पुढे...
न बोलवता, न सूचित करता आपल्या आयुष्यात येऊन धडकणारं वादळ म्हणजे प्रेम...!! आणि त्यामुळेच या जगातलं सगळ्यांत कठीण काम आहे कोणावर प्रेम करणं...एकदा का प्रेम नावाच्या भावनेने आपल्या आयुष्यात प्रवेश केला तर ते आपल्याला सगळ्यांमध्ये असतांनाही, सगळ्यांपासून दूर करून ठेवतं....सगळे सुटून जातात पण प्रेम मात्र शेवटपर्यंत सोबत असतं, मग ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तो सोबत असो किंवा नसो...मी आणि अतुल एकमेकांसोबत तर राहिलोच नाही, पण एकमेकांपासून दूर जाण्याच्या हट्टाने मात्र सगळ्यांपासून लांब गेलो... चेतन...माझ्या आयुष्यातील सगळ्यांत खास मित्र, नेहमीच माझी साथ देणारा, माझ्या कठीण परिस्थितीत मला मानसिक आधार देणारा आणि अतुलचा जिवलग भाऊ...तो आमच्यामुळे आमच्यापासून दुरावला...आता विचार केला तर हातात शुन्य ही उरलं नाही हाच भास होतो...
जो व्यक्ती आपल्या मनासारखा वागतो, आपल्या मनासारख्या घटना घडतात तेंव्हा त्याच्यात गुंतून राहणं खूपच सोप्प असतं....पण आपल्या मनसारखं घडत नसतांना, जेंव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात आपली काय जागा आहे हे माहीत नसताना ही त्याच्यावर जीव ओवाळून टाकणं, यालाच प्रेम म्हणावं कदाचित....अतुलचं त्यादिवशी असं निघून जाणं खूप सारे प्रश्न निर्माण करून गेलं...किती किती कल्पनांचे जाळे निर्माण झाले होते मनात, काय काय विचार केला होता मी..अतुल काय बोलेल, काय सांगेल, माझं उत्तर काय असेल...या सगळ्या विचारांमुळे झोपचं आली नव्हती, पण अतुल आला आणि असा न बोलता जो निघून गेला, त्यामुळे तर माझी कायमची झोप उडते की काय ही भीती होती मला...
मला घरी येऊन महिना झाला होता, पण अतुलचा चेहरा मात्र अजूनही तसाच्या तसा डोळ्यांसमोर तरळत होता... विचार करून करून डोकं जड आणि मन सुन्न व्हायचं, की कधी कोणालाही स्वतःपेक्षा जास्त महत्व न देणारी मी, आज एका अश्या मुलाच्या विचारांत आहे ज्याची आणि माझी फार फार तर तोंडओळख आहे..कोण कुठला तो दूरचा नातेवाईक, त्याच्या सोबत थोडं बोलणं काय झालं, माझं तर डोकचं आऊट केलं ह्याने...नाही...असं नाही चालायचं आता... '...और भी काम है दुनियामें मोहब्बत के सीवा' म्हणून मी झालं गेलं ते पाठीमागे टाकून माझ्या बारावीच्या निकालाची वाट पाहत होती...अपेक्षेप्रमाणे निकाल यावेळी ही उत्तमचं आला माझा...त्यापाठोपाठ एन्ट्रान्सचा ही निकाल घोषीत झाला..बऱ्यापैकी दिवे लावले होते...त्यावेळी एकाच एन्ट्रान्स वर मेडिकल आणि इंजिनिअरिंग ला ऍडमिशन मिळायचं...मेडिकल करण्याचा माझा विचार नव्हता...कारण हेच की ते करून सेटल होता होता पंधरा वर्ष निघून जाणार होते, आणि तो पर्यंत चेतनच्या म्हणण्याप्रमाणे 'आधी जवानी' तर फक्त अभ्यासात गेली असती...चेतनला मेडिकल ला जाऊन या गोष्टींची जाणीव झाली होती, त्यामुळे हे त्याच्या अनुभवाचे बोल होते...
