला आई बोलावते बघ खाली...पप्पांनी गुलाबजाम आणले म्हणे..."

गुलाबजाम म्हणजे रशु ची दुखती नस..!! तिने लगेच धाव घेतली खाली...मी जायला निघाली तितक्यात अतुलने ने माझा हात पकडला आणि मी थांबली...त्याने माझा हात त्याच्या तळहातात घेतला आणि त्यावर एक चॉकलेट ठेवलं.. आणि माझ्या डोळ्यांत बघत बोलला,

"खरं तर त्याच दिवशी देणार होतो पण तू आणि चेतन...." आणि बोलता बोलता तो थांबला...

"मी आणि चेतन???? पुढे काय.."
मी पण विचारलं...

"काही नाही.... अभिनंदन..."

"अरे..पण अ..."
मी त्याला पुढचं काही विचारणार तेवढ्यात रशु धावत पळत आली आणि बोलली,

"अतुल काका...तू खोटं बोलतो मला..मला कोणी बोलवलं ही नाही आणि आई बोलली की अजून पप्पा आलेच नाही.."
ती असं बोलल्यावर मी चमकुन अतुलकडे पाहिलं की का हा खोटा बोलला असेल..याला अजून काही दुसरं बोलायचं होतं का?? पण रशु त्याला खाली घेऊन गेली..आणि मनातले शब्द ओठांवर आलेच नाही...

मला इकडे येऊनही भरपूर दिवस झाले होते आणि त्यात निकाल ही लागला होता त्यामुळे आईबाबा आता मला परत बोलवत होते आणि मलाही त्यांची आठवण यायला लागली होती...त्यामुळे जावं लागणारच होतं... ताईकडे सगळ्यांनी मला खूप जीव लावला, आता त्यांना सोडून जातांना मलाही वाईट वाटत होतं, पण त्यासोबत एक बेचैनी ही होती की मागे काहीतरी सुटून जातंय... मी जाणार म्हणून ताईकडे आज सगळ्यांनी गच्चीवर जेवणाचा प्रोग्राम बनवला, अतुल ही आला होता..सगळे गप्पा गोष्टीत गुंग होते, पण माझी नजर येऊन जाऊन मात्र अतुलवरच जायची...दोन तीन वेळा तर आमची नजरानजरही झाली...मी काय लाजेने पाणी पाणी झाली सांगू??? आता चौथ्यांदा जेंव्हा असं झालं मी ताडकन उठली आणि ताईला सांगितलं की खाली जाऊन पाणी घेऊन येते...आणि लगेच धाव घेतली खाली...मी खाली गेली तेंव्हा असं वाटलं की झाली एकदाची सुटका.. मी अशी का मुर्खासारखी त्याला बघत होती, काय विचार केला असेल त्याने...त्यादिवशी पाय मुरगळला होता तेंव्हाही असाच बावळटपणा केला मी...माझे हातपाय गळून गेले होते हा विचार करून...मी थोडं पाणी पिलं आणि दोन मिनिटं शांत बसली जेणेकरून माझं इतक्या जोराने धावणाऱ्या हृदयाने जरा दम धरावा...तेवढ्यात पाठीमागून माझ्या खांद्यावर कोणातरी हात ठेवला...माझ्या डोक्यात, मनात सध्या स्थितीला अतुलशिवाय कोणाचंही येणं जाणं नव्हतं, त्यामुळे मी लगेच मागे वळून बोलली,

"अतु....." आणि माझे तोंडातले शब्द तोंडातच राहिले, कारण यावेळी चेतन होता...

"काय बोललीस??? अतुल??? "

"न...नाही...मी..ते...'अरे तू'...असं बोलायचं होतं मला..तू अर्धवटच ऐकलंस...." आणि मी परिस्थिती संभाळण्याचा प्रयत्न केला...

"हो का...जाऊदे ते, इकडे एकटी का बसलीयेस...सगळे वरती आहेत ना??? भीती वाटत असेल ना...."

"छ्या...मी नाही घाबरत कोणाला..." मी खांदे उडवत बोलली....

