दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण १२) Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण १२)

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण १२

“ फेर तपासणी मधे काही विचारायचे आहे ? ” न्यायाधीशांनी दैविक दयाळ कडे बघून विचारले.

“ नाही विचारायचे काही.माझा पुढचा साक्षीदार आहे ओमकार केसवड ” दैविक दयाळ म्हणाला.

ओमकार केसवड हा चाळीशीच्या घरातील , एक तरतरीत आणि सावध असा वाटणारा रुंद खांदे असणारा माणूस होता,त्याने शप्पथ घेतल्यावर दैविक ने त्याचा ताबा घेतला.त्याने साक्षीत सांगितले की ज्या जागेत खून झाला त्या पासून दोन किलोमीटर अंतरावर एका भाड्याच्या घरात तो राहतो.तो माळीकाम, आणि इतर झाडलोटीची कामे करत असे.एका जुनाट आणि पुरातन अशा गाडीतून तो ये जा करत असे.त्याला विशिष्ट अशी कामाची वेळ दिली गेली नव्हती पण कधी कधी तो बारा बारा तास सुद्धा काम करत असे. किंवा एखाद्या दिवशी एकच तास काम करून जात असे. वेळे पेक्षा काम संपवणे हे महत्वाचे होते .त्याने पुढे साक्ष दिली की सहा तारखेला दुपारी एक वाजल्या नंतर थोड्या वेळातच तो त्या आउट हाऊस ला आला होता.बाहेर चे गेट बंद होते .त्याने त्याच्या जवळच्या किल्लीने ते उघडले आत आल्यावर पुन्हा गेट ला कुलूप लावले, कारण तशीच पद्धत होती आणि तशाच सूचना त्याला होत्या.

त्याने आत आल्यावर झाडांना पाणी देणे, झादांच्या फांद्या कापणे , अशी कामे करायला सुरुवात केली.त्याला घराच्या बाजुला असलेल्या दाराला फट दिसली.तो दार बंद करायला गेला तेव्हा फटीतून त्याला जमिनीवर एका माणसाचा पाय दिसला.काय भानगड आहे बघायला तो दार उघडून आत गेला तेव्हा त्याला तपन जमिनीवर पडलेला दिसला.त्याने कोणत्याही वस्तूला हात न लागण्याची दक्षता घेतली.दार लाऊन तो बाहेर आला.मोठे गेट उघडून गाडी बाहेर काढली, पुन्हा गेट ला कुलूप लावले.आणि द्रौपदी मंडलिक कडे जाऊन सर्व हकीगत सांगितली.तिने नंतर पोलिसांना सर्व काही सांगितले.

“ घ्या उलट तपासणी.” दैविक म्हणाला.

“ तपन चा खून होण्यापूर्वी तू किती वर्षे नोकरी करतो आहेस?” पाणिनी ने सुरवात केली.

“ साधारण दोन वर्षे ”

“ कंपनीचे हे जे आऊट हाऊस आहे त्याचा वापर करणाऱ्या लोकांना तू ओळखतोस का? मला म्हणायचयं विशेषतः कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांपैकी.” पाणिनी ने विचारले.

“ हो ओळखतो सर्वाना.”

“ नमन लुल्ला ला ? ”

“ हो ओळखतो ”

“ ते तुला ओळखतात ? ”

“ अर्थातच ”

“ तपन ला ओळखतोस? ”

“ आम्ही दोघेही एकमेकांना अगदी चांगले ओळखतो.”

“ नमन जेव्हा तुला काही कामासाठी हाक मारायचे तेव्हा तुला काय म्हणायचे?”

“ ओमकार ”

“ आणि तपन काय नावाने हाक मारायचा? ”

“ ओमकार

“ तपन ने तुला कधी तुझ्या नावाच्या आद्याक्षरावरून ‘ ओके ‘ अशी हाक नाही मारली? ”

साक्षीदार थोडा अस्वस्थ होऊन चुळबुळला. पण पुन्हा क्षणभरात सावरून म्हणाला, “ मला नाही आठवत त्याने कधी ओके म्हणून हाक मारल्याचे. मला ओमकार च म्हणायचा.”

“ पाच तारखेच्या रात्री तू कुठे होतास?”

“ घरीच होतो मी .”
“ तुमच्या बरोबर कोणी होतं? की एकटेच होतात? ”

“ माझ्या घराच्या मालकीण बाई सप्रे यांच्या बरोबर मी होतो. त्या पासष्ट वर्षांच्या विधवा बाई आहेत.त्या आणि मी एकत्रच टी.व्ही. बघत होतो.”

“ काय वेळ होती तेव्हा? ”

“ संध्याकाळी सात ते रात्री साडे दहा पर्यंत. आम्ही जो कार्यक्रम बघत होतो तो बरोब्बर साडे दहाला संपतो त्यामुळे वेळ लक्षात आहे. नंतर मी झोपायला गेलो.”