मी इंजिनिअरिंग ला फॉर्म टाकण्याचा निर्णय घेतला...बाबांनी निर्णय माझ्यावर सोडला होता आणि मला फार काही माहिती नव्हती, त्यामुळे इंटरनेट कॅफेवर जाऊन त्या माणसाने जे जे चांगले कॉलेज सांगितले ते मी माझ्या मनानेच ऑप्शन फॉर्म मध्ये भरून आली...सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल मला विशेष आकर्षक होतं आणि नशिबाने मला ते मिळालं ही...कॉलेज ही चांगलं मिळालं...पुण्याला नंबर लागला होता त्यामुळे मी, आईबाबा आनंदात होतो...मला आनंद याचाही होता की मी आता अतुलच्या गुंत्यातून बाहेर पडणार होती...पण हा निव्वळ माझा वेडेपणा होता...कारण, अतुलमधून बाहेर पडणं आता मला शक्यच नव्हतं...चोरून चोरून वहीच्या मागच्या पेजवर अतुलचं नाव लिहिता लिहिता कधी ते मनाच्या कागदावर कोरल्या गेलं, काही कळलंच नाही..पण तरीही उगाच मनाच्या समाधानासाठी हे बरं वाटलं की मी त्याच्या पासून लांब जाणार, म्हणजे मी डोळे मिटले म्हणजे जगानेही डोळे मिटले असाच मूर्खपणा होता ना तो...!!
चांगल्या रिझल्ट बद्दल सगळेच मला शुभेच्छा देत होते, कौतुक करत होते आणि या सगळ्यांमध्ये मला आठवत होतं ते, जेंव्हा मी दहावी पास झाल्यावर अतुलने सगळ्यांची नजर चुकवत, हळूच येऊन माझ्या हातावर चॉकलेट ठेवलं होतं...आता त्याला माझा विचार येत नसेल का?? त्यालाही कळलंच असेल की रिझल्ट आला आहे..नागपूर ला परीक्षा द्यायला गेलो होतो तेंव्हा काय मनस्थिती होती आमची...मी जितकं अतुल मधून बाहेर पडायचा विचार करायची तेवढीच त्याच्यात गुंतत जायची...कधी कधी तर असं वाटायचं की आता घरचा लँडलाईन वाजेल आणि त्याचा फोन येईल, पण असं काहीही व्हायचं नाही... आता तर पुण्याला जायची वेळ आली आहे, आता काही त्याच्याशी बोलणं व्हायचं नाही, हे मनाला पटवून दिलं आणि लागली माझ्या कामाला...तसा यावेळी फोन तर वाजला, पण तो होता चेतनाचा...माझ्या विचारांत मी त्याला माझा रिझल्ट ही सांगितला नव्हता हे आता माझ्या लक्षात आलं...त्याने बाबांशी थोडा वेळ बोलून मग माझ्याकडे मोर्चा वळवला...
"काय ग ये शहाणे..जशी गेली आहेस तसा एक फोन नाही, निकाल लागला ते ही कळवनं नाही, आणि आता दोन दिवसांत तू पुण्याला जात आहेस ऍडमिशन घ्यायला ते ही सांगितललं नाहीस...काय झालंय तुला??? की पुन्हा चिडली आहेस माझ्यावर..."
"नाही रे...असं काहीही नाही, मी कळवणार होतीच तुला पण नाही जमलं, आणि आता जायचं आहे तर तयारी सुरू आहे...एकतर ते पुणे वैगरे काही ओळखीचं नाही त्यामुळे बाबा जरा चिंतेत आहेत..."
"हो, पण त्यांना बोललो मी आताच चिंतेच काही कारण नाही..अतुल आहे ना तिथे... आणि तुझा ही त्याच कॉलेज ला नंबर लागलाय..."
"हूं??? काय...?? कसं काय??? "
"कसं काय? मला काय माहीत...ऑप्शन फॉर्म तू भरला होतास ना...बरं झालं पण, तो असल्यावर काळजी नाही.."
