दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-९) Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-९)

दॅट्स ऑल युअर ऑनर
(प्रकरण नऊ)


वकिलांसाठी राखून ठेवलेल्या खोलीत पाणिनी पटवर्धन, आकृती समोर बसला होता.

“ तू मला जे जे घडलंय ते सर्व च्या सर्व सांगितलं आहेस?” त्याने विचारले.

“ एकूण एक गोष्ट सांगून झाल्ये माझी.” आकृती म्हणाली.

“ ते तुझ्यावर आरोप पत्र ठेवताहेत. त्यांच्याकडे काहीतरी छुपा पुरावा आहे जो मला माहीत नाहीये.”

“ त्यांच्याकडे काय पुरावा आहे मला माहीत नाहीये पण मला एकाच माहीत आहे की मी त्याला मारले नाही. माझ्याकडे सुरा असता तर मी त्याला नक्की मारला असता.” उद्वेगाने आकृती म्हणाली.

‘’ अं हं असल काही उच्चारू सुध्दा नकोस ! तू पोलिसांना सर्व काही सांगितलस?”

“ हो. मी खरे म्हणजे सांगणार नव्हते, म्हणजे सांगायला नको होते पण तारकर इतका चांगला वागला माझ्याशी, वडीलधाऱ्या सारखा.तो म्हणाला की मला फक्त खुलासा दे.काही काळजी करू नकोस. ”

“ मला माहिती आहे.पोलिसांच्या चातुर्याचा तो एक भाग आहे. तुझ्या कडूनच माहिती काढायची, आणि त्याचा तुझ्या विरुद्धच वापर करून तुझ्यावर आरोप ठेवायचा.” पाणिनी म्हणाला.

“ मी उगाचच सगळ.....” ती खुलासा करायला लागली

“आता नको त्याचा विचार करू. येत्या काही दिवसात आपल्याला कोर्टात जावे लागेल. प्राथमिक सुनावणी म्हणतात त्याला. त्याचा हेतू हा असतो की तुझ्यावर आरोप ठेवण्यासाठी पोलिसांकडे सबळ कारण आहे का ते पाहणे. पण आपल्याला तिथे प्रश्न विचारायला संधी असते आणि आपले साक्षीदार आणायला पण संधी असते. त्यातून आपल्याला आपल्या विरुध्द लावलेला दावा किती सबळ आहे याचा अंदाज येतो. तू त्याच्या गाडीतून पळून गेल्यावर तपन पुन्हा त्याच्या खोलीत आला असावा आणि लगेचच त्याने आमलेटआणि मांस खाल्ले असावे. ”

“ लगेचच का? म्हणजे कशावरून? ” तिने शंका म्हणून विचारले.

“कारण थंड अंडी आणि मांस रुचकर लागते. तुला खात्री आहे की तिथे दोन प्लेट्स होत्या? ” पाणिनी ने विचारले.

“ हो खात्री आहे .कारण मीच त्या प्लेट्स मधे अंडी आणि मांस वाढले होते.”

“ म्हणजे मग त्याचा अर्थ असा आहे की त्या दुसऱ्या प्लेट मधील अंडी आणि बिस्किटे, खायला तिथे दुसरे कोणीतरी होते.” पाणिनी ने अंदाज केला. “ आणि तो दुसरा माणूस तिथे ,तू निघून गेल्यावर लगेचच आला असला पाहिजे ,म्हणजे काही मिनिटाच्या आतच.” पाणिनी म्हणाला.

“ आकृती, नीट आठव, तू त्याच्या गाडीने पळून गेलीस तेव्हा वाटेत तुला किती गाड्या दिसल्या?”

“ एकही नाही. म्हणजे कच्चा रस्ता सोडून हायवेला लाडे पर्यंत एकही गाडी नव्हती वाटेत.” आकृती आठवत म्हणाली.

पाणिनी च्या कपाळावर आठ्या पसरल्या. “ तू म्हणालीस की त्याला तो शेवटचा फोन आला तेव्हा त्या नंतर त्याच्या वागण्यात फार मोठा बदल झाला म्हणून? म्हणजे आधी त्याने संपूर्ण संध्याकाळ छान मूड मधे घालवली आणि त्या फोन नंतर तो एकदम आक्रमक झाला ? ”

“ हो बरोबर. तसेच जाणवले मला. त्या फोन मधील संवादानंतरच त्याच्यात अचानक फरक पडला.” ती म्हणाली.

