Jal tu Jvalant tu - 5 books and stories free download online pdf in Marathi

जल तू ज्वलंत तू! - 5

5

-----------------

त्यादिवशी वॉशिंग्टनमध्ये फारसे ऊन नव्हते. तिथे रात्री नऊ वाजता सूर्य मावळत असे. आज संध्याकाळी ढगाळ वातावरणाने सूर्य लवकर मावळल्यासारखे वाटले.

व्हाईट हाऊसच्या समोरच्या प्रशस्त लॉनमध्ये फिरणार्‍यांची रहदारी नेहमीसारखीच होती. एकीकडे तरुण आणि मुलांच्या घोळक्यात तर जणू जत्रा भरली होती. लोक कुतुहलाने त्या लहानशा ब्राजिलियन वंशाच्या कुत्र्याला पाहत होते. त्याला कोणीतरी दारू पाजली असणार. तो दोन पायांवर नाचत होता. त्याच्या गळ्यात बांधलेला सोनेरी स्कार्फ ध्वजासारखा लहरत होता. त्याला पाहून टाळ्या वाजवणार्‍या लोकांमध्ये मुलंच नाही तर त्या कुत्र्याची मालकीण मॉमग्रेटा पण सामील होती. तिच्याबरोबर न्यूयॉर्कहून आलेली तिची मैत्रीणपण होती. थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या फोटोग्राफरने हे दृश्य कॅमेरात कैद करणे सुरू केले होते. फोटोग्राफर ज्या कार्यक्रमाचे फोटो घ्यायला आला होता, तो सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता.

फिन्जान आपल्या होणार्‍या वधूला घेऊन तिथे पोहोचला नव्हता. सगळे त्याची प्रतिक्षा करत होते. अमेरिकेच्या राष्ट्रपतीभवनाच्या समोर थोड्या अंतरावर एका सुंदर कारंज्यासमोर फिन्जानचे काही मित्र प्रतीक्षा करत होते. डान्स करणारा ब्राजिलियन डॉग आणि त्या महिला फिन्जानच्या निमंत्रणावर तिथे आल्या होत्या.

तेवढ्यात फुलांनी सजवलेली एक आलिशान कार येऊन थांबली. कार अर्नेस्ट चालवत होता. मागे वर-वधूच्या पोशाखात फिन्जान आणि त्याची प्रेयसी बसले होते. आता आकर्षणाचे केंद्र कुत्र्याऐवजी कारमधून उतरलेले जोडपे होते. सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

फोटोग्राफरने फिन्जान दांपत्य आणि त्यांच्या पाहुण्यांचा एक आठवणीत राहील असा फोटो काढला. त्यात सगळे एकदम हवेत उसळी मारून आपला आनंद व्यक्त करत होते. त्या शानदार क्षणाचा अर्थ असा होता की, फिन्जानने धरतीपासून आकाशापर्यंतच्या प्रवासात मित्रांच्या हजेरीत, आपल्या प्रेयसीबरोबर जगाचा प्रवास करण्याचा संकल्प केला आहे. मखमली लॉनवर शॅम्पेनने जणू सडा घातला. फिन्जानच्या चमकणार्‍या चेहर्‍यावर नवीन जीवनाचा उन्माद दिसत होता.

सगळेजण तीन-चार कारमध्ये बसून रात्रीच्या जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे फिन्जानने पेरीनाशी सगळ्यांची ओळख करून दिली. तो तिला पन्नी नावाने हाक मारत होता. एक आनंददायक संध्याकाळ आणि त्याच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीने फिन्जानच्या जीवनात मागच्या काही दिवसात जे काही घडले होते, ते धुवून पुसून टाकले. रात्री उशिरा मित्रांनी निरोप दिला. फिन्जान आणि पेरीना घरी आले.