“ सकाळी किती वाजता उठलास? ”

“ साडे सात ला. ”

“ साडे सात ? पण कामावर तर दुपारी एक वाजे पर्यंत गेला नाहीस ”

“ मी तो पर्यंत सप्रे बाईंच्या च्या घरची कामे केली.मी त्यांना भाडे देत नाही, त्या बदल्यात त्यांची कामे करतो. ”

“ तुला त्या आऊट हाऊस च्या देखभाल करण्याच्या कामाचा पगार मिळतो का दरमहा? ” पाणिनी ने विचारले .

“ नाही सर्, मला तासावर पैसे मिळतात. मी कोणत्या कामाला किती वेळ दिला ते नोंदून ठेवतो आणि त्या नुसार मला पैसे देण्यात येतात.”

“ तुझ्या वर नियंत्रण कोण ठेवतो? म्हणजे तुझ्या नोंदी वर विश्वास ठेऊन पैसे दिले जातात की त्या कोणी तपासते? ”

“ माझ्या कामाच्या वेळेच्या स्लिपा मी द्रौपदी मंडलिक कडे देतो.ती ते तपासते आणि त्यावर ओके असे लिहून टेबलावर ठेवते. मग कंपनीचा कोणीतरी माणूस येतो त्या स्लिपा घेऊन जातो ,नंतर मला चेक पाठवला जातो. ”

“ सहा तारखेला तू जेव्हा तिकडे गेलास तेव्हा बाहेरचे गेट कुलूप लावलेल्या अवस्थेत होते याची तुला खात्री आहे?”

“ पक्की खात्री आहे. ”

“ त्या परिसरात काहीतरी खटकण्याजोगे घडलंय असे तुला जाणवले का? ”

“ फक्त घरात प्रवेश करायचे दार किलकिले उघडे होते. तेवढेच वेगळे जाणवले.”

“ या खेरीज काहीही नाही? ”

“ काहीही नाही.”

“दॅट्स ऑल युवर ऑनर.” पाणिनी म्हणाला. “ माझी उलट तपासणी संपली.”

ओमकार केसवड आनंदाने पिंजऱ्या बाहेर आला.त्याच्या अंदाजापेक्षा त्याची उलट तपासणी फारच सोपी सहज झाली होती.

“ माझा पुढचा साक्षीदार आहे,प्रभाकर लघाटे .माझी अशी अपेक्षा आहे की याची साक्ष अगदी पटकन संपावी.”

“ मला पण तसेच अपेक्षित आहे. कारण ही प्राथमिक सुनावणी आहे आणि तरी सुध्दा सकाळचे पूर्ण सत्र यातच संपून गेलंय.मला वाटत होतं की दुपारच्या सत्रात मी नवीन खटला सुरु करू शकेन.आता असं दिसतंय की जेवणाच्या सुट्टी नंतरचा दुपारचा वेळ सुध्दा हाच खटला पुढे चालवावा लागणार.” न्यायाधीश म्हणाले.

दैविक दयाळ म्हणाला, “ पटवर्धन ने जर, प्रभाकर च्या साक्षी मधून मी जे सिध्द करू इच्छितो त्याला आधीच संमती दिली तर ती पूर्ण साक्षच रद्द करता येईल आणि आपला वेळ वाचेल.”

“ प्रभाकर कोण आहे आणि त्याच्या साक्षी मधून तुही काय सिध्द करू इच्छिता ? ”

“ तो पोलीस आहे खुनाच्या रात्री म्हणजे पाच तारखे पर्यंत .रात्री बारा वाजे पर्यंत तो कामावर हजर होता.तो साक्ष देईल की तपन ची गाडी अग्नी रोधाकासमोर लावलेली त्याला आढळली; त्या बद्दल चे दंड आकारला गेल्याचे समन्स त्याने काढले. गाडी वरही त्याची प्रत चिकटवली.तो हे सांगेल की हिर्लेकर ने वर्णन केलेल्या ठिकाणीच ही गाडी लावलेली होती ”

“ फक्त एकच समन्स काढले गेले ? ” पाणिनी ने विचारले.

“ या पोलिसाने हे एकच काढले.”

“ त्या गाडीचे पुढे काय झाले? ” पाणिनी ने विचारणा केली.

“ रात्री बारा नंतर जो नवीन पोलीस कामावर रुजू झाला त्याने पुन्हा नव्याने समन्स काढले. शेवटी रात्री तीन वाजता ती गाडी उचलून नेण्यात आली.साधारण दोन किंवा तीन वेळा समन्स चिकटवले गेले की गाडी उचलून नेण्यात येते. ” दैविक दयाळ ने उत्तर दिले.

“ मी असे समजतो की तुम्ही या बद्दल स्वतः संबंधित पोलिसांशी बोलला आहात. आणि तुम्ही जे अत्ता आम्हाला सांगितले तेच हा साक्षीदार सांगणार होता.”

“ हो. मी जे सांगितले तेच तो सांगणार होता.” दैविक म्हणाला.

“ या पोलिसाने चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्या बद्दल जे पाहिले समन्स गाडीवर चिकटवले ते किती वाजता?”

“ रात्री नऊ च्या सुमाराला.” दैविक दयाळ उत्तरला.

“ तशीच वस्तुस्थिती असल्याची तुम्हाला खात्री आहे? ”

“ हो. मी तसा शब्द देतो.” दैविक म्हणाला.