"अग राणी... तू नाही, तुला बघून भुतांना भीती वाटत असेल ना...हाहाहा..खिखिखी..." आणि चेतन माझी वेणी ओढून धावत सुटला, त्याला मारायला मी त्याच्यामागे धावत होती तर त्याने स्वतःला माझ्या थप्पड पासून वाचवण्यासाठी माझा हात पकडला, तेवढ्यात ग्लास पडण्याचा आवाज आला...आम्ही दोघांनी वळून पाहिलं तर अतुल होता...त्याने एक नजर माझ्यावर टाकली, मला वाटलं त्याचे डोळे डबडबले आहेत...पण जेंव्हा आमची नजरानजर झाली, तो लगेच आला त्याच पावलांनी मागे वळाला...काहीही न बोलता पण मनात भरपूर काही वादळ घेऊन...चेतनच्या आवजावरही थांबला नाही...माझ्या आतमध्येही प्रचंड कल्लोळ माजला होता, कदाचित माझ्या चेहऱ्यावरही झळकत होता...

"काय होतंय आजकाल या मुलाला काही कळायला मार्ग नाही... तुला माहीत आहे का??" चेतनने माझ्यावर एक कटाक्ष टाकला आणि विचारलं मला...त्याने असं विचरल्यावर मी स्वतःला सावरत आणि काहीच झालं नाही या अविर्भावत बोलली,

"म..मला काय माहित???तुझा भाऊ आहे, तुला माहीत असायला हवं..." आणि पुन्हा माझ्या चेहऱ्यावर काही दिसू नये म्हणून मी तिथून पळ काढला....

खरंच इतकं कठीण असतं का स्वतःला व्यक्त करणं?? हो कदाचित... त्यामुळेच तर मला आणि अतुलला इतकं जड जात होतं...पण ज्याच्यासमोर मनाचा पसारा मांडून ठेवायचा आहे आणि जेंव्हा त्याच्याच बद्दल अश्या अपरिचित पण हव्याहव्याशा भावना निर्माण होत जातात तेंव्हा व्यक्त होणं ही फार कठीण होतं आणि सगळं दाबून ठेवणं तर महाकठीण... इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणतात ना...अगदी तसंच...

माझ्या जायचा दिवस उजाडला...सकाळपासून ताईची लगबग सुरू होती माझी तयारी करून देण्यात...ताईच्या घरच्या प्रत्येक सदस्याने मला खूप प्रेम दिलं होतं, वाटलंच नाही की कोण्या दुसऱ्याच घर आहे...मी सगळ्यांना भेटून आली... अतुलकडे ही गेली, त्याच्या घरी ही सगळ्यांनी मनभरून आशीर्वाद दिले पण तो मात्र शेवटच्या क्षणी दिसत नव्हता...माझे डोळे अजूनही त्यालाच शोधत होते...पण उशीर होत होता त्यामुळे मी निघून आली, मनात राग तर भरपूर होता आता त्याच्यासाठी...म्हणजे, जेंव्हा नको तेंव्हा माझ्यासमोर येऊन माझे श्वास बंद होतील इतकी धडधड वाढवून जातो आणि आता जेंव्हा मी जात आहे, माहीत नाही नंतर कधी त्याला बघेल, कधी बोलेल...आणि हा मात्र खुशाल गायब आहे...जाऊदे...मला पण काय पडली आहे त्याची...मी का वाईट वाटून घेतेय...आणि हे काय?? माझ्या डोळ्यातून पाणी का येतंय??? विचार केला, खूप झालं आता, नको त्याचा विचार, एकदा इथून गेलं की पुन्हा परत कधी यायचं नाही...आणि सगळ्यांचा निरोप घेऊन मी बसस्टँड वर पोहोचली...

चेतन मला घरापर्यंत सोडवायला येत होता...आम्ही बसची वाट पाहत होतो, इकडेतिकडे बघत असतांना मला भास झाला की अतुल येतोय...मी डोळे मिटले आणि पुन्हा दुसरीकडे मान वळवली...पण एक मिनिटं... तो अतुलच होता.. लगबगीने माझ्याकडे येत होता...मला काय आनंद झाला सांगू?? आणि मी माझ्या चेहऱ्यावरचा हर्ष लपवण्याचा निरर्थक प्रयत्न करत असताना तो माझ्या पुढ्यात येऊन ठेपला...तो काही बोलणार इतक्यात चेतन आला,

"वा साहेब...आता आलास तू?? सकाळी मला वाटलं थोडी मदत होईल तुझी..साखर झोपेत असशील हो ना??"

"हो...म्हणजे नाही..हां म्हणजे मी ते..."
स्वतःचे शब्द त्याला सावरता ही येत नव्हते इतका गडबडला होता तो...