चेतनशी बोलल्यावर बाबांची चिंता जरी कमी झाली होती तरी माझी वाढली होती ना...!! काय करून बसली होती मी...फॉर्म भरतांना माझ्या लक्षात कसं आलं नाही हे...बुद्धीला पुन्हा अतुलशी सामना नको होता पण मनाला हे वाटत होतं की कदाचित ही नियती असेल आमची...कदाचित ज्या गोष्टी अधुऱ्या राहिल्या आहेत त्याच पूर्ण करण्यासाठी आम्ही नव्याने भेटणार आहोत...तरी नेहमीप्रमाणे स्वतःला एक ताकीद दिली होती की आता जोपर्यंत तो स्वतःहून येणार नाही आपल्याकडे तोपर्यंत त्याचा विचार करायचा नाही किंवा एका कॉलेजला आहोत म्हणून जास्त हवेत तरंगायचं नाही...पण एक मात्र खरं होतं की येणारे काही वर्ष आमचं आयुष्य बदलवून जाणार होते आणि ती आमची नियती होती, त्यामुळेच तर अनवधानाने किंवा नशिबाने म्हणा, आम्ही लांब जात असताना पुन्हा सोबत आलोच...आता ही सोबत आमचं नातं कसं घडवणार होती काय माहित, पण अतुलच्या भाषेत सांगायचं तर एक नक्की होतं की,
"कुछ रिश्ते,जिंदगी बदल देते हैं,
मिले तब भी, न मिले तब भी।"
*******************
काय माहीत का, पण मी आणि अतुलने आमच्या मधात एक अंतर बनवून ठेवलं होतं... असं नाही की घरचे त्याला ओळखत नव्हते किंवा त्याच्या घरी मी अपरिचित होती पण तरीही आम्ही खुलून कधी कोणासमोर बोललो नाही किंवा तसं दाखवलं नाही...लोकांसमोर एकमेकांसाठी आम्ही अनोळखी सारखेच होतो पण आमच्या मनात एकमेकांसाठी काय जागा आहे हे मात्र गुपित होतं...हे गुपित कधी आम्ही स्वतःच्या मनाला सांगण्याचंही धाडस केलं नाही..काहीतरी होतं ज्यामुळे आम्हाला ही रेषा लांघायला जड जात होतं...
आमचा पुण्याचा प्रवास सुरु झाला...मी आता हॉस्टेल ला राहणार त्यामुळे बाबांनी मला छोटा नोकियाचा मोबाईल ही घेऊन दिला होता, पण बाबांची सक्त ताकीद होती की त्याचा वापर फक्त घरी बोलायलाच झाला पाहिजे... पहिल्यांदा त्यांच्यापासून लांब जात होती त्यामुळे त्यांची काळजी साहजिक होती...बारा तासांचा प्रवास करून पोहोचलो एकदाचे पुण्यात आम्ही... कॉलेज जवळ एक लॉज मध्ये फ्रेश होऊन बरोबर दहा वाजता कॉलेजमध्ये पोहोचलो...डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जितके लोकं ऍडमिशन ला आले होते त्यांना ऑडीटोरियम मध्ये बसवण्यात आलं... तेवढ्यात बाबांचा फोन वाजला...पण आतमध्ये काही ऐकू येत नव्हतं, त्यामुळे बाबांनी मला बाहेर जाऊन बोलायला सांगितलं...मी बाहेर जाऊन फोन रिसिव्ह केला, आणि तिकडून आवाज आला..
"हॅलो... हां काका अतुल बोलतोय मी..."
आणि आवाज ऐकताच माझी धडधड इतकी सुरू झाली की काय बोलावं काही कळत नव्हतं...उत्तर देणं ही कठीण झालं होतं...माझ्या पाठोपाठ बाबा ही बाहेर आले, मी काहीच बोलत नाहीये फोनवर म्हणून बाबा मला वारंवार विचारत होते कोणाचा फोन आहे...मी घाईघाईने बाबांच्या हातात फोन देत बोलली,
"म्म्म..माहीत नाही बाबा, काही कळलंच नाही...बहुतेक तुमच्या ऑफिस मधून आहे...तुम्ही या बोलून, मी आतमध्ये जाते...आपल्याला कोणत्याही क्षणाला बोलवतील व्हेरिफिकेशन साठी..."
