वाचलास रेsssss वाचलास ! - 3 siddhi chavan द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वाचलास रेsssss वाचलास ! - 3

'त्या नदी घाटावर आजूबाजूचा कानोसा घेत मी गाडीला किक मारली, ती काही केल्या स्टार्ट होईना. बरेच दिवस पावसात भिजल्याने तिची अवस्था खूप वाईट झाली होती. सात वर्षे झाली, माझ्या स्वकमाईतून घेतलेली पहिली गाडी. असा कसा वाऱ्यावर सोडेन मी तिला. डिकी चेक करून आधी माझी डायरी उचलली. माझी डायरी, तिच ज्यामध्ये मी कथा लिहितो. माझ्या [अजरामर] कथा. मी लिहितो, मग वेबसाईटला पब्लिश करतो, आणि मग त्याच भयकथा कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यच वाटोळं करतात. अगदी नायनाट....
आणि सुरु होतो लपंडाव. मी, माझी कथा आणि या सगळ्याच्या मागे लागलेली मीडिया, माझ्या कथेसारखीच घटना आयुष्यात घडून आयुष्याची फरफट झालेला एखादा अभागी देखील यात सामील असतो, जर तो अजून जिवंत असे तर.
नाही, यापुढे आता माझी कोणतीही कथा सत्यात उतरणार नाही. कारण आज मी या डायरीचा शेवट करतोय. लिखाण तर यापुढे बंदच… टाळेबंद म्हणा ना हवं तर.'

हातातल्या डायरीची पान फडफडत होती आणि मला खूप चरफडलं. अगदी खोल काळजात दुखरी कळ उमटली.
" कडकड कडाडणार्या मेघांची, गडगड त्या चमकणाऱ्या विजेची,
फडफड साऱ्या भरलेल्या पानांची, अन चरफड झाली या जीवाची. "
‘ तरीही मी काळजाला हात घातला, आणि त्या डायरीची पानं ओरबाडायला सुरुवात केली. मिळेल ते, हातात सापडेल ते पान फाडत चाललो होतो. शेवटी आठवडाभरापूर्वी लिहिलेली ती कथा समोर आली, अजूनही क्रमश असलेली ... 'मी आणि सलीम, जिथे आम्ही सापडली होतो, चेटकिणीची वाडी.' नष्ट करायची होती सारी पानं, मी उजव्या हाताच्या मुठीत सलग चार पानं चुरगळून टाकली. फाडून टाकणारच होतो. इतक्यात, इतक्यात सोसाट्याचा वर सुटला. अकाली वादळाला सुरुवात झाली होती. काय चाललंय याचा थांगपत्ता लागेना, आणि ती डायरी माझ्या हातून निसटत चालली. अचानक तिच्यामध्ये कुठूनतरी बळ आले. नाही ... नाही, माझ्या हातातून कोणीतरी ओढतच नेली डायरी. असंख्य धुळीचे लोटच्या लोट वाहू लागले होते. त्यामागे कोण होते ते दिसेना. मी ही त्या डायरीला निसटता-निसटता अजूनच घट्ट पकडू लागलो. ती पुढे आणि मी मागे विव्हळ- फरपटत चाललो होतो. आता माझी शक्ती कमी पडू लागली आणि माझे अवसान गळून पडले. एका बाभळीच्या झाडाखाली मी डोकं टेकलं. शरीराला अगणिक काटे रुतत चालले होते.
आणि... आणि पुन्हा तेच वीभत्स हास्य ऐकू आले, त्याच विद्रुप चेहेर्यामागे दडलेले छद्मी पण विजयाचे हास्य. तिने डायरी हिसकावून घेतली होती. उपाशी लांडग्याला शेळी मिळवी, तशी ती डायरीतील त्या पानांवर तुटून पडली, मी जणू तिला नको असलेला निरुपद्रव प्राणी होतो. तिने एका हाताने माझी मान पकडली आणि सरळ हुसकावून लावले, थेट त्या नदीपात्रात. धडामsss, धूम. '

' डाव्या हाताच्या कोपराला खालची इटालियन मार्बल चांगलीच लागली होती आणि कमरेला सुद्धा. डोळे उघडले तर मी बेडवरुन खाली आडवा पडलो होतो. म्हणजे? म्हणजे ते माझं स्वप्न होत तर? माझा विश्वास बसेना. घाबरल्याने अंगावरचे कपडे घामाने चांगले ओलेचिंब झाले होते. मी कमरेला हाताचा आधार दिला आणि विव्हळत उठून पुन्हा बेडवर आडवा झालो. स्वप्न ते, खड्ड्यात गेली ती फटफटी. मारो ती डायरी, पुन्हा तिकडे जाणे नाही, स्वप्नात पण जायला नको.'

" अहो, त्याला पुन्हा वेडाचे झटके येत आहेत, आठवडा झाला तो येऊन. रूमच्या बाहेर पडत नाही. खाण्या-पिण्यामध्ये लक्ष नाही आहे. फक्त बडबडतो, 'वाचवा, वाचवा' म्हणून. "

" एवढं सुखसोयींयूक्त घर आहे, माझा कारखाना सुद्धा बक्कळ नफा कमावतो, पण त्यात या मुलाला काडीचा रस नाही. जातोच कशाला त्या निर्जन गावात? काय मिळत याला घर-दार सोडून ? काही कमी नाही इथे."

" असूदेत हो. लेखनाची आवड आहे. जातो अनुभव लेखनासाठी. पण आल्यापासून पाहतेय, तर मागच्या वर्षी सारखंच चालू आहे. परत वेड लागलं वाटत. "

" मग काय करू म्हणतेस? पुन्हा त्या सायकॅट्रिसला बोलवू ? "

" होय, बोलवा. दुसरा काही पर्याय दिसत नाही. आणि अभि आपलं ऐकतो कुठे. यावेळी त्याच्यासाठी चांगला डॉक्टर करूया. "

' बाहेर हॉलमधून आई-बाबांचा आवाज मला स्पष्ट ऐकू आला. मी आत्तापर्यंत केलेल्या चुकांची उजळणी सुरु झाली होती. मला वेड्यात ठरवून इलाज सुरु करायचा, ही त्यांची जुनी ट्रिक. ते तरी काय करणार? मी वागतोच असा, वेड लागल्या सारखा. पण पुरे झालं आत्ता हे सगळं, पुन्हा हॉस्पिटलची पायरी चढायची नाही. मला यातून बाहेर पडायचं आहे. माझ्या वेदना कुठल्या कुठे पळाल्या होत्या, मनाशी पक्का निर्धार करून, मी उठून तयारीला लागलो. आता पुन्हा सुरुवात, जिथे सगळं सोडून पळ काढला होता, तिथूनच पुन्हा नव्याने सुरुवात करायची.'
'पुन्हा मागे जाणं, फार अवघड नाही, आणि वाटत तितकं सोप्पही नाही. ठीक आहे, सुरुवात तरी करू. कोणाशी तरी मन मोकळं करावा म्हणून विचार करत होतो. मी कितीही वेळा पाठ फिरवू दे तरीही मला माझ्या चुकांसह पुन्हा पुन्हा बेशर्त स्विकारणारं, माझ्या हक्कच एकच माणूस, ती म्हणजे रक्षा. '

------------------------------------------------------

क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com