***

असे म्हणतात की जमीन कशीही असली तरी त्यावर कधी ना कधी हिरवळ उगवते. निसर्गाच्या झोळीत सगळ्या प्रकारच्या मातीतून बहार येईल असे उपाय आहेत. फक्त योग्य वेळ येईपर्यंत धीर धरला पाहिजे. फिन्जानचे ते घर जे मागच्या काही दिवसांपासून अनेक अडचणींना तोंड देत होते ते पेरीना आल्याबरोबर बहरले. भिंती घर वाटू लागल्या. छताला लागलेली जळमटं नाहीशी झाली. कल्हई करणारा जसा कल्हई लावून भांडी चमकवतो तसे पेरिनाच्या हाताने घरातल्या सगळ्या वस्तू चमकवल्या. फिन्जानने आपल्या धंद्यातून काही दिवसांची सवड काढली. बफलोच्या बाहेर काही दिवस काढण्याचा कार्यक्रम बनवला. फिन्जानच्या मित्रांनी याला मधुचंद्र ट्रीप नाव दिले. त्याच्या मित्रांनी त्याचा व्यवसाय सांभाळला. नुकसान होऊ दिले नाही.

फिन्जानच्या मनात आपल्या बालपणीच्या त्या लहानशा शहराच्या- ग्रोव सिटीच्या आठवणी अशा जपून ठेवलेल्या होत्या जसे पुस्तकात फूल ठेवावे. तेथील एका शाळेत त्याने काही दिवस शिक्षण घेतले होते. त्याने तिथे जाण्याचा प्रस्ताव पेरिनासमोर ठेवला. तिने तो मान्य केला. असं म्हणतात की लग्नानंतर मुली मुलांच्या वर्तमानापेक्षा भूतकाळ जाणून घ्यायला जास्त उत्सुक असतात. त्यांच्यासाठी हे तसे असते जसे वडिलोपार्जित खजिना ठेवलेले लॉकर उघडणे. ज्या झाडाखाली त्यांनी आपले घर बनवले ते कोणत्या नर्सरीत उगवले, कोणत्या हवा-पाण्यात मोठे आले, हे जाणून त्यांना आनंद होतो.

काही दिवसांनंतर ते पिटसबर्ग मार्गे डेट्रोइटमध्ये होते. एका मोठ्या काळ्या लिमोजीनमधून प्रवास करताना पेरिना तो रस्ता पाहून सद्गदित झाली, ज्या रस्त्याने फिन्जान तिला घेऊन जात होता. फिन्जानच्या विचाराच्या समुद्रात आठवणींचे हजारो रंगीबेरंगी मासे त्याला त्रस्त करत होते. लाल दगडांनी बनलेले ते लहान शहर त्याला पाण्यात विरघळलेल्या पुष्पगुच्छासारखे वाटत होते. तेथील गोल रस्ते शहराच्या एकतेचे प्रतीक होते.

ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्याच्या मागे अतिशय शांतता होती. उष्णता होती. वातावरणात उत्साह होता. रात्री सगळे नाहीसे झाले.

जगाच्या पाठीवर न जाणो कुठे कुठे काय काय होत होते. मनू आणि श्रद्धाला घेऊन कोणत्यातरी लांबच्या देशात जयशंकर प्रसाद ‘कामायनी’ लिहीत होते. लंडनच्या जवळपास घरी परतणार्‍या कवीला डेफोडाइल फूल दिसले. युनानमध्ये कोणी आदम आणि हव्यासाठी थिरकणारी थाप घडवत होता.

ध्रृवार न संपणारी रात्र विकली जात होती. कोणाजवळ वेळ असता तर त्याने जाऊन खरेदी केले असते.

पौर्णिमेच्या रात्री जो चंद्र चांदीच्या परातीसारखा दिसतो, तोच थोडा वेळ ढगांशी लपंडाव खेळून धुसर होऊन जातो.

फिन्जानने एके सकाळी पेरिनाला आपली ती शाळा दाखवली, जिच्या आठवणीने ते इथे आले होते. पेरिनाला त्या इमारतीत किंवा जागेत असे काहीही दिसले नाही ज्याच्यामुळे तिची आठवण वर्षानुवर्षे रहावी. फिन्जानच्या लक्षात आले म्हणून त्याने तिथे येण्याचे खरे कारण सांगितले.

