दिलदार कजरी - 24 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 24

२४.

नदी किनारी भेट कजरीशी

कजरी आज उठली ती खुशीतच. स्वतःशीच खुदकन हसत. दिलदार दिलवर बनून तिच्या दिलावर राज्य करत होताच. सकाळ नि दुपार त्याला भेटण्याची वाट पाहण्यात, संध्याकाळी त्याच्याशी बोलण्यात नि रात्र ते सारे आठवून त्यात रमण्यात जायची. पण रात्री दिलदार चक्क स्वप्नातच आला. खिडकीतून आला म्हणे! झाडावरून खिडकीतून? पण खरोखरच आला असता तर?

चंबळनदीच्या किनारी तो मोठा खडक त्यांच्या प्रेमकथेचा साक्षीदार होता. त्याच्या पायथ्याशी ती जाऊन बसली. नदीचा हा भाग निर्जन होता आणि तिथे खडकावर बसून दिवसेंदिवस स्वप्ने पाहणे हाच तिचा छंद होता. आज तिथे जाऊन ती बसली, दिलदारची वाट पाहात. काल तो हरिनामपुरात गेलेला, गुरूजी काय म्हणाले असतील?

दिलदार त्याच्या सायकलीवर पोहोचला..

तो येताच ती मान फिरवून बसली. न बोलता.

"मी आलोय.. राणी."

तिचा एक शब्दाचा हुंकार ही नसावा..

"काय झाले? रागावलीस?"

"नाही. बोलू नकोस माझ्याशी.."

"अगं, काल उशीर झाला तिकडे. नाही येऊ शकलो..

"दिलदार आता आलास तू? पण काल का नाही आलास? रागावलेय मी.."

"अगं तुला ठाऊक आहे ना.. मी काल हरिनामपुरात गेलेलो.. उशीर झाला."

"मी तरीही रागावलेय."

"बरं.. आता नाही ..

"आणि मग लाडीगोडी लावायला उगाच स्वप्नात आलास. खरोखरीचा नाही आलास म्हणून रागावलेय मी. मी आता तुझ्याशी बोलणारच नाहीये."

"स्वप्नात आलेलो मी?'

"होय, मध्यरात्री. खिडकीतून म्हणे. मग गेलास उडी टाकून! खरंच आला असतास तर?"

"म्हणजे? तुला ते स्वप्नच वाटले की काय? मी खरोखरच आलेलो. खिडकीतून. मी बोललो काहीतरी, तू फक्त हुं हुं करत होतीस.."

"अय्या, तुला कसं काय ठाऊक?"

"कसं म्हणजे? मी खरोखरीच आलेलो. खिडकीतून."

"चल. खोटारडा."

"मी? खोटारडा?"

"अर्थात .."

"तू आज उठलीस तेव्हा तुझ्या उशीच्या बाजूला एक आंबा होता?"

"हो. तुला काय ठाऊक?

"मला काय ठाऊक? मीच ठेवलेला. आंब्याच्या झाडावरून थेट प्रियेच्या जवळ. गोड मुलीसाठी गोड आंबा. त्या झाडावरच पिकलेला."

"अय्या! खरंच! म्हणजे तू रात्री येऊन गेलास?"

"हुं.. राहवले नाही म्हणून. काल भेटली नव्हतीस तू. राहवले नाही. रात्री तुझ्या घराखाली आलो."

"घाबरला नाहीस तू?"

"मी? मला लोक घाबरतात.. पाहिले तर खिडकी उघडी होती. आलो चढून."

"कुणी पाहिले असते तर?"

"तर? तेच घाबरले असते.. डाकूंचा डाका पडला की काय म्हणून!"

"मग.. तू घातला तो डाकाच होता. दिलदार डाकूने माझ्या दिलावर घातलेला डाका.. डाकिया बनून. डांबीस आहेस तू.. एक नंबरचा!"