“ त्याला त्याच्या प्लान मधे अचानक बदल करावासा वाटला, किंबहुदा, त्याने जे काही करायचे ठरवले होते ते सावकाश ,आरामात करण्या ऐवजी त्याला घाई घाईने उरकावेसे वाटले. म्हणजेच कोणीतरी येणार असावे.” पाणिनी ने अंदाज केला.

“ आकृती त्याच्या संवादावरून कोण येणार होते काही अंदाज? ”

तिने मानेनेच नकार दिला. “ मला बोलणे ऐकू येत होते पण वाक्ये समजत नव्हती. कारण त्याने फोन उचलून दुसऱ्या खोलीत नेऊन लावला. त्यातून एक तर तो जास्त बोलतच नव्हता, पलीकडच्या माणसाचे ऐकत होता.”

“ त्याने फोन उचलून दुसऱ्या खोलीत नेला याचा अर्थ त्यांच्यातील बोलणे तुला कळू नये हाच होता. फोन उचलल्यावर हे आठवते का की तो प्रथम काय बोलला? असे काही बोलला का जेणे करून तो कोणाशी बोलत होता याचा सुगावा लागेल? ”

“ नाही. कोणाचीच नावे त्याने घेतली नाहीत बोलताना.”

“ तो एखाद्या स्त्री बरोबर बोलत होता की पुरुषाशी हे तरी समजत होते का फोन वरील बोलण्या वरून? ” पाणिनी ने तिला खोदून विचारले.

“ नाही. ते पण कळायला मार्ग नव्हता. तो पलीकडच्या व्यक्तीशी सतत सहमती दर्शवत होता. म्हणजे त्यांच्यात मतभेद आहेत असे संवादावरून वाटत नव्हते तरी पण तो सारखी सहमती देत होता,कशाला तरी. ” ती म्हणाली.

“ तुला कशावरून वाटतय तसं ? ”

“ तो सारखे ऑल राईट ,ऑल राईट असे म्हणत होता. मधेच तो ओके असे म्हणाला.” आकृती म्हणाली.

पाणिनी पटवर्धन एकदम उठून उभा राहिला. “ नीट आठवून सांग तो ओके या शब्दाच्या अनुषंगाने काय म्हणाला नेमके पणाने.”

“ आधी तो हॅलो म्हणाला, नंतर म्हणाला हाय. म्हणजे एखाद्या जवळच्या माणसाचा फोन आल्यावर कसे संवाद होतील तसे तो बोलला. नंतर एका ठिकाणी त्याने ऑल राईट ओके असे दोन्ही शब्द वापरले. मला ते जरा ऐकायला विचित्रच वाटले. ”

“ म्हणजे कदाचित ओके हे त्या माणसाचे टोपण नाव असावे, पलीकडून बोलत असणाऱ्याचे.” पाणिनी एकदम उत्तेजित होऊन म्हणाला.

“तसेच असेल , म्हणून त्याने ऑल राईट आणि ओके असे दोन्ही शब्द वापरले असतील. ” आकृती म्हणाली.

“ आता यातले कोणालाही काहीही सांगायचे नाही.,ओठ शिवल्या सारखे गप्प बसायचे. पोलिसांना तू या आधी सर्व सांगितलेच आहेस. आता हे ओके प्रकरण बिलकुल बोलायचे नाही. कोणालाच.” पाणिनी ने सूचना दिली.

“ मी खर म्हणजे जास्तीत जास्त आठवायचा प्रयत्न करायला हवा होता परंतू दुसऱ्याच्या बोलण्यात तोंड न खुपसण्याचे आणि त्यांचे बोलणे भोचक पणे न ऐकायचे संस्कार माझ्यावर झालेत.”

“ त्याची काळजी आता सोडून दे. इथून पुढे काळजी करायचे काम मी करीन. तू आता निवांत रहा. पुन्हा तुला भेटायची संधी मला मिळणार नाही त्यामुळे आपली भेट आता कोर्टातच होईल.” पाणिनी ने तिला आश्वासित केले.

तिथून पाणिनी थेट त्याच्या ऑफिस मधेच आला.

“ काय नवीन विशेष ? ” सौम्या ने विचारले.

“ खूप काही नवीन घडलंय. आपल्याला ओनिक केपसे. ला शोधावेच लागेल. कनक कडून काही समजलंय? ”

“ नाही अजून काही समजले नाही.” सौम्या म्हणाली. तेवढ्यात ओजस ची विशिष्ठ पद्धतीची थाप दारावर पडली आणि सौम्या ने दार उघडल्यावर तो आत आला.