तेथून काही अंतरावर एका पर्वतीय क्षेत्रात बनलेल्या चर्चच्या मागे एक फार मोठे फार्म हाऊस होते. काही वर्षांपूर्वी एका भारतीय संताने तिथे आपला आश्रम बनवला होता. आता ते संत अमेरिकावासी झाले होते. त्या आश्रमात शेकडो लोक येत-जात होते. तिथे नेहमी गाड्यांची गर्दी असायची. लोक सांगतात की त्या आश्रमाच्या जवळ जवळ सत्तर देशात शाखा आहेत. हजारो लोक येऊन या संताजींना भेटतात. आपल्या समस्या सांगतात. त्यांच्याकडून उपाय जाणून घेतात. फिन्जान संतांना विचारणार होता की नायगारा धरण पार करण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही? पेरिनाने शांतपणे ऐकले आणि अगदी सपाट प्रतिक्रिया दिली, “अहो, कोणी माणूस हे कसे सांगू शकेल की एका माणसाचे प्रयत्न पूर्ण होतील की नाही?”

ते दोघे बरोबर हिंडत फिरत होते. पेरिनासाठी एवढे पुरेसे होते की ती फिन्जानबरोबर जात आहे. पेरिनाचे हे तत्त्वज्ञान होते की एक व्यक्ती जर काही करू इच्छित असेल, तर दुसर्‍याने अशी इच्छा का करावी की त्याने ते करू नये. तिला कोणत्याही वादविवादातही पडायचे नव्हते, की जर संतजींनी फिन्जानला यशस्वी होण्याचा संदेश दिला आणि फिन्जान आपल्या मोहिमेत यशस्वी झाला, तर या यशाचे श्रेय कोणाला मिळेल? संतजींना की फिन्जानला? जर संतजींनी फिन्जानचे स्वप्न पूर्ण होण्याबाबत शंका प्रदर्शित केली आणि तरीही फिन्जान यशस्वी झाला तर संतजींना काय शिक्षा मिळेल? जर संतजींनी फिन्जानला यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला आणि फिन्जान अयशस्वी झाला तर फिन्जानला काय नुकसान भरपाई मिळेल? संतजींनी सफल न होण्याबद्दल सांगितले आणि तसेच झाले तर एका देशात साहसिक काम पूर्ण न होऊ देण्याचा दोषी कोण ठरवला जाईल, संतजी की फिन्जान? संतजींनी काहीही सांगितले आणि फिन्जानबरोबर काहीही झाले तरी या सत्तर देशातले लोक या गोष्टीत का पडत आहेत?

जगातील दुसरा सगळ्यात ‘दाट’ देश या गोष्टीत वेळ घालवत असेल तर पेरिनाला काय घेणं देणं आहे!

थोड्या वेळाने पेरिना फिन्जानचा हात धरून आश्रमाच्या पायर्‍या चढत होती. ते आश्रमात जात होते, तसे काही लोक आश्रमातून बाहेर येत होते. पेरिनाला आश्चर्य वाटत होते की, लोकांचा स्वत:च्या हिमतीपेक्षा बंद खोलीत बसलेल्या एका दुसर्‍या माणसावर जास्त भरवसा आहे. कोणत्याही प्रश्नाची दोन उत्तरे असतात. हो किंवा नाही. माणूस डोळे मिटून सगळ्यांना हो किंवा सगळ्यांना नाही म्हणेल, तरी पन्नास टक्के उत्तर बरोबर ठरणारच. या यशाबद्दल त्याची स्तुती होणारच!

आत काही लोक प्रतिक्षा करत होते. त्यांना एका सुसज्ज दालनात बसवले. त्यांना सुगंधीत स्वादिष्ट पेय दिले गेले. टोकन दिले. आश्रमासाठी स्वेच्छेने काही द्यावे असेही सुचवले. फिन्जान अभिभूत होऊन, पेला हातात घेऊन सोफ्यावर बसला. पेरिनाला हे सगळं कंटाळवाणं वाटलं. ती आश्रमाच्या चारी बाजूचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी मागच्या बाजूला गेली. मागे एका औषधी बागेत लोक काम करत होते. पेरिनाने एका वृद्ध स्त्रीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती हां, हूँ, व्यतिरिक्त काही बोलली नाही. पेरिना निराश होऊन भिंतीजवळून चालत लांब गेली. एकटीच शतपावल्या करू लागली. आतली गर्दी पाहून आलेल्या पेरिनाला अंदाज होताच की फिन्जानचा नंबर लागायला अनेक तास लागतील.

