पुढे...
आपण सतत प्रेम शोधत असतो, पण प्रेमाला शोधण्याची आवश्यकता असते का??? अजिबात नाही... प्रेम शोधायचं नसतं तर प्रेम ओळखून पारखायचं असतं...जर तुम्हाला प्रेम शोधायची गरज पडत असेल तर तुम्हाला कधी प्रेम झालंच नाही असं समजावं...सरळ चालत असताना अचानक एखाद्या वळणावर पाऊलं थांबावित आणि त्या वळणामुळे आपल्या गंतव्याची तमा न बाळगता प्रवासच बदलून जावा, असं असतं प्रेम...!! एकदम साधं सरळ आयुष्य जगत असताना मी कशी एवढी अतुल मध्ये गुंतली हे कळलंच नाही... काळानुसार हा गुंता एवढा वाढला की तो सोडवता येत नव्हता...आणि जेंव्हा तो सोडवता येत नाही तेंव्हा मात्र त्याला कापूनच त्यातून बाहेर पडू शकतो... त्यामुळे अतुलकडे जाणारे सगळे मार्ग बंद केले होते मी, तोंडले होते सगळेच बंद...!! पण एकदा जगलेलं प्रेम परत येतं हे नक्की...जो व्यक्ती शरीराने आपल्यासोबत नसूनही, जेंव्हा त्याच्यासोबत आपला मानसिक संवाद सुरू असतो, तेव्हा त्याला प्रेमचं म्हणावं ना...!! आणि ते प्रेम होतं म्हणूनच उगाच ते लोकांच्या डोळ्यांत यावं आणि बदनाम व्हावं म्हणूनचं आम्ही बोललो नाही, ते प्रेम होतं म्हणूनच सगळं अव्यक्त होतं...!!!
साखरपुड्याच्या दिवशी ज्याप्रकारे अतुल बोलून गेला आणि चेतनला मी नाराज केलं तेंव्हापासून मला ताईच्या घरी थांबायची जराही ईच्छा नव्हती...पण चार दिवसांत मीनल ताईचं लग्न होतं आणि तोपर्यंत मला जाता येणार नव्हतं..त्यामुळे लग्नानंतर लगेच आईबाबा जातील तोपर्यंत तरी मला थांबावंच लागणार होतं...त्यादिवशी माझा उतरलेला चेहरा ताईच्या नजरेतून सुटला नाही..आईबाबांसमोर तर असंच दखवायचं होतं की सगळं काही ठीक आहे...हां, ताईने विचारण्याचा प्रयत्न केला तर तिला मी सांगून दिलं की चेतन आणि माझं भांडण झालं...आमचं जे 'तुझं माझं जमेना अन तुझ्याविना करमेना' नातं होतं त्यामुळे तिनेही ते जास्त मनावर घेतलं नाही, पण माझ्या मनाला ते लागलं होतं खूप... माझी कोंडी होतं होती, हे सगळं जे सुरुये त्यामुळे गुदमरल्या सारखं व्हायचं...पण गुपचूप सहन केल्याशिवाय पर्याय नव्हता...अतुलच्या मनाचा तर मला काही पत्ता लागत नव्हता आणि त्याच्या मनात काय सुरू आहे याचे प्रयत्न देखील मला करायचे नव्हते सगळ्यांसमोर....पण चेतनला दुखावलं होतं मी त्यामुळे त्याची समजूत काढणं गरजेचं होतं...
साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी मी चेतनला बोलायचं ठरवलं...अपेक्षेप्रमाणे तो घरच्या मागच्या साईड ला फोनवर बोलतांना सापडला, विचार केला इथेच गाठते याला आणि मी त्याच्या मागून जाऊन...
"भॉ....." त्याने दचकून मागे वळून पाहिलं, रागावलेल्या नजरेने माझ्यावर एक कटाक्ष टाकला अन काहीही न बोलता जायला निघाला... मी पुन्हा त्याला थांबवण्यासाठी बोलली,
"कोणीतरी तोंड फुगवून एकदम फुगाचं होतो..हा फुगा फोडू का मी....?" मी माझं हसू लपवत बोलली, पण त्यावर चेतनला मात्र अजूनच जोर चढला आणि तो माझ्याकडे पाठ वळवून उभा राहिला...