“ तर मग जे तुम्ही सांगितले ती प्रभाकर लघाटे ची च साक्ष आहे हे मी मान्य करतो.” पाणिनी म्हणाला.

“ तुम्ह हे पण मान्य करता का की रात्री बारा नंतर रुजू झालेल्या पोलिसांनी गाडीवर दोन वेळा समन्स चिकटवले आणि रात्री तीन च्या सुमाराला गाडी उचलून नेण्यात आली. ? ”

“ तुम्हाला हे संबंधित पोलिसांकडून कळले का, त्यांच्याशी तुम्ही बोलल्या नंतर? आणि ते पोलीस तशीच साक्ष देणार आहेत याची तुम्ही हमी देता का ? ” पाणिनीने विचारणा केली.

“ मी हमी देतो.”

“ तर मग उलट तपासणीचे अधिकार अबाधित ठेऊन मी मान्यता देतो.” पाणिनी म्हणाला.

“ तुमच्या बाजूने खटल्याचे साक्षी पुरावे संपलेत का? ” न्यायाधीशांनी दैविक ला विचारले.

घड्याळाकडे नजर टाकत दैविक म्हणाला, “ नाही अजून. मला अजून एक साक्षीदार आणायचा आहे समोर.”

“ त्याची साक्ष सुध्दा लौकर संपेल का? ” न्यायाधीशांनी विचारले.

“ ते सांगता येणार नाही मला. माझी सर तपासणी लौकर संपेल पण उलट तपासणी किती वेळ चालेल हे सांगता यायचे नाही कारण तो साक्षीदार आहे इन्स्पे.तारकर.” दैविक म्हणाला.

“ त्याची साक्ष सुध्दा आधीच्या साक्षी सारखी स्वीकारता येणार नाही का? ”

“ मला नाही वाटत तसं. तो अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर साक्ष देणार आहे. मला आत्ताच्या घडीला माझा पुरावा उघड करायचा नाहीये पण तो अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि त्याचा धक्का बचाव पक्षाला बसायची शक्यता आहे.हा पुरावा खटल्याचा अंतीम शेवट ठरवणारा असणार आहे. ” दैविक दयाळ म्हणाला.

“ ही प्राथमिक सुनावणी आहे.सांगा तुम्ही काय सिध्द करू इच्छिता तारकरच्या साक्षीतून.? ”

“ आरोपीने त्याच्या समोर दिलेली कबुली तो सांगेल. एवढेच नाही तर परिस्थिती जन्य पुरावा काय आहे ते ही सांगेल.” दैविक म्हणाला.

“ एकंदरितच हा खटला मला वाटतोय तेवढा लौकर संपणार नाही अशी चिन्ह दिसताहेत.” न्यायाधीश नाईलाजाने म्हणाले. “ कोर्ट आता दुपारच्या सत्रात पुन्हा चालू होईल. आरोपी कारागृहातच राहील.”

“ तुमच्या मतानुसार कसा चाललाय हा खटला? ” आकृती सेनगुप्ता मधल्या सुट्टीत, पाणिनी ला विचारले.

“ मला वाटलं होत त्यापेक्षा खूपच चांगल चाललंय. तुला ओळखणाऱ्या त्या दोन साक्षीदारांचा एवढा गोंधळ उडालाय ही वरच्या कोर्टात हे प्रकरण जाईल तेव्हा ते दोघे वेगळ्याच गोष्टी ना हो म्हणतील. ”

“ याचा अर्थ असा की वरच्या कोर्टात हा खटला जाई पर्यंत माझी सुटका नाही?.” आकृती म्हणाली.

“ या खालच्या कोर्टात एखादा आरोपीची सुटका होईल असे आपण नाही अपेक्षित करू शकत.” पाणिनी म्हणाला.

“ काय दु:स्वप्न आहे हे पटवर्धन.एखाद्याला तुरुंगात रहावे लागणे म्हणजे.”

“ मला माफ कर आकृती पण या पेक्षा वेगळ्या प्रकारे मी नाही हाताळू शकत हे प्रकरण.याच कोर्टात तुला आरोपातून मुक्त करायचा प्रयत्न केला तर त्याची परिणीती उलटीच होण्याची भीती आहे. कारण त्यासाठी तुला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे करून तुझी हकीगत कोर्टाला सांगावी लागेल. तू खरे सांगते आहेस यावर न्यायाधीशांना विश्वास बसेल अशा प्रकारे तुला पटवावे लागेल. या खटल्यात जे न्यायाधीश आहेत त्यांच्यावर माझ्या या युक्तीचा परिणाम होणार नाही. ते नेहेमी असेच धोरण ठेवतात की आरोपीला गुन्ह्यात गुंतवण्याचे दृष्टीने पुरेसा पुरावा असेल तर निकाल देऊन टाकायचा .आरोपीने नंतर वरील कोर्टात आपली बाजू मांडवी,पुरावे द्यावेत स्वत:ला निर्दोष सिध्द करावे.ते काम वरच्या कोर्टाचे आहे.”