पेरिनाला हे पाहून बरं वाटलं की, ती वृद्ध महिला तिच्याकडे येत होती. ती पेरिनासमोर आली. ती महिला गेली चाळीस वर्षे त्या आश्रमात काम करत होती आणि तिथे चालणार्‍या कारभाराबद्दल तिला बरीच माहिती होती. महिलेने अगोदर पेरिनाची क्षमा मागितली की, ती ड्युटीवर असताना तिच्याशी बोलू शकली नाही. कामाच्या वेळेत कोणाशी बोलण्यास तिथे सक्त मनाई होती. आता ड्युटी संपल्यावर महिला पेरिनाजवळ आली होती.

महिला नॉर्वेच्या ओस्लोची राहणारी होती. आश्रमाची विश्वासपात्र होती. अनेक देशांची यात्रा तिनं केली होती. पेरिनाशी मैत्री करायला तिला वेळ लागला नाही. कारण ती बोलकी होती. आश्रमात बोलायला बंदी असल्याने कदाचित ती बाहेर बोलत असावी.

खडे वाजावेत अशा आवाजात बरंच काही सांगितल्यावर तिनं काही गोष्टी कुजबुजत सांगितल्या. त्यात पेरिनाला कळले की, संतजी भारताचे नाहीत. म्यानमारचे राहणारे आहेत. महिलेने दिलेली माहिती ऐकून पेरिना आश्चर्यचकीत झाली होती की, हा आश्रम जवळजवळ नव्वद वर्षांपूर्वी बनला होता. तेव्हा एका अशक्त माणसाला भारतातून जवळजवळ बंदी बनवूनच इथे आणले होते. लोक सांगत असत की, भारतात डोंगरावर, गुहेत जाऊन तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त करण्याची परंपरा आहे. असे तपस्वी काही धन कमावत नव्हते. आपल्या सिद्धीच्या बदल्यात काही घेत नव्हते. त्यांना त्यांच्या ज्ञानामुळे पूर्वानुमान होत असत, जे लोक जाणून घेऊ इच्छित असत.

नंतर काही व्यापारी बुद्धीचे लोक अशा समर्थ लोकांना बळजबरीने आश्रय देऊन, लपवून आपल्या बरोबर ठेवत असत. त्यांच्या चमत्कारिक ज्ञानाच्या बळावर आपली दुकानं चालवत होते. भारतीय राजेरजवाड्यांनी अशा तपस्वींच्या मदतीने अनेक देशात आपले वर्चस्व स्थापित केले होते. पेरिनाला वाटले की, ही स्त्री बोलता बोलता थांबली तर जाऊन फिन्जानला सतर्क करावे. जे काम पेरिनाला सहज सोपे वाटत होते. ते तितके सहज सोपे नव्हते. ती महिला गप्प व्हायला तयार नव्हती. पेरिनाला अनेक गोष्टी कळल्या. आश्रम सुरू करताना ज्या जर्जर वृद्ध व्यक्तीला आणले होते, ती आता जिवंत नाही. पण आजसुद्धा शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे एक महात्मा तिथे आहेत. त्यांना आश्रमाच्या बेसमेंटमध्ये एका लहान खोलीत ठेवले होते. ते थोडेसे भोजन करतात आणि निर्वस्त्र राहतात. खोली एखाद्या नैसर्गिक गुहेसारखी आहे. ते बाबा पाहिल्याबरोबर वेडे असावेत असे वाटते. पण सत्य हे आहे की, यांच्या ज्ञानाने आमचे संतजी सगळीकडे नाव कमावत आहेत. हे म्हणत असताना तिने सगळीकडे पाहिले. तिचे बोलणे कोणी ऐकले तर नाही ना! पेरिनाला वाटले, आश्रमाच्या संतजींना नाही भेटले तरी चालेल पण त्या वृद्ध महात्म्याला पहावे. आता तिला त्या बाबाबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची होती.

थोड्या वेळाने फिन्जान समोरून येताना दिसला. तो तिला शोधत मागच्या बाजूला आला होता. वृद्ध महिलेच्या इतक्या वेळेच्या सहवासाने पेरिनाला एवढे धाडस आले की बाबांना भेटण्याच्या आपल्या इच्छेबद्दल तिला सांगावे. काही विचार करून महिला तिला बाबाजवळ घेऊन जायला तयार झाली. पेरिनाला तिची एक चमत्कारिक अट मान्य करावी लागली. बाबा महिलांना भेटत नाही. ते फिन्जानला भेटतील. तेव्हा तिने लपून त्यांना पाहावे. फिन्जानला जोखीम उचलून त्यांची भेट घालून द्यायला ती तयार झाली.