आणि मी धावत येऊन मध्ये येऊन बसली...मी का बोलू शकली नाही त्याला, कसं वाटलं असेल त्याला, हाच विचार मी करत असतांना मला व्हेरिफिकेशन साठी बोलवण्यात आलं..मी जाऊन व्हेरिफिकेशन करून परत आपल्या जागेवर आली तर बाबा येऊन बसले होते, ते बोलले,
"अग.. चेतनचा चुलत भाऊ होता फोनवर...चेतनने त्याला सांगितलं असेल त्यामुळे आला तो आपल्या मदतीला आणि तू बोलली ही नाहीस त्याला... कमीतकमी विचारायचं तरी कोण आहे...बरं असुदे....झालं का व्हेरिफिकेशन??"
"हो...पण त्यांना तीन सेट हवेत फोटोकॉपी चे, माझ्याकडे दोनच आहेत, एक आणावा लागेल बाहेर झेरॉक्स वर जाऊन..."
"ठीक आहे ना, चल, अतुल बाहेरचं असेल त्याला सांगतो मी..."
आणि मी काही बोलायच्या आधी बाबा ऑडीटोरियम च्या बाहेर गेले, नाईलाजाने मलाही त्यांच्या मागे जावंच लागलं... बाहेर अतुल उभा होता...आधीच जुलैच्या पावसाने वातावरण थंड झालं होतं, त्यात अतुलला पाहिल्यावर तर मी अजूनच गार पडली.. पण त्याला पाहिलं अन पाहतच राहिली... तो ज्या अदबीने बाबांशी बोलत होता, पुन्हा त्याचे ते भुरभुर उडणारे केस, त्याची गालावरची खळी... आणि मी त्याला बघतच राहिली भान हरपून...त्याची नजर माझ्यावर पडताच त्याने भुवया उंचवुन माझ्याकडे पाहिलं तेंव्हा मी भानावर आली आणि लगेच बाबांच्या मागे जाऊन उभी राहिली...बाबा त्याला झेरॉक्स बद्दल सांगत होते...
"मी आणतो ना लगेच..तुम्ही बसा आतमध्ये.." अतुल बोलला,
"ठीक आहे, हिला पण घेऊन जा सोबत..."
"कशाला??? अम्म्म म्हणजे, मी आणतो ना, कशाला उगाच त्रास...." मी त्याच्या सोबत जाणं त्याला टेन्शन देऊन गेलं होतं वाटते त्यामुळे एवढ्या थंड वातावरणात ही कपाळावर आलेला हलकासा घाम रुमालाने पुसत अतुल बोलला...
"अरे त्यात त्रास काय??? ती पण शिकेल ना, तिलाही माहीत होईल कुठे काय काय आहे...तिला एकटीला राहायचं आहे आता, आणि तू काय प्रत्येक वेळी तुझे क्लास सोडून येशील का तिला मदत करायला..."
आता आमच्या बाबांनी असा फर्मान सोडल्यावर नाही बोलायची कोणाची हिम्मत होईल??...मुकाट्याने आम्ही मान हलवली आणि गेलो...अगदी कॉलेजच्या मेन गेटच्या बाहेर रस्ता ओलांडूनच झेरॉक्सचं दुकान होतं...अतुल माझ्या पुढे आणि हातात फाईल घेऊन मी त्याच्या मागे होती....त्याने तोंडातून चक्कार शब्दही काढला नव्हता, किंवा काही दिवसांपूर्वी आमचं जे अर्धवट बोलणं सोडलं होतं आम्ही आणि आता त्या नंतर योगायोगाने एकाच कॉलेजला असे सोबत आलोत, कशा कशाचाही त्याने विषय काढला नाही...ते तर सोडा, त्याने मागे वळून एकदा माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही..मला वाईट वाटत होतं, पण स्वतःला समजावत होती मी...आम्ही गुपचूप गेलो झेरॉक्स घेतले आणि परत यायला निघालो...मी मात्र त्याच विचारांच्या गर्दीत अडकली होती, की असं काय झालंय ज्यामुळे अतुल माझ्याकडे बघायलाही तयार नाही आणि रस्ता ओलांडताना लक्ष नसल्याने मी गाडीसमोर येणार तेवढ्यात अतुलने माझा हात खेचून मला बाजूला केलं...अजूनही माझा हात त्याने घट्ट पकडून ठेवला होता, थोडा चिडतंच तो बोलला,
"वेडी आहेस का?? तुला काही झालं असतं तर मी...."
आणि बोलता बोलता तो थांबला, मी मात्र त्याच्या डोळ्यात हरवली होती...स्वतःचे शब्द सावरत पुन्हा तो बोलला,
"तुला दोन वेळ बोललो, नीट बघून चाल..लक्ष कुठे होतं तुझं???? "
तो असं बोलल्यावर मी माझे डोळे त्याच्या चेहऱ्यावरून हटवले आणि इकडे तिकडे बघत बोलली,
"सॉरी...मी दुसऱ्याच विचारात होती, तुझ्याकडे लक्षचं नाही दिलं मी..." माझ्या अश्या बोलल्यावर त्याने माझा हात लगेच सोडला...
"हं... तसही कधी दिलंस??" तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, पण मला कळलं ते...
"हूं....म्हणजे???"
माझ्या या प्रश्नावर त्याने एक उपहासात्मक स्मित दिलं अन बोलला,
"हमें पता है तुम कहीं और के मुसाफिर हो..
हमारा शहर तो यूँ ही रास्ते में आया था।"
त्याने असं बोलून पुन्हा मला निरुत्तरीत केलं होतं...त्यांनंतर तोंडाला कुलूप लावून आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो... ऍडमिशन झाल्यावर त्याने मला आणि बाबांना पूर्ण कॉलेज दाखवलं... त्या दिवशी पूर्ण दिवस तो आमच्या सोबत होता, कॅन्टीन पासून तर लायब्ररी पर्यंत त्याने सगळं दाखवलं..अर्थात त्याचं बोलणं फक्त बाबांशीच होतं, मी आपली गुपचूप त्यांच्या मागे फिरत होती...माझं सिव्हिल होतं आणि अतुलचं इलेक्ट्रिकल त्यामुळे आमचे डिपार्टमेंट वेग वेगळ्या बिल्डिंग मध्ये होते...ते एक बरंच झालं होतं... उठसूट रोज रोज एकमेकांचं दर्शन होऊन मनस्ताप वाढणार नव्हता...दुपारपर्यंत कॉलेजच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या होत्या, आता मात्र हॉस्टेलचं बाकी होतं...अतुलने ती अडचण ही सोडवून दिली...तसं बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल आजूबाजूलाच होते पण मध्ये स्टाफ क्वार्टर्स होते...मी होस्टेलच्या फॉर्मलिटी पूर्ण करेपर्यंत बाबा आणि अतुलने मिळून लॉज वरून माझं सामान आणलं..मला तोपर्यंत रूम ही मिळाली होती... मला सोडून बाबा रात्रीच्या गाडीने परत जाणार होते.. आता मात्र मला रडू कोसळलं...आईबाबांना सोडून एकटी राहण्याची ही माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे जड जात होतं..मला रडताना पाहून बाबांचे डोळे ही पाणावले...आम्हाला बघून अतुल बोलला,
"काका, नका काळजी करू काही...तुम्हाला काहीही अडचण आली तर सांगा मला, मी आहेच...."
अतुलचे शब्द बाबांना खुप आश्वस्त करून गेले, मलाही बर वाटलं... तो ट्रॅव्हल पॉईन्ट पर्यंत बाबांना सोडायला ही गेला...त्याचं ते वागणं पाहून मी अजूनच भाळली होती त्याच्यावर पण अजूनही तो मला बोलायचं टाळत होता...होस्टेलच्या पहिला दिवस, त्यात अतुलचा अबोला आणि घरची आठवण, यामुळे अश्रू काही केल्या थांबत नव्हते...बाबांशी फोनवर बोलणं देखील झालं होतं पण त्यांच्या समोर पुन्हा रडून त्यांना प्रवासात नाराज करायचं नव्हतं मला...पण मनातून खूप एकटं एकटं वाटत होतं..इतक्यात माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबर वरून कॉल येत होता..कोणाचा नंबर असेल या विचाराने उचलू की नको करत करत मी फोन रिसिव्ह केला तर तिकडणं आवाज आला...
"अतुल बोलतोय....."
********************
क्रमशः