“ आणि या कोर्टाचे?” आकृती ने विचारले.

“ आरोपीला अडकवायचे, पटापट निकाली काढायचे खटले. मी सांगेन तसे करशील आकृती?” पाणिनी ने सांगितले.

“ करीन तुम्ही म्हणाल ते. तुम्हाला नमन लुल्ला ने खरेच सांगितले की मी खोटारडी आहे आणि माझा भूतकाळ पिंजून काढणार आहे तो म्हणून?”

आकृती ने विचारले.

“ हो म्हणाला मला तो तसं.पण आता आपण त्याचा फायदा करून घेवूया. मी वर्तमान पत्र वाल्याना सांगतो की याच गोष्टीची प्रसिद्धी करा की परिस्थितीत अडकलेल्या आणि श्रीमंत बापाच्या वाया गेलेल्या मुलाच्या वासनेची शिकार ठरलेल्या तरुणीला न्याय मिळण्या ऐवजी तो श्रीमंत बाप तिने न केलेल्या खुनात अडकवायला बघतोय. आणि तिचा भूतकाळ उकरून काढून चारित्र्य हनन करायचा त्याचा प्रयत्न आहे. याचा परिणाम असा होईल की पेपर वाचून जनसामान्य लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण होईल. न्यायाधीश पेपर वाचतील तेव्हा त्यांचेही तुझ्याबद्दल चे मत जरा बदलेल अशी शक्यता आहे. तेव्हा आता धीर धर.”

त्यांची मुलाखत झाली.आकृती ला पुन्हा आत नेण्यात आले. पाणिनी पुन्हा कोर्टाच्या मागील बाजूस गेला तेव्हा तिथे मैथिली, कनक ओजस आणि सौम्या गप्पा मारत होते.

“कसा चाललाय खटला? ” मैथिली ने विचारले.

“ माझ्या अपेक्षेनुसारच घडतंय. कर तर अपेक्षित केल्यापेक्षा बरं चाललंय.” पाणिनी म्हणाला. “ तो हिर्लेकर एवढा गोंधळून गेला आकृती ला ओळखताना ,की त्याने अशी काही विधाने केली की त्याचा वापर आपण नंतर करू शकणार आहोत.”

“ पण तो नंतर ते नाकारणार नाही कशा वरून? ” मैथिली ने शंका विचारली.

“ तो कोर्टात जे बोललाय ते सर्व कोर्टाच्या लेखनिकाने लिहून घेतलेले असते. म्हणजे सर्वच साक्षीदारांचे बोलणे नोंदवले जाते. त्यामुळे कोणीच तसे बदलू शकत नाही.”

मैथिली उठून उभी राहिली तेव्हा पाणिनी ने तिला जेवण्यासाठी थांबायचे निमंत्रण दिले पण मैत्रिणी बरोबर जायचे असे सांगून ती निघाली.

“ दोन वाजता पुन्हा कोर्ट चालू होईल तेव्हा येणार आहेस का ? ” पाणिनी ने विचारले.

“ नक्कीच येणार ”

ती गेल्यावर पाणिनी ओजस ला म्हणाला, “ कनक, त्या अग्नी रोधाकासमोर आकृती ने लावलेल्या तपन च्या गाडी बाबत काहीतरी चमत्कारिक गोष्ट आहे. ”

“ काय म्हणायचे आहे तुला ? ” ओजस ने भुवया उंचावल्या.

“ त्या पोलिसाने , प्रभाकर ने , रात्री नऊ वाजता त्या गाडीवर पाहिले समन्स लावले., हिर्लेकर ने आकृती ला गाडीतून उतरताना पाहिले.पण तो नक्की वेळ सांगू शकत नाही, रात्री बाराच्या आधी एवढेच मोघम सांगतोय.पण त्या समन्स मुळे आपल्याला कळलंय की ती गाडी रात्री नऊ च्या आधी लावली गेली होती. आता इथेच मोकळी जागा आहे.पोलिसांना सूचना होत्या की एखाद्या गाडीवर दोन किंवा तीन समन्स लावलेली दिसली तर गाडी उचलून न्यायची.प्रभाकर ची कामाची वेळ रात्री बारा ला संपली तेव्हा जाण्या पूर्वी त्याने एक समन्स रात्री नऊ च्या सुमाराला लावले होते.त्या नंतर रात्री बारा वाजता दुसरा पोलीस हजर झाला आणि त्याने आणखी एक किंवा दोन समन्स लावली आणि गाडी उचलून नेली जाईल याची व्यवस्था केली. आता माझा प्रश्न असा आहे की पहिल्याच पोलिसाने म्हणजे प्रभाकर ने गाडीला एकच समन्स का लावले? रात्री नऊ ला एक लावले मग काम संपवून जाताना आणखी एकदा रात्री बारा वाजता आणखी एक का नाही लावले? ”

“ अशा गोष्टी व्यवहारात होत असतात पाणिनी.” ओजस म्हणाला.

