जल तू ज्वलंत तू! - 6 Prabodh Kumar Govil द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जल तू ज्वलंत तू! - 6

6

------------

ऋतू बदलला होता. कडाक्याची थंडी पडली होती. बफलोचे तापमान शून्य डिग्रीच्या बरेच खाली गेले होते. जसे भारतीय लोक विहिरीतून पाणी घेण्यासाठी पायर्‍या उतरत जातात, जसजसे धरतीच्या गर्भात पाय जातात तसतशी थंडी वाढतच जाते. तेथील नद्या, सरोवर बर्फाच्या लाद्या झाल्या होत्या. हिरवी पानं पांढरी दिसू लागली होती. झाडांनी वेगवेगळी रूपं घेतली होती. आकाश पृथ्वीवर पाणी नाही, बर्फ टाकत होते. रस्त्यावर एखाददुसरा माणूस फिरताना दिसत होता. प्रवासीसुद्धा जे धाडसी होते तेच फिरत होते.

फिन्जान आणि पेरिनाने डेलाला तिच्या खोलीत पाठवले. त्यांनी अंथरुणावर कागदाच्या लहान लहान पिशव्या पसरल्या. या पिशव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पन्ना होते. पेरिनाला ते फार प्रिय होते. अनेकवेळा मोजून आणि पाहूनही तिचे कधी समाधान होत नव्हते. गेल्या काही दिवसात फिन्जानच्या मनात विचार येऊ लागले होते की, तो भारतातून अशी किमती रत्नं आणून इथे त्यांचा व्यवसाय करील. त्याने पाहिले की, लोकांना रत्नं पसंत आहेत, आणि त्यासाठी चांगली किंमत द्यायला तयार असतात. पेरिना आपली हौस आणि फिन्जानचा व्यवसाय यांचा योग पाहून अतिशय प्रसन्न होती. पेरिना तर काय पण फिन्जानला हे माहीत नव्हते की, त्याच्या अंतर्मनात भारत पाहण्याची इच्छा दडलेली आहे.

जेद्दाहहून आलेल्या आपल्या मामाकडून त्याला आपल्या आईच्या जीवनाबद्दल कळले, तेव्हापासून तो आपल्या तारा त्या वातावरणाशी जुळलेल्या पाहत होता. आपली आई रस्बीची रसबानो आणि रसबाला कशी झाली हे जाणून घेण्याची इच्छा होती. आपली मुळं कोण शोधून  स्पर्श करू इच्छित नाही!

अचानक वारे वेगाने वाहू लागले. वादळ येण्यापूर्वीचे वारे. थंडी वाढतच चालली होती. थोड्याच वेळात बातम्यांमध्ये फिन्जानने ऐकले की नायगारा धबधबा गोठला आहे. लोक या कल्पनेने रोमांचित होत होते. आकाशातून जमिनीवर उडी मारणारा विराट सागर एखाद्या तपस्वीसारखा हवेत समाधी घेतो! अतिवृष्टीचा शिकार झालेला ज्वालामुखी अचानक स्लो मोशनमध्ये परिवर्तित व्हावा. पाषाणपर्वत बनावा! त्या रात्री झोपेत फिन्जान स्केटिंग करत बर्फाच्या धबधब्यावरून खाली येत होता. तो हवेत उडून वर जात होता आणि गोठलेल्या बर्फावरून घसरत खाली येत होता. या खेळात तो लहान मुलांसारखा रमला होता.

सकाळी जेव्हा कॉफी टेबलावर ठेवून पेरिना त्याला उठवायला आली तेव्हा तो बेडवरून घसरून खाली फरशीवर पडला होता. त्याला असा जमिनीवर पडलेला पाहून पेरिना हसू लागली. तिच्या हसण्याने डेला जागी झाली. ती आपल्या खोलीतून डोळे चोळत आली. आपल्या वडिलांना फरशीवर पडलेले पाहून तीसुद्धा हसू लागली.