"आता पुढे ऐक.. आज आमच्या टोळीतील सगळे जण जमलेले.. सरदार संतोकसिंग खूप दिवसांनी परत आले.."

"मग?"

"ऐक तर. काल आम्ही गेलेलो तर गुरूजींच्या घरी सरदार आणि इतर मंत्री होते.. आणि आज सरदार बोलत होते.. गुरूजी इतके मोठे कुणी आहेत काय? मंत्रीलोक त्यांच्या घरी येतात ते?"

"हरिनाथ गुरूजी? त्यांचा सगळेच आदर करतात. गुरूजींसारखा दुसरा कोणी नाही गावात. तसे ते राजकारण्यांपासून दूर असतात, पण ते राजकारणीच त्यांच्या मागे येतात. त्या गावात गुरूजींना मान आहे. ते म्हणतील तसेच होते तिथे.."

"म्हणजे निवडणुका आल्यात म्हणून ..?"

"असणार! पण गुरूजी असे सहज मानणार नाहीत. गावासाठी काहीना काही ते मिळवतील. मला वाटतेय, हेच असणार .. संतोकसिंग टोळीची शरणागती. याशिवाय दुसरी चांगली वेळ कुठली मिळणार..? त्याच सगळ्यांचेच भले आहे."

"अगदी बरोबर बोललीस. आज सरदार तेच सांगत होते. आपली टोळी शरण येणार. शस्त्रे टाकणार. सरकारशी वाटाघाटी सुरू आहेत म्हणाले. सगळ्या टोळीतील डाकूंना कुठेतरी शेतीसाठी जमीन मिळेल. आजवर मेहनत केली ती आता वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. ऐकून सगळ्या टोळीकरांची तोंडे सताड उघडी पडलेली. समशेर सोडून. कारण आम्हाला गावात तसा अंदाज आलेला. इतक्या लवकर गुरूजींनी हे घडवून आणले.. पण सरदार इतक्या सहज मानतील असे नव्हते वाटले. गुरूजींची कमाल आहे."

"कमाल तर खरीच. एकदा मात्र गुरूजींना भेटून ये. म्हणजे जास्त कळेल काय ते. पण गुरूजी व्यवस्थित विचार करून सारे करतात. पाहिलेस ना.."

"होय. म्हणजे त्यांच्या अपहरणातून त्यांनी एक डाकूंची टोळी संपवू घातलीय. त्यात माझी ही प्रेमकथा, तू. म्हणजे बघ.. त्यांनी टोळीतील कच्चा दुवा हेरला आणि .."

"म्हणजे मी कच्चा दुवा?"

"नाही गं राणी.. तू पक्का दुवा. त्या झाडावर पिकलेल्या आंब्यासारखा. पक्का!"

"पक्काच आहे.. शहाणा.. पण राजकारण यालाच म्हणतात का रे? पण यात सगळ्यांचाच फायदा आहे."

"माझा पण! नाहीतर तू कशी भेटली असतीस? पण अजून पुढे काय होणार नि कसे? मला काहीतरी काम शिकावे लागेल.."

"सगळे ठीक होईल राजा. आजवर इतके काही घडले त्याची अपेक्षा केली होती कुणी? अगदी टोळीच्या शरणागतीपर्यंत.. एकवेळ मी तुझ्याबरोबर पळून आले असते.. म्हणजे आपले जमले असते समज.. पण ही टोळी संपवणे.. एकही गोळी न चालवता. म्हणजे असे होऊ शकते.. तर काहीही होऊ शकते! होय की नाही?"

"होय की! गुरूजीच यातून मार्ग दाखवतील.."

"बरं, आज येणार आहेस तू?"

"कुठे?"

"कुठे काय? स्वप्नात! खिडकीतून?"

"येऊ?"

"मी हो ही नाही म्हणू शकत नि नाही ही! मला तू हवा आहेस.. पण असा खिडकीतून नाही."

"मग?"

"दरवाजातून आलेला. राजरोस.."