“ मी दैविक ने सांगितलेल्या गोष्टी स्वीकारून प्रभाकर आणि इतर पोलिसांची साक्ष आणि उलट तपासणी टाळली पण माझ्या या स्वीकृतीला एक कंगोरा आहे आणि दैविक च्या तो लक्षात नाही आला.कनक, तुझी माणसे कामाला लाऊन जरा माहिती घे की त्या गाडीवर एकूण किती समन्स चिकटवली होती आणि किती वाजता .” पाणिनी म्हणाला.

“ पाणिनी ,ओमकार केसवड ला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे तू उलट तपासणीत चव्हाटयावर का नाही आणलेस? ”

“ त्याचा आपल्याला उपयोग नसता झाला फार.त्याचे खच्ची कारण झाले असते पण आपल्या अशिला ने खून केलेला नाही हे त्यातून सिध्द कसे होणार? ”

“ कनक, तू जरा त्या माणसाचा खुनाच्या रात्रीचा ठाव ठिकाणा शोध. त्या स्पार्कस बाईकडे चौकशी कर की खरंच तो तिच्या बरोबर टी.व्ही. बघत होता का? ”

“ तू आणि सौम्या छान पैकी जेवा.मी मात्र तुझे काम करायला जातो.”

ओजस लटकेच रागाऊन म्हणाला.ओजस उठून गेला तेव्हा चाळीशीच्या घरातील एक बुटका आणि जाडगेला माणूस कोर्टात बसलेल्या लोकांच्या घोळक्यातून त्यांना ढकलत पाणिनी जवळ आला.त्याचे हात पॅण्ट च्या खिशात होते. “ मिस्टर पटवर्धन? ” त्याने विचारणा केली.

“ हो. कोण तुम्ही?” पाणिनी ने विचारले.

“ मी ओनिक केपसे.” तो म्हणाला. “ माझ्या सारखा व्यवसायात असणारा माणूस नेहेमीच आपला पाठलाग कोण करतोय का या बद्दल जागरूक असतो. त्याला कळले की पाठलाग होतोय की त्याला जाणून घ्यायचे असते की का कोतोय पाठलाग आणि कोण करतय.”

“बर मग? ” पाणिनी ने बेफिकीरपणे विचारले.

“ मला कळले की माझ्या मागे लावलेले गुप्तहेर हे तुम्हीच लावले आहेत आणि तुम्ही मला तपन च्या खुनात गुंतवायचा प्रयत्नात आहात.”

“बर मग? ” पाणिनी ने पुन्हा बेफिकीरपणे विचारले.

“ मग मी तुम्हाला सांगायला आलोय की असले प्रकार करू नका.”

माझ्या व्यवसायात मी काय करायचे आणि काय नाही हे मीच ठरवतो.माझ्या अशीलासाठी जे हिताचे असते ते मी करतो.” पाणिनी ने त्याच्याच भाषेत त्याला उत्तर दिले. “ तू घोड्यांच्या शर्यतीचा बुकी आहेस. तपन साठी तू पैसे लावतोस. आणि तुझ्यात आणि तपन मधे काहीतरी करार आहे की पाच हजार रक्कम होई पर्यंत पैसे लावत जायचे. पाच हजार झाले की तुला रक्कम मिळायची.”

“ असेल पण त्यात तुमच्या अशिलाला आरोपातून सोडवायला हा व्यवहार काय उपयोगी आहे? मला कशाला यात बळीचा बकरा करताय?”

“ मी बळीचा बकरा करत नाहीये.मी फक्त वस्तू स्थिती काय आहे ते शोधून काढतोय. आणि त्या मला शोधता आल्या तर माझ्या अशिलाच्या फायद्यासाठी मी त्या कोर्टात उघड करीन.” पाणिनी ने त्याला जाणीव करून दिली.

“ ही गोष्ट फारशी बरोबर ठरणार नाही.”

“ कुणासाठी ? ”

“ तुमच्या स्वास्थ्या च्या दृष्टीने.”

“ माझ्या तब्बेतीची काळजी मी घेईन.” पाणिनी म्हणाला. “ तू पाच तारखेच्या रात्री कुठे होतास याचे उत्तर देऊ शकला नाहीस तर तुझी तब्बेत बिघडेल. हे नक्की.”

“ मी तेच सांगायला तुमच्याकडे आलो होतो.”

“ मग आधीच का नाही सांगितलेस? माझ्या तब्बेतीबद्द्ल बोलत बसलास त्यापेक्षा ते सांगायचे ना ! ”

“ मी जुगार खेळत होतो.”

“ हे सिद्ध करता येईल तुला? ”

“ येईल , परंतु माझ्या बरोबर जी माणसे जुगार खेळत होती त्यांना त्यांचे नाव यात ओढले गेल्याचे आवडणार नाही. ”

“ तुला तपन कडून पाच तारखेला पाच हजार चा चेक मिळाला?”

“ हो.पाच तारखेला सकाळी दहा च्या सुमाराला.”

“ तुझे पूर्वीच्या देण्यातले पैसे त्यातून तुला मिळाले?”

“ मी म्हणेन की त्याची माझ्या कडे तेवढ्या रकमेने पत वाढली. ”

“ तू त्याच्यावर पाच हजार रकमे पेक्षा जास्त विश्वास ठेवत नाहीस? ”

“ मी कोणावरच पाच हजार पेक्षा जास्त रकमेचा धोका स्वीकारत नाही.”