"एवढा अटीट्यूड??? आणि मला दाखवतो.....हो, आता साक्षी मिळाल्यावर माझी किंमत थोडी राहणार तुला..दोस्त दोस्त ना रहा..." आणि मी उगाच नाराजीच्या सुरात बोलली, आणि हा बाण वर्मी लागला, साहेब बोलते झाले...
"काय दोस्त?? कोण दोस्त?? अशी असते का दोस्ती?? काल काय माझा खून करायचा इरादा होता का?? किती भडकली होतीस...मला वाटलं, माझी एकुलती एक मैत्रीण आणि तीही मेंटल झाली...हाहाहाखिखिखी..."
"मी मेंटल?? आणि तू काय लय शहाणा आहेस का?? माहीत नाही काय बघितलं त्या साक्षीने तुझ्यात???"
मी त्याला चिडवत बोलली,
"ते तर बघणाऱ्याच्या नजरेत असते आता,
"ढूँढोगे तो खामीयाँ ही पाओगे मुझमे,
परखोंगे तो खुबिया भी बहुत है!"
अरे....ही तर शायरी झाली राव...बघ, अतुलचा एक गुण शिकलोच मी..."
"अम्म्म..ते सोड, मला सांग ना, साक्षी बद्दल...कोण आहे, कशी आहे, कुठली आहे..."
"अरे तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार...पण तू तुझं तोंड उघडायचं नाही हं कुठे आताच...."
"हो रे, एवढा तर भरोसा ठेव ना..."
काळजावरचं एक ओझं तर कमी झालं होतं, मी माझ्या मित्राला परत मिळवलं होतं... तसा चेतन जास्त दिवस तोंड फुगवून बसला नसता पण चूक माझी होती त्यामुळे मला या मैत्रीसाठी पुढाकार घ्यावा लागणारचं होता...आता माझ्या आणि अतुलच्या मधात कोण पुढाकार घेणार होतं हे दोघांनाही माहीत नव्हतं...कदाचित आमच्यापैकी कोणालाही बोलायचंच नव्हतं...
ताईचं एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे चेतनचा गोतावळा खूप मोठा होता...खूप सारे चुलत भावंड असल्यामुळे त्यांची नेहमीच दंगामस्ती असायची...आणि आता तर त्यासगळ्यांपैकी मीनल ताई लग्न होऊन जाणार म्हटल्यावर तिच्यासोबत त्यांना चांगला वेळ घालवायचा होता...आठवड्याभराने लग्न होतं त्यामुळे साखरपुडा झाल्यावर त्या सगळ्या भावंडानी एका दिवसाच्या पिकनिकला जायचं ठरवलं...त्या सगळ्यांमध्ये मला मीनल ताई आणि चेतनचं जास्त जवळचे होते, पण सगळे माझ्यासाठी नवीन असल्याने मला काही इच्छा नव्हती जायची त्यामुळे मी जाण्यास नकार दिला...पण हट्टीपणा तर त्यांच्या रक्तातच होता त्यामुळे चेतन आणि मीनल ताई अडून बसले की मला त्यांच्या सोबत जावंच लागेल...आणि मला जावंच लागलं...
शहरापासून पंधरा किलोमीटरवर आम्ही पोहोचलो, अतिशय मोहक असं स्थळ होतं...छोटंसं राधाकृष्णाचं मंदिर, बाजूला बाग आणि थोड्याच अंतरावर वाहणारी नदी...सगळ्यांनी आधी दर्शन घेतले आणि नंतर प्रत्येकाचे फोटोसेशन सुरू झाले...एवढे सगळे सोबत असतानाही अतुलने एकदा माझ्याकडे पाहिलं ही नाही किंवा बोलला ही नाही..तो विचार करून करून माझे डोळे भरून येत होते, त्यामुळे मी गुपचुप बाजूला जाऊन बसली..पण माझे डोळे मात्र अतुलवरचं खिळले होते..तो ज्याप्रकारे त्याच्या घरच्या लोकांची काळजी घ्यायचा, सगळ्यांमध्ये मिसळून जायचा, त्याचं ते अदबीने बोलणं, हे सगळं मला त्यावर भाळण्यासाठी पुरेसं होतं...पण नेमकी आमच्यात कुठे माशी शिंकली हे काही कळत नव्हतं..
