दिलदार कजरी - 25 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 25

२५.

शरणागतांची शरणागती

सकाळी सकाळी टीव्हीच्या आजूबाजूला सगळे टोळीकर जमून ऐकत होते. मोठया आवाजात बातम्या ऐकू येत होत्या. दिलदार उठून त्या ऐकू लागला. हरिनाथ मास्तरांच्या घरी पाहिलेला पांढऱ्या शुभ्र कपड्यातील नेता मुलाखत देत होता. मोठया खुशीत आणि स्वतःवर खुश होत तो तावातावाने बोलत होता,

"आमच्या सरकारच्या प्रयत्णाने या ठिकाणी आम्ही चंबळच्या एका मोठ्या डाकूनच्या टोळीला शरन येन्यास भाग पाडले आहे. आमच्या मानणीय आनि आदर्नीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपले राज्य दहशत मुक्त करण्याचा वसा आम्ही या ठिकाणी घेतला होता. त्या अणुषंगाने आमच्या मानणीय आनि आदर्नीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शणाखाली आनि आमच्या अथक प्रयत्णांना यश येऊन चंबळमधील एक मोठी टोळी आपली शस्त्रे टाकून शरन येणार आहे. भयमुक्त राज्य या आमच्या घोषनेच्या अंमलबजावनी अंतर्गत केलेली ही अत्यंत महत्त्वाची आणि भविष्यकालावर या ठिकाणी छाप सोडेल अशी घटणा आहे. डाकू आणि दरोडेखोर या ठिकाणी शेवटी मानसेच असतात हे ध्याणात घेऊण त्यांच्याशी वाटाघाटी करून सन्माण्य तोडगा काढन्यात आम्हाला यश आले आहे. चंबळच्या खोऱ्यातील समशेर डाकूनची टोळी गांधीजयंतीच्या दिवशी शरन येनार आहे. त्यामुळे या विभागातील डाकूनच्या दहशतीला या ठिकाणी आळा बसूण आजूबाजूच्या गावांणा दिलासा मिळनार आहे. या सर्व डाकू आणि दरोडेखोरानचे योग्य पुनर्वसण करण्यात येनार असून त्यांना या ठिकाणी उपजीविकेसाठी शेतजमीण शासनाकडून देन्यात येईल. पुढील पिढ्या या ठिकाणी या दरोडेखोरीत लोटल्या न जान्यासाठी शिक्षन हाच एक उपाय आहे, तेव्हा त्यांच्या लहाण मुलांना जिल्हा शाळेतून या ठिकाणी प्रवेश देऊन शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की ही चंबळच्या खोऱ्यातील एक महत्त्वाची आणि मोठी टोळी होती जिचा म्होरक्या समशेरसिंग आपल्या टोळीतील सर्व दरोडेखोरानसह या ठिकाणी शरन येईल. या संबंधात मानणीय मुख्यमंत्र्यांसह रामगढ येथील एक स्थानिक रहिवासी आनि पुढारी श्री.संतोकसिंग यांणी जातीणे पुढाकार घेतला असूण राज्य त्यांचे ऋनी राहिल हे आम्ही या ठिकाणी आवर्जूण सांगू इच्छितो."

समशेरसिंग हा टोळीचा म्होरक्या? आणि संतोकसिंग स्थानिक रहिवासी? सारे टोळीकर डाकू अचंब्यात पडले.. एक समशेरसिंग सोडून.

"शांत रहा. सरदारांनी तुम्हाला सारे सांगितले आहेच. आपल्याला नवीन आयुष्य सुरू करायचे आहे. सरदार निवडणूक लढवणार आहेत. तेव्हा त्यांच्या नावाने टोळी असणे म्हणजे निवडणूक हरण्याची खात्री. तेव्हा टोळीस माझे नाव देण्यात आले आहे. यावर माझ्यामते खरा हक्क दिलदारसिंग याचा होता. सरदार संतोकसिंग यांची इच्छा तशी नव्हती आणि स्वतः दिलदारसिंग यास राजी झाला नसता. आणि आता आपली टोळी विसर्जित होत असताना तिचा म्होरक्या कोण हा प्रश्न गैरलागू आहे.. सर्व टोळीबांधवांनी आपल्या पुढील आयुष्याबद्दल विचार करणे गरजेचे आहे. आपल्याला सन्मानाची वागणूक मिळेल पण आपणही तसेच वागणे गरजेचे आहे. तेव्हा आजवरचे दांडगाईचे आयुष्य संपले असून आपल्याला कष्टाची कमाई करून जगावयाचे आहे. मंत्री म्हणाले तशी जमीन काहींना तर काहींना छोटी दुकाने काढून मिळतील असे सरदारांनी स्वतः सांगितले आहे. दिवसेंदिवस टोळी चालवणे कठीण होत असून आपली पुढची पिढी यातच अडकून राहिली तर प्रगती आपल्या आयुष्यात जवळपासही फिरकणार नाही. हे समजून आपल्याला पुढील विचार करावयाचा आहे. काही दिवसांतच आपण शस्त्रे टाकून नवीन जन्मास सुरूवात करू. आजवर धाकदपटशाने मिळायचे तर आता आपल्या मेहनतीने सारे मिळवायचे आहे. पण त्यातच सन्मान आणि प्रतिष्ठा आहे."