***

इतके भयंकर वादळ गेल्या कित्येक वर्षात आले नव्हते. बफलोवर या वादळाने फक्त गार वारे सोडले होते. पण देशाच्या इतर भागात हाहाकार माजवला होता. नायगारा धबधबा त्या रात्री गोठला होता. वादळाने बरेच नुकसान केले होते. अनेक घरं पडली होती. त्यांचे फोटो लोकांनी वर्तमानपत्रात पाहिले होते. अनेक भागात लाईट नव्हते.

या वादळाने हजारो मैल लांब मॅनमारमध्ये खळबळ माजवली होती. ते नावाजलेले संतजी, ज्यांच्या आश्रमाची लोक पूजा करत असत, ते या वादळाची शिकार झाले होते. डोंगरावर बनलेल्या त्या आश्रमाचे आवार छिन्नभिन्न झाले होते. पडलेल्या भिंती आणि पसरलेल्या दगडमातीच्यामध्ये या आश्रमात राहणारे बाबा, ज्यांचे वय शंभर वर्षांपेक्षा जास्त सांगितले जात होते, ते न जाणो कुठे अंतर्धान पावले होते. भारत आणि मॅनमारबरोबर अमेरिकेनेसुद्धा वादळग्रस्त लोकांना मदत दिली होती. संतजी व बाबा जिवंत आहेत की काळाने त्यांना ओढून नेेले, या विषयावर चर्चा चालली होती. अंदाज लावले जात होते. आश्रमाची गडगंज संपत्ती क्षतविक्षत झाली होती. ती संपत्ती वकिलाती मार्फत सरकारने ताब्यात घेतली होती.

कालपर्यंत लोकांना त्यांचे भविष्य सांगणारी जमीन आज आपले भवितव्य आणि सुरक्षिततेच्या बाबतीत आश्रित झाली. पाण्यात बुडालेल्या काठांना अश्रूंचा आधार देणार्‍यांमध्ये नॉर्वेची एमरासुद्धा होती. व्हर्जिनियाची अगाथा होती, अजरबैजानची साँझासुद्धा आणि डेन्मार्कचा पिन्ससुद्धा!

जे वाचले नाही, ते तर नाहीच पण जे वाचले त्यांचे सुद्धा काही वाचले नाही. समुद्रात इतक्या उंच लाटा उठल्या की मासे नाराज होऊन दुसर्‍या दिवशी पाण्यावर आलेच नाहीत. तळाशी खोल पाण्यात बसून राहिले.

असे वाटले जणू जगाच्या स्टिअरिंगवर बसलेल्या परमेश्वराला डुलकी लागली आणि जगाची गाडी खोल खड्ड्यात जाऊन पडली. जंगलात जर काही संकट आले तर जनावरांचा कळप आपल्या गुराख्याचे रक्षण करतो. तसेच देवाच्या सेवकांनी देवाला मदत केली. शेवटी ती काळरात्र संपली. पहाट झाली.

फिन्जान आणि पेरिना वर्तमानपत्र पाहून दु:ख करत होते. अनेक वर्षांपूर्वीची आपली हनीमूनची रात्र आठवत होते. पण त्यांना त्या धुंद रात्रीच्या आठवणींतून बाहेर यावे लागले. कारण त्यांच्या समोर त्यांची कॉलेजमधून परतलेली मुलगी उभी होती. तिला माहीत नव्हते, की वादळाच्या या बातम्यांनी तिच्या आई-वडिलांवर काय परिणाम केला. डेलाला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं.

वादळामुळे अनेक आनंदाचे उत्सव रद्द केले अशी वर्तमानपत्रात बातमी होती. तसेच फिन्जान व पेरिनाने आपल्या मनात फुललेली बाग काढून टाकली.