सगळे मस्ती करण्यात एक नंबर पटाईत पण कामं करण्यात मात्र आळशी...भुका सगळ्यांना लागल्या होत्या पण गाडीतून जेवणाचे डब्बे आणि पाणी काढून आणायचा मात्र कंटाळा सगळयांना..त्यामुळे शेवटी कंटाळून मीनल ताई उठून गेली सगळं सामान आणायला.. मला ते बरं नाही वाटलं, मी सुद्धा तिला मदत करायला गेली...पण जीचं लग्न आहे तिने कामं करणं हे कोणालाही पटलं नाही त्यामुळे चेतन बोलला,
"मीनल तू राहू दे गं.... आणेल दुसरं कोणी..."
"ओय हिरो..दुसरं कोणी म्हणण्यापेक्षा तू उठ ना, आळशी कुठला, स्वतःच्या बहिणीची थोडी तरी किंमत कर..चल आपण जाऊन आणू...."
चेतनच्या आळशीपणावर राग काढत मी बोलली,
"तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना, प्लिज माझ्यावरचं काम तू कर ना...प्लिज...." चेतनची नौटंकी पुन्हा सुरू झाली...
सगळ्यांसमोर काय भांडण करायचं म्हणून मी स्वतःच्या तोंडाला आवर घालत बोलली,
"सुधरणार नाहीस ना तू कधी..."
"कधीच नाही..खिखिखी..." आणि त्याचं हसणं सुरू झालं...
मी गाडीतुन सामान काढत असताना अतुल मागून कधी आला काही कळलंच नाही...आम्ही दोघांनी मिळून सगळे डब्बे, पाणीच्या बॉटल गाडीतून काढल्या.. काहीही न बोलता....त्याने सगळं एकट्यानेचं घेतलं होतं, त्याच्या हातात सगळे डब्बे वैगरे मावत नव्हते त्यामुळे मदत म्हणून मी त्याच्या हातातलं सामान घ्यायला गेली तर तो अतिशय कोरड्या स्वरात बोलला,
"मी घेतो...राहू दे तू..." पण मी काही ऐकलं नाही, आणि एकही शब्द न बोलता, त्याला काहीही उत्तर न देता, त्याच्या एका हातातली पिशवी घेतली तर त्याने रागाने पुन्हा माझ्या हातून ती हिसकावून घेतली.. मला त्याचं असं वागणं खूप मन दुखवुन गेलं आणि माझे डोळे भरून आले..मी जागेवरचं थांबली..तो दोनच पाऊलं पुढे गेलेला, पुन्हा मागे वळून माझ्याजवळ आला, माझ्या डोळ्यांत साचलेले थेंब त्याला दिसले असतील, त्याने त्याच्या हातातील सामान खाली ठेवलं, डोळे बंद करून एक सुस्कारा टाकत बोलला,
"हे बघ...सॉरी...माझं मलाच कळत नाहीये, मी असा का करतोय...प्लिज आता रडू नको, सगळ्यांनी बघितलं तर काय विचार करतील..नको नाराज होऊस, माझ्यामुळे तू आधीच हर्ट आहेस, प्लिज..."
त्याने माझा हात हातात घेतला तर मी तो लगेच मागे घेतला, मला खुपचं राग आला होता त्याचा...मी माझे डोळे पुसले आणि जायला निघाली तर त्याने पुन्हा माझा हात पकडून मला थांबवलं...
"काहीतरी बोल प्लिज...अशी उत्तर न देता नको जाऊस.."
"हात सोड..लोकांचा विचार आहे ना तुला..तर मग लोकांनी पाहिलं तर काय विचार करतील ते...."
"अग....मला तसं म्हणायचं नव्हतं..कसं समजवू तुला.. कधीतरी समजून घे ना तू ही..." तो अतिशय केविलवाण्या आवाजात बोलला,
"नाही.....नाही समजून घ्यायचं मला काही...सगळं तुझ्या मनाप्रमाणेच का व्हायला पाहिजे रे...तुझी इच्छा असते तेंव्हा तू कोणाचाही विचार न करता, माझा हात पकडून थांबवणार आणि तुझा मूड नसेल तर मला ओळखही देणार नाही...त्या दिवशी नागपुर वरून येतांना ही असंच केलंस तू...आता काहीच नाही बोलायचं..लांब राहायचं..कळलं...."