टोळीतील डाकूमध्ये कुजबूज होऊ लागली, बघता बघता ती वाढली नि गोंगाट नि गोंधळ झाला. आजवर ज्या बंदुकीच्या नळ्यांनी राज्य कमावले नि गाजवले त्या सोडून आता पाणी भरण्याच्या नळ्या वापराव्या लागतील! असे सामान्य जीवन जगावे? वाघ कधी शेळीसारखे जगेल? ज्या हातांस रक्ताची चटक लागली, ते हात आता गवत हाती घेतील? ज्या विळ्याच्या पात्यांनी माना नि गळे चिरले, त्यांनी आता शेतातील पिके कापावी? आजवर संतोकसिंगच्या टोळीत लहानाचे मोठे झालेले कित्येक जण, संतोकसिंगने हिंसेचे नि दहशतीचे बाळकडू पाजले ते पचवून. त्या सर्व गोष्टी एकाएकी सोडणे कठीण. अशा आयुष्यात असणारी सारी गंमत एकदा शस्त्रे टाकली की निघून जाणार. भवति न भवति झाली. सारे डाकू गोंधळलेले आधीच संतोकसिंगच्या आधीच्या भाषणानंतर, कदाचित ते सारे स्वप्न असेल नि उगाच काहीतरी सरदार सांगत असतील म्हणून फार मनावर न घेतलेले, आता समशेरच्या बोलण्यानंतर परिस्थितीची जाणीव होत सगळे भानावर आले, आलेल्या परिस्थितीला आता तोंड कसे द्यावे? दूर दिवाणसिंगच्या टोळीत सामील व्हावे? की स्वतःची एक टोळी बनवावी? संतोकसिंग कडक होता जरूर पण टोळीकरांना कधी काही कमी पडू दिले नव्हते. दिवाणसिंग तसा माथेफिरू होता. कधी कोणाला गोळी घालेल सांगता येत नव्हते. त्याव्यतिरिक्त अजून काही टोळ्या होत्या. छोट्या, म्हणजे वाटमारी करतात म्हणावे अशा. डाकूंच्या सगळ्या सदस्यांच्या मध्ये गंभीर चर्चा झडू लागल्या. संतोकसिंगने असा निर्णय टोळीतील सगळ्यांना न विचारता नि न विश्वासात घेता घ्यावा याबद्दल सारेच थोड्या घुश्श्यात होते. असा धुमसता असंतोष टोळीत काही दिवस पसरला.. समशेरला त्याचा अंदाज होताच, पण एके दिवशी टोळीतील कित्येक बंड करून उठतील इथवर मात्र नव्हता.

बंडाची भाषा टोळीसाठी नवीन होती. सगळेच बंदूकधारी नि सगळेच मनाने निबर आणि क्रूरतेचे वावडे नसलेले. दिलदारसिंग आजवर डाक्या दरोड्यांत नव्हता तरी सारे त्याकडे संतोकसिंगमुळे दुर्लक्ष करत आलेले नि त्याच बरोबर आता समशेरसिंगही आता शरणागतीची भाषा करतोय..

समाजात बदल घडवणे.. समाजातील सर्वांवर ज्याचा परिणाम होईल असा कुठलाही निर्णय घेण्याआधी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे. भले ही हा निर्णय सर्वांच्या भल्याचा असो, धुरिणांनी त्याची अंमलबजावणी करताना संवेदनाशीलता दाखवावी लागते. वरून लादलेला निर्णय असंतोषाला कारण ठरतो. समाजातील वाईट रूढी जशा नुसत्याच कायद्याच्या बडग्याने सुधारता येत नाहीत, तसेच हे. मानसिकता बदलणे हा मार्ग मोठा आणि खडतर, पण निश्चित बदल घडवणारा. त्यासाठी मेहनत करावी लागते. सत्ता धुरिणांना त्यासाठी तितका संयम असावा लागतो नि धोरणीपणाही. पण स्वतःच्या प्रेमात असणारे नि स्वत:च्या सर्वशक्तिमानतेची घमेंड असणारे इथे हमखास चुकतात. तसा संतोकसिंग चुकला. चुकलाच. आता संतोकसिंगची आजवरची सारी पुण्याई धुवून निघेल.. समशेरसिंग आणि दिलदारसिंग यांना संपविण्यास लागणाऱ्या गोळ्या फक्त दोन.. आणि गरज पडली तर संतोकसिंगासाठी तिसरी.. डाकूंच्या टोळीत रात्र रात्र गंभीर खलबते होऊ लागली. आजवर टोळी पोलिसांपासून सुरक्षित होती, ती संतोकसिंगाच्या दहशतीनेच की पोलिसांशी असलेल्या लागेबांध्यांनी? समशेरच्या पाठोपाठ गुलजारसिंग टोळीतील तसा सिनियर म्हणावा असा डाकू. त्याला टोळीच्या मुखियागिरीची स्वप्ने पडू लागली. सत्तास्थान, मग ते कितीही छोट्या राज्याचे का असेना, मोह कुणाला सुटलाय? टोळीच्या शरणागतीतून हे चांगले काही निष्पन्न होईल.. गुलजारसिंगच्या मनातील हिशेब सुरू झाला. गुलजार नि त्याची पळवून आणलेली गुलाबोराणी.. दोघे सत्ता सिंहासनावर बसतील. टोळीतील सर्व धोरणे गुलजारसिंग ठरवेल. आणि बाकी सारे फक्त अंमलबजावणी करतील.. मनात मांडे खाणे गुलजारसिंगचे सुरू होते. अजून काही दिवस शरणागतीसाठी बाकी होते. त्याआधीच समशेरसिंग नि दिलदारसिंग दोघांचा खेळ संपवावा नि रातोरात टोळीचे स्थलांतर घडवून आणावे..