"बस्सस....राहू दे, तुझं वाक्य पूर्ण होईपर्यंत आमची बस निघून जायाची...एक काम कर, इथे उभा रहा हिच्यासोबत, मी पाण्याची बाटली घेऊन येतो...." चेतन त्याला हात दाखवत बोलला...

"हम्मम..." करून त्याने मान डोलवली फक्त...मला वाटलं त्याला काहीतरी बोलायचं आहे, मी वाट पाहत होती त्याची...असं वाटत होतं चेतन यायच्या आधी ह्याने बोलून मोकळं व्हावं आणि माझ्या मनावरचं दडपण कमी करावं...पण तो मात्र कोण्या विचारत होता काय माहीत...ती शांतता आता मला बोचत होती...

"काही बोलायचं आहे??" मी
"बोलायचं आहे...." अतुल

आणि आम्ही सोबतच बोललो...आणि सोबतच बोललो म्हणून दोघांना ही हसू आलं...चेहऱ्यावरचं स्मित लपवून
मी त्याला विचारलं,
"काय....?"

"ते ना..म्हणजे...खूप दिवसापासून सांगायचं होतं..."
माझं लक्ष तो काय बोलतोय त्याच्याकडेही होतं आणि चेतन येतोय का त्यावरही होतं... आम्हाला चेतन येताना दिसला तेवढ्यात अतुल बोलला...

"जो कह ना पाये हम बेजूबां अल्फाझोसे,
क्या समझ पाओगे कभी अनकहें अहसासो से...?"

त्याने त्याचे शब्द पूर्ण केले आणि चेतन आला...बसही लागली होती त्यामुळे आम्ही लगेच बसमध्ये चढलो...आणि माझा परतीचा प्रवास सुरु झाला...मी बसच्या खिडकीतून मागे वळून पाहिलं तर जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत अतुलचे डोळे मला पाहत होते...हा एक महिना माझ्या आयुष्यातल्या सगळ्यांत नाजूक भावनांना हवा देऊन गेला होता....
*****************


खूप कमी शब्दांत भरपूर काही बोलून जाणं हे सगळ्यांनाच जमत नाही ना...!! आणि नुसतंच डोळ्यातून आपल्या भावना व्यक्त करणं हे तर फार अवघड..!! पण ह्या दोन्ही खुबी अतुलमध्ये होत्या...अजूनही आहेत...मी परत येतांना तो जे काही बोलला, त्याचे ते मोजकेच शब्द मात्र माझ्या डोक्यात पिंगा घालत होते...खरंच मी समजू शकली होती का त्याचे शब्द बंद ओठातले??? का इतकं अवघड करून ठेवलं होतं त्याने?? येऊन सरळ सरळ बोलून मोकळं व्हायचं ना..प्रत्येकाला शायरी समजेल इतकं काव्यात्मक डोकं सगळ्यांचं चालत नाही ना...हं... अवघड माणसाच्या अवघड गोष्टी...त्याच्या विचारांत दोन वर्षे कसे निघून गेले काही कळलं नाही...मी बारावीची परीक्षा दिली होती नुकतीच...आणि अतुल...तो तर पुण्याला होता इंजिनिअरिंग ला...तो पुणे, मी अमरावती... सगळं काही अवघड झालं होतं...बरंच पाणी वाहून गेलं होतं पुलाखालून....

ताईकडून आल्यावर मला असं वाटलं होतं की मी अतुलपासून लांब राहिल्यावर कदाचीत माझ्या मनातील त्याच्याबद्दलचे भाव, त्यांची तीव्रता कमी होईल...पण असं झालं नाही...ही ओढ आता वाढतंच होती...कधी कधी राग यायचा स्वतःचा की मला त्याच्या मनात काय आहे याचा थांग पत्ता ही नाही आणि मी वेडी सतत त्याच्या विचारांत गुरफटून असते...पण मलाही फोकस करायचं होतं, आईबाबांच्या अपेक्षा खूप होत्या माझ्याकडून त्यामुळे मी अकरावी बारावीत अभ्यासात कमी पडू शकत नव्हती...असं नाही की या दोन वर्षांत कधी ताईकडे गेली नाही, पण जेंव्हा मी जायची तो नसायचा आणि तो यायचा तेंव्हा मी नसायची...