"ठीक आहे तर....जशी तुझी ईच्छा.. माझं असणं तुला इतकंच बोचते तर आता या नंतर काहीच समजवून देण्याचे प्रयत्न करणार नाही मी..." तो ही चिडतच बोलला,
आणि त्याने त्याच्या हातून माझा हात रागाने झटकला...मी सुद्धा रागारागात निघून आली...पुन्हा एकदा आमच्यातलं अंतर वाढवून..!! ते अंतर कमी करता आलं असतं आम्हाला...पण नाही, त्यावेळी 'कोण चूक कोण बरोबर' यावर वकिली कोणी केली असती मग??? कोणत्याही नात्यात अंतर वाढवण्यासाठी कोणतीही परिस्थिती किंवा कोणी तिसरी व्यक्ती जबाबदार नसते...त्यासाठी जबाबदार असतो आपला 'इगो', आपला राग...आणि राग माणसाकडून काय काय करवून घेतो....अतुलला 'नाही' म्हणण्याऐवजी एकदा 'हो' बोलली असती तर त्याच दिवशी बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या...योग्यवेळी आपला अहंपणा बाजूला ठेवून, काहीही प्रश्नउत्तरं न करता जर आपल्याला 'हो' बोलता आलं, तर जगातल्या कितीतरी गोष्टी सुखमय होतील...
जेवण वैगरे झाल्यावर सगळ्यांच्या गप्पा सुरु झाल्या..सगळे आपल्याला आयुष्यातल्या प्रेमाबद्दल बोलत होते, कोणी शाळेतले तर कोणी कॉलेजमधले किस्से सांगत होते आणि या सगळ्यांमध्ये मी आणि अतुल मात्र तोंडाला कुलूप लावून बसलो होतो..सगळ्यांमध्ये असूनही आम्ही मात्र एकमेकांमध्येच हरवलो होतो...खरं तर मीच अतुलच्या विचारांच्या गर्तेत हरवली होती, त्याचे डोळे मात्र माझ्यावर आग ओकत होते...तेवढ्यात मीनल ताईने अतुलला एक कोपरखळी दिली आणि बोलली,
"काय साहेब...तुम्ही का गप्प गप्प...प्रिया प्रकरणाबद्दल काहीच बोलणार नाही का???" हसत हसत तिने विचारलं, त्यावर अतुलने चमकून चेतनकडे पाहिलं आणि बोलला,
"चेतन...मी तुला बोललो होतो त्यादिवशी की असं काहीही नाही...तूच सांगितलंस ना मीनल ताईला..."
"अरे, माझ्यावर का आरोप करतो, तिला कळलं असेल कुठूनही, पण आता जर कळलंच आहे तर सांग ना, तिच्याकडून काही नसेल पण जर ती तुझ्या बोलण्याची वाट बघत बसली असेल तर...तू बोलून टाक तिला..."
आणि आता सगळे अतुलला चिडवायला लागले, त्यावर अतुल थोड्या नाराजीच्या आणि थोड्या चिडक्या स्वरात बोलला,
"उसके सामने दिल की तहें खोलू भी तो कैसे,
अल्फाज ना समझने वाली, जज़्बात क्या समझेंगी।"
आणि नेहमीप्रमाणे यावेळी ही त्याची नजर माझ्यावरच रोखल्या गेली...आता मला ते असह्य झालं होतं.. सगळ्यांसमोर स्वतःच्या मनातली घालमेल लपवणं कठीण झालं होतं...पण कसंबसं स्वतःला आवर घालत तो अख्खा दिवस काढला बाहेर...
**********************
आपल्याला समोरच्याबद्दल ज्या भावना बोलता येत नाहीत, त्या समोरच्याने आपल्याला बोलून दाखवाव्या आणि ती वाट पाहण्यात आपण तीळ तीळ मरावं, हे किती पिडादायी आहे ना...!!! प्रेमात असंच होतं....नाही का हे प्रेम किती मोठी आफत????.प्रेम आयुष्यात येणं म्हणजे आफतचं आहे पण कोणतीही आफत प्रेमासारखी येऊन आयुष्य फुलवून जात नाही...संकटं माणसाला अनुभव देतात तर प्रेम माणसाला प्रगल्भ बनवते, विचारांना परिपक्व बनवते...फक्त प्रेम काय आहे, हे कळायला हवं...