***

डेलाला नायजेरियाच्या एका कंपनीत नोकरी मिळाली. पेरिना थोडी नाराज झाली पण जेव्हा तिला कळले, की काम इथे न्यूजर्सीत राहूनच करायचे आहे, तेव्हा तिची काळजी मिटली. जेमतेम तीन महिने झाले असतील, डेलाने त्यांना आणखी एक समाधान दिले. तिने आपल्या सहकर्मी वुडन रोझशी लग्न केले व त्याला घेऊन घरी आली. फिन्जान व पेरिनासाठी तो दिवस खास होता. त्या दिवसाच्या वातावरणाने त्यांच्या जीवनाच्या पानावर सोनेरी अक्षरात लेख लिहिला. काळाच्या लेखणीने घटनांचे शब्द लिहित जाण्याचे नाव जीवन आहे!

फिन्जान आणि पेरिनाच्या जीवनपात्रात त्या दिवशी फुलांचा अर्क भरला, ज्या दिवशी डेलाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. काळ किती झपाट्याने जातो हे पेरिनाला त्या दिवशी कळले ज्या दिवशी वुडन दोन्ही मुली आणि डेलाला घेऊन नायजेरियाला गेला.

फिन्जानला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो आणि पेरिना मुलींजवळ नायजेरियाला जाण्याचा प्लॅन बनवत. पण फिन्जानला जसा वेळ मिळत होता तसा निघूनही जात होता. ते कधी मुलींजवळ जाऊ शकले नाहीत. मुली एक-दोनदा येऊन त्यांच्याकडे राहून गेल्या.

एके दिवशी डेला तिथे आली आणि मुलींना फिन्जान व पेरिनाजवळ सोडून गेली. वुडन आणि डेलाला कामाच्या संदर्भात हिंडावे लागत होते. काही दिवसांनी ते दोघे चायनाला गेले. तिने फिन्जानकडून आश्वासन घेतले की ते दोघे काही दिवसांसाठी चायनाला येतील.

एके दिवशी एक चमत्कार झाला. डेला मुलींना आणि आई-वडिलांना भेटायला आली तेव्हा तिने आपल्या सुटकेसमधून एक लहानशी डायरी काढली आणि पेरिनाला दिली. पेरिनाने उलटसुलट करून पाहिली आणि मग प्रश्नार्थक नजरेने डेलाकडे पाहू लागली. डेलाकडून त्या डायरीचे रहस्य ऐकून ती आनंदाने उडाली. तिच्या हातातून कपड्यांची पाकिटं खाली पडली जी, डेलाने तिच्यासाठी आणि मुलींसाठी आणली होती. पेरिना ती डायरी हृदयाशी धरून अशी एकांतात पळाली जशी एखादी नवविवाहिता आपल्या माहेरी असताना पतीचे पत्र आले की ते घेऊन पळते की कोणी ते पत्र वाचू नये, पण सगळ्यांना दिसावे की पत्र आले आहे.

डेलाने सांगितले की, कामाच्या निमित्ताने ती चायनाला गेली होती. तिथे एका लहानशा गावात एक वेगळाच सेल लागलेला पाहिला. या सेलमध्ये एका जुन्या घरात बरेच जुने सामान ठेवलेले होते. एक म्हातारा आपल्या दोन-तीन साथीदारांसह बसला होता. त्या लोकांनी म्युझियममधून सामान गोळा करून आणले होते आणि विकत होते. सामानात एका आश्रमाचे आणि त्याच्या स्वामीचे चित्र होते. विश्वप्रसिद्ध आश्रमाचे सामान म्हणून ते विकत होते. ते सामान वरखाली करताना डेलाला ती डायरी सापडली होती.

तिने त्या साधारण डायरीला उचलून पाहिले. पहिल्या पानावर सुंदर बारीक अक्षरात लिहिलेले होते, “प्रिय पेरिना आणि तिचा पती फिन्जानसाठी. जे आपल्या हनिमून ट्रीपमध्ये वेळ काढून आश्रम पाहायला आले होते.” एमरा!

हे वाचल्यावर डेलाने ती डायरी खरेदी केली होती. तिने एखाद्या मौल्यवान भेटीसारखे त्या डायरीला खरेदी करून जपून ठेवले. कारण ती डायरी तिच्या आईवडिलांसाठी होती. तीसुद्धा हनिमून ट्रीपशी निगडीत होती. तिने एकही अक्षर न वाचता डायरी जपून ठेवली होती.

पेरिनाने डायरी वाचायला सुरुवात केली तेव्हा तिला जगाची शुद्ध राहिली नाही. एमराने लिहिले होते की, तिने पेरिना आणि फिन्जानची बरीच वर्षे वाट पाहिली होती. तिला आशा होती की, एक ना एक दिवस ते नक्की येतील. फिन्जानला संतजींनी येण्याचा आग्रह केला होता आणि सांगितले होते की, त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ते चौथ्या दिवशी देतील. म्हणून ती प्रतीक्षा करत होती. पण बराच काळ लोटला आणि ते लोक आले नाहीत, तेव्हा तिला त्यांच्याबद्दल काळजी वाटू लागली. त्यांच्याबरोबर एखादी दुर्घटना तर झाली नसेल ना!

एमराने लिहिले होते की, नंतर ती आश्रमाचे सगळे नियम कायदे मोडून बाबांना भेटली होती. फक्त पेरिनासाठी. नेहमी निर्वस्त्र राहणार्‍या बाबांना भेटणे निषिद्ध होते. तरीही ती भेटली. त्यासाठी तिला दंड भोगावा लागला.

एमराने बाबांना फक्त दोन प्रश्न विचारले. एक हा की, त्यांनी फिन्जानच्या मागे धावत जाऊन त्याच्या खिशातून मेलेला मासा का व कसा काढला? दुसरा प्रश्न होता, फिन्जानला पाहून ते पन्ना पन्ना का ओरडले?

बाबांनी मान हलवून दोन्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचे मान्य केले. एमराला अतिशय आनंद झाला. तिला वाटले, ही माहिती मिळाली तर ती आपल्या पाहुण्यांची मदत करू शकेल. अनेक महिने गेले तरी ते आले नाहीत, तेव्हा एमरा थोडी निराश झाली. मग तिने ठरवले की, ती ही माहिती लिहून ठेवेल. त्यामुळे ती माहिती सुरक्षित राहील. कधी त्यांचा पत्ता मिळाला तर ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. एमराने डायरीच्या शेवटच्या पानावर खुलासा केला होता की, ती हे सगळं का करत आहे. तिला फिन्जान आणि पेरिनाबद्दल आपलेपणा का वाटू लागला.

एमराने लिहिले होते, बाबांनी तिच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक चमत्कारिक अट ठेवली होती. बाबा म्हणाले होते की, तिने चामड्याच्या हंटरने बाबांना मारावे आणि तोपर्यंत मारत राहावे, जोपर्यंत ते रक्तबंबाळ होत नाहीत. जर ती तसे करू शकली नाही तर तिला तिच्या प्रश्नांची खरी उत्तरं मिळणार नाहीत. तिने विनंती केली होती की, हंंटर मारण्यासाठी आश्रमाच्या इतर कर्मचार्‍याला सांगावे. पण बाबांनी मान्य केले नाही. एमराला बाबांचे म्हणणे मान्य करावे लागले. तिच्या डोळ्यात अश्रू आले, जेव्हा तिने शंभर वर्षे वय असलेल्या जर्जर, कृशकाय, संत स्वभावाच्या बाबांवर हंटर चालवला.

थोड्याच वेळात बाबांच्या शरीरातून रक्त वाहू लागले. एमराला भीती वाटत होती की आज तिच्या हातून हत्या न होवो! पण ती गेली अनेक वर्षे आश्रमात होती. बाबांचे अनेक चमत्कार तिने पाहिले होते. म्हणून बाबांचे म्हणणे मान्य केले होते.

बाबांनी तोंड उघडले, पण एमराला वेगळा अनुभव देऊन.