ओजस ची ती दार वाजवायची एक खास पद्धत होती.ती फक्त पाणिनी आणि सौम्या ला माहित होती. त्या विशिष्ट प्रकाराने दार वाजले म्हणजे ओजस आला हे दोघांना समजत असे. पाणिनी च्या केबिन मध्ये कोणी बसले असेल आणि त्यावेळी ओजस ने आत येणे श्रेयस्कर असेल तरच सौम्या दार उघडून त्याला आत घेत असे. जर सौम्या ने दार उघडले नाही तर ओजस आत येत नसे.

“ कनक, तुला महत्वाचे सांगायचंय. काउंटर फाईल वर जे ओके असे लिहिलंय, त्याचा अर्थ आपल्याला वाटतो त्या पेक्षा जास्त महत्वाचा ठरणार आहे. त्याचा अर्थ ठीक असा नसून माणसाची आद्याक्षरे असू शकतात. आता एक चेक ओनिक केपसे. च्या नावाने आहे आणि.........” पाणिनी चे बोलणे मधेच तोडत ओजस म्हणाला, “ या माणसा बद्दल माझ्याकडे तुला देण्यालायक मोठी उपयुक्त माहिती आहे. हा माणूस रेस च्या घोड्यावर सट्टा लावणारा म्हणजे बुकी आहे. उच्चभ्रू लोकांचा बुकी आहे. तपन ने त्याला भरपूर धंदा दिला असेल यात मला शंकाच नाही. ”

“ तुझी ही माहिती बऱ्याच गोष्टींचा खुलासा करणारी आहे.” पाणिनी म्हणाला.

“ थांबा जरा ” आपली वही उघडत सौम्या म्हणाली. “ आपल्याकडे आणखी एक ओके आहे. त्या आउट हाऊस च्या बाहेरच्या परिसराची ,बागेची देखभाल करणारा ओमकार केसवड ”

“ माय गॉड ! मला क्षणभर विसरायलाच झालं होत त्याचं नाव ” पाणिनी म्हणाला.

“ त्याच्या बद्दल सविस्तर अहवाल अत्ता नाही माझ्याकडे पण एवढे समजले आहे की तो तुरुंगातून तात्पुरता सुटलेला कैदी आहे.” ओजस ने माहिती दिली.

“ ऐकावे ते नवलच. ! कोणत्या गुन्ह्यासाठी आत होता तो कनक? ”

“ ब्लॅकमेल ”

पाणिनी सौम्या ला उद्देशून म्हणाला, “ आपण त्या चेक बुक चे जे फोटो काढले होते ,ते स्टुडिओत दे आणि त्याच्या प्रति काढून घे .”

“ सर् मी आधीच ती व्यवस्था केली आहे. एवढेच नाही तर चेक वरचे ओके हे शब्द तपनच्याच अक्षरातले आहेत का याची पडताळणी करण्या साठी हस्ताक्षर तज्ज्ञांबरोबर भेट ही ठरवली आहे. ”

“ वा ! सौम्या . मस्तच काम केलेस. मी सांगण्यापूर्वीच माझ्या मनातले ओळखून विषय मार्गी लावलास. मला तुला काय वाटतय की ते अक्षर तपन चे असेल? ”

“ तुलना करण्यासाठी आपल्याला तपन ने लिहिलेला आणखी एक ओके हा शब्द मिळाला तर आपल्याला चांगली संधी आहे अन्यथा नाही.”

“ आपण द्रौपदी ने बिलावर लिहिलेल्या ओके शब्दाचा नमुना दाखवू शकतो. म्हणजे आपल्याला कळेल की चेक्स च्या काउंटर फाईल वर लिहिलेले ओके हे तपन चे अक्षर आहे की द्रौपदी मंडलिक चे आहे.पण ते चेक बुक तपन चे असेल तर त्यावरचे अक्षर त्याचेच असण्याची शक्यता जास्त आहे. कनक, ते चेक बुक ज्या बँकेचे आहे,त्या बँकेच्या कॅशियर ला गाठ. मला हवं की हे पाच हजार रक्कम लिहिलेले चेक वटवायला बँकेत कोण येत होते. ”

“ ते रोख रक्कम देणार नाहीत का ? ” ओजस ने विचारले.

“ तपन च्या खुनाच्या आदल्या दिवशी जर तो चेक बँकेत आला असेल तर आणि तरच बँक पैसे देईल नाहीतर नाही. ” पाणिनी म्हणाला.” अर्थात दुसऱ्या दिवशी सकाळी लौकर जर तो चेक बँकेत सदर झाला असेल आणि तपन मेल्याचे बँकेला समजले नसेल तर बँकेने त्याची रोख रक्कम दिली असू शकते” पाणिनी म्हणाला. “ तपन मेल्यावर जर चेक घेऊन कोणी बँकेत आले असेल आणि बँकेने तपन मेला या कारणास्तव चेक चे पैसे देणे नाकारले असेल तर कॅशियर ला तो प्रसंग आणि चेक घेऊन येणारी व्यक्ती लक्षात राहिली असेल. तेव्हा त्या दृष्टीने मला माहिती दे. अजून एक, जर का बँकेने त्यांना तपन गेल्याचे माहित नव्हते म्हणून चेक चे पेमेंट केले असेल तर तो चेक बँकेच्याच रेकोर्ड वर असेल, त्यावरील अक्षर बघून आपल्याला ओके या शब्दाचा आणखी एक नमुना मिळेल, जो आपण हस्ताक्षर तज्ज्ञा ना दाखवू शकू. ”

“ आता मला कळाले पाणिनी की आपल्या बुद्धीत किती फरक आहे. ! मी लगेच कामाला लागतो. ”

“ ही माहिती आपल्याला मिळे पर्यंत कोर्टात जाऊन साक्षीदारांना काय काय माहित आहे काय नाही हे तपासायला आपल्याला संधी आहे.” पाणिनी म्हणाला.

“ तुला वाटतय पाणिनी , की सरकारी वकील अॅड.खांडेकर त्यांच्या कडले एखादे गुपित उघड करतील? काहीतरी हातचे ते राखून ठेवतीलच तुला धक्का द्यायला.” ओजस म्हणाला.

“ माझ्याशी सरकारी वकील अॅड.खांडेकर त्या दिवशी ज्या पद्धतीने बोलले त्यावरून मला त्यांच्यात खूप आत्मविश्वास जाणवला. त्यांच्या कडे नक्कीच असा काहीतरी पुरावा आहे की जो मला माहित नाहीये अजून.” पाणिनी म्हणाला.

“ मला विचारशील तर आकृती च्या दृष्टीने सर्वात सुरक्षित काय असेल तर तिने कबूल करावे की तपन ने तिला फसवून त्या आउट हाऊस ला नेले , तिच्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला आणि शेवटी स्व संरक्षण करताना तिने त्याला भोसकले.” ओजस म्हणाला.

“ तसे असेल तर तो पाठीमागून कसा भोसकला जाईल? ” पाणिनी ने मुद्दा मांडला.

“ त्यात अडचण अशी आहे की तिने आधीच पोलिसांना सर्व सांगितलंय. ” पाणिनी म्हणाला.

“ ती आपली जबानी बदलू शकते की कोर्टात ! ” ओजस म्हणाला.

“ कोर्टात ती जे काही सांगेल ते उपयुक्त नसेल तर सत्य असेल. माझा विश्वास आहे की सत्य हे केवळ ताकदवान शस्त्र असते असे नाही तर ते एकमेव शस्त्र असते.” पाणिनी म्हणाला.

“ तू तुझ्या पद्धतीने चालव खटला पण तिने जर पुरावा म्हणून गाडीतून तपन ने काढलेला एक स्पेअर पार्ट सदर केला ना तर तिच्या म्हणण्याला बळकटी येई आणि तिला सर्वांची सहानुभूती पण मिळेल.” ओजस म्हणाला.

“ काळजी करू नको, आपण तो स्पेअर पार्ट पुरावा म्हणून वापरणार आहोतच. महत्वाचा मुद्दा हा आहे की तिने पोलिसांना दिलेल्या जबाबा नुसार, प्लेट मध्ये वाढलेले आम्लेट आणि मांस हे आकृती आणि तपन दोघानीही खाल्ले नव्हते पण प्रेताची तपासणी करणारे डॉक्टर म्हणतात की अंडी आणि मांस खाल्यावर काही मिनिटातच तपन चा मृत्यू झालाय.” पाणिनी म्हणाला.

“ याचा च अर्थ आकृती तिथून गेल्या नंतर कोणीतरी तिथे लगेचच आलं होतं. .त्या दोघांनी ,म्हणजे तपन आणि त्या पाहुण्याने ते खाणे संपवले. आणि त्या नंतर लगेचच तपन गेला. ”

“ रहस्य गडद झालंय ! ” सौम्या म्हणाली.

( प्रकरण नऊ समाप्त.)