गुलजारसिंगाची नि त्याच्या टोळीबांधवांची विचारांची गाडी इकडे अडली. एकतर नवीन जागा शोधणे आले, नाहीतर संतोकसिंगच्या हाती टोळीचा अंत ठरलेला.. सारा टापू संतोकसिंगला तळहातावरील रेघांसारखा ओळखीचा, त्याच्यापासून दूर जाऊन कुठे नव्याने पालं वसवणे.. नाही म्हणायला एका ठिकाणी वसतीला राहून काही वर्षात एक प्रकारे सुखासीनता आलेली. ती सारी सोडून नव्याने संघर्ष करणे, तो ही संतोकसिंगाशी.. एका गोळीत एकेक जण टिपता येईलही पण पोलिस माग सोडणार नाहीतच, संतोकसिंगने तर पोलिस नि राजकारण्यांशीच नवा घरोबाच जमवलेला.. तरीही काहीतरी करायलाच हवे. आजवर कधी गुलजारसिंगची टोळी असेल असा विचार नव्हता आला. आता गुलजारसिंगच्या मनात तोच विचार घर करून राहिला.

पण ही गुलजारसिंगची सारी सोनेरी स्वप्ने एके दिवशी सकाळी एका क्षणात भंगली. एकेका गोळीत दिलदार, समशेर आणि संतोकसिंग यांचा खात्मा करण्याची दिवास्वप्ने भंगली ती पहाटे पहाटे संतोकसिंग येऊन समोर उभा ठाकल्यावर. संतोकसिंगचा दराराच तसा होता. शाळेतील व्रात्य पोरे हेडमास्तरांना पाहून एकाएकी शांत होतात तसे काहीसे गुलजारसिंगचे झाले. सारे टोळीकर बाजूला जमले. संतोकसिंग काय सांगणार ते ऐकण्याची उत्सुकता तर होतीच पण आजवरची टोळीतील खदखदीची खलबतं सरदार संतोकसिंगच्या कानी गेली असतील तर.. याची भीतीही..

"सरदार आपण? आता?" गुलजारचे बोलणे उघडपणे भ्यायल्यासारखे होते..

"गुलजार, तू दचकला आहेस की घाबरला आहेस?"

"तसं नाही सरदार.."

"तसं की कसं.. सांगू नकोस. इतके ध्यानात ठेवा.. हा सरदार संतोकसिंग एका रात्रीत सरदार नाही झाला. मला दूरवर राहून इकडची बित्तंबातमी समजते.. जास्त मी काही सांगणार नाही. थोडावेळ मी आज इथे आहे. ज्या कोणाला टोळी सोडून जायचे आहे त्यांनी मी असेतोवर ताबडतोब निघून जावे. त्यांना कोणी हटकणार नाही की मारणार नाही. इथून बाहेर पडल्यावर त्याने स्वतःचा बचाव स्वतःच करावयाचा आहे. जंगलातून बाहेर पडताच पोलिस मागे लागले म्हणून परताल तर तो रस्ता बंद आहे. आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. तेव्हा विचार करून निर्णय घ्या. गुलजार सिंग.."

"जी सरदार.."

"तू मोठा.. तू आणि तुझे साथीदार जमा कर.. निघण्याची तयारी कर.."

"नाही सरदार. आम्ही तुमचे मीठ खाल्ले आहे.."

"मीठ की साखर.. हवे ते खा. जायचे असेल तर आता बाहेर पडा. यानंतर थोडीही कुजबूज कानी आली तर गाठ सरदार संतोकसिंगशी आहे हे विसरू नका.."

संतोकसिंगच्या दिलेल्या दमानंतर टोळीतील खलबतं बंद झाली. सध्याच्या घडीला शस्त्रे खाली टाकण्यावाचून पर्याय नाही याची जाणीव सर्वांना झाली. बंडखोरी करून जीव गमावण्यापेक्षा सरदार संतोकसिंगचे ऐकून जे मिळेल तर पदरी पाडून घेण महत्त्वाचे इतके ध्यानी आले..

समशेर आणि दिलदारचा रस्ता आता अधिकच सुकर झाला.. कधी एकदा कजरीला हे सारे सांगतो असे दिलदारला झाले.. तर समशेरला गुरूदासपुरी गीता उघड्या डोळ्यांतील स्वप्नात दिसायला लागली!