एकदा घरच्या लॅन्डलाईनवर दोन तीन फोन येऊन गेले.. बाबांनी उचचले कोणी बोललं नाही...बाबांनी थोडी चिडचिड केली की कोणी बोलत नाही आणि निघून गेले... परत थोड्या वेळेने फोन आला, आता काय माहित का पण मला फोन रिसिव्ह करावा वाटला...मी हॅलो बोलताच, तिकडणं जो आवाज आला ते ऐकल्यावर तर असं वाटत होतं आनंदाने किती नाचावं, उड्या माराव्या..कारण आवाज अतुलचा होता...आमच्या दोघांच्या हॅलो नंतर मात्र कोणी काही बोलायला तयार नव्हतंच...
"बिझी आहेस??" त्याने विचारलं...

"मी?? नाही तर... मी..."
मी काही बोलणार तेवढ्यात बाबांच्या मोबाईलवर फोन आला आणि बाबा मला बाहेरून मोठ्याने ओरडून सांगत होते...
"बेटा, लवकर ये, चेतनचा फोन आहे..काहीतरी सांगतोय तो कॉलेजच्या एन्ट्रान्स बद्दल..."
बाबांचा आवाज मला तर ऐकू गेलाच पण तिकडे अतुलनेही ऐकलं त्यांचं बोलणं, आणि बाबांचा आवाज ऐकून माझी तारांबळ उडाली, त्यामुळे अतुलाल काय उत्तर द्यावं हे कळत नव्हतं, तेवढ्यात तोच बोलला...

"सॉरी तू बिझी आहेस... जा... तुझ्यासाठी फोन आहे...स्पेशल..." आता त्याच्या आवाजात रुक्षपणा जाणवला मला...

"नाही...मी करते ना तुला नंतर, नक्की... आता बाबा.."
आणि मी काही स्पष्टीकरण द्यायच्या आधीच तो बोलला,

"नको..असू दे...नाही जमायचं तुला..."
आणि 'खाडकन' त्याने फोन आपटला...मी मनातून दोन शिव्या घातल्या चेतनला..का हा चुकीच्या वेळीच तरफडला??

मी बोलली तर होती अतुलला की मी फोन करते पण कुठे करू हे डोक्यात नाही आलं... माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि त्याचा नंबर मला माहित नव्हता..पुन्हा आमच्या अर्धवट संवादाने नुसता तापच वाढवला होता माझा...पण त्याची ओढ मला गप्प बसू देत नव्हती त्यामुळे कधी रशु ला बोलता बोलता त्याच्याबद्दल चौकशी करायची...ताईला उगाच तिच्या घरच्यांच्या बातम्या विचारायची...चेतनशी नेहमी बोलणं व्हायचं, त्यामुळे कधी आडून आडून त्याच्याजवळही अतुल बद्दल बोलण्याचा प्रयत्न केला...तसा तो दिलखुलास होता बोलायला त्यामुळे जास्त काही विचार केला नव्हता त्याने माझ्या आणि अतुल बद्दल पण एकदा जेंव्हा तो त्याच्या बद्दल सांगत होता तेंव्हा मी मात्र अतुलचा विषय काढला, मग बोलता बोलता तो ही बोलून गेला,

"मी तुला पकडून पकडून माझ्या विषयावर आणतो नेहमी आणि तुला त्याच्याबद्दल का जाणून घ्यायचं असतं??? क्या चल रहा है...खिखिखी..." आणि पुन्हा त्याचं ते भयानक हसणं आणि मला चिडवणं...

"कुठे...कुठे काय चाललंय?? काहीही बोलतो तू... आता जसं तू माझ्या घरच्यांबद्दल विचारतो तसं मे सुद्धा विचारलं त्यात काय झालं???"

"बरं बाई कळलं...सॉरी...मी मजाक करत होतो..."

"बरं...पण यानंतर मला असा मजाक चालणार नाही हां.."
मी पण आपली बाजू मजबूत ठेवण्यासाठी त्याला उगाच खोटी ताकीद दिली...
त्यावेळी तर माझी गत 'चोर अन वरून शिरजोर' अशीच होती..पण कसंतरी चेतनला हँडल केलं मी आणि आता हात जोडले की आता कोणाला ही अतुल बद्दल विचारणार नाही.. नशिबात असेल तर होईल भेट...आणि नशीब मात्र लवकरचं फळफळलं...
********************

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED