शाहिर... - 4 Subhash Mandale द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शाहिर... - 4

'शाहीर'!

क्रमशः..
भाग- चार

".. कव्वाच झालं न्हाय, की कुठल्या प्रयोगाला मी गेलो नाही. 'माणसाच्या अंगात कलेची गोडी भिनली, की त्याला जा म्हणून सांगावं लागत न्हाय, त्याची पावलं आपोआपच तिकडं वळत्याती. मग त्याला बांधून ठेवलं तरी सुध्दा.'

तुला सांगायचं म्हंजी, आमचा आर्वी ला कार्यक्रम होता आन् आम्ही कार्यक्रमासाठी बैलगाडी जुंपून इथनं दुपारचंच निघाल्यालो. बैलगाडीत पुढच्या बाजूला कलापथकाचं सगळं सामान बसवल्यालं आन् मागच्या बाजूला चार पाच जणांना बसता येईल इतकी जागा होती; त्यात आम्ही दाटीवाटीनं बसल्यालो. वर उन्हाचा नुसता रक हुता.

असल्या उन्हाच्या रकीत बाकीचे आळीपाळीनं रस्त्यानं चालत होते. जाताना वाटेत एक वढा (ओढा) लागला. वढ्यात थोडं पाणी होतं, ते पाणी बघून उन्हाच्या धगीनं घामाघूम झालेले बैलगाडीतले एक दोघं वढ्याच्या अलीकडच्या काठावर हातपाय धुवायला, तोडावर पाणी मारायला उतरले. काहीजणांनी खांद्यावरचं टावेल पाण्यात बुचकाळून काढलं आन् पिळून डोक्यावर घेतले, 'तेवढीच उन्हाची झळ कमी लागंल म्हणून.'

वढा वल्डून वढ्यातनं वर निघताना मोठा चढ हुता. आम्ही बैलगाडीत मागच्या बाजूला असल्यामुळं आम्हाला काय माहित, की पुढं चढाला एका बाजूनं घसरट हाय ते. बैलगाडी हाकणाऱ्यानं तशीच एका अंगानं बैलगाडी रेमाटली.
मग काय, उलाटली बैलगाडी!.
बैलगाडी उलाटल्यावर बैलगाडीतल्या सगळ्या सामानसकट आम्ही रस्त्यावर...

तुला सांगायचं म्हंजी, कुणी बघू नि (बघू नये) अशी आमची अवस्था झाली होती. आमचं सगळं कलापथकच रस्त्यावर इस्काटल्यालं.
बरंच्या बरं माझ्याशिवाय कुणाला जास्त लागलं न्हाय. एक दोघांना थोडं खर्चाटून मुक्का मार लागल्याला, पण माझ्या गुडघ्याला निबार मार बसल्याला.
पण काय न्हाय, कापडाचं चिरगुटं गुडघ्याला बांधलं आन् तसंच लंगडत लंगडत वढ्यातनं वर गेलो.
बाकीच्यांनी माझ्या गुडघ्याला लागल्याली जखम, त्यातनं निघायला लागल्यालं रगात बघितलं आन् हाबकून गेले. सगळ्यांच्या पुढं एकच प्रश्न, 'आता काय करायचं...?'
कार्यक्रम करायचा तर ठरलाय, त्यामुळं कायबी करून गेलं पाहिजे, पण आसं इतकं गुडघ्याला लागल्यालं असताना सुदीक ह्यास्नी म्हणजे मला पुढे कसं न्यायचं.. आन् कार्यक्रमासाठी घेऊन गेलं तर अशा अवस्थेत यांना स्टेजवर उभा राहता येणार हाय का ?.. त्यापेक्षा यांना माघारी पाठवूया, घरी गेले तर दवापाणी तरी करता येईल, असा सगळ्यांचा विचार...

" शाहीर, तुम्ही आसं करा. तुमच्या गुडघ्याला लय लागलंय, तुम्ही माघारी फिरा, आम्ही जसा जमेल तसा ह्यो आर्वीचा कार्यक्रम करू, हाय त्या कलाकारांमध्ये पार पाडू." , अशा सगळ्यांनी मिंनत्या (विनंती) करून बघितल्या, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो,
'पाय मोडून पडला, तरी चालंल, पण कार्यक्रमासाठी जाणारच, माघारी फिरणार नाय.'
आसं ठरवून मी बैलगाडीत बसलो आन् सगळ्यांच्या संगं पुढचा प्रवास चालू ठेवला. वाटेत निरगुडीच्या झाडाची एक फांदी मोडून घेतली; चालायचं म्हंटलं तर त्या काठीच्या आधाराने चालता येईल. तेवढाच आधार...

तर असं करत आम्हीं एकदासं आर्वीत पोहोचलो, त्या टायमाला नुसताच दिस मावळला होता. आमच्या कलापथकाच्या कलाकारांच्या थांबण्याची व्यवस्था मराठी शाळंच्या वरांड्यात केलेली. गेल्या गेल्या त्या गावातल्या मंडळींनी किटली भरून चहा आणला. एक कळशी भरून पाणी, त्यासंगं पाणी प्यायला तांब्या हे आम्ही तिथं पोहोचायच्या आधीच आणून ठेवल्यालं. चहा पाणी झालं आन् मराठी शाळंच्या वरांड्याला लागून पुढंच स्टेज होतं, तिथं पडदा बांधायचं, लायटिंगची व्यवस्था करायची, अशी किरकोळ किरकोळ काम उरकून घ्यायला सुरुवात केल्याली, पण मी आपला शाळंत मास्तरला बसायला लोखंडी खुर्ची होती, त्या खुर्चीवर तसाच बसून राहिल्यालो.
आधीच चार पाच तासांचा प्रवास करून गेल्यालो, त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून गुडघ्याचं दुखणं वाढल्यालं. गुडघ्याला लागलं, त्या टायमाला रगात गेलं आन् कापाड बांधल्यावर काय टायमानं रगात थांबलं, पण लागल्यावर जी कळ आली होती, ती त्या टायमाला कशी तरी सोसली, पण सांजच्या टायमाला पाय टम्म सुजल्याला. दुखण्याची कळ वाढतच होती. उठून चालता येईना ना मांडी घालून बसता येईना, अशी अवस्था झालेली, त्यामुळं कळ सोसून तसाच खुर्चीवर बसून राहिलो होतो.

गावात कलापथक आलंय म्हंटल्यावर आम्हाला बघायला लोकांची वर्दळ सुरू झाली. सांजच्याला दिस मावळल्या पासून कडूस पडेपर्यंत लोकं आम्हाला बघायला येत होती. आमच्यातल्या सगळ्यांना बघून, भेटून, विचारपूस केल्यानंतर लोकं विचारायची, 'तुमच्यात शाहीर कोण हाय ?' मग आमच्यातले माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे, 'तेऽऽ बघा. लोखंडी खुर्चीवर पाय वाकडा करुन बसलेले हायत, ते शाहीरच हायत.'

लोकं माझी अवस्था बघून जायची आन् गावात जाऊन सांगायची. पुन्हा तीच लोकं बाकीच्या चार सहा जणांना घेऊन माझ्याकडं यायची. असं करत करत लोकांची वर्दळ 'नेमके, शाहीर कोण आहेत ?' हे बघायला यायला लागली. लोकं राहुन राहुन वरचेवर येऊन विचारायची, 'शाहीर कोण आहेत...!, शाहीर कोण आहेत...!'

'आता झाली का पंचाईत!' पाय सुजलेला कुणाला समजू नि, म्हणून मी आत्तापर्यंत जे दडवत होतो, ते लोकं उ उघडं करून बघत होते. 'आत्ता रं काय करायचं..!' पण काय न्हाय, एकदा का ह्यो कार्यक्रम झाला, म्हणजे गुडघ्याचं काय व्हायचं हाय, ते होऊदे... बघूया गुडघ्याच्या दुखण्याची कळ माझ्यावर वरचढ ठरतेय, की माझा कवणं म्हणायला आवाज वरचढ ठरतोय, अशी मनाला आट्टण लावली आन् रात्री कार्यक्रमाला स्टेजवर कवण म्हणायला उभा राहिलो.

आन् कवण म्हणायला सुरुवात केली... ..थांब.. हं.."

इतकं बोलून शाहिर नानांनी तीन ते चार सेकंदाचा वेळ घेतला आणि अक्षरशः तो क्षण स्मृती पटलावर उमटवून माझ्यासमोर कवण म्हणायला सुरुवातही केली.

ऐक,
" होता शेतकरी सारा सुखी त्यावेळा,
नव्हता आळस ठावं कोणाला.
आनंदानं राबती शेताला,
पावसाची चिंता नव्हती आम्हाला.
जर पावसानं घोटाळा केला,
अन् आव्हान देऊन त्या वरुणाला,
दंड ठोकून उभे शेताला,
एका दिवसात खणून विहिरीला,
पाजीन मग पाणी साऱ्या शिवाराला.
चढे मग जोर जितराबाला,
हिरवंगार...

धान्याच्या ना ना जाती,
सांगू मी किती,
झळके शिवार..
सांगतो ऐका जात धान्याची,
तऱ्हा लय न्यारी हरबऱ्याची,
ऊस अन् मका काळ्या उडदाची,
पांढऱ्या तुर मुग मटकीची,
चाखावी बहार शेंगदाण्यातली.
सुबत्ता सारी भाजीपाल्याची,
साऱ्या मुलखाला...
नाही आळस ठावं कोणाला न्
सारी राबती आनंदानं शेताला..."

ह्या कवणाच्या सादरीकरणाने क्षणभर का होईना, पण त्यांनी मला हिरव्यागार शिवाराची सफर घडवून आणली, त्यासोबत माझ्या मनावरची मरगळही झटकून टाकली..

शाहिरनानांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. त्यांचा उत्साह पाहून माझ्या मनाला अजूनच मोहर फुटला. मला जणू चटकच लागली, मी मग अजून एखादं गीत ऐकायला मिळतंय का ते पहात होतो, तितक्यात त्यांनीच दुसरं एक कवण म्हणायला सुरुवात केली,

" गडे दुनियेची दौलत सारी,
बघ पिकलीया माझ्या शिवारी. ||धृ||
रातदिवस राबून कसली,
आली भरात अन् मुसमुसली,
आज आनंदानं बघ हसली,
वर आकाश उधळीत लाली,
खाली सोनेरी ही शेत सारी. ||१||
आला रंगात शाळू हा माझा,
फुलं उधळीतो काऱ्याळा तुझा,
साऱ्या धान्याचा शाळू हा राजा,
आरं ऊस वाऱ्यावरं.!
ऊस वाऱ्यावर डोलतो भारी,
समदा दख्खन दणाणू ललकारी.||२||
या रे हातात गोफण घेऊ,
रान राखाया एकीने जाऊ,
जीवापरीस आमची प्यारी,
धरणी कसील त्याची सारी.||३||

शाहिर नानांनी गायलेलं हे काव्य ऐकून माझ्या तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडले, "व्वाह्..! मस्तच..! जबरदस्त..!"

(या दोन्ही कवणांच्या व्हिडिओची लिंक शेवटी दिली आहे.🙏)

"तुला सांगायचं म्हणजे, बळीराजाचं कवण झालं, तसं लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, लोकांच्या मुखी ते शब्द रेंगाळू लागले. तेव्हा सगळ्या लोकांना समजलं, की शाहीर म्हणजे नेमकं कोण आहेत अन् काय आहेत..."

तीस वर्षांपूर्वी म्हंटलेलं गीत आठवायला आणि त्या गीताची मनातल्या मनात उजळणी करायला त्यांनी अवघ्या तीन ते चार सेकंदाचाच वेळ घेतला. यावरूनच त्यांच्या कलेची एकरुपता तुमच्या लक्षात येईल.

मघाशी या घटनेला अनुसरून मला एक प्रश्न पडला होता, पण ते जे सांगत होते, तो काळ त्यांच्या नजरेसमोरून हटवून, त्यांचा उत्साह मला कमी करायचा नव्हता आणि तसंही त्या घटनेतील सलगता भंग करायला माझं मन धजवत नव्हतं, इतकं मी त्या घटनेशी समरस होऊन ऐकत होतो.

तो प्रश्न मी आत्ता विचारला, " नाना,.....

क्रमशः....

१.
https://youtube.com/shorts/3H1veo3EoKs?feature=share

२.
https://youtube.com/shorts/3H1veo3EoKs?feature=share

©_सुभाष आनंदा मंडले
(9923124251)