"बाबा, ओ बाबा, मी शाळेत जातेय, दुपारी वेळेवर जेवण करून घ्या हा... " सोनू शाळेत जात असतांना शेतात काम करत असलेल्या बाबांना आवाज देत बोलली.
"हो पोरी, जेवेन मी वेळेवर आणि तू पण शाळेत व्यवस्थित जा आणि स्वतःची काळजी घे, बरं का... " बाबा म्हणाले.
"हो बाबा, घेईन काळजी, बरं येते मी" एवढं बोलून सोनू शाळेत निघून गेली.
अवघ्या ११ वर्षांची असतानाच सोनूची आई दीर्घ आजाराने तीला कायमची सोडून देवाघरी गेली होती. सोनू एकुलती एक मुलगी, पण तिच्या आईवडीलांनी सोनूला खूप चांगले संस्कार दिले होते. पोटापुरते कमावता येईल इतकी त्यांची शेतीभाती होती. आई गेल्यापासून तीचे बाबाच तीचा सांभाळ करत असत. घरातली कामं तसेच शेतीची कामे देखील ते कुठलीही तक्रार न करता करत असत. सोनू लहानपणापासूनच खूप समजदार होती, म्हणून तीला आपल्या बाबांची दगदग समजत होती. तीला खूप वाईट वाटत होते.
पावसाचे दिवस जवळ येत होते. शेतात कामं पण भरपूर होती म्हणून सोनूला बाबा म्हणाले की, "सोनू, शेतात कामं बरीच आहेत, मला शेतातून यायला थोडा उशीर होईल म्हणून तू घरातच रहा, मी आल्यावर भाकरी बनवेन बरं का". "हो बाबा, ठिक आहे " सोनू म्हणाली.
संध्याकाळ झाली. सोनूने पाहिलं की अंधार होत आलाय तरीही बाबा शेतात काम करत आहेत. बाबा कधी येणार आणि कधी जेवण करणार. बाबा खूप थकलेले असणार, तीला बाबांची खुप काळजी वाटली. मग तिने विचार केला, की मीच भाकरी बनवली तर, बाबांचा त्रासही थोडा कमी होईल आणि बाबांना आरामही मिळेल.
आई आणि बाबा जेवण करत असताना ती चुलीजवळ बसून व्यवस्थित लक्ष देऊन पाहत असे. म्हणून तिने चूल पेटवली, एका परातीत पीठ घेऊन थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं. छान पिठाचा गोळा तयार केला. तीला मज्जाच वाटली आणि तीने आनंदाने जोराची टाळीच वाजवली. मग हळूहळू तीने भाकरी थापायला सुरुवात केली, पण भाकरी काही गोल होईना. ती थोडी नाराज झाली. आईसारखी गोल भाकरी कशी बनवता येईल याचा विचार करता करता तीला एक मजेशीर कल्पना सुचली. तीने एक ताट घेतलं आणि थापलेल्या भाकरीवर ते ताट दाबलं आणि भाकरीचा गोल आकार बघून ती खुश झाली. आणि अशाच प्रकारे तीने बाकिच्या भाकर्या पण बनवल्या. पण भाकरी शेकत असताना तीला बर्याचदा हाताला चटके लागले. आणि तिच्या तोंडून आपसुकच "आई" हे शब्द बाहेर निघाले. आणि आईच्या आठवणीने तीच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले. ती विचार करू लागली. खरंच आई जेवण करत असताना तीच्याही हाताला असेच चटके लागत असतील ना, पण तीने ते कधीच दाखवलं नाही.
एके दिवशी आईच्या हाताला लागलेल्या चटक्यांचे ते काळे डाग पाहून सोनूने तीला विचारले की, "आई, तुझ्या हाताला हे काळे डाग कसले आहेत गं?" तेव्हा आईने तिला सांगितले की, "चुलीवर भाकरी बनवत असताना हे चटके हाताला लागत असतात, त्याचेच हे काळे डाग आहेत".
मग सोनूचा आईला निरागस प्रश्न हा की, "आई, मला लागलं की मी लगेच ओरडते, रडते. मग तुझ्या हाताला चटका लागल्यावर तू का ओरडत नाहीस?" सोनूच्या या प्रश्नावर आई खळखळून हसायला लागली. आणि आई तिला म्हणाली, "सोनूबाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जगात कुठलीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय मिळत नाही, आज तु एखाद्या गोष्टिसाठी कष्ट करशील पण पुढे तुला त्यातुनच आनंद मिळेल, सुख मिळेल".
"ते कसं काय गं आई? तुला हाताला चटके लागतात, त्याच्यात कसं काय आलं सुख आणि आनंद? " सोनूने आईला विचारलं.
