आम्ही नुकतीच फोर व्हीलर घेतली होती.मुख्य म्हणजे मी महिन्याभरातच गाडीवर बऱ्यापैकी हात साफ करून घेतला होता. आत्मविश्वास दुणावला होता की आपण कार घेवून लाँग ड्राईव्ह करू शकतो. त्यामुळे मी आणि अनिल ने जवळचेच वन नाईट स्टे आणि दुसऱ्या दिवशी परत घरी येवू असे स्पॉट्स शोधायला सुरुवात केली. नुकताच पावसाळा संपत आला होता . बाहेरचे वातावरण लाँग ड्राईव्ह साठी एकदम झकास होते. बरीच शोधाशोध केल्यावर आम्ही जव्हार जायचे ठरवले. कांदिवली वरून अगदी १२०-१३० कि.मी. असल्यामुळे मला गाडी चालवण्यासाठी पण सोयीस्कर.
आता डेस्टिनेशन तर फायनल झाले. राहायचे कुठे? हा पुढचा प्रश्न. लगेच गुगल ची मदत घेतली. जव्हार हा आदिवासी भाग असल्यामुळे तुम्हाला खूप लक्सरी स्टे मिळणार नाहीत पण जे आहेत ते सुद्धा चांगले आहेत.आम्ही सगळे रिव्ह्यू वाचल्यावर' प्रकृति ॲग्रो फार्म ' इथे रहायचं ठरवलं. त्यांच्या साईटवर जावून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला. श्री. रुपेश आणि उज्ज्वल भाटड हे दोन भाऊ हे फार्म हाऊस चालवतात. त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती दिली. रूम चार्जेस किती, त्यात काय काय समाविष्ट आहे, आजूबाजूला बघण्यासारखं काय आहे. रुपेश ने दिलेल्या माहितीवरून आम्ही दोन दिवसांचा छान प्लॅन बनवला.
दिवस खूप कमी होते. अगदी ऑन द स्पॉट ही ट्रीप ठरवल्यामुळे पटापट सगळ्या तयारीला लागलो. सगळ्यात अगोदर आमचे मेकॅनिक राजू भाई यांच्या कडून गाडीची नॉर्मल चेकिंग करून घेतली. त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर पुढची तयारी सुरू केली. कपड्यांची पॅकिंग, छत्री, रेनकोट . जव्हारसाठी कोणता मार्ग घ्यायचा याची दोन तीन जणांशी चर्चा केली. विक्रमगड मार्गे जायचं की चारोटी मार्गे. दोन्ही बाजूंनी रस्त्याची कंडीशन सारखीच आहे. फक्त चारोटी मार्गे कि.मी.वाढतात आणि एक टोल नाका पण लागतो. म्हणून आम्ही विक्रमगड मार्गे जायचं ठरवलं. अजून एक महत्वाचं, माझी पहिलीच लाँग ड्राईव्ह असल्यामुळे आम्ही खबरदारी म्हणून बरोबर ड्रायव्हर घ्यायचं ठरवलं. राजू भाईशी या संदर्भात चर्चा केली तर " मेरा भाई ड्रायव्हर हैं आप उसे लेके जाना" असं त्यांनी सुचवलं. अजून एक प्रश्न मार्गी लागला. मी, आर्या आणि अनिल आमच्या स्वतःच्या गाडीतून पहिल्या लाँग ड्राईव्ह साठी तयार झालो. मनातून खुश होते.पण आतून मी थोडी घाबरले होते. मला जमेल का येवढं लांबच ड्रायव्हिंग !
ड्रायव्हर ला रात्री रिमाईंडर देवून मी झोपी गेले. सकाळी सगळे अगदी वेळेवर तयार झाले. बॅगा गाडीत ठेवल्या.मी घरातून निघण्याच्या आधी देवासमोर निरंजन लावले. तशी कुठेही प्रवासाला निघण्यापूर्वी निरंजन लावण्याची सवयच आहे मला, पण आज अजून थोड मनापासून देवासमोर हात जोडले.