महिलेला तिथे जाण्याची परवानगी नव्हती. म्हणून तिने बागेत काम करणार्‍या एका मुलाला फिन्जानबरोबर पाठवण्याची व्यवस्था केली. पेरिना आणि ती महिला दुसर्‍या बाजूने एका झरोक्यातून बाबांचे दर्शन करण्यासाठी लपल्या.

बाबांना पाहणे सोपे नव्हते. त्या मुलाच्या मागे जाताना फिन्जानला असे वाटत होते जणू तो प्राणीसंग्रहालयातील वाघाला बघायला जात आहे. पिंजर्‍यात बंद असलेला वाघ पाहणार्‍यांच्या समोर येवो अथवा ना येवो ते वाघाच्या मर्जीवर अवलंबून असते. पाहणारा कोठून आलेला आहे, याला महत्त्व नव्हते. आश्रमातील अनेक गुहांमधून वेड्यावाकड्या रस्त्याने फिन्जान त्या मुलाबरोबर बाबाच्या गुहेत पोहोचला.

बाबांची तेव्हा दाराकडे पाठ होती. त्यांनी आकाशाकडे हात उचलले होते. दोघे तरुण गप्प उभे राहून, बाबांनी त्यांच्याकडे पाहण्याची वाट पाहत होते. वरच्या बाजूने उन्हाचा लहानसा कवडसा गुहेत पडत होता. पेरिना व ती वृद्ध महिला त्या झरोक्यातून पाहत होत्या. त्यांना तळघराच्या त्या खोलीचा एक भाग दिसत होता. पण बाबा दिसत नव्हते.

तरुणाने फिन्जानला सांगितले की, जेव्हा बाबा इकडे बघतील तेव्हा त्यांना प्रणाम करू नका. असे का हे विचारण्याआधीच बाबांनी वळून पाहिले. फिन्जान घाबरला. त्याने बाबांना अभिवादन केले. बाबा मोठ्याने हसले व दारासमोर आले. बाबा वळून समोर आल्याबरोबर फिन्जानच्याबरोबर आलेला तरुण पळू लागला. फिन्जान तिथेच उभा राहिला.

जमिनीच्या छिद्रातून डोकावून आता पेरिना बाबांना पाहत होती. बाबा उडी मारून फिन्जानसमोर आले. विजेच्या वेगाने फिन्जानच्या टीशर्टचा खिसा धरून ओढू लागले. फिन्जान घाबरला. त्या तरुणासारखा तो जिकडे पळाला होता तिकडे पळाला. तो तरुण थोड्या अंतरावर उभा राहून सगळं पाहत होता. फिन्जानच्या मागे धावताना बाबा “पन्ना पन्ना,” ओरडत होते. ते ऐकून पेरिना उत्तेजित झाली. तिने वृद्ध महिलेला सांगितले, की फिन्जान तिला ‘पन्नी’ म्हणून हाक मारतो. उत्साहात ती हेही विसरली की बाबांसमोर महिलांना जाण्याची मनाई आहे. ती धावत बाबांजवळ जाऊ लागली. तिथे जाईपर्यंत बर्‍याच पायर्‍या उतराव्या लागणार होत्या. ती पुढे जाण्याआधी वृद्ध महिलेने तिला हाताला धरून थांबवले. पेरिना म्हातारीच्या हातातले बळ पाहून आश्चर्यचकित झाली.

तिकडे वेगाने धावणार्‍या फिन्जानला बाबांनी पळत जाऊन पकडले. त्याच्या टीशर्टच्या खिशात हात घालून काहीतरी शोधू लागले. फिन्जानची भीती थोडी कमी झाली. तो स्वस्थ उभा राहिला. बाबाने फिन्जानच्या खिशातून हात बाहेर काढला. फिन्जान हे पाहून आश्चर्यचकित झाला की, त्याच्या खिशातून सोनेरी केशरी रंगाचा चिंचेच्या आकाराचा मासा बाबांच्या हातात होता. मासा मेलेला होता. फिन्जान भीतीने थरथर कापू लागला. कारण याच माशाला लांब फेकण्याचा प्रयत्न करण्याचे भयंकर स्वप्न त्याने पाहिले होते. तो माशाला फेकू शकला नव्हता. मासा गायब झाला होता. आता तोच फिन्जानच्या खिशातून बाबांच्या हातात आला होता.