एमरा हे पाहून आश्चर्यचकीत झाली की, सगळ्या शरीरातून रक्त वाहून गेल्यावर बाबा तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बसले. तेव्हा त्यांचा चेहरा विलक्षण तेजाने चमकत होता. शरीरावर जखमा नव्हत्या. रक्त नव्हते. एमराच्या जीवात जीव आला. ती मनापासून लक्ष देऊन ऐकू लागली. बाबा म्हणाले, “हवेत भटकणारा एक आत्मा- त्याने फिन्जानला आपल्या ताब्यात घेतले होते. लहान माशाचे रूप घेऊन तो फिन्जानच्या आसपास राहत होता.”

एमराने विचारले, “हा आत्मा कोणाला काही नुकसान पोहोचवू शकत होता का? मुळात हा आत्मा काय होता? हा व्हायरल इन्फेक्शनसारखा शरीराला लागतो का? याचा संबंध एखाद्या भौतिक घटना-दुर्घटनांशी आहे का? त्याचा पुन्हा जन्म घेण्याचा प्रयत्न होता का? असा प्रयत्न कोणी करू शकतो का?”

बाबा मोठ्याने हसले. ते म्हणाले, “हे जीवन फार लहान आहे. त्यात एवढे जाणून घेण्याची गरज नाही. जेव्हा जीवन सुरू होते, तेव्हा त्याला त्याच्या मागच्या जीवनाबद्दल काही आठवत नाही, आणि त्याचे पुढे काय होणार आहे हेही माहीत नसते. पण जसे एका पात्रातून दुसर्‍या पात्रात टाकताना पाण्याचे काही थेंब धरतीवर पडतात तसेच जीवन असणे, नसणे या क्रमात कधी एखादा जीव जीवन चालवणार्‍यांच्या हातातून पडून अदृष्य होतो. अगदी एखाद्या पात्रातून तडफडून उडणार्‍या माश्यासारखा.”

“बरं बाबा आता सांगा, फिन्जानला पाहून तुम्ही पन्ना पन्ना का ओरडला होतात?”

“हा जो प्राण फिन्जानला चिकटून माझ्यासमोर आला होता, तो यापूर्वी माझ्यासमोर आला होता. म्हणून मी त्याला ओखळले.” एमरा आश्चर्यचकीत झाली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. ती घामाघूम झाली. बाबाने सांगितले, हा आत्मा जवळ जवळ चारशे वर्षांपासून भटकत आहे. मध्ये काही दिवस तो मानव योनीत होता, तरी शांत झाला नाही आणि पुन्हा भटकू लागला. माणूस दयेला पात्र आहे. त्याला माहीत नाही की ज्याला तो आपली सामूहिक ओळख समजतो त्याचा जीवनचक्रात काय परिणाम होतो. माणूस याचा विचारसुद्धा करू शकत नाही. माणसाजवळ असा काही पुरावा नाही की तो आपल्या उत्पत्तीचे कारण व प्रक्रिया समजू शकेल. तरीही तो आपल्या परिदृष्याला अंतिम समजून त्याच्या बाबतीत आयुष्यभर भ्रमात राहतो. अनेक वर्षांपूर्वी एका स्त्रीच्या रूपात जन्म घेऊन हा आत्मा एका महालात दासीच्या रूपाने जगत होता. याचे नाव पन्ना होते.

एके दिवशी राजकीय उलथापालथीत पराजीत झालेला एक शासक एका मुलाचा वध करायला तलवार घेऊन त्या महालात आला. तिथे ही स्त्री सेविका म्हणून तैनात होती. राज्याचा भावी राजा वयाने लहान असल्याने या सेविकेच्या देखरेखीत होता. पिशाच्च वृत्तीच्या त्या पराजित राजाने भावी राजाचा वध करायचे ठरवले. त्याच्यावर सैतानाचा प्रभाव होता. या दासीच्या मनात राजाबद्दल स्वामीभक्तीची भावना होती. राज्याबद्दल आपल्या कर्तव्याच्या जाणिवेने तिने ‘न भूतो न भविष्यती’ निर्णय घेतला. तिने एका बांबूच्या टोपलीत राजपुत्राला लपवून महालातील कर्मचार्‍यांच्या संरक्षणात महालाबाहेर पाठवले. त्याच्या ठिकाणी आपल्या मुलाला ठेवले. परिणाम असा झाला की ते निर्दोष बाळ मारले गेले. ही घटना ऐकवून बाबा रडू लागले. जणू हा अपराध त्यांच्यामुळे झाला असावा. एमराला पण वाईट वाटले.