ड्रायव्हिंग सीटवर बसून सगळ नीट चेक केलं. साइन बोर्ड वर काही साइन नाही आहे ना हे आधी बघितलं आणि मी आमच्या पहिल्या लाँग ड्राईव्ह साठी निघाले. मुंबईत गाडी चालवली असल्यामुळे मला तेवढी भीती वाटत नव्हती. अनिल नंतर मला सांगत होता, माझ्या बाजूला बसलेला ड्रायव्हर अनिल ला थोडा टेन्शन मध्ये वाटत होता. त्याला बहुतेक भीती असावी की ही बाई गाडी नीट चालवेल ना. नाहीतर कुठे तरी नेवून ठोकायची. अनिल पाठी बसून त्याची गंमत बघत होता. अनिलला माहित होते की मी स्लो जाईन पण कुठे ठोकणार नाही. माझं सगळं लक्ष मात्र ड्रायव्हिंग वरती होत. कधी उजवा आरसा, कधी डावा तर कधी फ्रंट मिरर बघत काळजीने गाडी चालवत होते. कोणाला कट मारायच्या अजिबात भानगडीत न पडता एक लेन पकडून आमची गाडी पुढे चालली होती. अगदीच वेळ आली तर लेन बदलत होते. कांदिवली, बोरिवली, दहिसर नंतर फाऊंटन हॉटेल वरून डावीकडे वळून मी अहमदाबाद हायवे वर गाडी घेतली. मुंबईच्या ट्रॅफिक मधून थोडी सुटका मिळाली. आता गाडी सुसाट जात होती. वसई आल्यावर मात्र ड्रायव्हर मला बोलला," मॅडम, अब मैं गाडी चलाता हुं"त्याला खरचं भीती वाटत असणार असं वाटलं. मी गाडी साईड ला घेवून त्याच्या हातात दिली आणि रिलॅक्स बसले.
अहमदाबाद हायवे वर मनोर नाका आला की आपण उजवीकडे वळतो. आम्ही टर्न घेऊन थोडा वेळ तिथे थांबलो. एकतर सकाळ पासून काहीच खाल्ले नव्हते. पोटात कावळे ओरडायला लागले होते. आता पुढचा प्रवास थोडा ग्रामीण भागातून असल्यामुळे पुढे कुठे नाष्टा मिळेल की नाही याची खात्री नव्हती त्यामुळे आम्ही इथेच वडापाव आणि चहा वर पोट भरून घेतलं. तिथे जास्त वेळ न रेंगाळता आम्ही निघालो. आता परत गाडीचा ताबा मी घेतला. रस्ता बऱ्यापैकी सुस्थितीत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेलं निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं होत. भात इथलं मुख्य पीक असल्यामुळे हिरवीगार भाताची शेती नजर जाईल तिथवर पसरलेली होती. झुळझुळ वाहणारा स्वच्छ पाण्याचा ओढा मध्येच लक्ष वेधून घेत होता. अनिल पाठीमागून सतत बोलत होता कुठे तरी थांबुया .पण गाडी साईड ला लावण्यासारखा रस्ता भेटत नव्हता. थोडे पुढे गेल्यावर रस्ता थोडा रुंद वाटला . गाडी रस्त्याच्या बाजूला लावून आम्ही फोटो शुटसाठी उतरलो. अगदी सिनेमात दाखवतात तसाच रस्ता होता. दोन्ही बाजूला वड पिंपळाची झाडे, त्या झाडांची रस्त्यावर पडलेली दाट सावली ,उन्हं असली तरी थंडावा देत होती. आम्ही रस्ता सोडून थोड खाली भाताच्या शेतात उतरून मनसोक्त फोटो काढले. रस्त्यावर उभे राहून फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही फक्त येणा - जाणाऱ्या वाहनांची काळजी घेतली तर काहीच प्रॉब्लेम नाही. मनासारखे फोटो काढून तिथलं निसर्ग सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेरात बंदिस्त करून आम्ही गाडीत बसलो. एक तासभर तरी लागणार होता जव्हार पोहचेपर्यंत. जव्हार येई पर्यंत खूप सारे स्पॉट्स असे आहेत की तुम्हाला कार मधून उतरायला भाग पाडू शकतात. वेळ असेल तर तुम्ही तेही एंजॉय करू शकता. आम्ही मात्र अजून एकाच ठिकाणी थांबलो. तो एक नदीवर असलेला ब्रिज होता. नदीचं नाव मला माहीत नाही पण नदीचं पात्र मोठं होत आणि नदीच्या पात्रात उतरायला साईडने पायवाट आहे. आम्ही त्या लोकेशनचा पुरेपूर फायदा उठवत भरपूर फोटो काढले.
आता मात्र कुठेही थांबायचं नाही असं ठरवलं. मॅपवर प्रकृती ॲग्रो फार्म जवळच आल्याचं दाखवत होत. आपण मनोर नाक्यावरून सरळ सरळ आलो होतो. गूगल मॅप किंवा स्थनिकांच्या मदतीने आपण सहज प्रवास करु शकतो. आदिवासी भाग असला तरी लोकं को -ऑपरेटिव्ह आहेत . मनोर नाका - सावरखिंड - चिंचघर - विक्रमगड -साखरे असं करत करत काशिवली बस स्टॉप वरून आम्ही राईट घेतला आणि तिथून दहा मिनिटात आमच्या हॉटेलला पोहचलो.