फिन्जाननेसुद्धा बाबांचा ‘पन्ना पन्ना’ ओरडण्याचा आवाज ऐकला होता. पण त्याला काही कळले नव्हते. त्याच्याही लक्षात आले होते की, तो पेरिनाला प्रेमाने पन्नी म्हणतो.

आता तो तरुण जवळ आला. बाबांचा हात धरून त्यांना गुहेकडे घेऊन जाऊ लागला. फिन्जान एका बाजूला उभा राहिला. वृद्ध महिला पेरिनाला सांगू लागली की, पन्ना भारतातील किमती दगड असतो. लोक त्याला आपल्या दागिन्यात मढवतात. जसे अंगठीत. पेरिनाला हे ऐकून खूप आनंद झाला. पण वृद्ध महिलेला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही की, बाबांनी फिन्जानच्या खिशातून मेलेला मासा कसा काढला आणि मासा हातात घेऊन ओरडण्याचे काय प्रयोजन होते. हे जाणून घ्यायला वृद्ध महिलासुद्धा उत्सुक होती.

वृद्ध महिलेने पेरिनाला बाबांचे दर्शन घडवायचे ठरवले होते. पण त्यात एवढी भानगड होईल याची तिला कल्पना नव्हती. ती अस्वस्थ झाली आणि तिने फिन्जान दांपत्याला निरोप दिला.

परत येताना पेरिना आनंदात होती. तिने फिन्जानला हेही विचारले नाही की, मुख्य संतजीशी भेट घेतली त्या भेटीत काय झाले. फिन्जानने स्वत:च थोडी माहिती दिली. फिन्जान त्यांच्या संपन्नतेने आणि विनम्रतेने प्रभावित झाला होता. संतजींनी सांगितले होते की, त्याने इथे येत राहावे. चौथ्या भेटीत ते सांगतील की नायगारा फॉल्स् तो पार करू शकेल की नाही. जर यशस्वी होणार असेल तर कसा? फिन्जान आता संतजींशी दुसर्‍या आणि तिसर्‍या नाही, चौथ्या भेटीबद्दल विचार करत होता.

पेरिनाला आता एखाद्या ज्वेलरीच्या दुकानात जायचे होते. फिन्जान तिला हनिमून उपहार देणार होता. पेरिनाच्या मनात आता भारतीय पन्ने झगमगत होते. तिला पन्न्याचे दागिने तर घ्यायचे होतेच पण पन्नाबद्दल माहिती मिळवायची होती. पुढच्यावेळी ती जेव्हा त्या महिलेला भेटेल तेव्हा पन्नाचा किमती हार घालूनच भेटेल. तिच्या मते बाबांच्या बद्दल हा सन्मान होता.

पेरिनाने माहिती मिळवली की पन्ना फक्त काही देशातच मिळणारा किमती दगड आहे. भारतात सगळ्यात जास्त मिळतो. संध्याकाळी डिनरच्या वेळी फिन्जानने रंगीत मदिरेचा ग्लास पेरिनाला पेश केला तेव्हा तिला त्या चकाकणार्‍या काचेच्या एक एका कोनात किमती पन्ने दिसू लागले. जेवणात जेव्हा आख्खा होला रश्यात ठेवलेला आला तेव्हा त्याच्या उघड्या डोळ्यात तिला पन्ने दिसले.

ती सगळी चमक रात्री फिकी पडली. फिन्जानने खिडकीचा पडदा ओढून घेतला. नाइट लॅम्पचा स्वीच ऑफ केला. खिडकीतून आकाशातील शेकडो पन्ने दिसत होते. ते आता पडद्याआड गेले. अंधारात पेरिना एखाद्या मानससरोवरातून मोती वेचायला गेली. फिन्जानने रात्र आणि झोप यांना भांडताना सोडून दिले. ना रात्र संपत होती ना दिवस उगवत होता!