त्यानंतर ही आई स्वत:ला समजावू शकली नाही की, तिनं हे काय केले? जगातील सर्वात बलवान आणि पवित्र नाते या दृष्टांताच्या गुंतागुंतीत भटकत आहे. जेव्हा एखादी हरिणी आपल्या पाडसाला सिंहाच्या पंज्यातून सोडवण्याचे स्वप्न बघते, तेव्हा हा दृष्टांत साफ वातावरणाला गढूळ करतो. जेव्हा एखादी चिमणी आपली अंडी वाचवण्यासाठी सापाशी झुंज देण्यासाठी निघते, तेव्हा हा दृष्टांत तिचे मनोबल कमी करतो.

बाबांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिल्यावरसुद्धा एमराचे आश्चर्य कायम होते. बाबांनी हे सांगून चकीत केले की, तो आत्मा अजून शांत झाला नाही. त्याहून मोठा धक्का बसला की, याच आत्म्याने काही वर्षांपूर्वी फिन्जानच्या आईच्या रूपाने जन्म घेतला होता. हे सगळं ऐकून ती बेशुद्ध पडली. थोड्या वेळाने आश्रमाच्या जवळपास बाहेर राहणारी कुत्री एका स्वरात रडू लागली. तो आवाज ऐकून आश्रमाचे मुख्य संताजी बाबांच्या खोलीकडे धावले. आश्रमाची सगळी व्यवस्था थोड्या वेळासाठी गडबडली. कोलमडून पडणार्‍या बाबांनी आश्रमाच्या सेवकांना सांगितले की तुम्ही आत्ता येथून जा. हा आश्रम आत्ता राहणार नाही. तेवढ्यात संतजी तिथे पोहोचले. त्यांनी बाबांचे बोलणे ऐकले. आयुष्यात पहिल्यांदा मी स्त्रीशी बोलून आपला नियम तोडला. त्यामुळे माझ्या सिद्धी माझी साथ सोडून गेल्या. आता मला परत गेले पाहिजे.” बाबांनी शांतपणे डोळे मिटले आणि धराशाही झाले. त्यांनी प्राण सोडला.

एमरा कोमामध्ये गेली. अनेक दिवस बेशुद्ध होती. शुद्धीवर आली तोपर्यंत बाबांचे अंतिम संस्कार झाले होते. बाबा गेल्यावर तिला कळले की, बाबांनी तिला भेटण्याची काय किंमत मोजली.

असे कोणी नव्हते ज्याला एमरा सांगू शकेल की तिचे नाव एमरेल्ड होते, ते नंतर एमरा झाले. एमरेल्डचा अर्थ पन्ना होता. तिने जीवनात अनेक वेळा लग्न केले. अनेक वेळा मुलं झाली, पण तिच्या नशिबाने तिला पुन्हा पुन्हा एकटी केले. एके दिवशी सगळं सोडून ती साध्वी झाली.

***

एमराची डायरी वाचल्यावर पेरिनाला वाटले की एकदा एमराला भेटावे. पण आता इतक्या वर्षांनंतर आता तिला हेही माहीत नव्हते की एमरा जिवंत आहे की नाही. आणि असेल तर कुठे असेल?

पेरिनाला हे वाचून शहारे आले की बाबा मरताना सांगून गेले होते की, हा आश्रम आता राहणार नाही. तिने आश्रम आणि डायरीबद्दल फिन्जानला सांगितले, तेव्हा त्यालाही वाईट वाटले. आपण एकदा जाऊन बाबांना भेटायला हवे होते, असेही वाटले. पण आता वेळ निघून गेली होती.