“ तपन ने पाच तारखेला दुपारी पैसे लावायला सांगितले?”

“ हो ”

“ तो त्यात हरला की जिंकला? ”

“ त्याने काही फरक पडतो ? ”

“ मला वाटत फरक पडतो.माझा अंदाज आहे की त्यात त्याला मोठा फटका बसला आणि तुला त्याच्या कडून जुगार खेळण्यासाठी आणखी पाच हजार हवे होते.”

“ तुम्ही विनोद करताय का?”

“ म्हणून तू त्याला फोन केलास आणि सांगितलस की त्याला बराच तोटा झालाय आणि त्याचे तुझ्या कडे जमा असलेले पाच हजार आता संपलेत.त्यामुळे तुला आणखी पाच हजार हवे आहेत आणि ते घ्यायला तू येतो आहेस.कदाचित तू असेही सांगितलेस की संध्याकाळी तू जुगार खेळायला बसणार आहेस आणि तुला ही रक्कम रोख हवी आहे.” पाणिनी ने त्याच्यावर तोफ डागली.

“ छान कल्पना रम्य गोष्ट सांगताय. आता पुढचे ही सांगून टाका. मी काय केलं त्या नंतर?”

“ तू त्या आऊट हाऊस वर गेलास.”

“ दीड दमडीच्या पाच हजार रकमेसाठी?” तो गुरगुरला.

“ जुगारात तू हरला होतास आणि ती रक्कम तुला लगेचच द्यावी लागणार होती. त्या खेळात उधारी चालत नाही . तिथे तुझे आणि तपन चे वाद झाले आणि तू त्याच्या पाठीत चाकू खुपसलास ”

“ माझी तपन शी भांडणे होतील हे आधीच जाणून मी जातानाच चाकू घेऊन गेलो होतो असे म्हणायचं की काय तुम्हाला? “

“ तुला न्यायला कशाला पाहिजे चाकू? स्वयंपाकघरात होतेच की चाकू.” पाणिनी म्हणाला.

समजा तुमचा कयास खरा आहे ,असे क्षणभर मानले,तरी मी माझ्या कायमच्या ग्राहकाला पाच हजार एवढ्या लहान रकमेसाठी का भोसकीन? ”

“ त्याने पैसे द्यायला नाकारले म्हणून.”

“ तपन सारखा श्रीमान मुलगा फक्त पाच हजार रकमेला नाही म्हणेल?त्याला त्याची पत गमवायची नव्हती.घोड्याच्या शर्यतीत मी त्याचा बुकी होतो.त्याचा माझ्यावर विश्वास होता.जेव्हा तो जिंकत होता तेव्हा त्याला लागलेले पैसे मी इमानदारीत त्याला देत होतो.त्याच्या बापाला यातली काहीही माहिती नसायची.मी ते गोपानियच ठेवले होते आणि तपन ला हे माहित होते. अशा स्थितीत तो मला पैसे कसे नाकारेल? ”

“ कदाचित त्याने तुला चेक दिला असेल.” पाणिनी ने खडा टाकून पहिला.

“ ओह ! आता नवी कल्पना ! ”

“ कदाचित तुमच्यात बाई वरून वाद झाले असतील.” पाणिनी म्हणाला.

“ माझ्या धंद्यात बायकांना स्थान नाही.”

“ एखाद्या विशिष्ट बाई वरून.? ”

“ माझ्या जीवनात कोणत्याही बाईला किंमत नाही. तुम्हाला असं म्हणायचं की मला जुगारात पैसे कमी पडले म्हणून मी तपन कडे ते मागायला गेलो. तिथे तो म्हणाला की अरे केपसे आत्ताच एक तरुणी माझ्या ताब्यात आली होती पण मला गुंगारा देऊन ती पसार झाली. तू तिला शोध. पण असं कर की आम्लेट,बिस्किटे थंड होतील तर तू आधी माझ्या बरोबर खाऊन घे. त्यामुळे मला जुगारात हरलेले पैसे भरायची घाई असूनही मी त्याच्या बरोबर खात बसलो. किती हास्यास्पद आहे नाही का हे विधान आणि हा तर्क? ”

“ तुला बरीच माहिती दिसत्ये घडलेल्या घटनांची.” पाणिनी उद्गारला.

“ माझ्या धंद्यात, मला जेव्हा कोणी मला लटकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला सर्व माहिती जवळ ठेवावीच लागते.” केपसे म्हणाला.

“ मानल की तू सर्व माहिती जमा केलीस. आता मी सांगतो काय झालं असावं ते.तपन तुला म्हणाला असेल , केपसे,मला भूक लागली आहे.टेबलावर खाणे मांडले आहे.मी खायला सुरु करणारच होतो तेवढ्यात एक पोरगी मला गुंगारा देऊन गेली.मी तुला माझे खाणे झाले की चेक देतो.तुला भूक लागली असेल तर तू ही दुसऱ्या प्लेट मधील अंडी आणि मांस खाऊन घे.नसेल खायचे तर ते बाहेर टाकून दे.”