त्या रात्री संतजींच्या आश्रमात आपल्या खोलीत झोपलेल्या वृद्ध महिलेलासुद्धा झोप आली नाही. ती विचार करत होती, बाबांनी पेरिनाच्या पतीचा पन्ना पन्ना म्हणत पाठलाग का केला? ती गेली अनेक वर्षे इथे होती आणि तिला इथल्या कामकाजाबद्दल बरीच माहिती होती. तिला वाटत होते की, पेरिना पुन्हा येईल. म्हणून तिला वाटत होते की, हे कोडे सोडवावे. पेरिनाबद्दल तिला आपलेपणा वाटत होता. नवीन लग्न झालेली मुलगी हनिमूनच्या दुसर्‍या दिवशी पतीबरोबर इथे का आली असेल? बैराग्याच्या आश्रमात अशा तरुणांचे काय काम?

वृद्ध महिला कसेही करून ते कोडे सोडवू पाहत होती. तिला वाटत होते, तिने पेरिनाला मदत करावी. ती जर अचानक एखाद्या संकटात सापडणार असेल तर तिला अगोदरच सावध करावे. बाबांना महिलांनी भेटणे निषिद्ध होते तरी...

बाबांना भेटण्यासाठी ती वृद्ध महिला एमरा, ती अट मान्य करायला तयार होती, ज्याच्यामुळे संतजींनी महिलांना बाबांना भेटण्याची मनाई केली होती. तिला कोणत्याही परिस्थितीत पेरिनाला मदत करायची होती.

त्यानंतर वर्षे लोटली. न फिन्जान आला ना पेरिना!

ते दोघे विसरले की, ते त्या आश्रमात का आले होते. त्यांना फक्त एवढेच लक्षात राहिले की, लग्नानंतर त्यांची ही हनिमून टूर होती, आणि आनंददायक होती. बफलोला आल्यावर ते आपल्या संसाराम रमले. फिन्जान मन लावून आपला व्यवसाय करत होता.

कधी त्याच्या मनात आपल्या स्वप्नाचा विचार आला तरी तो विचार करत असे की, त्याला त्याचे स्वप्न कोण्या संत महंताच्या मंत्रतंत्राने पूर्ण करायचे नाही. आपली चिकाटी आणि धाडसाने करायचे आहे.

फिन्जान अनुभव घेत होता. वयाबरोबर त्याची समज वाढत होती. तो विचार करत असे, जर हे महाज्ञानी लोक आपले ज्ञान आणि मंत्रतंत्राने लोकांचे जीवन सुधारण्याची क्षमता ठेवतात तर मग हे संपन्न देशात का जातात? आपल्या मागासलेल्या देशात राहून का काम करत नाहीत? तिथे यांची गरज आहे. मग त्याला यांच्या ज्ञानाबद्दल शंका येऊ लागते. काही का असेना, पेरिनाची हिरेपन्नामध्ये रुची वाढली. ती शहरात जेव्हा आशियातील किंवा भारतीय कुटुंबाला पाहते, तेव्हा विवाहित स्त्रियांच्या हातातील काचेच्या हिरव्या बांगड्या तिला आकर्षित करतात. ती सुद्धा कधी कधी बांगड्या व पन्ना जडवलेली अंगठी घालत असे. ती तिने आपल्या प्रवासात खरेदी केली होती.

पेरिनाच्या मनात एक गोष्ट राहिली होती. ती त्या सोनेरी, केशरी रंगाच्या माशाला विसरली नव्हती. बाबांनी फिन्जानच्या मागे धावत जाऊन त्याच्या खिशातून तो काढला होता.

त्या दिवशी फिन्जानबरोबर बोस्टनमध्ये हिंडताना तिने एक मोठे मत्स्यालय पाहिले, तेव्हा तिच्या आठवणी ताज्या झाल्या. या शानदार, अत्याधुनिक एक्वेरियममध्ये तिचे डोळे तोच मासा शोधत होते. फिन्जान एक एक मासा पाहून पुढे जात होता. पण ती भिंतीवर लिहिलेली माहिती वाचत होती. कदाचित तिला त्या सोनेरी माश्याबद्दल काही माहिती मिळेल. त्याने पेरिनाच्या मनात शंकेचे बी पेरले होते.