एमराची डायरी वाचल्यावर पेरिनाला जाणवले की तिच्यात फार मोठा बदल झाला आहे. तिच्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर उठलं आणि त्याची तीव्रता हळूहळू वाढू लागली. तिचे जीवन बदलू लागले. आता ती आपला वेळ वाचनात घालवत होती. कोणती कोणती पुस्तकं वाचत होती कोण जाणे!

एक गोष्ट तिला सारखी खटकत होती की, एक सिद्ध पुरुष स्त्रीपासून आयुष्यभर लांब राहून सिद्ध कसा होऊ शकतो? तो ते क्षण विसरू शकतो, जेव्हा तो या जगात पदार्पण करतो. स्त्रीशिवाय या जगात येण्याचा इतर मार्ग आहे? स्त्रीच्या शरीरात जन्म घेऊन तिच्या वेदनांच्या आधारे या जगात येणारे तिची अवहेलना कशी करू शकतात? हे ढोंग नाही का? असा कोणता देव आहे जो कोणाला सिद्ध होण्यासाठी स्त्रीपासून लांब राहण्याची अट घालतो. जर एखाद्या देशात, समाजात असा देव असेल तर त्याच्याजवळ हे जग चालवण्यासाठी स्त्रीच्या भूमिकेपासून वाचण्याचा पर्याय आहे का?

डेलाला आश्चर्य वाटत होते की आईचा सगळा वेळ आता वाचनालयातच जातो. ती नियमित लायब्ररीत जात होती. बाजारातून पुस्तकं आणत होती. डेलाच्या दोन्ही मुली सना आणि सिल्हा आपल्या आजीमध्ये झालेला हा बदल गंभीरपणे घेत तेव्हा डेलालाही वाटायचे की आता तिच्या मुली आईजवळ राहिल्या तर त्यांच्या करिअरची काळजी राहणार नाही. ती थोडे दिवस इथे आई आणि मुलींबरोबर राहून पुन्हा चायनाला जात होती.

फिन्जानला वस्तू गोळा करण्याची हौस होती. ती हळूहळू व्यापारात बदलली. आणि आता शोध आणि अनुसंधानमध्ये बदल झाला. पेरिनाच्या नवीन हौसेने त्याच्या वस्तूंमध्ये जुन्या पुस्तकांचा समावेश केला. फिन्जान आणि पेरिना न जाणो कशाच्या शोधता असत. सना आणि सिल्वा आता या वृद्ध दाम्पत्याशी मैत्रीच्या नात्याने वागत होत्या.

फिन्जानचा व्यापार आता पेरिना बघू लागली होती. फिन्जान आता फारसा बाहेर जात नव्हता. पेरिनाचे फिरणे जास्त होत होते. तिला वाटत होते, ज्या देशात स्त्रियांच्या बाबतीत जुने विचार आहेत तिथे जाऊन काम करावे. ज्या देशात स्त्रीला समाप्त करण्याची वृत्ती आहे किंवा तिला जखडून मागासलेली ठेवण्याची वृत्ती आहे अशा देशातील लोकांना विचारावे की तुमच्याकडे काय पर्याय आहे? पण पेरिना कुठे जाऊ शकली नाही. तिचे विचार तिच्यापुरतेच होते.

विचार परिपक्व होऊ लागतात तेव्हा शरीर तरुण होऊ लागते. वय तेव्हा महत्त्वाचे नसते. डेलाने पेरिनाला पत्र लिहून कळवले की लवकरच एक मिशन सुरू होणार आहे. तेव्हा तिने आनंदाने उडी मारली. सना आणि सिल्वा सुद्धा खूश झाल्या. त्यांचे आई-वडील एका मिशनसाठी येथे येणार होते आणि बरेच दिवस अमेरिकेत रहाणार होते. फिन्जानच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे अश्रू त्याची मुलगी परत येणार म्हणून नव्हते, त्याच्या जीवनाच्या एका बंद पुस्तकाची पानं उलगडण्यासाठी फडफडत आहेत म्हणून होते.

ज्ञश्र