“ चालू दे तुमचा कल्पना विलास. नंतर काय झालं?”

“ तू मांस आणि अंडी खाल्लीस.मग तुमच्यात वाद विवाद झाले.”

“ मला चेक मिळाला की नाही ? ”

“ मिळाला चेक तुला.”

“ पाच हजार चा ? ”

“ पाच हजारचा ” पाणिनी म्हणाला.

“ चेक मिळाल्यानंतर माझा त्याच्याशी वाद झाला?”

“ तोच भाग मी तपासून बघतोय.” पाणिनी म्हणाला.

“ तुम्ही काय शोधून काढायचे आणि कसे काढायचे तो तुमचा प्रश्न आहे.पण मी एवढेच सांगतो मी त्याच्याकडे गेलो नाही.जास्तीचे पैसे मागितले नाहीत किंवा वादही झाले नाहीत.मला एकच चेक त्या दिवशी मिळाला तो सकाळी दहा च्या सुमारास. तुम्हाला समजेल की तो चेक मी दुपारी दोन च्या सुमाराला बँकेतून वटवला. पाच तारखेला. आणखी एक ऐका, मी जेव्हा जुगार खेळायला बसतो तेव्हा माझ्याकडे पैसे असतात म्हणून बसतो.भीक मागत फिरावे लागत नाही मला. तुमची तुम्ही स्वत:ची एक बाजू माझ्या समोर अत्ता मांडली आहे.ती सर्वांसमोर चव्हाट्यावर आणण्यापूर्वी त्यातली सत्यता तपासा आणि पुरावे पण गोळा करा.”

“ मला नको सांगू कायदा कसा हाताळायचा ते.तुझ्या बरोबर कोण जुगाराच्या खेळात होते ते मला सांग.मी खात्री करून घेईन.तुझे खरे ठरले तर तू सुटशील.मला कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकाऊन त्याचे नुकसान करायचे नाही.” पाणिनी म्हणाला.

“ मी आधीच सांगितलंय की माझ्या बरोबर असलेले लोक यात ओढले जाता कामा नयेत.”

“ ते काहीही असले तरी मला असा विश्वास वाटतोय की तू तपन ला फोन केला असला पाहिजेस.”

“ का वाटतय तुम्हाला असे? ”

“ मी त्या आधी तुला विचारतो, तपन तुला हाक मारताना काय नाव घेऊन हाक मारत असे? तुझे पहिले नाव घेऊन की तुझ्या आद्याक्षरावरून.?”

“ मला पहिल्या नावानेच म्हणजे ओनिक नावानेच कायम हक मारत असे.”

“ तो तुला कधीही ओके असे म्हणायचा नाही?”

“ कधीच नाही.” पाणिनी च्या डोळ्याला डोळे भिडवून तो म्हणाला.

“ ठीक तर मग.तुझ्या बरोबर जुगारात असलेल्या माणसांची यादी दे.मी हे काम सावधपणे करीन.”

“ मी असले काहीही करणार नाही.माझ्या धंद्यात मी असे काही करत नसतो. तुमच्या भल्यासाठी मी वस्तुस्थिती सांगितली आहे.”


पाणिनी पटवर्धन ने आपल्या कोटाच्या खिशात हात घातला आणि कोर्टाचा शिक्का असलेले एक दस्त बाहेर काढले. त्यावर पेनाने ओनिक केपसे असे नाव लिहिले आणि ते केपसे ला दिले.

“ हे काय आहे? ”

“ कोर्टाच्या शिक्क्याचा समन्स म्हणजे, आदेश आहे हा.आज दुपारी दोन वाजता सरकार पक्ष विरुद्ध आकृती या खटल्यात बचाव पक्षातर्फे साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी.”

केपसे चा चेहेरा काळवंडला. “ मी वारंवार सांगत होतो आणि चांगल्या भाषेत सांगत होतो ”

“ मी पण तुला वारंवार सांगत होतो आणि चांगल्या भाषेत सांगत होतो की तुझ्या बरोबर जुगारात बसलेल्या माणसांची यादी मला दे.”

“ तुम्ही थापाडे आहात.कुठलाच हुशार वकील प्राथमिक सुनावणीत बचाव पक्षातर्फे पुरावा सादर करत नाही.”

“ तुला मी समन्स काढलाय.अत्ता दोन वाजता कोर्टात हजर राहायला लागेलच तुला. मी थापाड्या आहे की नाही तुला कोर्टात दिसेलच.”

“ थांबा ,थांबा. आपल्या दोघात काही गैरसमज नकोत.” केपसे म्हणाला.

“ तुला कोर्टात हजार राहण्यापासून तात्पुरती सुटका हवी असेल तर मला बऱ्या बोलाने यादी दे.” पाणिनी ने दम भरला.

केपसे ने आपल्या खिशातून एक वही बाहेर काढली आणि त्यावर काहीतरी लिहायला सुरुवात केली. “ ही पाच नावे तुम्हाला दिली आहेत.” वहीचे पान टरकाऊन पाणिनी ला देत केपसे म्हणाला. “ तुम्हाला मी ही माहिती दिल्याचे त्या लोकांना आवडणार नाही ,पण तुम्ही गुप्तपणाने आणि त्यांची नावे चव्हाट्यावर न आणता माहिती मिळवलीत तर मी कुठे होतो ते ही माणसे सांगतील. या पाचपैकी दोन माणसांच्या नावापुढे मी एक खूण केली आहे.त्यांच्या पासून सुरुवात करा.ते मुरलेले जुगारी आहेत आणि त्यांना त्यांची नावे बाहेर आली तरी फरक पडणार नाही. उर्वरित तीन जण हे मोठे व्यावसायिक आहेत आणि त्यांना असं वाटतंय की ते चांगले जुगारी आहेत ”

“ ते हरलेत जुगारात? ”

“ हरलेत.”

“ आणि तू जिंकलास, तुझ्या बरोबरचे दोन जण, ज्यांची नावे तू अत्ता मला दिलीस ते जिंकले. ”

“ तुमचं कोण जिंकल कोण नाही याच्याशी काहीच देण घेण नाही खर म्हणजे.पण आहे असे तुम्हाला वाटत असेल तर एवढेच सांगतो की आम्ही जिंकलो.”

“ या गोष्टीला प्रसिध्दी का द्यायची नव्हती तुला ते आता माझ्या लक्षात आलंय.” पाणिनी म्हणाला.

“ यात्यामुळे मी गुन्हेगार ठरतो असे नाही ”

“ तू तिथे जुगार खेळात असशील आणि तिथून बाहेर पडला नाहीस याची मला खात्री झाली की बस्स.मला बाकी काही नकोय. तू जरी ते सिध्द करू शकला नाहीस तरी मी माझ्या तपासातून सत्य समोर आणीनच. त्या नंतर तुला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात खेचायचे की नाही ते ठरवीन. ”

“ मी ऐकले होते की तुम्ही सरळसोट माणूस आहात आणि समोरासमोर वार करता.त्याचा अनुभव आला मला आज,अत्ता. तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती काढा आणि तुमच्या लक्षात येईल की मी स्वच्छ आहे.”

इतका वेळ खिशात घातलेला हात त्याने अचानक बाहेर काढला.पाणिनी शी हस्तांदोलन केले.

“ तुला त्या दिवस भरात एकदाच आणि एकच मिळाला होता तपन कडून?”

“ एकच. सकाळी दहाच्या सुमाराला.वाटेत थांबून त्याने मला दिला होता.आणि दुपारी त्याने घोड्यावर पैसे लावले.आता आपण आपले पत्ते एकमेकांना दाखवतोय म्हणून पुढचे ही स्पष्ट सांगतो, की तो त्या घोड्यावर जिंकला. फार नाही पण बऱ्यापैकी.तो जिवंत असता तर त्याला पैसे मिळाले असते.”

“ आणि जिंकल्यावर सुद्धा नाही मिळणार त्याला आता?” पाणिनी ने विचारले.

“ मी कशा साठी स्वतः हून कुणाला सांगत येऊ की मी बुकी आहे आणि तपन ला पंधराशे देणे लागतो म्हणून? ”

“ एवढी रक्कम होती?” पाणिनी ने विचारले.

“ जवळ जवळ.” केपसे म्हणाला.

नंतर सौम्या कडे पाहून म्हणाला, “ मला तुझ्या समोर पटवर्धन शी या पद्धतीने आणि या विचित्र वेळेला बोलावे लागले या बद्दल माफ करा.परंतू तुम्हीही मान्य कराल की पटवर्धन सारख्या माणसाशी बोलायचे असेल तर अशीच संधी शोधावी लागते.तुमचेआज दुपारचे नियोजन काय होते मला माहित नाही परंतू मी आगांतुकासारखा मधेच घुसलो. ” एवढे बोलून तो निघून गेला.

पाणिनी ने सौम्या कडे पहिले. “ तुमच्या बायकी शास्त्रा प्रमाणे तुझं अंतर्मन काय म्हणतयं ? ”

“ मला वाटतय की तो खरं बोलतोय. विशेषतः जेव्हा तो म्हणाला ना की, तपन त्या घोड्यावर जिंकला.आणि तो जिवंत असता तर त्याला पैसे मिळाले असते म्हणून या वरून मी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. ” सौम्या म्हणाली.

“ मला ही तसच वाटतय. आपण कनक ला पहिले सांगूया की त्या जुगारात बसलेल्या माणसांची माहिती काढ.ओके एवढेच शब्द चेक च्या काउंटर वर लिहिलेल्या गोष्टीला एकंदरीत मोठेच महत्व येणार असे दिसतंय.”

“ कदाचित आपण समजतोय तसे ओके हे शब्द माणसाच्या नावाची आद्याक्षरे नसतीलही. काहीतरी कोड्यातील अर्थ असेल त्याचा.” सौम्या म्हणाली.

“ मग ते कोडे सोडवायलाच लागेल आपल्याला.” पाणिनी म्हणाला. पण त्या आधी आपण खावून घेवू काहीतरी.” पाणिनी म्हणाला.
भाग १२ समाप्त.