पिकनिक वरून आल्यापासून तर मी अन अतुल समोरासमोर आलोच नाही...मी चिडली होती मान्य आहे, पण त्यानेही ज्या प्रकारे राग व्यक्त केला होता, असं वाटत होतं त्याला फार काही फरक पडत नाही माझ्या नाराजीचा... आणि त्यामुळेचं मी त्याला टाळत होती...पण असं केल्याने भावना बदलणार होत्या का?? आमच्या मनाची घालमेल कमी होणार होती का?? माहीत नाही....
लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येत होता तशी माझी अतुलपासून दूर जाण्याची घडी ही जवळ येत होती...वाईट ही वाटत होतं की गेल्या दोन वर्षांपासून मी फक्त याला मनात ठेवून काढले आहेत, या आशेत की कधीतरी भेट होईल आमची आणि जे आम्ही एवढे दिवस मनात दाबून ठेवलं आहे त्याची वाट मोकळी होईल...
मीनल ताईच्या हळदीचा दिवस उगवला...घरात सगळ्यांचे चेहरे आनंदाने खुललेले होते, मी अन अतुल मात्र जबरदस्तीच्या हास्यामागे आमचा कल्लोळ लपवून ठेवला होता... एवढ्या कार्यक्रमात चुकून आमची नजर एक झाली तरी अवघडल्यासारखं व्हायचं...दुसऱ्या दिवशी लग्न होतं, त्यामुळे आदल्या रात्री सगळ्यांची धावपळ सुरू होती... ताई आणि मी मीनल ताईला तिची बॅग भरण्यात मदत करत होतो...तेंव्हा मीनल ताईला आठवलं की तिच्या काही साड्या ताईच्या कपाटातून आणल्याच नाहीत...सकाळी घाई झाली असती त्यामुळे मी विचार केला की मी आताच घेऊन येते...ताईचं घर अतुलच्या घरापासून जास्तीत जास्त अर्ध्या किलोमीटर वर होतं पण रात्र झाली होती त्यामुळे ताई चेतनला सोबत पाठवणार होती...पण जेव्हा जायची वेळ आली तर कळलं की अतुल सोबत येणार आहे, कारण चेतन दुसऱ्या कामाने बाहेर गेलाय...आता त्याच्या सोबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता...
आम्ही लगेच घरी पोहोचलो, मी ताईच्या कपाटातून साड्या घेतल्या आणि ते बंद करायला गेली तर ते काही केल्या बंद होतं नव्हतं...मी खूप प्रयत्न करत होती, अतुल मात्र लांबूनच हाताची घडी घालून माझी मशागत बघत होता, आणि मी काही स्वतःहून त्याला मदतीला बोलावणार नव्हती...शेवटी माझे प्रयत्न पाहून तोच आला आणि त्याने मला बाजूला केलं..जोर जबरदस्तीने त्याने ते लोखंडी कपाट बंद केलं, पण माझ्या हाताला थोडं खरचटलं होतं... त्याचं लक्ष माझ्या हाताकडे गेल्यावर, त्याने लगेच माझा हात हाती घेतला आणि बोलला,
"तुला लागलंय थोडं, थांब मी क्रीम लावतो..."
मी लगेच माझा हात सोडवून घेतला आणि बोलली,
"काही गरज नाही... मी ठीक आहे..."
"काहीच ठीक नाहीये...उद्या लग्न झालं की तू जाशील...त्याआधी बोलायचं आहे...ऐकून तर घे ते..त्यादिवशी मी जे वागलो त्यासाठी खरंच सॉरी...पण का वागलो तेच सांगायचं आहे...परवा सकाळी जायच्या आधी गच्चीवर येशील प्लिज...आता जाऊया... उशीर झालाय.."
अतुलच्या बोलण्यावर मी काहीही वाद न घालता तयार झाली..माझं मलाच आश्चर्य वाटत होतं की, अगदी या क्षणापर्यंत मी त्याच्यावर रागवली होती, आणि एवढी की मी त्याला बघायलाही तयार नव्हती आणि आता तो जे बोलला त्याला मी मंत्रमुग्ध होऊन ऐकलं ही आणि त्याला भेटायला तयार ही झाली...आता मला ही उत्सुकता होती की कधी एकदाची ती सकाळ होते...दुसऱ्या दिवशी मीनल ताईचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं..तिच्या पाठवणीच्या वेळी मलाही खूप भरून आलं, मोठ्या बहिणी प्रमाणे तिने जीव लावला होता मला...त्याचं दिवशी अतुलचा हळवा स्वभाव ही मला लक्षात आला...त्या रात्री मला झोप आलीच नाही..असं वाटत होतं कधी एकदाची सकाळ होते आणि कधी मी अतुलला बोलते...