"सोनू, आपण भाकरी भाजत असताना हाताला चटके बसत असतात, पण त्याच भाकरीने आपल्या माणसांचं पोट भरल्यावर तो तृप्तीचा ढेकर देतो ना, तेव्हा त्याला बघून आपल्याला आनंद होतो, आणि त्या सुखाला जगातील कुठल्याही सुखाची तोड नाही बाळा, आपलं मनही समाधानाने भरतं." छोटीशी सोनू आईकडे फक्त बघत राहते. हे आठवत असताना सोनूच्या डोळ्यांतून अश्रू आले.
अचानक तीच्या हाताला चटका लागला तशी ती आईच्या आठवणीतून बाहेर आली. आणि तीने बनवलेली भाकरी भाजी व्यवस्थित झाकून ठेवली. ती आज स्वतःवरच खुप खुश झाली होती. तीने आपल्या बाबांचा त्रास थोडा कमी केला होता. आणि दारात बसून ती बाबांची वाट बघू लागली.
एवढ्यात सोनूला बाबा येताना दिसले. त्यांनी हातपाय धुतले आणि म्हणाले, "सोनू, भूक लागली असेल ना बाळा, आज मला खुपच उशीर झाला बघ, पटकन भाकरी टाकतो तुझ्यासाठी." सोनू बाबांना बघून फक्त हसत होती. त्यांनी घरात येऊन पाहिलं तर जेवण तयार होतं. त्यांना आश्चर्यच वाटलं. ते तिच्याकडे बघत म्हणाले, "सोनू, भाकरी भाजी तू बनवलीस."
"हो बाबा, तुम्ही खाऊन बघा ना, कशी बनवलंय ती." सोनू आनंदाने म्हणाली.
"अगं पण मी आल्यावर बनवली असती ना, चुलीत भाजलं असतं तर तुला?" बाबा काळजीने म्हणाले.
"नाही बाबा मी अगदी ठीक आहे. बाबा आई होती तेव्हा आईने तुम्हाला चुलीवर काहीच करू दीलं नाही. सगळं आईच करायची पण आता आई गेल्यानंतर तुम्ही सगळंच करता. मला कुठल्याच गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः इतके कष्ट करता. किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर. बाबा तुमची सगळी दगदग मला कळते. आई मला एकदा म्हणाली होती की, या जगात कुठलीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. त्यावेळेला आईच्या बोलण्याचा अर्थ मला कळला नव्हता. पण आज त्या गोष्टीचा खरा अर्थ मला कळला बाबा.
आणि मुलीचे हे सर्व ऐकुन बाबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. आणि तीला मायेनी जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या मनात विचार आला की, माझी मुलगी इतकी मोठी कधी झाली हे मलाच कळले नाही, आणि त्यांना रडताना हुंदकाच आला.
सोनूने बाबांचे गालावरचे अश्रू पसले आणि बाबांना जेवायला वाढले. त्यांनी पाहिले की भाकरी अगदी गोल चंद्राच्या आकाराची बनवलंय. सोनूने बाबांना आवाज दिला, "बाबा, भाकरी खाऊन बघा ना कशी झालंय ते." तसं त्यांनी एक घास खाल्ला, सोनू बाबांच्या तोंडाकडे बघत होती, पण बाबा शांतपणे जेवत होते.
बाबा म्हणाले, "सोनू, खुप छान जेवण केलंय तू बाळा, बरं का." हे ऐकून तीला खूप आनंद झाला, पण तीने पहिला घास तोंडात टाकताच तोंड वाकडे केले. तीने लगेच बाबांना विचारले,"बाबा, तुम्ही खोटं बोललात ना मला. भाकरी थोडी कच्चीच आहे आणि भाजी पण खारट झालंय मग जेवण छान झालंय असं का म्हणालात.?"
"बाळा, आपल्यासाठी कोणी काही प्रेमाने करत असेल ना, तर त्याला नावं ठेऊ नये. त्यामागे त्याचं प्रेम असतेच पण त्याने तेवढे कष्टही घेतलेले असतात." बाबा तिच्या हातांकडे बघत बोलले. मग सोनूनेही जेऊन घेतले.
मग बाबांनी सोनूचे दोन्ही हात हातात घेतले आणि हातांना तेल लावून दिले. बाबांना अगदी गहिवरून आलं हे तीने पाहिले,"बाबा, तुम्हाला माहिती का मी चंद्रासारख्या गोल गोल भाकर्या कशा बनवल्या ते आणि तीने बाबांना सगळं सांगितलं. तसे बाबा जोरजोरात हसू लागले आणि त्यांच्यासोबत सोनूही हसायला लागली.
"खरंच आईबाबांच्या कष्टाला मोल नसते, ते अनमोल असतात, हेच सत्य आहे..."
---समाप्त---
🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹
💞💞---बापलेकीचं प्रेम---💞💞
➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️