"पण पुजारीबुवा मानतील? तुझी मावशी?"

"तुला मी आताच म्हटले ना, काहीही होऊ शकते.. काहीही! म्हणजे कदाचित ते मानू ही शकतात.."

"खरंच की.. म्हणजे बघ.. मी आलो घरी तुझ्या .. पुजारीबुवांना म्हणालो.. मला तुमच्या मुलीचा हात हवाय.. तिचे माझ्यावर प्रेम आहे.."

"आणि तुझे?"

"माझे? विचार करावा लागेल.."

"मारेन तुला मी.."

"बापरे! मग ते विचारतील.. काय करतोस कामधाम नि पोटापाण्याचा उद्योग .. तिथे गाडी अडायची.. पण कामधाम तर करतो काहीतरी. आता टोळी शरण आली की लवकरच दुसरा मार्ग उघडेल.. पण.."

"पण काय?"

"पण माझ्या डाकूंच्या टोळीतील सारे.. माझा बाप नामचीन खूंखार डाकू.. पूर्वजही डाकूंच्या व्यवसायात! असल्या कुटुंबात.. असल्या बापापोटी आलेला दिलदार. दिलाने कसाही नि कितीही उदार असला तरी.."

"तू चिंता नको करूस.. काही ना काही चांगलेच होईल.."

"हुं.. चांगले. चांगलेच. जशी तू मला भेटलीस.."

समशेर आणि दिलदार परत हरिनाथ मास्तरांना भेटायला हरिनामपुरात पोहोचले. मास्तर तिथे नव्हते. शहरात गेलेत म्हणे. लागोपाठ दुसऱ्यांदा दोघे तसेच परतले. येता येता समशेरला गुरुदासपुरच्या गीताची आठवण आली..

"चल यार, गुरुदासपुरावरून जाऊया.."

वेळेचा हिशेब केला तर तिकडून परतताना संध्याकाळची कजरी भेट होणार नाही.. दिलदार विचारात पडला. नाही म्हणावे कसे? समशेरने आजवर त्याला इतकी मदत केलेली. एका गुरूदासपुरी न जाण्याने तो अप्पलपोट्या ठरणार.. आणि संध्याकाळी न जावे तर कजरीचा तो नाकाच्या शेंड्यावर गिर्यारोहण करत टुणकन वर चढून बसण्यास जणू तयारच असावा असा राग.

"गीता काय करत असेल रे आता?"

"मला कसे ठाऊक असणार?"

"दिलदार, आता आपली टोळी शरण गेली की.. काहीतरी शक्यता आहे गीताच्या घरी जाऊन तिला पटवण्याची.."

"खरेय.. पण तुला सांगू एक.."

"काय?"

"आता असा नकोस जाऊ.. म्हणजे मला अनुभव आहे म्हणून सांगतो..फिल्डिंग कशी विचार करून लावावी लागते."

"म्हणजे?"

"म्हणजे नदीत चांगला धुवून पुसून साफ हो. हे धुळीने भरलेले कपडे बदल.. नि मग जा. समज तुला ती भेटली नि तू अशा अवतारात .. मग काय?"

"खरे म्हणतोस?"

"खरे? अगदी खरे. अनुभवाने सांगतोय ना.. तुझा तो रेशमी कुर्ता घालून जा.."

"असं म्हणतोस .. मग चल.. पण एक सांगतो.. तुझ्या कजरीच्या गावावरूनही नको जाऊयात.."

"का?"

"तुझे कपडे पण मळलेले आहेत ना म्हणून .."

"आता काय फरक पडणारे?"

"ससुर ससुरा देखेगा तो? दिल्ली बहुत दूर है अब भी भाई.."

"असं म्हणतोस .. ठीक आहे."

समशेर हे सांगताना हळूच हसत होता.. पण दिलदारचे लक्ष कुठे असायला तिकडे? तो आपल्याच धुंदीत होता.