मी सकाळी सकाळी उठून आवरून बसली होती...आईबाबांची तयारी ही झाली होती जायची..ताईच्या घरचे, अतुलच्या घरचे सगळे आईबाबांशी गप्पा मारण्यात व्यस्त होते...मी नजर चुकवून लगेच गच्चीवर गेली आणि त्याची वाट बघत असतांना माझ्या मागून येऊन चेतनने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन बोलला,
"काय ग...जायची इच्छा नाही का?? चल खाली सगळे वाट बघत आहेत तुझी..."
आता त्याला काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं मला..एकीकडे राग ही येत होता, वाईटही वाटत होतं की अतुल का आला नसेल वेळेवर, आजही बोलणं झालंच नाही आणि याआधी जो वेळ मिळाला तो फक्त अबोल्यात घालवला...तेवढ्यात धावत पळत धापा टाकत अतुल माझ्या आणि चेतनाच्या समोर येऊन उभा झाला..त्याच्या चेहऱ्यावरची अधीरता एका सेकंदात नाराजीत बदलली...
"काय रे..मॅरेथॉन पळत होतास का?? आणि तू इथे काय करतोयेस??" चेतनच्या प्रश्नावर अतुल गारदचं झाला, काही सेकंद त्याला सुचलचं नाही काय उत्तर द्यावं, पण शेवटी तो बोलला,
"ते..अम्म्म.. तुला...तुला शोधत होतो....ते जरा काम होतं.."
"हो का...बरं.. मला आधी माझ्या पार्टनर ला बाय करू दे, मग येतो मी...हिला मला सोडून जायची इच्छा होत नाहीये..खिखिखी..." माझ्याकडे बघत चेतन बोलला आणि मला चिडवतांना पुन्हा त्याचं हसणं सुरू झालं...
"हो का...मीच जातो मग, तू ये मागून..."
अतुलचं रुक्ष बोलणं कळलं मला, आणि इतक्यात चेतनला फोन आला, बहुधा साक्षीचा असावा त्यामुळे तो घाईघाईत खाली निघून गेला...अतुलही जाणार त्याआधी मी त्याला थांबवत बोलली,
"ते...तूझीच वाट बघत होती मी...बोलणार होतास ना..."
"हो...पण आता राहूच दे...आणि तू माझी वाट बघत नव्हतीस... हो ना? असू दे...." आणि त्याने जायला पाऊलं उचललीत,
"अरे पण का बोलावलं होतं ह्याचं उत्तर तरी देऊन जा..."
मी कळकळीने त्याला बोलली, त्यावर तो मागे वळला आणि माझ्यावर एक कटाक्षा टाकत बोलला,
"हर सवाल का जवाब हो जरुरी तो नही,
कुछ बातो का जवाब खामोशी भी होती है।"
...आणि तो निघून गेला, पुन्हा अनुत्तरित...मी जरी त्याच्याच उत्तरासाठी थांबली होती तरी आता माझे अश्रू मात्र थांबत नव्हते...खूप वाईट वाटलं की येथपर्यंत येऊन पुन्हा आमच्यातल्या भावना अव्यक्तचं राहिल्या...स्वतःला सावरत मी माझ्या घरी निघून आली... आता, ना माझ्याकडे मोबाईल होता, ना त्याचा नंबर होता...२००६
मध्ये तेंव्हा ना कोणते सोशल मीडिया अजून आले होते, जे मी त्याला शोधू शकली असती...दिवस फक्त आत एन्ट्रान्स चा निकला काय येतो या विचारात आणि अतुलच्या आठवणीत जात होते...माहीत नव्हतं, आता पुढे कधी आम्ही समोरासमोर येऊ की नाही....आमचं भेटणं होईल की नाही...आता तर मी सगळ्या आशाच सोडून दिल्या होत्या...पण म्हणतात ना 'उम्मीद पे दुनिया कायम है'...याची प्रचिती येणार होती मला..
**********************
क्रमशः