एक्वेरियमच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर समुद्राच्या एका भागात पोहणार्‍या एका तरुण-तरुणीला पाहिले तेव्हा पेरिनाला वाटले, आपणही त्या तरुण-तरुणीसारखे गार पाण्यात उतरावे. खोल पाण्यात शोध घ्यावा आणि फिन्जानच्या खिशात सापडलेल्या माश्याचे प्रतिरूप शोधावे.

जगातील कोणताही देश असो, कोणताही वंश असो, कोणत्याही वयाचे जीवनसाथी असो, आपल्या पतीच्या खिशाची माहिती मिळवणे प्रत्येक पत्नीचे पहिले कर्तव्य असावे.

***

निसर्गाने धरणीच्या शृंगारासाठी दोन दागिने बनवले आहेत. एक चकाकणारे ऊन आणि दुसरे सगळीकडे पसरणारे चांदणे. चंद्र आणि सूर्याला हे काम दिले आहे. पृथ्वीवर कधी या गोष्टींची कमतरता नसावी. वर्षाव करत रहा. कधी थकून बसू नका. कधी सुट्टी मिळणार नाही. हो, पण कधी थकलात तर ढगांची चादर पांघरून विश्रांती घ्या. पण चालता चालता थांबण्याची परवानगी मिळणार नाही.

बस्स! यामुळे कधी कुठे काही थांबले नाही.

हळूहळू फिन्जान सगळं विसरला आणि पेरिनासुद्धा. काळाने त्यांना जे काही दिले नाही, त्याच्या बदल्यात बरंच काही दिले. त्यांना एक गोड मुलगी झाली.

काळ कदाचित काही विसरेल पण लोक विसरत नाहीत. आणि ज्यांची मनं जुळतात, ते तर कधीच विसरत नाहीत. काही विसरत नाहीत. फिन्जान आणि पेरिनाने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. येणार्‍या पाहुण्यात न्यूयॉर्कहून आपल्या मालकिण मॉमसह ते ब्राझिलियन कुत्रेसुद्धा आले होते. त्याचे आणि फिन्जानचे स्वप्न एक होते. ते आता लहान पिल्लू राहिले नव्हते. खूप मोठे झाले होते.

या पार्टीत फिन्जानने पाहुण्यांना सांगितले की, त्याची लेक डेलाचा जन्म नायगारा फॉल्स्वरून पडणार्‍या पाण्याच्या शिंतोड्यांत अर्ध्या रात्री एका शिपमध्ये झाला होता. त्यांच्या जीवनातील ही अमूल्य भेट त्यांना चांदण्या रात्री, लाटांवर डगमगणार्‍या जहाजावर मिळाली होती. पाहुणे पेरिनाने मेहनत घेऊन तिच्या पसंतीने बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा स्वाद घेत होते. फिन्जानने सांगितलेली घटना आनंददायक होती. पण हे सांगताना फिन्जान रडू लागला. हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. सगळ्यांना वाटले की, हे आनंदाश्रू आहेत. लोकांना माहीत होते की, फिन्जान भावूक होत नाही. म्हणून त्यांना त्याच्या अश्रूंचे, औदासिन्याचे कारण जाणून घ्यायचे होते. नाईलाजाने फिन्जानला सांगावे लागले की, डेलाच्या आजीचा जन्म झाला तेव्हा तिची आई जेलमध्ये होती. एक बादली पाण्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी पाणी आणण्यासाठी तिला जबरदस्त संघर्ष करावा लागला होता.

सगळे दु:खी झाले. वातावरण उदास झाले!

फिन्जानचे मित्र त्याला औदासिन्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार होते. त्याआधी पेरिनाच्या चपळ बुद्धीने काम केले. वातावरण बदलण्यासाठी तिने आपल्या किमती खड्यांचे कलेक्शन आणले. सगळे कुतुहलाने पाहू लागले. पेरिनाने सांगितले की, तिला वेगवेगळे खडे खरेदी करण्याची हौस आहे. तिला जिथे कुठे पन्ना दिसेल, तेथून ती खरेदी करते. तिच्या कलेक्शनची सगळ्यांनी स्तुती केली. पार्टी पुन्हा रंगात आली. डेलाला हजारो आशीर्वाद मिळाले. जिने आजीची तहान जिंकून अथांग पाण्यावरच जन्म घेतला होता.

ज्ञश्र

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED